मी आणि माझा पासपोर्ट

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

पासपोर्टाचे आता काही अप्रूप राहिलेले नाही. खरा खोटा कुणाकडेही असतो.एखादेवेळेस रेशनकार्ड मिळवणे (तूम्ही दुष्मन देशाचे नागरीक असाल, किंवा काही खास धर्माचे असाल, किंवा काही खास राजकीय पक्षाशी संलग्न असाल, ते सोडा ) मुष्कील असेल, पण पासपोर्ट काय, कुणालाही मिळतो.
सध्या माझ्याकडे तीन तीन पासपोर्ट आहेत. (नाही हो, अजून माझे शेजारी देशांशी, तितके जिव्हाळ्याचे संबंध नाहीत.)

आणि या तीन पास्पोर्टांच्या तीन तहा आहेत.

शिक्षण वगैरे पूर्ण झाल्यावर, माझा तसा काही परदेशी जायचा विचार नव्हता. पण मिळतोय तर का सोडा, म्हणून मी पासपोर्टासाठी अर्ज केला. त्यावेळी रंगीत फ़ोटू म्हणजे चैन असायची. आणि ते सहसा मिळायचेही नाहीत. माझ्या बहिणीच्या लग्नाचे रंगीत फ़ोटॊ, धुवून मिळायला चक्क दोन महिने लागले होते. (१९७९ सालची गोष्ट. त्यावेळी व्हीडीओची सोयच नव्ह्ती. तिच्या लग्नाची चक्क फ़िल्म काढली होती. )
त्यावेळी पासपोर्टचे कार्यालय वरळीला होते. (मुंबईतील १९९२ सालच्या बॊम्बस्फ़ोट्मालिकेच्या कितीतरी आधीची गोष्ट ही. ) बसमधून जातायेता, तिथली भलीमोठी रांग दिसायची. लोक अगदी पहाटेपासून रांग लावून असायचे. पण त्याच दरम्यान ३० दिवसात पासपोर्ट द्यायचा नियम पण आला होता. त्यावेळी एजंटच सगळे काम करायचा. फ़ी अगदी माफ़क म्हणजे, १०० रुपयेच (त्या काळातले बरं ) होती. तर वरळीच्याच एका एजंटकडे मी माझी कागदपत्र दिली. त्यावेळी मूळ प्रती पण, द्याव्या लागत
नसत. (कित्ती सोप्प होतं नाही सगळं, त्या काळी ) आणि मी चक्क विसरुन गेलो.

महिनाभराने, त्या एजंटने पासपोर्ट घरी आणून दिला. त्यावेळचा माझा फ़ोटॊ, अगदी फ़ोटॊ काढण्यासारखा आहे. तरुण वय (त्या काळी हो ) त्यावेळी मिश्या, खाली वळलेल्या अशी फ़ॆशन होती. (बघा डॆनी वगैरेंचे जूने सिनेमे.) फ़ोटो काळापांढराच आहे, पण निदान स्पष्ट तरी आहे. (पुढच्यांची कथा ऐकाच ). हा पासपोर्ट मिळाल्यावर दोन वर्षे पडूनच होता. त्या दोन वर्षात फ़ॆशन तर
बदललीच पण माझा चेहरा पण बदलला. माझे त्यावेळचे वजन फ़क्त ५८ किलो होते. (पुढे मस्कतला गेल्यावर काहि महिन्यातच ते ७६ किलो झाले ) पहिल्यांदा देशाबाहेर गेलो, त्यावेळी इमिग्रेशनवाला, माझ्याकडे अर्धामिनिट बघतच राहिला. मीच तो, अशी खात्री पटल्यावरच त्याने शिक्का मारला.
त्यानंतर माझी भटकंती सुरु झाली. स्वित्झरलंड्ला तर प्रत्येकवेळी मुंबईच्या विमानासाठी चेक ईन करताना, तुझ्याकडे भारताचा व्हिसा आहे का, असे विचारत असत. मला कळेना असे का ते (मग माझ्या एका ओमानी मित्राने सांगितले कि माझा तोंडावळा जॊर्डनीयन लोकांसारखा आहे, ऐकावे ते नवलच.)
असे करता करता, पासपोर्ट एक्स्पायर व्हायची तारीख जवळ आली. आणि मी होतो नेमका नायजेरियात.

मला भारतात असे सांगण्यात आले होते कि, नायजेरियात भारताचा दूतावास आहे. आणि तिथे नवा पासपोर्ट मिळू शकेल. पण प्रत्यक्षात तिथे मात्र, निदान माझ्या कंपनीत तरी कुणालाच याची कल्पना नव्हती. त्यात मी होतो, फ़्रेंच कंपनीत, शिवाय बदनाम पोर्ट हारकोर्टला.

शेवटी माझ्या एका ब्रिटीश मित्राने चौकशी केली (त्या काळात इंटरनेट वगैरे नव्हते हो) आणि मला भारतीय दूतावास नायजेरियात असल्याची बातमी दिली. (पण तो अबूजाला आहे कि लागोसला आहे, याची त्यालाही खात्री नव्हती.) मग त्याच्या एका मित्राने, मला अर्ज आणून दिला.
आता परत फ़ोटो काढणे आले, आणि ते सुद्धा पोर्ट हारकोर्टमधे. माझा चालक इझे आणि मी अशी वरात भरदुपारी निघाली. भर दुपारी निघायचे कारण, फ़ोटो उन्हात काढणे गरजेचे होते. आता म्हणाल उन्हात का ? तर तिथे लाइट नसते, त्यामुळे फ़्लॆश वगरे कसा पाडायचा (थोडक्यात सगळाच उज्जेड ) नायजेरियातील वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीचे नाव नेपा (म्हणजे नायजेरिया इलेक्ट्रिकल
पॊवर अथोरिटी, पण तिचा लोकप्रिय अर्थ, नेव्हर एक्स्पेक्ट पॊवर अगेन. जगाच्या तेल साठ्यांपैकी ५ % साठा त्या देशात असूनही, तिथे तेलाचा आणि वीजेचा प्रचंड तुटवडा आहे. )

हा फ़ोटोवाला नको, याच्याकडचा कॆमेरा चांगला नाही. तो नको, त्याच्या कडे स्वत:चा कॆमेरा नाही, असे इझेचे चालले होते. मग अचानक त्याने गाडी घराकडे वळवली, का तर म्हणे मी पांढरा शर्ट घातलाय. त्याने मला त्याच्या पसंतीचा शर्ट घालायला लावला. शेवटी सगळे जूळवून आम्ही फ़ोटॊ काढायला गेलो, तर जोरदार पाऊस. पोर्ट हारकोर्टला, कडक उन्हात पाऊस पडू शकतो.

अर्धा पाऊण तास वाट बघितल्यावर, एकदाचा पाऊस थांबला, पण स्टुडीओच्या अंगणात पाणीच पाणी झालेले. मग त्याने मला स्टूलावर उभे केले. तोंडावर कडक उन. त्या डगमगत्या स्टूलावरुन पडेन कि काय अशी भिती. पण एकदाचा फ़ोटॊ निघाला.
कॆमेरा डिजीटल वगैरे नसल्याने, काय ते दोन दिवसानी कळेलच, असा विचार करत आम्ही निघालो.
दोन दिवसानी, इझे फ़ोटॊ घेऊन आला. ओईबो (माझे तिथले टोपणनाव ) फ़ोटो किती छान आलाय बघ, असे म्हणत त्याने माझ्यासमोर फ़ोटॊ ठेवले. मला न सांगताच, त्याने त्यातले दोन फ़ोटॊ स्वत:साठी ठेवले. मी ते बघितले आणि कपाळावर हात मारुन घेतला. कारण फ़ोटॊत माझे डोळे चक्क मिटलेले आहेत.
परत फ़ोटॊ काढू म्हंटले तर तेवढा वेळ नव्हता. माझ्या ब्रिटिश मित्राची, करेबियन मैत्रिण म्हणाली, कि इराकमधे, तर बायकांच्या पासपोर्ट वर, बुरखा घेतलेले फ़ोटॊ असतात. आता तिला काय सांगू, कि आम्ही भारतीय आहोत, आमच्यात बुरखा घेत नाहीत म्हणून. बरं मित्रासमोर वाद घालण्यात अर्थ नव्हता, कारण तोच माझा अर्ज घेऊन जाणार होता.

शेवटी भारतीत दूतावासातील लोकांच्या शहाणपणावर विश्वासून, अर्ज त्याच्या हाती दिला.तो खात्रीने अस्वीकृत होऊन परत येईल आशी खात्री होती.
पण कसचे काय ? आठवडाभराने, तो माझा पासपोर्टच कि हो घेऊन आला. पुढची दहा वर्षे, मी तो पासपोर्ट मिटल्या डोळ्याने वापरला. परत माझी भटकंती सुरुच.

आता परत नवीन पासपोर्ट घ्यायची वेळ आली. एक्स्पायर नव्हता झाला. तर चक्क पानं भरली होती. परत मी नायजेरियात. आता म्हंटले स्वत:च जावे दूतावासात. या वेळेस मात्र एकंदर तंत्र खुपच सुधाराले होते. माहिती व अर्ज चक्क नेटवर उपलब्ध होते. अर्ज डाऊनलोड केला.

फ़ोटो वगैरे आधीच काढून ठेवला होता. सुवाच्य अक्षरात अर्ज वगैरे बरुन, भल्या पहाटे निघालो. लागोसमधली वाहतूकीची कोंडि लक्षात घेता, इतक्या आधी निघणे गरजेचे होते. या दूतावासाचे व्यवस्थापन, पुण्यातल्या चितळ्यांकडे असायची दाट शक्यता आहे, कारण तिथे अकरा वाजता नवीन अर्ज स्वीकारणे बंद करतात. अकरा म्हणजे अकरा. अरे हो एक सांगायचे राहिलेच. सध्या पासपोर्टाचे नवीन पुस्तक वगैरे देत नाहीत, नवा पासपोर्टच घ्यावा लागतो.

बाकि सगळ्यांना बराच काळ थांबावे लागते, पण माझा पासपोर्ट त्याच कार्यालयातला असल्याने, मला कमी
कागदपत्रे दाखल करावी लागणार होती. शिवाय वेळही कमी लागणार होता. पण माझे हे दिवास्वप्न लवकरच भंगले.
कागदपत्रात काहि कमतरता नव्हती. पण फ़ोटोच्या आकारात काहीतरी गडबड होती. आपण फ़ोटोग्राफ़रला सहज, पासपोर्ट साईझ म्हणून सांगतो, पण या दूतावासात वेगळे आकारमान सांगितले होते. तसे ते नेटवर उपलब्ध होते, पण ते पासपोर्ट साईझपेक्षा वेगळे असू शकते, हे माझ्या डोक्यात शिरलेच नव्हते.

प्राथमिक छाननी करणाऱ्या अधिकार्‍याने तशी शंका बोलून दाखवली होतीच. पण त्याच्याकडे मोजमाप
करायला पट्टी नव्हती. मग मी गेलो आतल्या कार्यालयात. तिथे एक नायजेरियन बाई होती, पण तिला
चक्क मोडकेतोडके हिंदी येत होते. तिने मला माझा फ़ोटो उंचीला काही मिलिमीटर्स ने कमी तर रुंदिला
काही मिलिमीटर्सने जास्त असल्याचे सांगितले. मी तिथल्या तिथे कात्रीने काटछाट करायची तयारी
दाखवली, तर तिने चालणार नाही, असे सांगितले. शिवाय कमी असलेली उंची (फ़ोटोची हो ) वाढवायची
कशी हा प्रश्न होताच.

वेल, हा प्रश्न चूटकीसरशी तिनेच सोडवला. (तसे नायजेरियात सगळेच प्रश्न चुटकीसरशी सुटतात ) बाहेर
तिचाच मित्र, फ़ोटोग्राफ़र म्हणून होता. शिवाय मी परत येईपर्यंत ती थांबणार होतीच.
बाहेर आलो. तर तिचा तो मित्र माझी वाटच बघत होता. (त्याने बहुदा आत जातानाच मला हटकले
होते, पण मी लक्ष दिले नव्हते ) त्याने मला बोलून दाखवले, तसे. आता मला त्याला शरण जाण्याशिवाय
गत्यंतर नव्हते. गेटवे ऒफ़ इंडीयाजवळ कसे फ़ोटोग्राफ़र्स आपण काढलेले फ़ोटो गळ्यात मिरवत असतात,
तसेच तो करत होता. पण जवळपास कूठे लॆब वगैरे दिसत नव्हती, पण त्याने, ओगा (साहेब या अर्थी
नायजेरियन शब्द ) वेट अ लिटील. आय प्रिन्ट इट नाऊ नाऊ, असे म्हणत मला तयार केले.
टाय, पावडर, कंगवा सगळेच होते त्याच्याकडे. एक गटार आणि एक भिंत यांच्यामधे केवळ फ़ूटभर
जागा होती, तिथे त्याने मला उभे केले. मागच्या भिंतीवर पांढरे कापड टाकले ( ती पण दूतावासाची
अट बरं का ) आणि माझा एकदा फ़ोटॊ काढला. आणि तो गायब झाला.

भर रहदारीच्या रस्त्यावर, आणि तेही नायजेरियात उभे राहणे, म्हणजे मानेवर तलवार असे म्हणण्यापे़क्षा
दोन तलवारिंच्या मधे मान, असे म्हणणे जास्त योग्य. आजूबाजूला आपल्याला खाता येईल, असे काहिही
उपलब्ध नव्हते. पण तिथे यलो फ़िव्हर कार्डच काय (आफ़्रिकेतील बहुतेक देशाना भेट द्यायच्या आधी हे घ्यावे लागते. त्याबद्द्ल मी पूर्वी लिहिले आहेच ) नवीन पासपोर्ट देखील उपलब्ध होते (हो आपल्या भारत देशाचे ) मी वर लिहिलेच आहे कि नायजेरियात, कुठलाही प्रश्न चुटकीसरशी सुटतो.

अर्ध्या एक तासाने तो उगवला. नेहमीपेक्षा किमान दसपट किमतीत. मला ते फ़ोटो घ्यावे लागले. आणि तो
फ़ोटो म्हणजे काय सांगू महाराजा. काळा का गोरा ते सोडा, समोर कि पाठमोरा, न कळे, न कळे, ठकचि
पडीले ऐसे, अशी अवस्था. पण तो मात्र मला ऐटीत सांगत होता, कि अगदी मापात बसणारा फ़ोटो आहे, आत तो रिजेक्ट होणेच शक्य नाही. (त्याच्या आत्मविश्वासाचे कारण, वेगळे सांगायला हवे का ? )
तो फ़ोटो निरखत निरखत आत शिरलो (साम्य तीळही नच दिसत मुखाचे, नाव तरी कोरवा शिरावरी, हे
नाट्यगीत नेमके का आठवावे ?)

आत गेलो, तर त्या बाईने दोन मिनिटात माझे काम करुन टाकले. आता तो दिव्य फ़ोटो, त्यात आणखी
स्कॅन करुन, माझ्या पासपोर्ट वर आहे. या पासपोर्टावर टिनू आनंद पासून सनैल आनंद (देवानंदचा सुपुत्र,
आठवतोय का कुणाला ? ) इतकेच काय घोडा, उंट, जिराफ़सारखा एखादा चतुष्पाद प्राणी देखील प्रवास
करू शकेल. (माझी गणना कश्यात आहे, ते सांगा बरं )

आणि येती १० वर्षे तरी, मी तो बाळगणार आहे.

विषय: 
प्रकार: 

ए गप्पे चम्प्या, तुझ्याकडून स्पेन अन आता ऑस्ट्रेलियाची चिल्लर ड्यू आहे!
फाटक्यात पाय घालूच नकोस, त्यापेक्षा चिल्लरभरला हात खिशात घाल Proud

दिनेशभाऊ, पुन्हा कधी भेटू तेव्हा मला हवी चिल्लर Happy
फोटो टाका की ते दोन्ही-तिन्ही!

हाच तो प्रसिद्ध अस्पष्ट फोटो. साईझ कमी केल्याने जरा तरी धड दिसतोय.
(मला प्रत्यक्ष भेटलेल्याना, यावर विश्वास ठेवणे कठिण आहे )
untitled.JPG

दिनेश दा ...मस्त
पासपोर्ट संबधीत कुणी असेल तर मला मदत हवी आहे ...क्रुपया संपर्क करा ..काढायचा आहे .....एजंट नको ...

दिनेशदा, जबरी फोटो आणि लेखही ! खरच wanted फोटो आहे आणि तो तुमचा आहे हे सांगितलत म्हणून पटवून घेत आहे.
पासपोर्ट आणि व्हिसा प्रकरण खरच भारी असतं. माझाही पासपोर्ट आता रिन्यु करायचा आहे.. देव जाणे काय काय नवे अनुभव घ्यावे लागतील.. पण सहज आठवलं म्हणून गंमत सांगते..
काही वर्षांपूर्वी फ्रेंच काँस्युलेटला नोकरी करत असताना आपल्या पासपोर्ट ऑफिसच्या महान कामगिरीचा अनुभव घेतला होता. एका व्यक्तीचा शेन्गन व्हिजा बनवत असताना तिथल्या काँप्युटरवर माहिती फीड करताना त्या पासपोर्ट वर passport ची issue date १ एप्रिल १९९९ आणि passport expiry date चक्क ३१ फेब्रुवारी २००९ बघितली होती. काँस्युलेटचा काँप्युटर ते अ‍ॅक्सेप्ट करतो की नाही हे बघण्यात मी वेळ न दवडता तो व्हिजा बनवणे मी ऑफिसरच्या गळ्यात घातले होते.

Pages