मॉर्फोजेनेटीक फिल्ड्स, मीम्स आणि लमार्कीय उत्क्रांती

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
1’

अनेक वर्षांपुर्वी तेंव्हाच्या सायन्स टुडे नामक मासिकात मॉर्फोजेनेटीक फिल्ड्स वरील एक लेख वाचला होता. तो प्रकार म्हणजे वस्तुस्थिती की थोतांड अशी काहीशी विचारणा त्यात केली होती. जेंव्हा केंव्हा कुणीही सायकल चालवायला शिकते तेंव्हा एकप्रकारचे क्षेत्र (field) तयार होते. त्यानंतर जो कुणी सायकल चालवायला शिकेल त्याला त्या आसमंतातील क्षेत्राची मदत होते (त्या 'सिद्धांता'नुसार). त्याचमुळे आजकालच्या मुलांना सायकल शिकणे जास्त सोपे पडते असा दावा होता.

लमार्कीय उत्क्रांतीच्या सिद्धांतात आणि मॉर्फोगेनेटीक फिल्ड्समध्ये थोडे साधर्म्य आहे, पण लमार्कीय उत्क्रांतीची बैठक किंचीत जास्त मजबुत आहे. उदाहरणादाखल हा दुवा पहा: http://www.technologyreview.com/biomedicine/22061/ . तुम्ही ज्या वातावरणात वाढता, त्यासंबंधीच्या स्मृती पुढच्या पिढीपर्यंत पोचवता येतात. पण म्हणजे, तुम्ही किंवा तुमच्या आईवडीलांनी इतरांना सायकल चालवतांना पहायले असेल, किंवा ते स्वतः शिकले असतील तर तुम्हाला फायदा होऊ शकेल.

वरवर पहाता, हे मीम्स (memes) सारखे झाले - जीन्सचे (genes) वैचारीक समांतर - विचार/कल्पना/मते जी एका व्यक्तिपासुन दुसर्या व्यक्तिपर्यंत उड्या मारतात. पण कल्पनांच्या बाबत तुम्ही त्या आपल्याशा करता. त्या कितीही अमूर्त असु शकतात. तुम्ही त्यांना आत्मसात करता आणि पसरवता.

इतक्यातच TED वर व्ही. रामचंद्रन यांचे लघुव्याख्यान ऐकले: Neurons that shaped civilization. इथे ते प्रतिबींब मज्जातंतुंबद्दल बोलतात. वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया जेंव्हा केल्या जातात तेंव्हा मज्जतंतु उद्दिपीत होतात. प्रतिबींब मज्जतंतु मात्र जेंव्हा तुम्ही दुसर्यांना काही करतांना पहाता तेंव्हा पण उद्दिपीत होऊ शकतात (आठवा, प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजाचा चेंडु हवेत असतांना भारतीय क्षेत्ररक्षकाचे हात जसे चेंडुकडे सरकतात तसेच - मनातल्या मनात - तुमचे पण हात सरकतात). अशा प्रकारे उद्दिपीत झालेल्या मज्जातंतुंमुळे देखील स्मृती बनतात (याचमुळे तुम्ही इतरांच्या आनंदात तसेच दु:खात सहभागी होऊ शकता). माझा असा कयास आहे की या प्रतिबिंब मज्जातंतुमुळे आधी जे सायकल चालवायला शिकले त्यांच्यापेक्षा आत्त्ताची मुले जास्त लवकर शिकु शकतात (त्यांच्या प्रतिबींब मज्जातंतुंनी जास्त सायकलस्वार पाहिले असल्यानी).

अर्थात त्यामुळे मला अनेक वर्षांपुर्वी आलेल्या एका अनुभवाचे रहस्य उकलायला मात्र पुरेशी मदत झाली असे वाटत नाही. माझ्या स्वप्नात मराठी डिटेक्टीव्ह नंदु नार्वेकर एका पार्टीला जातो आणि खुप खातो आणि त्याला तसे करतांना पाहुन ते सर्व माझ्या पोटात जात असल्यासारखे मला वाटते. दुसर्या दिवशी माझे पोट बिघडलेले होते.

विषय: 
प्रकार: 

मस्त लेख आशिष! आवड्या! Happy

या लेखावरुन मला एक प्रश्न विचारावासा वाटतोय , 'ऑरा' बद्दल तुमचं काय मत आहे?

हा मस्तच सिद्धांत आहे की.. डोक्याला खुराक.. मॉर्फोजेनेटिक सिद्धांतात मला वाटलेला कच्चा दुवा म्हणजे त्या फिल्डच्या संदर्भात सगळेच गुळमुळीत आहे. त्यातुलनेत स्मृतींचे एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे संक्रमण हे अआहे.शास्त्रोक्त आहे.

आशिष, मीम्स (मी आजवर मेमेज असा उच्चार करायचो) बद्दल सविस्तर आणि सोप्या भाषेत लिहाल का? मला डॉकिन्सच्या पुस्तकांतून किंवा नेटवरुन सुद्धा फार काही झेपले नाहिये.

इन्टरेस्टिंग! तू दिलेले दुवेही वाचेन सावकाश.
मीम्सबद्दल खरंच लिही ना सविस्तर. मलाही नेटवरून नीटसं कळलं नाही ते प्रकरण.

आशिष, Thought provoking म्हणायला पाहिजे, कारण मी ही काल रात्री ११ वाजता मीम्स, मॉर्फोजेनिक फिल्ड्स वगैरे सर्च करत बसलो होतो Happy

लोकहो, धन्यवाद.
केवळ मी एक-दोन शब्द वापरले म्हणजे मला त्यातले खूप (किंवा सगळे) माहित आहे असा (गैर)समज कृपया करु नये Happy

लालू, बहुदा पोट आधीच खराब असल्याने तसे स्वप्न पडले असावे.

आर्या, मोर्फोजेनेटीक फिल्ड्स प्रमाणेच ऑरा (आणि रेकी देखिल) बर्यापैकी बिनबुडाचे आहेत. लमार्कीय उत्त्क्रांतीत देखिल कुणी केवळ जवळ असल्याने, किंवा हाताच्या माध्यमाने काही माहिती दुसर्यांना देता येते असे म्हंटल्या जात नाही.

मीम्स या जास्त कुतुहलजनक आहेत कारण त्यांच्या उत्क्रांती करता तुम्हाला काही तरी करावे लागते जे मेंदुशी (अर्थात विचारांशी आणि मनाशी सुद्धा) संबंधीत आहे. एक उदाहरण घेऊ या. आपल्याकडे लग्नकार्यात पंगती असत (अजुनही अनेक ठिकाणी असतात). कधितरी जमिनीवरील पंगतींची जागा टेबल-खुर्च्यांवरील पंगतींनी घेतली. जेवण झाल्यावर ते ५-६ नळ असलेल्या ठिकाणी जाऊन हात धुवायचे. अशातच कुणाला तरी एक मीम चावली (की झाली, की बोकांडी बसली?). त्यानंतर अचानक अनेक ठिकाणी लग्नच्या पंगतीत टेबलवरच फिंगर बाउल्स दिसु लागले. ही मीम उपयोगी असल्याने पसरली. पण त्याकरता काही लोकांना तिचा प्रसार करावा लागला.

क्रिकेट मधिल रिवर्स स्वीप देखील तसाच. कुठेतरी एखादी गोष्ट क्लिक होते आणि पसरते.

पुण्यातील (आणि इतरत्र देखील - कधिकाळी अकोला या करता प्रसिद्ध होते) पॉश, वाईट, कॅट या सारख्या शब्दांचा प्रसार देखील असाच होता. They have a life of their own. विज्ञानात अनेकदा एखादा शोध एकाच वेळी दोन तीन वेगवेगळ्या ठिकाणी लागल्याची उदाहरणे आहेत. काही सूप्त मीम्सचा त्यात हात असुही शकेल.

मीम्सचा पद्धतशीरपणे अभ्यास कसा करायचा याबद्दल मात्र एकमत नाही.

याउलट प्रतिबींब मज्जातंतुं हा प्रकार मात्र पुर्णपणे शास्त्रीय आहे, त्यांचा अभ्यास वैज्ञानीक कसोट्यांद्वारे पुढे नेता येतो. त्यांच्या अभ्यासामुळे ऑटीझम सारख्या गोष्टींबद्दल सुद्धा जास्त माहिती मिळेल असे दिसते आहे. पुढील दुव्यावरील १५ मिनीटांची क्लिप जरुर पहा: http://www.pbs.org/wgbh/nova/sciencenow/3204/01.html

मला पण Being John Malkovich या दृष्टिकोनातुन पुन्हा पहावा लागणार आहे.

अरेच्या, इतक्या दिवसात हा लेख कसा वाचला नाही?
मिरर न्यूरॉन्स एकदम खास प्रकार आहे, विषेशतः अगदी लहान बाळांमध्ये ब्रेन डेव्हलपमेंट होताना त्यांचे काम कसे चालते ते पाहणे इंटरेस्टींग ठरेल.
सरपटणार्‍या प्राण्याबद्द्लची एकंदरीत सस्तन प्राण्यांना वाटणारी भिती/घृणा हे देखील मीम्स आहे का? मुळात कलेक्टीव्ह सबकाँशसचा जीन्सवर परिणाम होतो का? असल्यास त्याचे मेकॅनिझम काय असेल?

छान

छोटेखानी लेख आवडला. मीम्स हा माझा आवडीचा विषय आहे. Happy

>>सरपटणार्‍या प्राण्याबद्द्लची एकंदरीत सस्तन प्राण्यांना वाटणारी भिती/घृणा हे देखील मीम्स आहे का?
माझ्यामते नसावी.
(सरडे पाली खाणारे कुत्रे असे शोधून बघावे.)

>>मुळात कलेक्टीव्ह सबकाँशसचा जीन्सवर परिणाम होतो का? असल्यास त्याचे मेकॅनिझम काय असेल?
जीन्सवर मुख्यत्वे एकाच गोष्टीचा परिणाम (!) होतो. सर्वायवल.
सध्याच्या परिस्थितीत जगायला आणि पुनरुत्पादन करायला योग्य ते जीन्स पुढे जातात / टिकतात.

सामाजिक दबाव/ समजुती - माणसाच्या बाबतीत - पुनरुत्पादनात महत्त्वाची भूमिका करतात.

उंदीर (मूषक वर्गीय) प्राण्यावर केलेले प्रयोग मी नेहमी सांशकतेने बघते कारण ते नियंत्रित आसमंतात घडतात. सोशल लर्निंग हा विषय कावळ्यांमध्ये अभ्यासला गेला आहे. काकवर्गीय हे तसे मूषकवर्गीय पेक्षा मानवाला दूरचे पण हा अभ्यास नैसर्गिक आसमंतात घडल्याने जास्त उपयोगी आहे.
https://www.youtube.com/watch?v=s472GjbLKQ4

अस्चिग, लेख आवडला. आणखी वाचतोय.
सीमंतिनी, कावळ्याची डॉक्युमेंटरी फेनोमिनल. भाषा, मुलांशी बोबड बोलणे, एकूणच समज. बरेच प्रश्न पडलेत, परत बघणारे आणि इतरही माहिती शोधतो. तू यात काम करतेस का? वेगळा लेख वाचायला आवडेल.

बर्‍याचदा पिल्लू जन्माला आलं की बाय डिफॉल्ट त्याच्यात काही न शिकवल्या गेलेल्या गोष्टी असतात.उदा.समुद्री कासवाची(लेदर बॅक टर्टल) पिल्लं आपोआप समुद्राचा रस्ता शोधतात.मगरीची पिल्लं जन्मली की त्यांच्या आईच्या तोंडात किंवा पाण्यात गेल्यावर डोक्यावर जाऊन बसतात.हे त्यांना मॉर्फोगेनेटिकली त्यांच्यात आलेले असते.माणसाचं पिल्लू हे पूर्ण परावलंबी असतं.याचं कारण आपलं मॉर्फोजेनेसीस आणि जीन लर्निंग काळ फारच कमी म्हणजे काहीच लाख वर्षे आहे.इअतर प्राण्यांच्या तुलनेत हा काळ म्हणजे खूपच नगण्य आहे.

मस्त लेख.थोडा अजून खोलात टाकायला हवा.

बाकी टेलीपॅथीक फिल्डवरच तर लोक काम करतात.उदा.मॉब मेंटॅलीटी,लीडरशीप इ.