Submitted by प्रसाद शिर on 13 March, 2008 - 02:50
असे जहालसे जहर तुझी नजर
मनात निर्मिते कहर तुझी नजर!
कितीक टाळलेस शब्द तू तरी
हळूच देतसे खबर तुझी नजर
मिठीतुनी हवे तसे दिलेच ना?
अजून मागतेय कर तुझी नजर!
दिसायची तिच्यातली अथांगता
करायची मनात घर तुझी नजर...
सखे तुझ्या मिठीमध्ये अनंतता
कशास पाहते प्रहर तुझी नजर?
खुशाल जा तुला जिथे हवे तिथे
मला पुरेल जन्मभर तुझी नजर
दिसायचे कसे मिटून पापण्या?
करायची कुठे सफर तुझी नजर?
फिरायचो जरी भणंग एकटा
दिसायचीच रानभर तुझी नजर
अजूनही तुझ्या मनी उन्हे कशी?
अजून शिंपतेच सर तुझी नजर
जगात पाहतो तिथे मला दिसे
जिथे तिथे तुझी नजर... तुझी नजर...!
प्रसाद
www.sadha-sopa.com
गुलमोहर:
शेअर करा
सुंदर...!
खुशाल जा तुला जिथे हवे तिथे
मला पुरेल जन्मभर तुझी नजर
जगात पाहतो तिथे मला दिसे
जिथे तिथे तुझी नजर... तुझी नजर...!
सुंदर...!
क्या बात है!
वाहवा प्रसाद! मस्तच गझल!!
कर, जन्मभर आणि सर हे शेर फार फार आवडले!!
काफिया?
मतल्यात जहर / कहर आल्यावर पुढे घर, खबर वगैरे कसं चालेल?
मला 'अनंतता' वगैरेंसारखे शब्द ओढून ताणून बसवल्यासारखे वाटतात. 'सखे तुझ्या मिठीत काळ थांबतो / थांबता' असं काही 'साधं सोपं' चाललं नसतं?
सहमत...
स्वाती, ते काफिये चुकलेले आहेत.
काळ थांबतो
स्वाती
'काळ थांबतो' हे शब्द अनंततापेक्षा जास्त छान वाटत आहेत !
जहर आणि कहर नंतर 'हर' नी शेवट न होणारे इतर काफिये (घर, खबर इ) गझलेत चालू शकतात का? तर व्याकरणाच्या काटेकोर नियमा नुसार नक्कीच चालणार नाहीत. यातून मार्ग म्हणजे अजून एक मतला लिहून त्यात काफिया ढिला करून घेणे! तसा मी प्रयत्न केला पण हा कहर आणि जहर चा शेर मला खूप आवडला म्हणून तोच मतला म्हणून ठेवला
(ज्या मुळे काही काफिये सदोष ठरत आहेत हे खरं आहे!)
साधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगायचं!
www.sadha-sopa.com
फिरायचो
फिरायचो जरी भणंग एकटा
दिसायचीच रानभर तुझी नजर
वा! हे आवडले.