संवाद : गुरू ठाकूर

Submitted by नमुसी on 22 February, 2010 - 01:28

'नटरंग'च्या प्रोमोजनी चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली होतीच. गाण्यांच्या क्लिप्स पाहून तर कधी एकदा पूर्ण गाणी ऐकायला मिळतील असं झालं. वर्तमानपत्रांत जेव्हा 'नटरंग'बद्दल लिहून आलं, तेव्हा त्यात अतुल कुलकर्णीशिवाय एक नाव प्रामुख्याने होतं, ते गुरु ठाकुर ( Guru Thakur ) यांचं. या चित्रपटाचे संवाद आणि गाणी - दोन्ही गुरु ठाकुर यांनीच लिहिलंय. मुळात त्यांची गाणी केवळ अप्रतिम, आणि त्यांना लाभलेली अजय-अतुलच्या संगीताची साथ म्हणजे दुग्धशर्करा योगच! एव्हाना ही गाणी सर्वांच्या ओठांवर खेळत आहेत यात नवल नाही. 'नटरंग'च्या संवादांत वापरलेली भाषा ही अस्सल कोल्हापुरी माणसाने लिहिलीय, असं वाटतं. त्यांची या चित्रपटात एक छोटी भूमिकाही आहे - शिरपतरावाची.

'मन उधाण वार्‍याचे' ह्या गाण्याने मनामनांत घर केलं आणि ह्याच गाण्यामुळे 'गुरु ठाकुर' हे नाव गीतकार म्हणून सर्वांसमोर आलं. त्याआधी त्यांची ओळख होती ती 'श्रीयुत गंगाधर टिपरे' ह्या मालिकेचा संवादलेखक म्हणून. सहजसुंदर लिखाण हे गुरु ठाकुरांचं वैशिष्ट्य. गेल्या चारपाच वर्षात जवळजवळ चौतीस सिनेमांची गाणी, सात-आठ चित्रपटांचे संवाद, आणि 'भैय्या हातपाय पसरी' हे गाजलेलं नाटक त्यांच्या खाती जमा आहेत. "मल्हार वारी", "ही गुलाबी हवा", "झटकून टाक ती राख", "पाऊल पडते अधांतरी" ही त्यांची काही गाजलेली गाणी.

ज्येष्ठ संगीतकार पद्मश्री श्रीनिवास खळे यांनी 'तुझ्या शब्दांमधेच नाद आहे. हातात सरस्वती आहे तुझ्या, ती जप.' असा आशीर्वाद गुरु ठाकुर यांना दिलेला आहे.

चला तर, एक उत्तम गीतकार, पटकथालेखक, संवादलेखक, व्यंगचित्रकार, छायाचित्रकार आणि अभिनेता - त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर 'कौतिक सांगू किती पठ्ठ्या बहुगुणी!' असलेल्या गुरु ठाकुरांशी थोड्या गप्पा मारू.

नमस्कार गुरु. सर्वप्रथम 'नटरंग'च्या यशाबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन!

धन्यवाद!

'नटरंग' च्या यशात तुमचा खूप मोलाचा वाटा आहे. पटकथा, गीतलेखन आणि एक भूमिकाही आहे तुमची चित्रपटात. कसं वाटतयं आता 'नटरंग' चं यश पाहून ?

खुप छान वाटतयं. काय आहे, आपल्याला वाटत असतं की माणसाला एका वेळी एकच काम द्यावं, म्हणजे तो त्याला शंभर टक्के न्याय देईल. माझ्यावर विश्वासनं दोन-तीन जबाबदार्‍या एकदम सोपवल्या गेल्या होत्या, त्यामुळे सुरवातीला दडपण आलं होतं. एका गाजलेल्या कादंबरीवर सिनेमा करायचा म्हणजे त्याकडे सगळ्या लोकांचं काटेकोर लक्ष असतं. 'नटरंग' ही पुरस्कारप्राप्त कादंबरी. सहाजिकच सगळ्यांचच लक्ष लागून राहिलेलं सिनेमात जवळपास सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीचा काळ दाखवायचा होता. तेव्हा अभ्यासाची, रिसर्चची आवश्यकता होती. मी खास कोल्हापुरी भाषा, लहजा शिकण्यासाठी काही दिवस तिथे जाऊन राहिलो. त्या भागातल्या लोकांच्या, विशेषतः वयस्क व्यक्तींच्या बोलण्याचा जवळून अभ्यास केला. अगदी शिव्यांपासून ते प्रेमाने पाठीत धपाटा मारताना ते कसे व्यक्त होतात हे पाहिलं, आणि मगच संवादलेखन करायला घेतलं.

शूटिंग चालू असताना जेव्हा त्या भागातले काही जण येऊन विचारायला लागले की 'तुम्ही इथलेच का?', तेव्हा माझ्या त्या अभ्यासाला पहिली पावती मिळाली. तशीच त्यानंतर ती एडिटिंगच्या वेळी मिळाली. नंतर खुद्द आनंद यादवांनी जेव्हा सिनेमा पहिला, तेव्हा 'माझ्या भाषेचा गोडवा, सौंदर्य शंभर टक्के जपल्याबद्दल तुम्हाला शंभरपैकी शंभर मार्कं!' अशी पावती त्यांनी दिली. इतर कुठल्याही पुरस्कारापेक्षा हा मोठा पुरस्कार मला मिळाला. त्यामुळे मी जी काही मेहनत घेतली तिचं चीज झालं असं वाटलं मला!

आज चित्रपटाला सर्वत्र तुफान प्रतिसा्द मिळतोय आणि या चित्रपटाविषयी जे काही छापून येतंय त्यात अभिनयासोबतच संवादांचीही वाखाणणी समीक्षक करत आहेत, हे त्या मेहनतीचंच फळ असावं.महाराष्ट्रात इतरत्र प्रतिसाद मिळतोच आहे पण मुंबई पुण्यातल्या मल्टीप्लेक्सेस मधुन मिळणारा तरुण वर्गाचा प्रतिसाद थक्क करणारा आहे आणि इतर भाषिक लोकही बघत आहेत. मराठी फिल्मची तिकिटं ब्लॅकमधे विकली जातायत हे चित्र सुखावह वाटतं.

guru-net1.jpg

पुस्तकावरून जेव्हा संवादलेखन करावे लागते, तेव्हा त्यात किती आणि कशा प्रकारची आव्हानं असतात?

अशा फिल्म्समधे पटकथालेखक आणि दिग्दर्शकाला खूप मेहनत असते कारण कादंबरीचा कॅनव्हास इतका मोठा असतो की त्यावर दीडदोनशे एपिसोड्सची मालिकाही बनू शकते. फिल्ममधे इतकं सगळं दोन-अडीच तासांत बसवायचं असतं. ती गोष्ट पूर्ण वाटावी, लोकांना समाधान वाटावं, त्यात काय कापायचं, काय ठेवायचं हे सगळं बघावं लागतं. कादंबरी सहसा नॅरेशन स्वरूपात असते, त्यात सलग संवाद नसतात. संवाद लिहिताना सगळं कथानक पात्रांचं बोलणं आणि प्रतिक्रिया यांतून व्यक्त करायचं असतं. त्या त्या पात्राची भाषा कशी असेल, तो कसं बोलेल, याचं भान शेवटपर्यंत टिकवून ठेवावं लागतं. हे एक चॅलेन्ज असतं. ह्या सिनेमात आणखीन एक चॅलेन्ज म्हणजे जो मेन हीरो आहे, गुणा कागलकर, हा शाहीर दाखवलाय - त्याला शाहिरीची आवड असते. तर त्याचे संवाद तशाच ढंगात आले पाहिजेत, त्याच्या बोलण्यात तो बाज असेल किंवा त्याला गाणी सुचतात, तर ती सुचण्याची प्रक्रिया काय असेल. मी गीतकार असल्या कारणाने मी ते सांगू शकतोच, पण ते त्याच्या भाषेत यायला हवं होतं. आव्हान होतं माझं व्यक्त होणं - गुणा कुठे राहतो, कुठल्या काळातला माणूस आहे, शाहिरीचं शिक्षण त्याला कुठून मिळालं असेल (लावण्या ऐकून, जुनी पुस्तकं वाचून) - या सर्वांशी सुसंगत असायला हवं होतं. मला 'तो' व्हायचं होतं. त्याच्या संवादांत आणि 'त्याने' लिहिलेल्या लावण्यांत ते दिसणं आवश्यक होतं.

लावण्या पहिल्यांदाच लिहिल्यात का तुम्ही?

हो, मी लावणी कधीही लिहिली नव्हती. त्यासाठी मला भाषेच्या अभ्यासाबरोबरच जुन्या लावणीचा अभ्यास करावा लागला. मग आम्ही ठरवलं की आत्ताच्या लावणी कलाकारांना प्रत्यक्ष भेटावं, त्यांच्या फडात जावून अभ्यास करावा. पण दुर्दैवाने आम्हाला असं दिसलं की आता त्या प्रकारची म्हणजे गणगौळण वगैरे असणारी लावणी होतच नाही. तो प्रकार लुप्त झाला आहे. त्यांना व्यवसायाच्या दृष्टीने ते परवडत नाही. आम्ही जेव्हा प्रत्यक्ष त्यांचा कार्यक्रम बघायला गेलो तर ते आयटम साँग वर नाचत होते. तर तेव्हा जरा भ्रमनिरास झाला. मग आपल्याला ऑथेन्टिसिटी जपायला काय करावं लागेल, तर असं ठरलं की जुन्या लावण्या ज्यात खरा पारंपारिक बाज होतं त्या शोधायच्या. मग मी पठ्ठे बापूराव, शाहीर रामजोशी ह्यांचं काव्य शोधलं. त्यांची शैली, लय, ठेका यांचा अभ्यास केला. जसं त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे एका ओळीत एकाच प्रकारच्या वजनाचे, वर्णाचे छोटे-छोटे शब्द घालायचे, जसं 'छबिदार सुरत देखणी, जशी हिरकणी, नार गुलजार'. ही लावण्यवती लावणी जिला म्हणतात त्या प्रकारची आहे. सौंदर्य होतं भाषेला त्या काळच्या लावण्यांत. मग ती सिनेमात आली आणि हळुहळू अश्लीलतेकडे वळत गेली. त्यामुळे कॉमन लोकांनी त्याकडे पाठ फिरवली आणि लावण्यांचा दर्जा खालावत गेला. तर मग आपण मूळ लावणी मांडावी असा विचार केला. बर्‍याच लोकांकडून कौतुक झालं. ज्येष्ठ शाहीर विठ्ठल उमप, संगीतकार श्रीनिवास खळे यांनी फोनवरून कौतुक केलं माझं. हे ऐकून खूप समाधान वाटलं. सुरुवातीची प्रोसेस खडतर होती पण त्याचं चीज झालं. तमाशा लावणी outdated झालीय, यंग जनरेशन तमाशा बघत नाही असं म्ह्टलं जात होतं. मला असं वाटतं की उत्तम दिलं तर तरुण पिढी अ‍ॅक्सेप्ट करते. आज मुंबईमधे बर्‍याच तरूण मुला-मुलींच्या आयपॉडवर 'नटरंग' ची गाणी वाजताहेत. नवी पिढी, जी रॉक आणि जॅझ जास्त ऐकतात, त्यांनीही 'वाजले की बारा'ला पसंती दाखवली आहे. कॉलेजमधेही डान्स बसवताहेत 'अप्सरा'वर. हे सगळं पाहून मला फार आनंद होतोय. मला असं वाटतं की लोक संगीताची परंपरा पुन्हा लोकांपुढे आणायला 'नटरंग' ने खूप मदत केल्ये.

'नटरंग' लिहिताना तुम्हाला दिग्दर्शकाने किती स्वातंत्र्य दिलं?

अगदी पूर्ण स्वातंत्र्य दिलं गेलं दिग्दर्शक रवि जाधव कडून आणि आनंद यादवांकडूनही. झालं असं की आनंद यादवांना आम्ही आधी एक सीन लिहून दाखवला आणि तो वाचून त्यांनी आम्हाला 'गो अहेड' चा सिग्नल दिला. तेव्हापासून रवि जाधव नी पूर्ण जबाबदारी माझ्यावर दिली आणि कसलीही आडकाठी आणली नाही.

असं कधी झालं का, की तुम्ही एखादी सीन लिहिलात आणि तो दिग्दर्शकाला आवडला नाही आणि स्क्रिप्टमधे बदल करावा लागला?

नाही, असं काही झालं नाही. उलट काही सीन्स जे खूप चांगले झाले होते ते फिल्मच्या लांबीचा विचार करून कापावे लागले. ते कापताना माझ्यापेक्षा ती मंडळीच हळहळली. सुरुवातीला आम्हाला भीती होती की, अतुल कुलकर्णी हे खूप विचारी आणि स्पष्टवक्ते अभिनेते आहेत. ते स्क्रिप्ट वाचल्यावर त्यात अनेक वेळा बदल करतात. पण त्यांनी स्क्रिप्ट वाचली आणि दाद देत, कौतुक करत राहिले लिखाणाचं. रवि कडुनही सतत प्रोत्साहन मिळत होतं. एकुण्च विचारांची नाळ जुळली होती त्यामुळे ही संपुर्ण प्रोसेसच आनंददायी होती.

मराठी सिनेमाला आता चांगले दिवस आलेत असं वाटतंय का तुम्हाला? अगदी ऑस्करपर्यंत पोचला मराठी सिनेमा!

आपण ह्याला एक सुरुवात म्हणू शकतो. 'श्वास'पासून जी सुरुवात झाली त्यानंतर जोगवा, गाभ्रीचा पाऊस, हरिश्चंद्राची फॅक्टरी - या सर्वांनी नॅशनल आणि इन्टरनॅशनल पुरस्कार मिळवलेत. 'नटरंग'मुळे आता मराठी सिनेमाला प्रेक्षकवर्गही लाभलाय. एका सुवर्णयुगाची ही नांदी म्हणता येईल. आता लोक वाट बघायला लागलेत की आता कुठला नवीन मराठी सिनेमा येतोय. 'कौन देखता है आजकल मराठी फिल्म्स?' असं आधी विचारणारेच आता 'अरे वाह!' म्हणून दाद देत आहेत. मलाही आता अमराठी निर्मात्यांकडून फोन येत आहेत की मराठी सिनेमा काढायचाय तर आहेस का तयार वगैरे. गेल्या दोन वर्षापासून हा एक मोठा फरक मला दिसून येतोय.

तुमच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीचं आता चीज होताना दिसतंय, तर कसं वाटतंय? आणि तुमच्या घरच्या लोकांची काय प्रतिक्रिया आहे तुमचं यश पाहून?

काही वर्षांपूर्वी निर्णय घेतला होता तो योग्य होता असं आता मला वाटतं. 'गंगाधर टिपरे' नंतर सीरियल बंद, फक्त मराठी सिनेमासाठी लिहीन आणि योग्यसंधी साठी थांबेन, असं मी ठरवलं होतं. गाण्यांपासून सुरवात केली. माझे हितचिंतक म्हणत होते मला की 'तू अंधार्‍या विहिरीत उडी टाकतोयस', पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. मराठी सिनेमाला पुन्हा चांगले दिवस येतील हा विश्वास होता, त्याचं आता चांगलं फळ मिळतंय असं वाटतंय.

मी मध्यमवर्गीय घरातला असल्याकारणाने माझ्या चित्रपटक्षेत्रात जाण्याच्या निर्णयाबद्दल नातेवाईक जरा नाराज होते. पण माझे आई-वडील ठामपणे माझ्या पाठीशी होते. त्यांना एक आतून खात्री होता की मी ह्याच क्षेत्रात यशस्वी होईन. असं फार कमी घरांमधे हल्ली दिसतं. सुदैवाने आईवडिलांचा सपोर्ट मला मिळाला.

तुम्ही चित्रपट क्षेत्रात जेव्हा यायचं ठरवलं, तेव्हा तुम्ही कोणाला आदर्श मानत होतात?

तसं आदर्श असं कोणी नाही. माझे आजोबा दासबोध वाचायचे आणि आम्हाला त्यातल्या चांगल्या गोष्टी सांगायचे. ते नेहमी सांगत की माणसाने कीर्तिवंत व्हावं. प्रसिद्ध कोणीही होतो. ('टिपरे' कॅरेक्टर लिहितांना मी डोळ्यांसमोर माझ्या आजोबांनाच आणायचो.) माझ्या मनात हे तेव्हापासून ठसलं होतं. स्वतःची एक आयडेन्टिटी व्हावी असं मला नेहमी वाटत असे.

मी कॉलेज मधे असताना व्यंगचित्रकार म्हणून करिअरला सुरवात केली. बरीच बक्षिसंही मिळवलीत मी त्यात. कॉमर्स शाखेत शिकत असूनसुद्धा मला 'मार्मिक'साठी व्यंगचित्रं काढायची संधी मिळाली. मी त्यांच्यासाठी बरीच राजकीय आणि इतर व्यंगचित्रं काढली. तेव्हा 'गुरु ठाकुर' म्हणून सही करू लागलो. तसं माझं खरं नाव गुरूनाथ ठाकूर. पण गुरु हे नाव क्लिक झालं आणि मी ते तसंच ठेवलं. माझ्या पंचलाईन्स त्यांना आवडल्या, आणि 'तू कॉलम कर' असं मला सांगण्यात आलं. मग मी वृत्तपत्रासाठी लिहू लागलो. तोपर्यंत फिल्म्स वगैरे डोक्यातही नव्हतं. मग कधीतरी मॉडेलिंग करायला लागलो. मग हळूहळू थिएटरकडे वळलो. अभिनय आणि लिखाण चालूच होतं. अशातच प्रभावळकरांच्या 'अनुदिनी'चं लिखाण हाती आलं. मी लहानपणी एवढा भिडस्त होतो की चार लोकांसमोर बोलायलासुद्धा घाबरायचो. कॉलेजमधे कधीही एकांकिकांमधे वगैरे भाग घेतला नव्हता. पण लिहायला घेतलं आणि भीती कमी होत गेली. एकूण शाळा-कॉलेजमधे असताना पुढे काय करायचं काहीच ठरवलं नव्हतं. योगायोगाने मला विविध क्षेत्रांमधे यश मिळत गेलं आणि आज मी इथे आहे!

मला कोणी विचारलं की आदर्श पटकथाकार कोण, तर मी सांगतो डेस्टिनी! माझ्या स्वतःच्याच आयुष्यातील प्रसंग असे येत गेले की काहीच न ठरवता योगायोगाने मला माझी दिशा मिळत गेली. ऑल इंडिया रेडियोमधे कोणालातरी भेटायला गेलो, तर त्यांना माझा आवाज आवडला. मग माझी कॅज्युअल अनाऊन्सर म्हणून निवड झाली. व्हॉईसओव्हर आर्टिस्ट म्हणूनही मी काम केलंय. त्याची मला 'नटरंग'मधे गावातल्या रांगड्या पाटलाचा आवाज काढण्यात मदत झाली. वेगवेगळी क्षेत्रं मला अनुभवता आली. वेळेचा पुरेपूर उपयोग करत राहतो मी. (हसत) मला असं वाटतं की झोपतो म्हणजे आपल्या आयुष्याचा वेळ वाया जातो. म्हणून मी रात्री दीडपर्यंत कामं करत बसतो आणि सकाळी सहा वाजता उठतो. माझी सतत काहीतरी creative करत राहायचं व्यसनच जडलंय म्हणा ना. मला वाटतं अगदी छोट्या अनुभवाचासुद्धा कुठे-ना-कुठे फायदा हा होतोच. वाया काहीच जात नसतं.

cartoons-net.jpg

व्यंगचित्रकारितेचा कसा फायदा झाला?

एका व्यंगचित्रकार स्पर्धेत पुरस्कार मिळाला. 'मार्मिक'चे तेव्हाचे संपादक श्रीकांत ठाकरे तिथे आले होते. त्यांनी मी केलेली कार्टून्स पहिली आणि त्यांनी मला सजेस्ट केलं की तुझी शैली उत्तम आहे, निरिक्षण (observation) वाढव. मी हा सल्ला मनावर घेतला आणि बस स्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर लोकांच्या हालचाली, त्यांची बोलण्याची पद्धत, हातवारे - या सगळ्याचा अभ्यास, निरीक्षण करू लागलो. याचा फायदा मला नट, गीतकार आणि लेखक म्हणून खूप झाला. नंतर 'श्रीयुत गंगाधर टिपरे' लिहिताना पल्लेदार संवाद लिहिण्य ऐवजी घरगुती भाषा वापरली 'टिपरे' मधे. नटांना ही ते संवाद बोली भाषेतले असल्यामुळे आपलेसे वाटायचे आणि लोकांकडूनही दाद मिळालेली की "हे आमच्याच घरातलं संभाषण वाटत आहे. (हसत) तुम्ही काय आमच्या घराच्या माळ्यावर लपून सगळं ऐकता की काय?" जेव्हा अशी दाद मिळते तेव्हा त्याचं श्रेय मझ्यातल्या व्यंगचित्रकाराला देतो. तुम्ही डोळे आणि कान सतत उघडे ठेवा. निरीक्षण करा. ह्याचा फायदा नक्कीच होतो.

'अगं बाई अरेच्चा'चे संवाद लिहितांनाही बायका काय विचार करत असतील, काय-काय असेल त्यांच्या मनात, घर- ऑफिस सांभाळतांना काय-काय डोक्यात ठेवतात, त्या मनातलं बाहेर व्यक्त करत नाहीत, वगैरे. ते सगळं लोकांसमोर प्रभावीपणे मांडणं, हे एक फारच कठीण काम होतं! निरीक्षणामुळेच हे मी लिहू शकलो. गंम्मत म्हणजे चित्रपटाच्या संवादलेखनासाठी मला महिला प्रेक्षकांची भरपूर दाद मिळाली .

'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' चित्रपटातला पोवाडा तर फार लोकप्रिय झाला!

हो. पोवाडा मी या निमित्ताने पहिल्यांदाच लिहिला. काहीतरी वेगळं करायची इच्छा इथेही पूर्ण झाली. अज्ञातदास नावाच्या एका त्या काळातल्या शाहीराने या प्रसंगावर काही ओळी लिहिल्या होत्या. महाराजांनी त्यांना त्यासाठी सोन्याचं कडं दिलं होतं असं ऐकिवात आहे. तर त्याच शैलीत महाराजांचा संपुर्ण यशस्वी प्रवास मांडायचा होता . ती जबाबदारी माझ्यावर आली. मला सांगण्यात आला की अज्ञातदासची शैली आणि तुझी शैली - ह्यात फरक दिसता कामा नये. मी जेव्हा त्या पोवाड्याचा रिदम ऐकला, तेव्हा एकदम उस्फूर्तपणे दहा मिनिटांत पोवाडा लिहून काढला. गंमत सांगायची म्हणजे, माझ्या करिअरच्या सुरवातीला मी 'श्रीमान योगी' नाटकात महाराजांची भूमिका केली होती. तेव्हा अभ्यास म्हणून केलेलं वाचन असं ऊपयोगी पडलं.

शाहिरी वाङ्मयात एक परिपूर्ण प्रवास झालाय असं आता मी म्हणू शकतो. कारण शाहीर दोन प्रकारचे असतात - एक लावणी श्रुन्गारिक लिहितात आणि दुसरे पोवाडा (वीररसात) वगैरे लिहितात. योगायोगाने मला दोन्ही प्रकार लिहायची संधी मिळाली. 'शिवाजीराजे'चं पोवाडा लेखन झालं आणि 'नटरंग' च्या लावण्यांचं काम चालू झालं.

अजय-अतुल आणि तुम्ही एक-से-एक गाणी दिली आहेत बर्‍याच चित्रपटांत.

हो! त्यांना लोकसंगीताची खूप आवड आहे आणि मलाही. त्यामुळे आमचा नुसता सुरच नाही तर तालही जुळतो असं वाटतं. कित्येकदा असं होतं की ते काही चाल करत असतात आणि मी मला सुचलेले शब्द ऐकवले की ते म्हणतात की 'अरे, हे असंच आमच्या डोक्यात चालू होतं'. वेव्हलेन्ग्थ जुळत असल्यामुळेच आम्ही जास्तीत जास्त हिट गाणी दिली असावीत!

चित्रपटासाठी गाणी लिहिण्या आधी दिग्दर्शक तुम्हाला कथानक सांगतात का?

बर्‍याच वेळेला कथा ऐकवली जाते आणि सांगण्यात येतं की ह्या अमुक ठिकाणी गाणं अपेक्षित आहे. काही जण नेमकी सिच्युएशन, त्याआधीचे संवाद ऐकवतात. ते खरंतर जास्त सोयीचं पडतं. बर्‍याचदा संवादावरून गाण्याची पहिली ओळ सुचते. विशेषतः सॅड साँगला जर आधीचा प्रसंग कळला तर मदत होते. आयटम साँग लिहिताना असं काही कथानक सांगायची गरजच पडत नाही.

तयार संगीतावर तुम्ही गाणी लिहिली आहेत का? आणि तुमचं असं कुठलं गाणं लोकप्रिय झालंय?

जवळजवळ साठ टक्के गाणी मी तयार चालीवरच लिहिली आहेत. 'मन उधाण वार्‍याचे ' हे माझं पाहिलं गाणंही चालीवरच लिहिलं होतं. 'नटरंग'च्या गाण्यांच्या वेळी त्याचं दडपणही आलं कारण संगीत आधी तयार झालं होतं आणि लावण्या लिहिण्याची माझी पहिलीच वेळ होती. पण ह्याचाही रिझल्ट चांगलाच निघाला.

तुम्ही 'गंगाधर टिपरे' लिहिलंय. बर्‍याच सीरियल्ससाठी शीर्षकगीतं लिहिली आहेत, पण 'मन उधाण वार्‍याचे' ह्या गीतामुळे नाव सर्वत्र झालं असं वाटतं का?

नक्कीच! त्यामुळेच गीतकार म्हणून माझी ओळख निर्माण झाली. ह्या गाण्याची लोकप्रियता हळूहळू वाढत गेली. ज्या वर्षी हे गाणं रिलीज झालं, त्या वेळी फार कमी रिस्पॉन्स मिळाला. पण नंतर 'स्लो पॉइझनिंग' सारखी त्याची नशा वाढत गेली. या क्षेत्रातल्या जाणकार मंडळींनीसुद्धा दाद दिली. गाण्याचा अर्थ जसजसा लोकांना उलगडत गेला, तशी त्याची लोकप्रियता वाढली. आताही बर्‍याच लोकांच्या कॉलरट्यूनवर हे गाणं वाजतं. कॉलेजमधे मुलं गातात. ह्या गाण्यामुळे मला ब्रेक मिळाला गीतकार म्हणून. त्याआधी मी गीतकार नव्हतोच. मी काही लिहिलं नव्हतं. माझा मलाच शोध लागला असंही म्हणता येईल. मी चांगली गाणी लिहू शकतो ह्याची मला जाणीव झाली आणि जरा कॉन्फिडन्सही आला.

तुम्ही साप्ताहिक मालिका लिहिणं आता सोडूनच दिलंय का?

हो. 'हसा चकटफू'साठी मी टायटल साँग केलं आणि संवादलेखनही. नंतर 'असंभव' साठी शीर्षकगीत. 'जगावेगळी' नावाची आणखीन एक मालिका केली होती. 'श्रीयुत गंगाधर टिपरे' ही मालिका पूर्ण झाल्यावर मी लिहिणं सोडलं. टीव्हीला एक वृत्तपत्रासारखा मिडिया म्हणतो मी. लोकांना रोज काहीतरी नवीन हवं असतं. रविवारचा पेपर कितीही इन्टरेस्टिंग असला तरी सोमवारी त्याची रद्दीच होते. मालिकेचा एखादा एपिसोड एकदम मस्त लिहिला, तरी त्याचा रिपीट टेलिकास्ट पाहताना लोकांना कंटाळा येऊ लागतो. टीआरपी आणि एखाद्या पात्राची लोकप्रियता लक्षात ठेवून लिहावी लागते मालिका. 'ही बाई मरणार आहे, पण तिला आणखीन आठवडाभर जगवा काही करून', वगैरे प्रकार चालू होतात. मग तिथे कलाकृती संपते आणि एक व्यापार चालू होतो. लेखक म्हणून त्यात समाधान मिळत नाही, त्यामुळे मी टीव्हीसाठी लिखाण थांबवलं.

तुम्ही उर्दूचं प्रशिक्षण घेतलंय असंही मी कुठेतरी वाचलं..

हो, मला थिएटर करायचं होतं. मॉडेलिंग करायचं, त्यानंतर हिंदी थिएटर किंवा हिंदी सीरियल्स असं मनात होतं. म्हणून हिंदी स्वच्छ असावं असं वाटलं. एक मुस्लिम मित्र होता. त्याच्याकडे गझल, शेरोशायरी ऐकायचो. तो एक छंद होता. गुलाम अली वगैरे ऐकायला आवडायचं. असं ऐकत मला भाषेचा गोडवा लागला. एक अदब असते बघा उर्दूत. म्हणून शिकलो, एक वर्षभर शिकलो. मला शिकवणारा परदेशी गेला, म्हणून अर्धवटच राहिलं. भाषा बोलता येते. हळूहळू वाचताही येतं. पण पुढे शिकायचं राहून गेलं. मी हिंदी मालिकांसाठीही संवादलेखन केलेलं आहे. हिंदी उर्दू साहित्य जवळुन जाणून घेता आलं हा एक फायदा झाला.

हिंदीमधे जाण्याचा विचार आहे का?

विचार आहे. पण क्रेझ नाही. 'काम द्या' म्हणून कोणाच्या मागे लागण्याचा माझा स्वभाव नाही. ऑफर आली तर नक्कीच करायला आवडेल. 'रिंगा रिंगा' फिल्मसाठी मी एक गाणं लिहिलंय. गोव्यातील कार्निव्हल साँग असं मराठी चित्रपटात पहिल्यांदाच लिहिलं गेलंय. गोव्यातल्या कॅथलिक कोकणी आणि हिंदी भाषेत केलंय. ह्यात मागे गायकाव्यतिरिक्त जो कोरस आहे तो मी पूर्ण कोकणी ठेवलाय आणि गायक कुणाल गांजावाला ह्यांनी गायलंय ते गाणं हिंदी आहे. रेकॉर्डिंगच्या वेळी कुणालनं विचारलं, 'आप हिंदी में क्यूं नही हैं?' तर मला असं वाटतं की मिळेल संधी कधीतरी. नक्की आवडेल मला. आत्तापर्यंत बर्‍याच गोष्टी समोरून येत गेल्या आणि मी अ‍ॅक्सेप्ट करत गेलो. 'बघू जमतंय का' असं म्हणून मी करत गेलो आणि त्यात सक्सेस मिळत गेला. हिंदी - उर्दूत मी काही कविता लिहिल्या आहेत आणि बर्‍याच लोकांना त्या आवडल्याही आहेत. बघू कसा योग जुळून येतो तो!

तुम्हाला वाचकांकडून आलेला एखादा अनुभव सांगू शकाल का?

आता दोन दिवसांपूर्वी एक प्रसंग झालाय. माझी 'असे जगावे' म्हणून एक कविता आहे. एका सोशल नेट्वर्किंग साईट वर, एका मुलीने लिहिले आहे की तिची एक मैत्रीण डिप्रेशनमधे गेली होती आणि सगळ्यांना भीती होती की ती आत्महत्या करणार की काय. पण ही कविता तिच्या वाचनात आली आणि खूप फरक पडला तिच्यात आणि ती डिप्रेशन मधून बाहेर आली. हे वाचून मला खूप आनंद झाला आणि असे अनुभव वाचून मला वाचकांसाठी काहीतरी चांगलं लिहायची प्रेरणा मिळते,

मी माझ्या स्ट्रगलच्या काळात लिहिली होती ती कविता. मुळात मी भयंकर positive आहे . आयुष्य किती दु:खी आहे आणि मी कसा हालात आहे हेच का लिहायचं. माझ्याकडे पैसे नसायचे, स्ट्रगल चालू असायचा, कामं नसायची. तेव्हाही चेह-यावरचा ऊत्साह कायम तसाच असयचा बरेचदा विचारल जायचं की 'तू इतका स्ट्रगल करूनसुद्धा इतका आनंदी राहूच कसा शकतोस?'

उत्तर म्हणून तेव्हा मी चार ओळी लिहिल्या होत्या:
खिशास भोके सत्त्याहत्तर
तरी चेहरा हसरा आहे>br> माझ्यासाठी जगणे उत्सव
रोज दिवाळी दसरा आहे...

तेव्हा ह्या ओळी जणू माझी आयडेन्टिटी झाल्या होत्या. तसं पहायला गेलं तर ही माझी पहिलीच कविता असं आपण म्हणू शकतो.

Aavhan.jpg आता काही झटपट प्रश्न:
आवडते गीतकार - ग .दि. माडगुळकर
आवडती फिल्म - बर्‍याच आहेत - वेगवेगळ्या कारणांसाठी आवडलेल्या.
आवडते लेखक - पुलंच्या व्यक्तिरेखांनी मला भारून टाकलं, जयवंत दळवी - ज्यांच्या कथा वाचून आपणही लिहावं असं वाटलं, विजय तेंडुलकर - ज्यांच्यामुळे पटकथा आणि नाट्यलेखनाकडे पहायची एक वेगळी दृष्टी मिळाली.
आवडतं पुस्तक - बरीच आहेत पण नुकतंच वाचलेलं प्रकाश नारायण संतांचं 'वनवास'... तुम्हाला क्षणात तुमच्या बालपणात नेण्याची विलक्षण ताकद आहे त्यात.
आवडतं ठिकाण - हिरवंगार तळकोकण
आवडता खाद्यपदार्थ - प्रेमाने वाढलेली चटणी-भाकरही पक्वान्नासारखी लागते. सगळी जादू त्या जेवू घालणार्‍याच्या मायेत आणि प्रेमात असते. ते नसेल तर पक्वान्नही बेचव लागतं, नाही का?

तुमच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगाल का?

'रिंगा रिंगा' आता लवकरच प्रदर्शित होईल. त्यानंतर 'व्हेकेशन', 'क्षणभर विश्रांती', 'धतींग-धिंगाणा', 'अगडबंब' - ह्या सर्व सिनेमांसाठी मी गाणीच लिहितोय. काही वेगळा विषय असेल तरच मी संवाद लेखनासाठी निवड करतो.

मायबोलीकरांना तुम्ही काय सांगाल?

कुठलाही माणूस आपल्या मातीपासून जितका लांब जातो तितकी त्याला त्या मातीची ओढ व्याकुळ करते. सर्व काही असून काहीतरी राहून गेल्याची रुखरूख लागून राहते. आपल्या मातीचा - मायबोलीचा बंध तुटल्याची ती भावना असते. मला वाटतं मायबोली.कॉमने तो हळवा बंध अलगद जोडलाय. जगभरात पसरलेल्या आपापल्या जिवलगांशी आपल्या भाषेत हितगुज साधण्याच्या या किमयेने आपल्याला इतकं जवळ आणलंय की मनात प्रकटलेला एखादा विचार चेहर्‍यावर उमटण्याआधी दूरदेशीच्या जिवलगाच्या कॉम्प्यूटर स्क्रीनवर उमटतो अन त्याच वेगाने त्याची प्रतिक्रियाही आणतो याचं श्रेय मायबोलीलाच! त्यामुळेच 'वसुधैव कुटंबकम्' - संपूर्ण विश्वच एक कुटुंब आहे - ही संकल्पना सत्यात आल्यासारखी वाटते. देशाविदेशांतल्या देशबांधवांना एकत्र आणण्याचं मायबोलीचं हे काम खरंच कौतुकास्पद आहे. हे कार्य असंच अव्याहतपणे चालू राहावं ही प्रार्थना आणि मायबोलीकरांना मन:पूर्वक शुभेच्छा!

गुरु , मायबोलीच्या मुलाखती साठी तुम्ही वेळ काढलात त्यासाठी मन:पूर्वक धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा!!

ता.क.: कालच "झी गौरव पुरस्कार" सोहळ्यात "नटरंग" चित्रपटातील "खेळ मांडला" गाण्यासाठी गुरु ठाकुर यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला.

--------------
मार्गदर्शन आणि सहाय्य - मृण्मयी, स्वाती_आंबोळे
--------------
खास मायबोलीकरांसाठी गुरू ठाकूर यांनी केलेले हे त्यांच्या कवितेचे वाचन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली. मुलाखतीवरून गुरू 'नॅचरल' कवी/लेखक आहेत असं वाटलं. मस्त. 'टीपरे'चे संवाद त्यांचे आहेत ठाऊक नव्हतं. तसंच व्यंगचित्रकार आहेत, हेही. त्यांना अनेकानेक शुभेच्छा.

ह्या मुलाखतीबद्दल आभार.

मस्त झालीये मुलाखत.. गुरू व्यंगचित्रकार पण आहेत हे माहीत नव्हतं.

झी मराठी सारेगमपचा उल्लेख नाही मुलाखतीत. Happy

खिशास भोके सत्त्याहत्तर
तरी चेहरा हसरा आहे
माझ्यासाठी जगणे उत्सव
रोज दिवाळी दसरा आहे.

क्या बात है !!
गुरु ठाकुर हे नाव आजकाल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडी आहे. "नटरंग" चा धडाका आणि लगेचंच हा संवाद......छान औचित्य साधलंय Happy

मुलाखत छानच झालीये.

जबरदस्त मुलाखत.. Happy
मार्मिक मधली व्यंगचित्रे पाहिली होती.. पण ते हेच गुरु ठाकुर हे माहित नव्हते.. तसच टिपरे चे संवाद लेखन पण ह्यानी केलेय ही नविन माहिती कळाली.
एकदम हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. पुढच्या वाटचालीसाठी खुप शुभेच्छा. Happy

मस्तच मुलाखत!!! धन्यवाद नम्रता!!!!
रिंगा रिंगा मधील "घे सावरून मन हे साजणा" हे गाणेपण गुरु ठाकुरचेच आहे का?
सध्या ह्या गाण्याने मला वेड लावले आहे Happy

Pages