त्यादिवशी युट्युबवर लेकासाठी योग्य अशी बडबडगीते शोधत असताना हे एक जपानी बडबडगीत सापडलं. "ओ-च्या ओ-च्या ओ-च्या च्या-च्या-च्या" अश्या गंमतीदार सुरुवातीने सुरु होणारं ते गीत एका लोभस जपानी चिमुरडीने मस्तपैकी डान्स वगैरे करुन छान सादर केलंय. (’जपानमध्ये सर्वात प्रेक्षणीय काय असेल तर ती मुले’ असं पुलंनी आधीच लिहून ठेवलं आहे त्याला स्मरुन त्या बाहुलीचं अधिक वर्णन करत नाही.) बडबडगीताचा अर्थ वगैरे समजून घेण्यापर्यंत चिरंजीव अद्याप पोचले नाहीयेत. पण ती चाल आणि ठेका आवडेल अशा हेतूने मी ते गाणं त्याला ऐकवलं आणि त्याला ते आवडलंही. तेव्हढ्यात ऑफिसमधून नवरा आला आणि चिरंजीव इतके कशात रंगलेत हे पाहत असताना त्याने मला विचारलं.
"कशावर आहे हे गाणं?"
आमच्याकडे मराठी/हिंदी/इंग्रजी सोडल्यास इतर काही अगम्य कानावर पडलंच तर ते बर्याचदा जपानी असतं हे आता त्याला कळलंय त्यामुळे गाणं जपानीच असणार अशी त्याची खात्री झालेलीच होती.
"म्हणजे?" मी.
"अगं म्हणजे काय विषय आहे गाण्याचा"
"ओह! अरे विषय आहे ’ओच्या’ म्हणजे आपला ’चहा’ रे!
"काय? जपानीत चहा ला ’ओच्या’ म्हणतात?"
"हो. आपला ’चहा’ तर त्यांचा ’च्या’. म्हटलं नव्हतं मी तुला मराठी आणि जपानी सारखी आहे म्हणून?" मी.
यावर ’हा एक शब्द जरा मिळताजुळता असला तर काय लगेच भाषा अश्या सारख्या होतात काय’ असं त्याच्या चेहेर्यावरचं उमटलंय की काय असं मला वाटलं. तेव्हढ्यात चहा आणायला तो आत गेला. चहाचा कप घेऊन निवांत बसल्यावर मला म्हणाला, "पण मग ही ’ओ’ ची काय भानगड आहे?"
’ओ’ची भानगड? म्हणजे?" मला कळेना.
"अगं तूच मघाशी नाही का म्हणालीस ’ओ-च्या’. पण नंतर नुसतंच ’च्या’ म्हणालीस. म्हणून म्हटलं ही ’ओ’-’च्या’ ची भानगड काय?" हा म्हणाला.
"अरे ते होय! जपानीत ’ओ-’ हा एक आदरार्थी प्रत्यय आहे. जिथे आदर व्यक्त करायचाय अशा बर्याच ठिकाणी त्या त्या शब्दाआधी ’ओ-’ प्रत्यय लावतात जपानीत." माझा खुलासा.
"अच्छा". माझा खुलासा ऐकून अधिक खोलात जायच्या भानगडीत तो अर्थातच पडला नाही.
यावरुन मला मी जपानी भाषा नुकतीच शिकायला सुरुवात केली होती ते दिवस आठवले. साधारण ९-१० वर्षांपूर्वीचा काळ. काहीवेळा क्लासमध्ये हास्याची कारंजी उडायची.
"’ओ-च्या’ चं शब्दश: भाषांतर केलं तर काय होईल? आमच्या एका मैत्रिणीने विचारलं.
"(तुमचा) आदरणीय चहा!". कुणीतरी उत्तरलं आणि तेव्हाचा हशा आठवून मला आत्ताही हसू फुटलं. आता आदरणीय व्यक्ती असावी पण चहासुद्धा आदरणीय असतो का?
चहावरुन अजून एक उदाहरण आठवलं. ’ओ-सारा’.
’सारा’ म्हणजे ’बशी’. मग ’ओ-’ लावल्याने तीसुद्धा आदरणीय झाली म्हणायची! अजून उदाहरणं म्हणजे ’ओ-नामाए’ (नाव), ओ-शिगोतो (जॉब), ’ओ-तान्ज्योबी’ (वाढदिवस) आणि अशीच अजून चिक्कार आहेत. अशा प्रकारे बहुतेक निर्जीव गोष्टींना हा आदरार्थी प्रत्यय लावून खिदळायला आम्हाला एक चांगलं निमित्त सापडलं होतं. हे ’आदरणीय’ प्रकरण आम्ही पुढे बराच काळ आपापसात बोलताना मुद्दाम वापरत होतो. बाकी पुढे नोकरी लागल्यावर भारतीय बॉसला आणि इतर सर्वसामान्य जनतेलाही कळू नये ’असं काही’ बोलायचं असलं की आम्ही जपानीत बोलत असू. नव्हे, अजूनही बोलतो! आदरणीय (!) बॉसबद्दल बोलताना तर खाशी मज्जा यायची!
’च्या’च्या निमित्ताने मराठी आणि जपानी भाषांतील साम्यस्थळांची (स्थळं म्हणजे शब्द, वाक्प्रचार वगैरे) परत एकदा उजळणी करुन झाली आणि त्यातली गंमत तुमच्याबरोबरही शेअर करावीशी वाटली म्हणूनच हा लेखनप्रपंच! काय आहे की इंग्रजी आणि जपानी अगदी पूर्णपणे भिन्न भाषा आहेत. अगदी लिपीपासून ते उच्चार, व्याकरण इ. सर्व बाबींमध्ये या दोहोंत काडीचंही साम्य नाही. त्यामानाने मराठी जपानीला खूपच जवळची आहे. खासकरुन व्याकरणदृष्ट्या. (अर्थात लिपी पूर्णपणे वेगळी आहे) मराठीप्रमाणेच जपानीतही वाक्यातील पदांचा क्रम सारखाच आहे-कर्ता-कर्म-क्रियापद. जपानीतील अव्यये (particles) मराठीतील ’ऊन’, ’हून’ किंवा ’चा’, ’ची’, ’चे’ अश्या प्रत्ययांशी साम्य दाखवतात. या दोन्ही भाषांतल्या साम्यस्थळांमधला अजून एक समान धागा म्हणजे एखादा शब्द किंवा वाक्प्रचार अर्थाने किंवा उच्चाराने किंवा दोन्ही गोष्टींनी मराठीत आणि जपानीत एकच किंवा जवळपास सारखा असणे. हे साम्य जाणून घेणं नक्कीच मनोरंजक आणि गंमतीशीर आहे. कसं ते बघूया.
का???? का!!!!!
आता ’च्या’ पिऊन आपण सुरुवात केलीच आहे तर माझ्या सर्वात आवडत्या साम्यस्थळाकडे जाऊया. पुलंनीही याविषयी ’पूर्वरंग’ मध्ये नमूद केलंय. ते म्हणतात ’जपानी ’का’ आणि मराठी ’का’ चा अर्थ एकच असावा.’ आणि ते अक्षरश: खरं आहे!
मराठीतला ’का’ आणि जपानीतला ’का’ अर्थाने आणि उच्चाराने अगदी सारखा आहे. गंमत म्हणजे मराठीप्रमाणेच जपानीतही तो प्रश्नार्थकच आहे आणि मराठीसारखाच तो वाक्याच्या शेवटी येतो! उदा. ’पारी ए इकिमाश्ता का’ म्हणजे ’पॅरीसला गेला होतास/होतीस का?’ मधला ’का’ एकच काम करतो. प्रश्न विचारणे! (फक्त एकच फरक आहे, प्रश्नार्थक ’का’ नंतर आपण प्रश्नचिन्ह देतो तर जपानी पोकळ टिंब देतात.[。]असं. पण आताशा प्रश्नचिन्हही जपानीत वापरतात). इतकंच काय, मराठीतल्या या प्रश्नार्थक ’का’ मागे कधीकधी काही भावना किंवा हेतूही असतात उदाहरणार्थ, ’तुझं पुस्तक मी वाचलं तर चालेल का?’ (परवानगी/संमती मागणे), ’पण तू तिला असं म्हणालासच का? (संताप व्यक्त करणारा प्रश्न). या सर्व भावना जपानी ’का’ तूनही व्यक्त होतात, अगदी हुबेहूब!
याशिवाय अजून एक उदाहरण. कधी कधी आपण एखादी गोष्ट ऐकल्यावर ’हो का!’, ’असं का!’ म्हणून उद्गारतो. आता या ठिकाणी ’का’ प्रश्नार्थक नसून उद्गारवाचक आहे. अगदी हाच प्रकार जपानीतही आहे. ते म्हणतात ’सोs देस का!’ किंवा नुसतंच ’सोs का!’. तर या जपानी 'का!'चं कामसुध्दा अगदी तेच बरं का! उद्गारणे!! उदाहरणार्थ,
’गो-नेन गुराई निहोननी इमाश्ता’.
’सोs देस का!’
म्हणजेच,
’जवळपास ५ वर्षे मी जपानमध्ये होते/होतो’
’असं का!’
अजून गंमत म्हणजे आपण कधी कधी मुद्दाम ’हो का!’ च्याऐवजी ’होक्का!’ म्हणतो ना तर जपानी ’सोक्का!’ म्हणतात.
बरं ’का’चा महिमा इथवरच संपत नाही. आपण मराठीत कित्येकदा म्हणतो ना,"अमुक अमुक असं करुया का? का तसं करुया?" (किंवा आपण या ’का’ ऐवजी ’की’सुद्धा वापरतो). तर या ’का’ किंवा ’की’ने दोन प्रश्नार्थक पर्याय जोडण्याचं जे काम पार पाडलंय तेच काम जपानीतही तस्संच पार पाडलं जातं. उदाहरणार्थ, ’कोरे का सोरे’ (म्हणजे ’हे ’का’ ते?’)
जपानी शिकायला लागल्यावर लगेचच या साम्यस्थळाशी गाठ पडली होती....मला वाटतं आमच्या पहिल्या धड्यात ’आनाता वा निहोन्जीन देस का’ (तू जपानी आहेस का?) असं काहीसं वाक्य होतं आणि तेव्हाच आमच्या सेन्सेईंच्या* ’जपानी बोली बरीचशी आपल्या मायबोलीशी मिळतीजुळती आहे’ या सांगण्यावर आम्ही शिक्कामोर्तब करुन टाकलं होतं!
खाऊन बघ ना!
मराठीत आपण अनेकदा सहज बोलतो...’हे खाऊन बघ ना जरा’...आता या ’खाऊन बघण्याच्या’ क्रियेत अर्थातच त्या एखाद्या पदार्थाची चव घेणे वगैरे अपेक्षित आहे. पण इंग्लिशमध्ये ही क्रिया आपण अगदी अशीच म्हणत नाही. आपण या क्रियेला ’taste it' किंवा ’try it’ म्हणतो. (Eat and see असं तर नाही म्हणत!) पण अर्थाने अगदी सारखी असणारी अश्शीच दोन क्रियापदं एकत्र वापरणारी ही ’खाऊन बघण्याची’ क्रिया जपानीत मात्र आहे. ’खाऊन बघ ना’ ला जपानीत ’ताबेते मिते (कुदासाइ)’ म्हणतात ज्यात 'ताबेते'(मूळ क्रियापद ’ताबेरु’) आणि 'मिते' (मूळ क्रियापद ’मिरु’) यांचा अनुक्रमे अर्थ चक्क ’खाणे आणि बघणे’च आहे! त्यामुळे जपानी शिकताना गाडी जेव्हा ’ताबेते मिरु’ या क्रियेशी आली तेव्हा चटकन वाटलंच ’अरे! हे तर आपलं ’खाऊन बघणे’! (आमच्या सेन्सेईंनी याला नाव ठेवलं होतं ’खाके देखो पॅटर्न’ ) (खाऊन बघण्यावरुन आठवलं, जपानीत ’चवी’ला काय म्हणतात माहित्ये? जपानीत ’चव’ म्हणजे ’आजी’! आम्हाला लक्षात ठेवायला सोपं गेलं. ’आजी’च्या हातची चव आपण विसरु शकतो काय?)
या ’खाके देखो’ पॅटर्नमुळे अश्या प्रकारच्या मराठीतल्या इतरही जोड्या आपोआप जपानीतून एकेक करुन समोर येऊ लागल्या आणि अभ्यासातला रस वाढला. येताजाता मग आम्ही ’कीईते मीमास’ (मूळ क्रियापद ’किकु=विचारणे आणि ’मिरु’=’बघणे’) म्हणजे ’विचारुन बघते/बघतो हं”, इत्ते मिते ने’ (मूळ क्रियापद ’इकु’=जाणे आणि ’मिरु’=’बघणे’) म्हणजे ’जाऊन बघ ना”, यात्ते मियोs का (मूळ क्रियापद ’यारु’=करणे आणि ’मिरु’=’बघणे’) म्हणजे ’करुन पाहूया का?’ असं जपानी सांडायचो! तेव्ह्ढीच प्रॅक्टीस!! परकीय भाषेत असे काही समान दुवे आढळले तर खरोखर ती भाषा शिकणं केवळ ’शिकणं’ राहत नाही तर तो एक ’अनुभव’ ठरतो! ’अभ्यासाला’ अभ्यासाचा कोरडेपणा रहात नाही तर तो एक रंगतदार, मजेशीर प्रवास होतो. असं काही साम्यस्थळ शिकलो की आम्हाला वाटायचं, मग आपण मराठीत अमुक अमुक असं म्हणतो, त्याला जपानीत काय बरं म्हणत असतील? अशी विचार प्रक्रीया चालू झाली की मग होतं ते ’सेल्फ लर्निंग’. स्वत:लाच मनाशी विचार करुन एकातून एक, एकातून एक अशी त्या भाषेतील शब्दसंपत्ती वाढवत नेता येते! त्यासाठी मग तुमचं मन आणि एक शब्दकोष इतकीच आयुधं लागतात!
’खाऊन बघणे’ प्रमाणेच आपलं ’जाऊन येणे’ सुद्धा जपानीत आहे. ते इंग्लिशमध्ये नाही! ’जाऊन येते’ ला इंग्लिशमध्ये ’I will go and come (back)' असं म्हणण्यापेक्षा ’I'll be back!' असंच म्हटलं जातं नाही का! पण जपानीसुद्धा पटकन आपल्यासारखे ’इत्ते किमास’ म्हणजे अक्षरश: ’जाऊन येते/येतो’ म्हणून मोकळे होतात. यात मूळ क्रियापदे अनुक्रमे ’इकु’=जाणे व ’कुरु’=येणे आहेत!
यासारख्या साधर्म्याच्या बर्याच गोष्टी आजही भाषांतराची कामे करत असताना जाणवतात आणि तेव्हा अगदी वाटतंच की अमुक एखादं वाक्य मी इंग्रजीपेक्षा मराठीमध्ये अगदी तंतोतंत अर्थाने चपखल शब्द वापरुन भाषांतरीत करु शकेन. पण क्लायंटला मराठी कुठे येतंय!
नावात काय आहे!
आता तुम्ही म्हणाल, दोन भाषांमध्ये नावं/आडनावं सारखी असण्यात असं काय ते विशेष? असं साम्य असू शकतं की. खरंय. पण कोणी काहीही म्हणो, योगायोगाने काही जपानी आणि मराठी नावांमध्ये मजेशीर साम्य दडलंय.
’दाते’ हे असंच एक जपानी आडनाव. मला आठवतंय मी नोकरी करत असताना त्यावेळी ’दाते’ नावाच्या एका जपानी असामीचं आमच्या कंपनीत काही समारंभाच्या निमित्ताने येणं झालं होतं. (मला वाटतं तेव्हा ते मुंबईचे जपानी कॉन्स्युलर जनरल होते किंवा कॉन्स्युलेटमधील कुणी बडे अधिकारी होते) तेव्हा आमच्या कंपनीतील एका वरिष्ठ व्यक्तिने ’दाते’ हे जपानी नाव कसं असू शकेल असा विचार करुन त्यांच्या नावाचा उल्लेख चक्क ’डेट’ केला होता. अजून एक उदाहरण काकूंचं. काकू म्हणजे आपल्या बिल्डींगमधल्या काकू नाहीत बरं! ’काकू’ हेसुद्धा एक जपानी आडनाव आहे. आम्ही शिकत असतानाच्या सुमारास मुंबईत ’काकू’ नावाचे कॉन्स्युलर जनरल कार्यरत होते. त्यांच्या सौ. जपानी शिकवत असत असं ऐकलं होतं. त्यांचं आम्ही 'काकू'काकू आणि मिस्टरांचं 'काकू'काका असं नामकरण केलं होतं.
उमा! मराठीतलं किती सुंदर नाव! माझ्या बॅचला एक ’उमा’ नावाची मुलगी होती. योगायोगाने ती उमाबाईंची मुलगीच शोभावी अशी सुस्वरुप होती. पण तिचं हसणं मात्र चमत्कारिक होतं. थोडंफार खिंकाळल्यासारखं. आम्ही आपापसात तिच्या हसण्यावरुन चेष्टा करत असू आणि त्यातच जपानीत घोड्याला ’उमा’ म्हणतात हे ज्ञान प्राप्त झालं. मग काय! आम्हाला आयतंच हत्यार मिळालं उमाला जेरीस आणायला! तर सांगायचा मुद्दा हा की जपानी नावांत/आडनावांतही गंमती दडलेल्या आहेत. ’उमा’ हे एक उदाहरण झालं. अशी अजूनही आहेत.
ऑफिसमध्ये एकदा एका सिनियर हुद्द्याच्या व्यक्तिचं आगमन होणार होतं. मी रिसेप्शनिस्टला विचारलं, "कोण गं"? ती म्हणाली "नाकानिशी". हे नाव ऐकताक्षणीच मला जाम हसायला आलं पण मुश्किलीने मी ते आवरलं. तरी पोरीच्या नजरेतून माझं दबलेलं हसू सुटलं नव्हतंच. तिने विचारलंच मला त्याबद्दल पण ’नाकानिशी’तली मराठी मजा त्या ख्रिश्चन पोरीला कशी मी समजावणार आणि काय तिला कळणार!
वर नावांबद्दल लिहिताना मला एकदा नावामुळे झालेला गोंधळ आठवला. (झालेला म्हणजे मी केलेला गोंधळ). तेव्हा मी नुकतीच भाषांतरकार म्हणून नोकरीस लागले होते. फ्रेशर असल्याने कामाचं जाम प्रेशर वाटायचं आणि त्या प्रेशरमुळेच माझा गोंधळ झाला. आमची कंपनी जी मशिन्स बनवायची, त्यासंबधित सर्व टेक्निकल मजकूर (मग त्यात Drawingsपासून Manualsपर्यंत सर्वकाही मोडायचं) मी जपानी<>इंग्रजीत भाषांतरीत करत असे. एक दिवस एका डॉक्युमेंटमध्ये डिझाईन स्पेसिफिकेशन्समध्ये ’Usagi' असा शब्द आला. जपानीत ’Usagi’ म्हणजे ससा. आता त्या सर्व टेक्निकल जंजाळात सशाचा संबंध काय ते मला कळेना. बरं मागेपुढे धड संदर्भही नव्हता. मग मी सर्व शब्दकोश पालथे घातले, इंटरनेटवर शोध घेऊन बघितला पण कुठेही तसल्या टेक्निकल माहितीमध्ये सशाचा मागमूसही दिसला नाही. मग नंतर अचानक सुचलं, अरेच्चा! कदाचित ही लिहिणार्याची साधी स्पेलिंग मिस्टेक असेल. ही स्पेसिफिकेशन्स ’Usami' नावाच्या जपान्याने लिहिली आहेत. तर टाईप करताना ’उसामी’चं चुकून ’उसागी’ झालेलं दिसतंय.! हुश्श! म्हणजे सशाचा खरोखरीच संबंध नाहीये म्हणायचा!’
मी सुटकेचा नि:श्वास टाकला खरा पण मला वाटलं एकदा विचारुन खात्री करुन घ्यावी. मग मी सरळ जपानला फोन फिरवला आणि सांगितलं की माझ्या मते अशी अशी अशी नावाची स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. यावर पलिकडल्या व्यक्तिच्या चेहेर्यावरचे भाव संभाषण फोनवरुन झाल्यामुळे मला बघता आले नाहीत पण मला त्याचा अंदाज आहे. शक्य तितक्या नम्रतेने त्याने सांगितलं. ’डॉक्युमेंटमध्ये ’ससा’च आहे. कारण आपल्या ग्राहकाला बाटलीवर सशाचं चित्र engrave करुन हवं आहे.’ हे ऐकून मी शक्य तितक्या त्वरेने फोन संभाषण आवरतं घेतलं
हो जा ’शुरु’!
जपानी शिकताना मला अजून एका क्रियापदाची गंमत वाटली होती. या क्रियापदाचं मराठीतल्या क्रियापदाशी थेट साम्य नसलं तरी मराठीतल्या त्या क्रियेशी जवळचं नातं मात्र नक्कीच आहे. जपानीमध्ये ’करणे’ किंवा ’To do' या क्रियेसाठी ’सुरु’ हे क्रियापद आहे. त्यामुळे त्यामुळे, "चला! परीक्षा जवळ येत चाललीय! आता अभ्यास ’सुरु’ करायलाच हवा" असं आपण म्हणावं आणि याच क्रियेला जपान्याने म्हणावे ’बेन्क्योs (अभ्यास) ’सुरु’! आहे की नाही!! आता अभ्यास हे एक उदाहरण झालं पण जपानीत इतरही असंख्य गोष्टी ’सुरु’च होतात. त्यात उठल्यापासून झोपेपर्यंतच्या असंख्य क्रियांचा समावेश होतो. मग ते ’सोजी’ (स्वच्छता करणं) असो किंवा ’काईमोनो’ (खरेदी) असो, जे काही आहे ते ’सुरु’च होणार. अर्थात जपानीतलं ’सुरु’ हे त्या क्रियापदाचं मूळ रुप असलं आणि काळानुसार त्यात बदल होत असला तरी एकंदरीत तोच मतितार्थ आहे.
याच ’सुरु’वरुन आठवलेलं अजून एक साम्यस्थळ म्हणजे ’सेवा’. आपल्या मराठीत ’सेवा’ शब्द आपण ज्या अर्थाने वापरतो अगदी त्याच अर्थाने उच्चारासकट जपानी लोक जपानीत वापरतात. फक्त आपण एखाद्याची ’सेवा करतो’ तर जपान वर दिल्याप्रमाणे ’सेवा सुरु’ करतात. पण त्या सेवेमागची भावना एकच आहे. काळजी घेणे! मदत करणे! इतकंच काय, बर्याच जपान्यांचा इमेल ’इरोइरो ओ-सेवा नी नारीमाश्ता’ ने सुरु होतो. म्हणजे काय तर, "खूप काही केलंत हो माझ्यासाठी, धन्यवाद बरं का’. (बाकी जपानी पद्धतीने कमरेत लवून आभारप्रदर्शन करायची स्मायली अजून कुण्या जपान्याने कशी काय तयार केली नाही कुणास ठाऊक. समोरच्याकडून इरोइरो सेवा घेतल्याबद्दल थॅंक्यू टायपल्यावर ठोकायला बरी पडली असती.:) )
परवा कुठलातरी लेख वाचताना त्यात ’मज्जा येत्ये नै?’ मधल्या ’नै’ ची एकसारखी भेट होत होती. मला असे ’नाही?’ ला ’नै’ म्हणणे (किंवा ’काहीच्या काही’ ला ’कैच्याकै’ म्हणणे) इत्यादी प्रकार कुठे वाचण्यात आले तर वाचायला आवडतात. गंमतीशीर वाटतात. आणि मग हमखास यातल्या ’नै’च्या जपानी भावंडाची आठवण येतेच. खरोखर, इथेही साम्य आहेच. कसं बघा हं. उदा. आपण खूपवेळा उदगारतो, अमुक एक गोष्ट ’मस्त आहे ना!’ त्यालाच जपानी म्हणतील ’सुगोइ ना!’. या ’ना’ चा उच्चार, अर्थ अगदी अगदी सारखा आहे आणि त्यामागची भावनासुद्धा! पण या ’ना’ व्यतिरिक्त जपानी कधीकधी ’ने’ पण वापरतात. हा ’ने’ आपल्याला आपल्या प्रश्नार्थक/उद्गारवाचक ’नाही?!’ ( आणि पर्यायाने ’नै’च्याही) जवळ नेतो. उदाहरणार्थ, ’कोरे वा ताकाई देस ने!’ म्हणजे ’हे महाग आहे, नाही?!’ (महाग आहे नै!)
मी ज्या कंपनीत काम करत असे तिथे एकंदरीत बिगर मराठी जनता जास्त होती. त्यातही बिहारी, उत्तरप्रदेशी जास्तच. त्यापैकी काहीजण ट्रेनिंगनिमित्त जपानवारी करुन आले. तर आल्यावर त्यांना साक्षात्कार झाला की जपानी बोली भाषा त्यांना त्यांच्या मातृभाषेसारखीच वाटतेय. हे त्यांनी मला बोलून दाखवलं. मला वाटलं म्हणजे जपानीचं केवळ मराठीशीच साम्य नाहीये तर! उदाहरणार्थ? मी गंभीरपणे विचारलं. तर एकजण म्हणाला, "हमार भासामें हम ’वा’ शब्द बहुत इस्तमाल करते है, लालूजींका भाषण तो सुना होगा आपने वर्साजी?" (या व्यक्तीने मला कधीही ’वर्षा’ म्हटलेलं नाही! कायम आपलं ’वर्साजी’च!)
’जी हा सुना है". मी.
"बस्स्स! तो जापानीभी ’वा’ शब्द बहुत इस्तमाल करते है. जैसे की ’कोरे वा नान देस्का?’"
हे उदाहरण ऐकलं मात्र आणि हिंदी आणि जपानी भाषेतला शाब्दिक सारखेपणा गंभीरपणे जाणून घ्यायला आतुर झालेल्या मला हसूच आलं एकदम. वातावरण सैलावलं.
’कोरे वा नान देस्का?’ म्हणजे ’हे काय आहे?’ खरंतर. यात ’वा’ हा एक topic/subject indicating particle (अव्यय) आहे आणि ’नान’ म्हणजे ’काय’.
पण या बहाद्दरांना त्यातला ’वा’ हा त्यांचा बिहारी ’वा’ वाटला आणि ’नान’ म्हणजे काय ते सांगायला नकोच!
मनात म्हटलं शेवटी प्रत्येकजण परकीय भाषेचे मातृभाषेशी कितपत लागेबांधे आहेत हेच शोधत असतो. मी तरी दुसरं काय करतेय!!!
समाप्त
*सेन्सेई= शिक्षक
लेख आवडला. ठाण्याला जपानी
लेख आवडला. ठाण्याला जपानी शिकायला लागल्यावर नी जपानला जायच्या आधी सरांनी सांगितलेलं की जपानी लोकांसमोर नवर्याला 'अहो' म्हणून बोलावू नका. कारण 'अहो' म्हणजे जपानीत 'गाढव'
मराठीत विचार करुन जपानीत बोललं तर खूप सोप्पं पडतं. हे खरंय.
मस्त लेख.. नेहेमीप्रमाणेच ,
मस्त लेख.. नेहेमीप्रमाणेच
, प्रत्येक वाक्याला अनूमोदन 


सायो
पण या लेखा वरुन जपानी शिकणे खुप सोपे आहे..असा गैरसमज करुन घेउ नये..
वर्सा, लेख एकदम सहीच. जपानी
वर्सा, लेख एकदम सहीच.
जपानी मुलांच्या चेहर्यामध्ये जो गोडवा आहे तो इथल्या मुलांमध्येही नाहीच बघायला मिळत, बाकी बर्याच गोष्टींमध्ये साम्य असलं तरी.
मी हे काकू चं लिहीणारचं होते, की कॉन्स्युलेटमध्ये एक काकू आडनावाची व्यक्ति होती वगैरे. केदारच्या ३ र्या वाक्याशी एकदम सहमत.
वाह! किती जुन्या आठवणी जाग्या
वाह! किती जुन्या आठवणी जाग्या झाल्या.... जपानी शिकतानाचे दिवस डोळ्यांसमोर आले...
फारच मस्त लिहिलंय... आणि खूप छान समजावून सांगितलयस!!
धन्यवाद. >>पण या लेखा वरुन
धन्यवाद.
>>पण या लेखा वरुन जपानी शिकणे खुप सोपे आहे..असा गैरसमज करुन घेउ नये.
पण मी म्हणीन की जपानी बोली भाषा शिकणे सोपे आहे. लिहिणे-वाचणे नक्कीच अवघड आहे..पेक्षा किचकट आहे...tests your patience!
गुजराती मधला नो आणि जपानी
गुजराती मधला नो आणि जपानी मधला नो पण सारखे आहेत.
सुंदर आपले पण अनुमोदन सगळ्या
सुंदर
आपले पण अनुमोदन सगळ्या गोष्टींना
@पर्सनलः
जपानी भाषा शिकतानाचे दिवस आयुष्यातले सर्वात उत्तम दिवस होते... २००२-२००४
'सेन्सेई' म्हणजे देव होते\होत्या अगदी. (आणि आहेतही..) ह्या निमित्ताने परत एकदा त्यांना प्रणाम!!!
नात्सुकाशीई बाहुली...@
@जियो & लिहो
-रुयाम
वर्साजी आप तो बहोतही अच्छी
वर्साजी आप तो बहोतही अच्छी टीचर है
मला पण जुने दिवस आठवून एकदम नात्सुकाशिई वाटले.
काकू प्रमाणे बाबा हे देखील आडनाव असते बर का.
एकदा मला आमच्या कंपनीच्या (मराठी) प्रमुखाने सांगितले की,
बाबा सान ला मेल पाठव, मला आधी वाटले की तो गमतीने म्हणतोय.
पण मेल आयडी आणि कांजी पाहिल्यावर कळाले की आहे खरा बाबा सान.
एकदा विमानात एक आजी (चव नाही) भेटल्या त्यांचे आडनाव होते ताते.
मी बोलताना दाते असेच समजुन चाललो होतो, पण लिहिलेले नाव पाहिल्यावर कळाले.
@महेश 'बाबासान' बाकी
@महेश
'बाबासान'
बाकी सगळ्याना धन्यवाद
मस्त लेख वर्षा. मजा आली
मस्त लेख वर्षा. मजा आली वाचताना.
नात्सुकाशी.
जपानीची मजा बाकी मला स्वतःला कधी समजली नाही असं तुझा लेख वाचून वाटलं. मराठी, इंग्रजी, हिंदी, जर्मन या चारी भाषांची जादू थोडीफार समजली. जपानी नुसतीच शिकले आणि नुसतीच समजते, पण त्यातले मर्म समजण्यापूर्वीच स्वल्पविराम घेतला. आता पुन्हा कधीतरी.
मी सुमारे १३ वर्षांपूर्वी
मी सुमारे १३ वर्षांपूर्वी जपानी शिकलो त्याची आठवण झाली. जपानीत आईला हाहा म्हणतात नी बाबांना चीची म्हणतात तर आगीला ही म्हणतात. तेव्हा आम्ही म्हणायचो की घरात आग लागली नी आइला बोलवायचे असेल तर म्हणायचे
..
..
हाहा ही ही हाहा ही ही

चु.भू.द्या.घ्या.
वडिलांचं नाव कुठेय त्यात?
वडिलांचं नाव कुठेय त्यात? त्यांना आगीत लोटायचं असं तर नव्हे?
मग ते हाहा चीची ही ही होइल...
मग ते
हाहा चीची ही ही होइल...
(No subject)
आमच्या कम्पनीत "शैलेश महाजन"
आमच्या कम्पनीत "शैलेश महाजन" नावाचा मार्केटींग मॅनेजर होता. त्याने १३ वर्षांपूर्वी सांगितलेली ही खरी / खोटी गोष्ट. नन्तर मला हा ज्योक म्हणुन पण कुणाकडुन तरी forward म्हणून ऐकायला मिळाला पण बहुधा ह्यात तथ्यांश असावा.
तर हा पठ्ठ्या जपान ला पहिल्यान्दाच गेला होता. तिथल्या क्लएन्ट च्या माणसांशी पहिल्या दिवशी सकाळी एकाने ओळख करुन दिल्यावर तो जपानी माणूस त्याला कमरेत वाकून म्हणाला "ओहायो गोझाइमास", मग ह्यानेही कमरेत वाकून आपले नाव म्हटले "शैलेश महाजन". दुसर्या दिवशी पुन्हा तेच. तो भेटल्यावर तो म्हणाला "ओहायो गोझाइमास", हासुद्धा त्याला अभिवादन करुन म्हणाला "शैलेश महाजन".
मात्र शैलेश ला शन्का आली, लगेच त्याने त्याच्या कलिगला विचारुन "ओहायो गोझाइमास"चा अर्थ विचारला, तेव्हा त्याला कळले की त्याचा अर्थ Good Morning असा आहे!
तिसर्या दिवशी ह्याने स्वतःच जाऊन त्याला अभिवादन केले "ओहायो गोझाइमास". जपानी चाट, लगेच जपान्याकडुन कमरेत वाकून प्रत्युत्तर आले
"शैलेश महाजन".
वर्षा मस्त लेख. जपानी भाषेचा
वर्षा
मस्त लेख. जपानी भाषेचा कधीही संबंध आला नाही तरीपण वाचायला मजा आली.
मस्त लेख.
मस्त लेख.
मस्त लेख..वाचताना मजा आली...
मस्त लेख..वाचताना मजा आली...
मी जपान मध्ये सहा सहा आठवड्या
मी जपान मध्ये सहा सहा आठवड्या च्या डेप्युटेशन वर ४ -५ वेळा गेलो होतो.तिथे आणखी आवाजास एक नाजूक हेलकावा देवून वापरला जाणारा वाक्प्रचार म्हणजे "अनो ने ~~~~~" हा आहे.
अनो ने- अनो ने ---वाक्य्,अनो ने ----वाक्य अशी ती गाडी चालते.
आपण मराठीत ,"बर का,बर का करून बोलतो -तसलाच हा प्रकार.
अजुन खुप गमती आहेत. आम्ही
अजुन खुप गमती आहेत.
आम्ही शिकत असताना "हाहा ही ही" सारखे खुप प्रयोग करायचो.
"आरिगातो गोझाईमास" म्हणजे "धन्यवाद",
आम्ही नेहेमी बाय बाय करताना "घरी जातो गोझाईमास" म्हणायचो.
"ओनेगाई" म्हणजे विनंती करणे.
जपान मधे असताना आमच्या एका मराठी मित्राच्या घरी गेलो होतो.
तो मुलाला मांडीवर घेऊन थोपटत झोपवत होता. तरी तो लवकर झोपत नव्हता.
हा आधी जे म्हणत होता त्यात बदल करून म्हणाला "गाई गाई ओनेगाई"
"आनादोरू" असा एक शब्द आहे त्याचा अर्थ "अनादर करणे" असाच आहे.
एकदम मस्त लेख
एकदम मस्त लेख
दोझो योरोशिकु ओनेगाइ शिमास चा
दोझो योरोशिकु ओनेगाइ शिमास चा नक्की अर्थ काय आहे? तो आमच्या सेन्सेइला आमच्यासारख्या हुश्शार गाक्सइंना (विद्यार्थ्यांना) समजावता आला नव्हता. एकंदरीत तो रीतिभातीचा प्रकार आहे एव्हढे कळले पण जपान मध्ये राहिलेल्यान्नो, उदाहरण देऊन स्पष्ट करा ना कुदासाइ (प्लीज).
दोझो योरोशिकू म्हणजे प्लीज्ड
दोझो योरोशिकू म्हणजे प्लीज्ड टू मीट यू. माझ्या सामान्य बुद्धीप्रमाणे जेव्हा आपण इंट्रोडक्शन करून देतो नां तेव्हा हे वापरतात. ओनेगाई शिमास म्हणजे विनंती करणे पण ते याच्यापुढे का लावलंय कळलं नाही. आमच्या क्लासमध्ये हे नवीन आलेल्या मुलाला/मुलीला म्हणायला सांगायचे. आधी स्वतःचे नाव सांगायचे व पुढे हे. तरी जपानी मधील एक्सपर्ट ह्यावर आणखी प्रकाश टाकतीलच.
मस्त लेख आणि मस्त
मस्त लेख आणि मस्त प्रतिक्रिया..
जॅपनीजच्या क्लास मधे खरच खूप धमाल यायची.. पॅटर्न सोपे आहेत एकदम.. ते आठवतात अजून पण कांज्या विसरलो सगळ्या..
सांगा बरं मुलांनो ह्या tongue twister चा अर्थ..
निवा निवा निवा तोरीगा निवा इमास... प्रत्येक निवा चा अर्थ वेगळा बर्का...
आडो, तू सांगितलेला अर्थ बरोबर
आडो, तू सांगितलेला अर्थ बरोबर आहे.
पराग, तू जपानच्या गप्पा बीबी वर जर शोलेच्या कुठल्याही एका हिंदी लाईनचं जॅपनीज मध्ये भाषांतर केलंस तरच तुझ्या टंग ट्विस्टरला उत्तर देऊ.
हा प्रवेश प्रक्रियेतला भाग
निवानी तोरीगा निवा इमास -
निवानी तोरीगा निवा इमास - अस आहे ते.
अर्थ : बागेत दोन पक्षी आहेत.
बाकी दोझो योरोशिकू ओनेगाई शिमास चा बरोब्बर अर्थ सांगू शकेन.
पण केव्हा आणि कोणत्या बाफवर सांगायचा ते सांगा
महेश, दोझो योरोशिकू चा अर्थ
महेश, दोझो योरोशिकू चा अर्थ सांगून शिळा झाला.
अब नया कुछ सोचो.
जपानमध्ये नवीन असताना ट्रेनमधल्या 'ओ त्सुकामारी कुदासाई' चा अर्थ अजिबात कळायचा नाही. एकतर बोलीभाषेत 'ओचकामारी' म्हणतात. शिवी दिल्यासारखी वाटायची एकदम.
ओचकामारी असेच त्या
ओचकामारी
असेच त्या ओत्सुकारेसामादेस बद्दल वाटायचे,
ओचकारे सामा देस. कोणी तरी कोणाला तरी ओचकारल्यासारखे
आणि ओचकारुन झाल्यावर
आणि ओचकारुन झाल्यावर 'ओचकारेसमादेशिता'
Pages