When in Rome... (इटली प्रवास: भाग १/२)

Submitted by सॅम on 21 February, 2010 - 13:29

मागच्या वर्षी (इ.स.२००९) ऑगस्टमध्ये आम्ही इटली प्रवास केला. युरोपात आल्यावर इटली प्रवास कधी होतो याची वाटच बघत होतो. आठवडाभर सुट्टी काढून दहा दिवसात मिळून आम्ही रोम, फ्लोरेन्स आणि व्हेनिसमध्ये राहिलो आणि रोमहुन नेपल्स व पॉम्पेइ, फ्लोरेनसहुन पिसाला धावती भेट दिली.

नेहमीप्रमाणे यावेळीही हॉटेल बुकिंग www.hrs.com वर केले. हॉटेल घेतानाच बघून रेल्वे स्थानकाजवळचे घेतले. कारण सगळा अंतर्गत प्रवास रेल्वेनीच करायचा होता. रोम-फ्लोरेंस-पिसा तीन-चार तासाच्या अंतरावर आहेत. आधी माहिती काढल्याप्रमाणे इटालियन रेल्वेची सेवा उत्तम आणि स्वस्त निघाली. आम्ही अगदी पर्यटन मोसमात गेलो होतो तरीही तिकीट ऑनलाईन आरक्षित न करता रोममध्ये पोहोचल्यावरच पुढची सगळी आरक्षणं केली. गाड्या संपूर्ण भरलेल्याच होत्या. आरक्षण करायला पण भरपूर मोठ्ठी रांग होती तरीही काउंटरवरील माणसांनी भरपूर वेळ देऊन छान योजना आखून दिली. युरोपातला पर्यटन काळ म्हणजे इथला उन्हाळा (जुलै ते सप्टेंबर) या काळात इथल्या शाळांनापण सुट्ट्या असल्याने युरोपिअन लोकं देखील मोठ्या प्रवासांना निघतात.

आधी जेवण हॉटेलात केले पण पिझ्झे इतके बकवास निघाले... व्हेज पिझ्झात भाज्या टाकायला कमालीची कंजुशी केली होती. नंतर नंतर छोट्या दुकानांमधून स्वस्त आणि मस्त पिझ्झा (१ किलो १० युरोला!!) घेऊन हॉटेलात खायचो. मला पिझ्झा प्रिय असल्याने आठवडाभर पिझ्झाच खाल्ला! (मी लहान असताना तामिळनाडूच्या सहलीवर दहा दिवस इडली-डोसाच खात होतो, भाताला हातही नव्हता लावला, त्याची आठवण झाली!!)

इटलीत सगळीकडेच जुन्या इमारती दिसतात. आमची हॉटेलपण अशाच जुन्या इमारतीत होती. गोल जिन्याच्या मधून जाणारी लिफ्ट थेट हॉलीवूडच्या कृष्ण-धवल सिनेमांमधून आणल्यासारखी वाटत होती. धक्का देऊन सुरु होणारी आजू बाजू लोखंडी जाली लावलेली! इमारतीची दारही दहा-बारा फुट उंच, मोठ्ठा हत्ती आत जाईल एवढी लांब-रुंद. तेवढीच जड पण. मला नेहमी प्रश्न पडायचा की लहान मुलं कशी उघडत असतील?... का त्यांनी मोठ्यांसोबतच बाहेर जावं हा उद्देश? प्रत्येक दारावर मुठी देखील वेगवेगळया आकाराच्या होत्या.

आम्हाला पहिला इटालीअन माणूस विमानतळाबाहेरच भेटला. उंच, हडकुळा, कुरळे केस आणि बोलण्याची ती विशिष्ट लकब थेट Mind your language च्या जीओवानीची आठवण करून देणारी! एकदम हुबेहूब. आम्ही खुश!!

इटाली आणि भारतात मला बरचं साम्य आढळलं.
... जसं रहदारी आपल्यासारखीच... जराशी बेशिस्त, म्हणजे कोणी चुकीच्या बाजूनी जातंय किंवा सिग्नल मोडून चाललाय असं (इतकं) नाही पण यांच्या युरोपीय शेजाऱ्यांच्या तुलनेत लेनची शिस्त कमी पाळली जायची तसेच अधून मधून होर्न देखील ऐकू येत, पादचारी कुठूनही रस्ता ओलांडत इतकंच.
... उकाडा आपल्यासारखाच... आता पॅरीसचा उन्हाळा बघितला होता. इटली त्याहून उष्ण आहे हे ऐकले होते पण पुर्ण प्रवासात हवामानानी जरा जास्तच साथ दिली! लख्ख उन आणि पारा पस्तीसच्या वरती!! आधी चांगलं वाटलं पण थोड्याच वेळात घाम आणि मग वैताग सुरु झाला. या उकाड्यामुळे दुपारी बाहेर फिरणं फार अवघड असल्याने आम्ही सकाळी ९ ते १२ फिरत असू मग जेवण करून २ पर्यंत घरी येत असू आणि आराम करून एक शॉवर घेऊन पुन्हा संध्याकाळी बाहेर पडायचो. शिवाय टोपी-सनस्क्रीन मस्टच!
... पर्यटकांच्या 'सोई' आपल्यासारख्याच... विमानतळ आणि रेल्वे स्थानकाबाहेर टॅक्सीवाले आणि एजंटच्या दुकानांचीच गर्दी. सरकारी सोई तश्या जास्त नाहीत. पर्यटकांच्या सोईच्या बाबत बार्सिलोनाहून चांगला अनुभव युरोपात दुसऱ्या शहरात आला नाही. इटलीत तुम्ही जर चार-पाच जण असाल तर टॅक्सी करून फिरलेलं स्वस्त आणि सोप्प. आमच्याकडे वेळ आणि इच्छा दोन्ही असल्याने आम्ही सार्वजनिक वाहतुकीचाच वापर केला.
... लोकं देखील आपल्यासारखीच... एक तर हे पाकिस्तानी-बांगलादेशी लोकं भरपूर झालेत (कुठे नाहीयेत ते सांगा!) इटालियन लोकांचे रंगरूप वेगळे तरी वागणं-बोलणं साधारण आपल्यासारखंच. कधी कधी तर बोलतायत का भांडतायत तेच कळत नाही. हातवारे तर एवढे करतात. मुली जोवर बोलत नाहीत तोवर छान दिसतात.
एकंदर आपण थोडा प्रयत्न केला तर इटलीची बरोबरी करणं तर आरामात शक्य आहे.

फिरताना सगळीकडे भरपुर चालायची तयारी ठेवा. पर्यटन माहिती कार्यालयाला जरुर भेट द्या. युरोपात राहून आम्ही हे एक शिकलो, अगदी पूर्वतयारी न करता सरळ पर्यटन कार्यालयात जाऊन आपल्या प्रवासाची आखणी करणे इथे शक्य आहे. सगळीकडे पास/तिकीट घेताना वय जरूर सांगा... युरोपात २६ वर्षांपर्यंत 'तरुण' समजतात! कधी कधी दोन-पाच युरो कमीत काम होतं. माझ्या अंदाजाप्रमाणे रोम फिरायला दोन दिवस, व्हॅटिकनसाठी एक दिवस आणि नेपल्स्+पॉम्पेइ बघायला एक दिवस हवाच. रोममध्ये राहून ही तिन्ही ठिकाणे पाहता येतील. फ्लोरेंसमध्ये राहून फ्लोरेंस बघायला कमीत कमी एक दिवस आणि पिसाला - जायचं असेल तर - अर्ध्या दिवसात भेट देता येईल. व्हेनिसला जास्त अपेक्षा घेऊन जाऊ नका माझ्या मते दीड दिवस पुरे... जितके जास्त राहाल तितके व्हेनिस कमी आवडेल!!

नेपल्स (नापोली)+पॉम्पेइ
रोमहुन नेपल्स (नापोली) आणि पॉम्पेइ अशी एका दिवसाची टुर १०० युरो प्रत्येकीत पडते. स्वत: गेलात तर खर्च जवळपास तेवढाच येतो पण वेळ मात्र जातो. आम्ही रोम-नापोली (नेपल्स) रेल्वे आणि नंतर टॅक्सी करून नेपल्स आणि पॉम्पेई बघितले. आधी टॅक्सी करणार नव्हतो पण अजून दोन (अमेरिकन) देसी मुली भेटल्या आणि त्यांच्याबरोबर टॅक्सी केल्यामुळे प्रत्येकी तीस युरोत काम झालं. पॉम्पेई मध्ये गाईड १०० युरो घेतो, जास्तीत जास्त दहा जणांचा एक ग्रुप असतो त्यामुळे दहा टाळकी जमा होईपर्यंत वाट बघावी लागते नाहीतर जास्त पैशे द्यावे लागतात. साधारण २ तासाची एक टूर असते. पॉम्पेईबरोबर व्हेसुविओ ज्वालामुखी बघायचा असेल तर त्याच दिवसात नेपल्स होणार नाही.

व्हेसिविओ ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे इ.स. ७९ ला पॉम्पेई आणि आजू बाजूची चार-पाच गावं नष्ट झाली. व्हेसुविओ हा जिवंत ज्वालामुखी असून शेवटचा मोठ्ठा उद्रेक इ.स.१९४४ ला झालाय. पॉम्पेई गाडले जाण्याआधी इ.स. ६२ ला मोठ्ठा भूकंप होऊन बरीच पडझड झाली होती. त्यानंतर बऱ्याच लोकांनी पॉम्पेई सोडले असा अंदाज आहे. त्यामुळे इ.स. ७९ ला ज्वालामुखी उद्रेकामुळे पॉम्पेई गाडले गेले तेंव्हा शहराची लोकसंख्या नक्की किती होती याचा अंदाज नाही. उद्रेक होण्याआधी समुद्रकिनारा पॉम्पेईला होता आता तो दोन किलोमीटर पुढे गेलाय. ह्या शहराचा शोध इ.स.१५९९ साली लागला.

पॉम्पेई आणि मागे व्हेसुविओ:

हे शहर त्या वेळी बरेच महत्वाचे होते. अचानक गाडले गेल्यामुळे त्याची रचना जशीच्या तशी राहिली. आत्ता आपल्याला त्या काळाच्या इमारती, रस्ते, भित्तीचित्रे जशीच्या तशी बघायला मिळतात.

बासिलिका: इथे न्यायदानाचे काम होत असे.

इ.स. ६२ च्या भूकंपानंतर शहर पुन्हा वासावयाचे प्रयत्न सुरु झाले. तेंव्हा जुन्या दगडी खांबासारखे दिसणारे खांब विटा आणि प्लास्टर वापरून तयार केले गेले.

अपोलो देवाचे मंदिर: (डावीकडे सौर-घड्याळ)

बाजारपेठेतील सरकार प्रमाणित आकारमान मोजण्याची मापे:

शहरात सगळे मृत्यू राख व धूर यामुळे गुदमरून झाले आहेत. सारे शहर राखेने/छोट्या दगडाने गाडले गेले आणि कालांतराने ती राख दाबून कठीण झाली. दरम्यान त्यात गाडली गेलेली शरीरे कुजून गेल्यामुळे तिथे पोकळी तयार झाली. उत्खननादरम्यान अशा पोकळीत प्लास्टर टाकून त्या मृत व्यक्तीची प्रतिकृती तयार करण्यात आली. अशाच काही प्रतिकृती, सोबत त्या काळतली मातीची भांडी व इतर कलाकृती:

हे शहर व्यवस्थित नियोजन करुन बांधले होते. रस्त्याच्या कडेला फुटपाथ असतं. काही रस्ते दुहेरी तर काही एकेरी वाहतुकीसाठी वापरण्यात येत. हे रस्त्यात असलेल्या मोठ्या दगडांमुळे कळतं. रस्ता ओलांडण्यासाठी या दगडांचा उपयोग व्हायचा. रस्ते दगडी असल्यामुळे बग्यांच्या चाकांच्या खुणा उमटलेल्या अजुनही दिसतात.

रस्त्याला नावे चित्र वापरून दिलेली आहेत: (जसं इथे मटण गल्ली आणि वाईन पथ ???)

सार्वजनिक स्नानगृह पूर्वीच्या रोमन साम्राज्यात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात. बरीच लोकं त्याचा वापरही करत. इथेही हे एक उद्रेकातून वाचलेले स्नानगृह:

इथली श्रीमंत लोकांची घरं बरीच मोठ्ठी असत, अंगण, अतिथीगृह, स्वयंपाकघर, नोकरांच्या खोल्या वै. विभागणी होती.
घराच्या प्रवेशद्वारावरचे मोसाईक:

घरातील भित्तीचित्रे:

पिठाची गिरणी आणि भट्टी:

२००० वर्ष जुन्या वस्तु/चित्रं/इमरती जशाच्या तशा बघताना वेगळंच वाटतं. समोरच्या व्हेसुविओकडे पाहिलं की उद्रेकावेळी कसा दिसला असेल असा विचार सुरु होतो आणि मग या लोकांच्या शेवटच्या क्षणांची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो.

नेपल्स:
नेपल्स मस्तय. समुद्रकिनारा आहे तसेच डोंगर पण आहेत... आम्ही अगदीच तासाभरात धावती भेट दिली पण राहलं तर मजा येइल असं वाटलं. तसं बघायला जास्त नाही.. एक समृदाजवळचा किल्ला, एक दोन चर्च, एक जुनी प्रसिद्ध गल्ली. पण डोंगरावर गेलं की भुमध्य समुद्र मध्ये व्हेसुविओ ज्वालामुखी आणि डावीकडे नेपल्स असं बघत बसावं वाटलं...

कुठल्याशा एका प्रेमकहाणीत शेवटी प्रियकर इथे येउन एक कुलुप लावतो म्हणे, तेंव्हापासुन सगळे प्रेमवीर इथे कुलुप लाउन त्यावर आपली नावे लिहितात... नगरपालिकेला ही कुलपं काढायचं अजुन एक काम...

आमच्या बरोबर ज्या दोघीजणी होत्या त्यातली एक अमेरिकेत नोकरी करत होती तर दुसरी नॉर्थ अमेरिकेत (कॅनडात)... रेल्वेनी परत रोममध्ये येईपर्यंत आम्ही बरोबरच होतो. वास्तविक दोघींच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण भारतात झालेलं... तरी ती अमेरीकन उच्चारापासून-कपड्यांपर्यंत अगदी पक्की अमेरिकन होती आणि ती कॅनडाची बोलताना सारखी 'नॉर्थ अमेरीकामे...' अशीच सुरु व्हायची, कॅनडा म्हणायला काय लाज वाटत होती कोणास ठाऊक! दोघी तशा मालदार होत्या, पुढे इटलीहून क्रूसने ग्रीसला जाणार होत्या!

.

रोम
रोमात रोमा-पास मिळतो. २२ युरोत नकाशा, माहिती पुस्तक, ३ दिवसासाठी सार्वजनिक वाहतूकीचा पास आणि पहिल्या २ पर्यटन स्थळांमध्ये मोफत प्रवेश... एकदम फायदेशीर! रोमला 'भग्न अवशेषांचे शहर' म्हणतात. कारण शहरात कुठेही गेलात तरी सगळीकडे पुरातन अवशेष दिसतील. रोममध्ये भूमिगत मेट्रो करायचे देखील बरेच प्रयत्न झाले पण जिथे खोदावं तिथे नवीन अवशेष मिळत आणि अजुन एक संग्रहालय करावं लागे असं म्हणतात!

या सगळ्या अवशेषात कलोसीअम, रोमन फोरम, पॅलॅटिनो हिल्स हे सगळ्यात भव्य आणि सुंदर आहेत. कलोसीअम दिवसा, संध्याकाळी आणि रात्री बघायला पाहिजेच. अतिशय भव्य इमारत आहे... शिवाय ग्यॅडिएटर पाहिला असेल तर त्या काळाची कल्पना करणे अजून सोप्पे जाईल.

कलोसीअमच्या तिकिटातच त्यासमोरचे रोमन फोरम आणि पॅलॅटिनो हिल्स बघता येतं. बरच चालाव लागतं पण बघायलाच पाहिजेत अशी ही ठिकाणं आहेत.

बाकी आकर्षण म्हणजे,
- ट्रिवीचे कारंजे: जितके एकले होते त्या मानाने ठीक आहे! इथे भरपूर गर्दी असते. सगळेजण त्या कारंज्यात नाणी टाकतात. असं केलं तर म्हणे तुम्हाला इथे परत यायची संधी मिळते... मला अजून युरोप बराच फिरायचा आहे त्यामुळे पुन्हा इथे येण्याबद्दल मी उत्सुक नव्हतो पण दबावाला (!) बळी पडून एक नाणं फेकावं लागलं! (विकिप्रमाणे रोज साधारण ३००० युरो इथे फेकले जातात)

- पॅन्थिऑन: इथेही गर्दी ओसंडून वाहत असते. या इमारतीची विशेषता म्हणजे दोन हजार वर्षापूर्वी बांधलेलं याचं गोलाकार छत हे आजही रेन्फोर्स न करता बांढलेलं सर्वात मोठ्ठे छत आहे. बाकी रात्री सगळे दिवे बहुतेक कलोसीअमवर लावल्यामुळे इथे लावायला दिवे शिल्लक राहिले नाहीत असंच वाटतं!

- स्पॅनिष स्टेप्स: हा प्रकार जेवढा ऐकला होता त्या मानाने बघायला काहीच नाही. एकतर आम्ही वाट चुकून फिरत फिरत शेवटी इथे पोचलो, तर खालपासून वरपर्यंत चिक्कार पायर्‍या आणि त्यावर बसलेली भरपूर लोकं ... बस! आम्हाला हा प्रकार काही खास वाटला नाही.

इथेच वरती बरेच कलाकार चित्र काढत असतात, त्यातलाच हा चित्रकार कलाकाराचे स्वातंत्र (Artistic Liberty) घेउन मोठ्या डोळ्याच्या चिनी मुलीचं चित्र काढत होता...

.

व्हॅटिकन सिटी
जगातील सगळ्यात छोटा देश... कॅथॉलिक लोकांसाठी सगळ्यात महत्वाचा! इथे बघायला आहे सेंट पिटर्स चर्च आणि व्हॅटिकन संग्रहालय.

व्हॅटिकन मध्ये सेंट पिटर्स बघायला मोठ्ठी (च्या मोठ्ठी) रांग असू शकते. जर तुमच्याकडे एक दिवस असेल आणि व्हॅटिकन म्युसिअमही बघणार असाल तर गाईडेड टूर घेतलेली चांगली. चर्चसमोर हे टूर वाले भेटतात... ते २० युरो जास्त घेतात पण संग्रहालय आणि चर्च दोन्हीकडे रांगेत उभं राहावं लागतं नाही.... माहिती पण व्यवस्थित मिळते. ते आधी संग्रहालयात नेतात. तिथे मुख्य आकर्षण म्हणजे व्हॅटिकनने जमवलेली संपत्ती, चित्र, मुर्त्या आणि सगळ्यात महत्वाचं मायकेलअ‍ॅन्जेलोने रंगवलेले सिस्टीन चॅपल, जे टूरच्या सगळ्यात शेवटी येतं.

आख्या संग्रहालयाच तिकीट सिस्टीन चॅपल बघितल्यावर वसूल होतं! मायकेलअ‍ॅन्जेलो हा मुळात मूर्तिकार होता त्यामुळे चॅपल रंगवायचं काम त्याने जरा नाखुशिनीच घेतलं. पण जे काम केलं ते जगप्रसिद्ध आहे. त्यात समोरच्या भिंतीवर रंगवलेला 'कयामत' (The Last Judgment) चा देखावा प्रसिद्ध आहे. हा देखावा कॅथॉलिक जगतात बराच गाजला. त्यात आणि बाकीच्या चित्रातली उघडी माणसं त्यावेळच्या बऱ्याच धर्मगुरूंना रुचली नव्हती. हा 'कायामती'चा देखावा मध्ये विधाता, आजूबाजूला देवदूत, वर स्वर्ग, खाली नरक असा रंगवला आहे.

छतावर अ‍ॅडम आणि इव यांची गोष्ट रंगवण्यात आली आहे. त्यात अ‍ॅडमचा जन्म, इवचा जन्म आणि एडनच्या बागेतून झालेली दोघांची हकालपट्टी हे येतं. छतावरची चित्र मस्त आहेत पण एक एक चित्र बघेस्तोवर मन दुखायला लागते. गाईड देखील मन लाऊन सगळी माहिती देत होती.

इथून बाहेर पडलं की आपण सेंट पिटर्स चर्चच्या शेजारी येतो. इथे एक भली मोठ्ठी रांग होती. चौकशी केल्यावर कळलं की ती चर्चच्या डोमवर जाण्यासाठी होती. तिथे जागोजागी लिहिलं होतं की ३५० पायऱ्या आहेत आणि चिंचोळा जिना आहे. त्यामुळे नाजूक प्रकृती असलेल्यांनी न गेलेलं चांगलं. ७ युरोचे तिकीट कढुन बरंच चढाव लागलं पण वरून व्हॅटिकन आणि रोम मस्त दिसत होतं.

कॅथॉलिक लोकांसाठी सगळ्यात महत्वाचं असं सेंट पिटर्स चर्च आतून अतिशय भव्य आहे. मोठ्ठा घुमट, त्यावर सोनेरी नक्षी सुंदर दिसते. इथेच मायकेलअ‍ॅन्जेलोनी साकारलेली 'पिएता' नावाची कलाकृतीही इथे आहे.

सेंट पिटर्स आणि इटलीत इतर काही चर्चमध्येपण ड्रेस कोड असतो(!) बायका, पुरुषांनी खांदे आणि गुडघे झाकले जातील असे कपडे घालावे लागतात. धक्कादायक वाटत ना! भारतात असताना हे ऐकलं असतं तर वाटलं असतं, ह्या लोकांना नुसतं 'कपडे घालून या' असं सांगितलं तरी बस आहे! पण इथे बघाल तर साधारण सगळेजण बऱ्यापैकी ठीक कपडे घालतात. 'भारतात राहत असताना परदेशाबद्द्ल झालेल्या कल्पना' यावर स्वतंत्र लेख होऊ शकेल.

चर्चसमोर मोठ्ठ पटांगण आहे. अ‍ॅन्जेल्स अ‍ॅन्ड डेमन्स मध्ये शेवटचा क्लायमॅक्स इथेच झालेला दाखवलाय. सिनेमा बघितलेल्यांना खालचे फोटो ओळखीचे वाटतील.

व्हॅटिकन हा वेगळा देश असल्याने यांचे प्रशासन वेगळे तसेच पोलीस वेगळे... फक्त ते पोलीस आहेत हे कळायला थोडा वेळ लागतो! खालचा फोटो बघा म्हणजे कळेल!

सगळ्याच स्माराकांप्रमाणे हे चर्च देखील रात्री पाहायलाच पाहिजे...

.

उफ्फ... दमलो... आता फ्लोरेन्स, पिसा आणि व्हेनिसबद्दल पुढल्या भागात!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती व वर्णनही ओघवतं आहे. फोटोही झक्कास. खासकरून सिस्टीन चॅपल व सेंट पीटर्स चर्च अफलातून.

एकंदर आपण थोडा प्रयत्न केला तर इटलीची बरोबरी करणं तर आरामात शक्य आहे. >>> Lol
युरोपमध्ये गेल्यावर तुमची पर्स सांभाळा असे सल्ले देण्यात येतात, जास्त करून इटलीला असं ऐकून आहे. पिझ्झा आणि पास्ता/स्पॅगेटी बद्दल तुम्हांला विचारायचं ठरवलं होतंच.

पोलिसांचा वेश बघून सर्कसमधली पात्रं वाटतायत.

वर्णन अजून पुरतं वाचलं नाहीये पण फोटो मस्तच.
त्या चिनी मुलीचं चित्र मस्त काढलंय पण डोळे जरा जास्तच मोठे काढले नाहीयेत? तिला बरं वाटावं म्हणून असेल बहुतेक. Wink

छानच. नेहमीप्रमाणे. वर्णन वाचताना, फोटो पाहताना हरवून गेले होते.. आणि एकदम [क्रमशः] दिसलं...

मस्तच लिहीत आहेस समीर....फ़ोटो्ग्राफ़ीही नेहमीप्रमाणे उत्तम

धन्यवाद मंडळी....

आऊटडोअर्स,
>> युरोपमध्ये गेल्यावर तुमची पर्स सांभाळा असे सल्ले देण्यात येतात,
हो... खासकर इटली आणि स्पेन... मदत करायच्या सबबीखाली/पैशे पडलेत/घाण लागलीये वै सांगुन! आपण थोडं सावध असलं की बसं... चिंताजनक परिस्थिती नाहिये Happy

सायो,
>> चिनी मुलीचं चित्र मस्त काढलंय पण डोळे जरा जास्तच मोठे काढले नाहीयेत?
artistic liberty!!!

सॅम
हे लिहून तू परत एकदा इटलीची सफर घडवल्याबद्द्ल धन्यवाद. मागच्यावर्षीची सगळी इटली ट्रीप परत डोळ्यासमोर आली.

.

वा: फोटो फार अफलातून , वर्णनात हात आखडता घेतलाय...

रोमन हॉलिडे मध्ये डॉमिनो पिझ्याची गाडी दिसते चक्क....

शाम राव , तुम्ही फोटो मायबोलीवर टाकताना १५० केबी चे बंधन कसे पाळता आणि फोटोची क्वालिटी कशी साम्भाळता? आमची तर पार वाट लागते फोटो रिड्युस केल्यावर.... Sad

>> मायबोलीवर टाकताना १५० केबी चे बंधन कसे पाळता आणि फोटोची क्वालिटी कशी साम्भाळता?
टोणगा, मी मायबोलीवर फोटो अपलोड करतच नाही!! पिकासावर करतो... आणि इथे लिन्क देतो. ती अशी,


१. पिकासावर फोटोच्या उजविकडे "Link to this photo" वर टिचकी मार
२. फोटो केवढा मोठ्ठा हवाय ते निवड, मी ८०० निवडतो
३. मी Image only (no link), निवडतो (मला फक्त हवा तो फोटो द्यायचाय, अख्या अल्बमची लिन्क द्यायची नाही)
४. Embed Image मधल्या लिन्क वर फोटो असतो

आता हा फोटो आपल्या लेखात घालण्यासाठी img या HTML टॅगचा वापर करतो
img width=630 src="http:// - - - - - वरती ४. मधे कॉपी केलेली लिन - - - - - .JPG"
वरचं वाक्य <> या कंसात टाकायचं. इथे width=630, कारण मायबोलीचे पान या आकाराचे आहे. (उभ्या चित्रांची उंची height वापरुन बदलता येते)