फक्त माणूस म्हणून जगायची संधी मला मिळेल कधी?

Submitted by नानबा on 18 February, 2010 - 15:39

गोष्ट तशी जुनी. फारा वर्षांपूर्वीची. जेव्हा भारतवर्षावर सवर्णांचं राज्य होतं. सवर्ण म्हणजे कोण? तर राज्यकारभार बघणारे क्षत्रिय आणि ब्राह्मण. जातीनुरुप समाजरचनेचा काळ होता. स्पृश्यास्पृश्य भेद होते, पण भरडल्या जाणार्‍या घटकालाही जाणीव नव्हती की तो भरडला जातोय! पूर्वसुकृत, प्रारब्ध अशा गोंडस नावाखाली प्रत्येकानं आपलं जगणं बिनभोबाट स्विकारलेलं (किंवा त्यांना स्विकारायला भाग पाडण्यात आलेलं)
काबाडकष्ट केल्यानंतर पोटाला मीठ-भाकर मिळणं हीच मोठी गोष्ट. मग समाजात मान, माणूस म्हणून वागणूक वगैरे गोष्टी बहुसंख्य लोकांना कल्पनेतही माहित नव्हत्या, मग त्या प्रत्यक्ष अनुभवणं तर दुरची गोष्ट! तसे, एखादे एकनाथ असायचेही, जे समाजाचा विरोध पत्करूनही जातपातीच्या पलिकडचा माणूस पाहू शकायचे, ज्यांना खरं ब्रह्म कळलेलं! किंवा एखादे शिवाजी महाराज- जे माणसाला जाती धर्मापेक्षा नियत आणि योग्यता बघून ओळखायचे. पण संत लोक वगळता अशांची संख्या कमीच! कुणी अशी वेगळं वागण्याची हिम्मत केलीच तर तोच वाळीत टाकला जायची शक्यता जास्त! त्यामुळे मनात असणारेही धाडस करू शकायचे नाहीत.
तर अशा चरकात आपला समाज सापडला असतानाची ही गोष्ट. दिग्या नावाच्या माणसाची. दिग्याचं खरं नाव काय होतं कुणास ठावूक, पण जातीवरून माणसाला हाक मारण्याच्या काळात लोक त्याला दिग्या म्हणायचे हेच विशेष!
दिग्याचा बाप गावच्या पाटलाकडे वेठबिगारी करायचा. त्याच्या बापाच्या बानं मोठ्या पाटलाकडून कर्ज घेतलेलं म्हणे - अन तेव्हापासून बाप पाटलाकडे कामाला लागला. थोडा मोठा झाल्यावर बापाबरोबरच दिग्याही जायला लागला पाटलाकडे.
"दिवसभर राब राब राबल्यानंतर पाणी पिण्यासाठी आपल्याला दुसर्‍यापुढे ओंजळ का पसरावी लागते?", "गोठ्यातल्या गुरांचा होत नाही, पण आपल्या सावलीचाही विटाळ कसा होतो?", "आपण किती वर्ष असं भाकरतुकड्याकरता दिवसदिवस मरायचं" असले प्रश्न दिग्याला कधी पडलेच नाहीत. कदाचित आपलं माणूस असूनही माणूस नसणं एखादेवेळेस जाणवलं असेलही, पण हे असलं जगणं एक प्रकारच्या अपरिहार्यतेनं सगळ्यां इतकंच दिग्यानही स्विकारलेलं होतं - एकतर ही सर्वमान्य समाज व्यवस्था होती, त्यातून दिग्याचा बराचसा वेळ जायचा तो त्याच्या विठूरायाच्या स्मरणात! जळी, स्थळी, काष्ठी पाषाणी फक्त विठ्ठ्ल! त्याच्या स्मरणात तो तहानभूकही विसरायचा!
असंच काहिसं आजही झालं. पाटलाची गुरं राखता राखता त्याच्याही नकळत तो पांडुरंगाच्या भजनात रंगला. भक्ताची चाकरी करण्याचा नावलौकिक असणार्‍या विठोबानही आज भक्ताची कसली परिक्षा पहायचं ठरवलं कुणास ठावूक! इकडे दिग्या भजनात गुंतलेला असताना तिकडे गुरांनी पिकाची नासाडी केली. पाटलाला हे कळलं अन तो भडकला. आधीच जाग्या झालेल्या पाटलाच्यातल्या सैतानाला जागं करायचं काम कुलकर्ण्यांनं केलं. दिग्यानं झालेली तूट भरून द्यावी असा पाटलानी हुकुम सोडला. दिग्यानं चुक मान्य केली - पण त्याच्याकडे द्यायला होतंच काय? त्याची जमीन दोन पिढ्यांमागेच पाटलाकडे गहाण पडलेली. घाबरतच त्यानं ह्या गोष्टीची वाच्यता केली, मात्र पाटील आणखीनच भडकला. दिग्याला अन इतर कामकर्‍यांना वेळीच जरब बसावी, म्हणून पाटलानं दिग्याला फटक्यांची शिक्षा सुनावली. विठ्ठलाचं नाव घेऊन पाठीवरचा एकएक कोरडा सहन करणार्‍या दिग्याला बघून पाटलाच्या संतापात आणखीनच भर पडत होती- त्याचबरोबर कोरड्यांचा जोरही. आणखीन जोरात- जोरात - अशाच एका क्षणी दिग्याला कळलं की आपण काही ह्यातून वाचत नाही.
पांडुरंगाला कधीच काही न मागणार्‍या दिग्यानं त्या क्षणी मात्र एक मागणं मागितलं "पुढल्या येळेला मला पाटलांच्या नायतर कुलकर्ण्याच्याच घरी जल्माला घाल. मी ह्ये समदं बदलीन."
त्या सत्शील माणसानं मरतानाही कुणाचं वाईट चिंतलं नाही - हे असं पहिलं अन शेवटचं मागणं मागून त्या विठ्ठलभक्तानं शेवटचा श्वास घेतला.
----------------------------------------
१९४० सालातली गोष्ट. भाऊराव आणि त्यांचे वडील बंधू दादासाहेब कुलकर्णी, दोघांनाही साधारणतः महिन्यापूर्वी अटक केलेली. घरात पुरुषमाणूस कुणीच नाही - अशात भाऊरावांच्या पत्नी सौ पार्वतीबाईंचे दिवस भरत आलेले. खरंतर लग्नानंतर बरेच वर्ष मुलबाळ नाही म्हणून किती लोकांनी भाऊरावांना दुसर्‍या लग्नाचा सल्ला दिला. ते फक्त हसून म्हणायचे " माझा दुसरा विवाह आधीच झाला आहे. ह्या हिंदुस्थानाशी!"
नऊ महिन्यापूर्वी मात्र त्यांचा दत्त त्यांना पावला. पार्वतीबाईंना दिवस गेले. खरंतर किती कोडकौतुक व्हायला पाहिजे होतं त्यांचं! पण देशाकरता सर्वस्वाची होळी करण्याचे दिवस होते ते - त्यात स्वतःच्या छोट्या मोठ्या कष्टांची तमा कुणाला होती!
त्या दिवशी सकाळ पासून पार्वतीबाईंना कळा येत होत्या. नुसतीच घालमेल! तशी आक्का सुईण होतीच मदतीला! अखेर रात्री बाराच्या आसपास सुटल्या पार्वतीबाई! मुलगा झालेला त्याना. मुलाचा पायगुण चांगला म्हणून भाऊराव आणि दादासाहेबही सुटून आले तुरुंगातून. दत्त दिगंबरांचा प्रसाद म्हणून मुलाचं नावही दिगंबरच ठेवलं. आईचं (आणि तुरुंगात नसतील तेव्हा वडिलांचं) कौतुक झेलता झेलता दिगू दिसामाशी मोठा होत होता.

१४ ऑगस्ट १९४७ - भाऊरावांसारख्या अनेक स्वातंत्र्यसेनानींच्या प्रयत्नांना अखेर यश आलं होतं. आज रात्री बारा वाजता - म्हणजे १५ ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळणार होतं. गुलामगिरीचे दिवस आता गेले होते - आता गांधीबाबाचं राज्य येणार! सगळं वातावरण कसं भारलेलं होतं!
स्वातंत्र्य मिळालं खरं - पण पाठोपाठ सुरू झाल्या त्या हिंदू मुसलमान दंगली. लाखोंनी निरपराध लोक मारले गेले! सगळं वातावरणच गढूळल्यासारखं झालं! ह्या सगळ्याप्रकाराला एक वर्षही झालं नसेल, पण इंग्रजांची जागा 'देशी' साहेबांनी घ्यायला सुरुवात केलेली! अर्थातच स्वातंत्र्यानंतर रामराज्य येईल हा फुगा अजून पूर्णपणे फुटला नव्हता. अशातच ३० जानेवारी १९४८ ला गांधिजींचं मुस्लिम विषयक धोरण सहन न होऊन नथुराम गोडसे नं गांधीजींवर गोळ्या झाडल्या! गांधीजी अनंतात विलिन झाले.
गांधींचा मृत्यू, नथुराम गोडसे अन नाना आपट्यांना फाशी- येवढ्यावर हे प्रकरण संपलं नाही. हिंदू मुसलमानांचं रक्त अजून सुकतच होतं - तोच एक नवीन लाट पसरली - गोडसे ब्राह्मण असल्यानं - ब्राह्मण विरोधी लाट. पुरोगामी म्हणवल्या गेलेल्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी ब्राह्मणांची घरं जाळली गेली, होती नव्हती ती संपत्ती लुटली गेली, काही ठिकाणी तर पोरीबाळींची विटंबना करण्याचे घाटही घातले गेले होते. जे नशीबवान होते, ते आहेत त्या वस्त्रांनिशी पळून गेले. पण सगळ्यांचच नशीब एवढं चांगलं नव्हतं!
भाऊराव कुलकर्ण्यांना हे सगळं होणार ह्याची कुणकुण लागली. अत्यावश्यक गोष्टींचं गाठोडं बांधून ते कुटुंबासहित बाहेर पडणार तर दाराला बाहेरून कडी असल्याचं लक्षात आलं. काय घडतंय हे लक्षात आल्यानं त्यांच्या काळजात चर्र झालं. निदान दिगूला तरी बाहेर काढलं पाहिजे ह्याविचारांनी त्यांनी मागचं दार, खिडक्या सगळं पाहिलं - पण खूप उशीर झालेला. लोक वाड्याभोवती जमलेले. त्यांना भाऊरावांचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचे कष्ट/हालअपेष्टा आठवल्या नाहीत, नाही दिसला मुलाच्या काळजीनं काळवंडलेला पार्वतीबाईंचा चेहरा, दिगू तर अजून उमललाही नव्हता- पण ह्यातलं काहीच दिसत नव्हतं त्या जमावाला. कळत होतं तर इतकच की हे ब्राह्मण आहेत अन त्यांना जाळायचं आहे.
पेटलेल्या वाड्यात आकांत माजला. बायकापोरांच्या किंचाळ्या , हुंदके एकच कल्लोळ झाला. अप्पा कुलकर्ण्यांनी बाधलेल्या त्या वाड्याबरोबर जळताना दिगूला त्याचे सगळे जन्म आठवले! हो सगळे जन्म! एका जन्मात तो विठ्ठलभक्त दिग्या होता - आणि जातीमुळे नागावला गेलेला. ते सगळं बदलायला तर तो ह्या जन्मी ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेला ना! पण त्याला मोठं व्हायची संधीही मिळाली नव्हती! बाहेरच्या जमावात आडनाव बदललेला, जात बदललेला तोच पाटलाचा, अप्पा कुलकर्ण्याचा चेहरा दिसत होता!
अन मग असे इतर अनेक जन्म :- जर्मन छळछावण्यात मारला गेलेला ज्यू, मुसलमानी राजवटीत धर्मांतराकरता छळला गेलेला हिंदू, दंगलीत मारला गेलेला मुसलमान, गुलाम म्हणून विकला गेलेला आफ्रिकन, ग्रीक साम्राज्यात लोकांच्या मनोरंजनासाठी भुकेल्या वाघाबरोबर कुस्ती करणारा गुलाम, नवर्‍याबरोबर चीतेला जबरदस्तीनं बांधला गेलेला अन नंतर सती म्हणून मंदीरात उभा असणारा दिगू! असे किती गेलेले जन्म! असे किती येणारे जन्म!
=========================
दिगूची ही कथा ऐकून मी सुन्न झाले. ही कथा फक्त दिगूची नाहिये, तुमची माझी- आपल्यातल्या कुणाचीही असू शकते! सैतानाला कुठली जात, कुठला धर्म नसतोच मुळी. तो फक्त आपल्याला आपण सगळेच माणूस आहोत हे विसरायला भाग पाडतो. मग सुरु होतं - मी मुसलमान- तू हिंदू, मी ब्राह्मण- तू मराठा, मी पुरुष तू बाई, मी गोरा- तू काळा, तू ह्या देशीचा - मी त्या देशीचा. भेद होतच रहातो प्रत्येक पातळीवर. जगात फक्त मुसलमान धर्मच राहिला तरी ते सुन्नी शिया म्हणून एकमेकांना मारतीलच. एकाच जातीचे लोक राहिले तरी पुन्हा पोटजाती असतीलच! अगदी सगळे भेद नष्ट केले तरी बाई-पुरुष, गरीब-श्रीमंत, छळणारा- छळ सहन करणारा असे भेद कधी जातील?

जगाच्या दृष्टीनं मी भारतीय असते, भारतात महाराष्ट्रातली अन हिंदू, हिंदूंमध्ये मी ब्राह्मण असते, ब्राह्मणात देशस्थ (त्यातही पुन्हा ऋग्वेदी), स्त्री हे आणखीन एक वर्गीकरण.
मग पेटत रहाते मी वेगवेगळ्या भेदांवरून.
श्रेष्ठ मानत रहाते- माझाच देश, माझंच राज्य, माझाच धर्म, माझीच जात, माझंच स्त्रीत्व!
मला कुठलं नाव नाही, नाहिये कुठला चेहरा!
धर्म- जात पेटण्यापुरतं, मला नाहीच कुठला सोयरा!
अशीच मी धुमसत रहाते, रहाते पेटत पुन्हा पुन्हा!
जाळत जाताना माणुसकीला, मी असते हस्तक सैतानाची- फक्त घेते देवाधर्माचा चेहरा!

गुलमोहर: 

केदार म्हणाल्याप्रमाणे -रँड मोड ऑन - कुठल्याही व्यवस्थेत पिडीत / शोषीत वर्ग तयार होत असतोच, अशी व्यवस्था नसणारा समाज कधीही होणार नाही हेच सत्य. हीच परिस्थीती सर्व देशात आहे. दुसर्‍याच्या परिस्थीतीचा फायदा घेणे हा मानवी स्वभाव आहे. माणुस टाळुन समा़ज बनत नाही त्यामुळे समाज म्हणल की हे सर्व येणार. मार्क्स जेथे पराभव पावतो तेथे अजुन तरी दुसरा पर्याय जगासमोर नाही. किंबहुना हे पर्याय नैसर्गीक नसल्यामुळे पराभुत होतात. कर्माचा सिध्दांत हे हरीभाई ठ़क्कर यांचे पुस्तक वाचावे म्हणजे भारतीय तत्वज्ञान या प्रश्नांवर काय म्हणत या बाबत जाणता येईल.
नानबा तुमची लेखनशैली छानच आहे.

प्रयोगला अनुमोदन !

पिसाळलेल्या आणि भरकटलेल्या जमावाचे रुपांतर जनावरात होते. आमच्या गावातली जुनी माणसे सांगतात.
आमच्या आजोबांनी गावात प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी आमची तीन एकर जमीन देवू केली होती. त्यावरच्या बांधकामासाठी देखील स्वत:ची काही जमीन विकून पैसा पुरवला होता. आजही ती शाळा आजोबांच्या नावाने गावात आहे. आज त्या वेळी चौथीपर्यंत असलेल्या शाळेचे रुपांतर हायस्कुलमध्ये झाले आहे.
पण म. गांधींची हत्या झाल्यावर त्यावेळी उठलेल्या लाटेत या कुठल्याही गोष्टींचा विचार न करता लोकांनी आमचा वाडा जाळला होता. ज्या माणसाकडे प्रत्येक अडी अडचणीच्यावेळी सारे गाव धाव घ्यायचे त्या माझ्या आजोबांना अतिषय भयंकर रितीने मारहाण करण्यात आली. त्यानंतर वर्षभर आप्पा अंथरुणालाच खिळुन होते... त्यातच गेले.

अप्रतिम लिहिलं आहेस. तळमळ जाणवते...विशेषतः शेवटच्या उतार्‍यात.

माणसाचा पशू होतो, तेव्हा त्याला कोणतीही जात, कोणताही धर्म नसतो. तो केवळ एक पशूच बनून राहतो. Sad

भयानक आहेत तुम्ही सांगताय त्या आठवणी.. Sad
मी अमेरिकन समाजाकडे जेव्हा बघते अन जेव्हा मनात आपल्या देशाशी तुलना होते - दर वेळेस वाटतं की आपला देश असा कधी होणार! म्हणजे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नाही म्हणत आहे. पण समाज म्हणून - जाता येता हुल्लडबाजी/ दंगे नाहीत. अवघड परिस्थितही शिस्तबद्धता. उगा आपलं माझं लग्न आहे मी फोडणार फटाके घरासमोर- असलं काही नाही. सामान्य माणसाला सरळपणे जगायची इच्छा असेल तर संधी आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामात पैसे खातात का माहित नाही इथेही - पण त्याची झळ तरी नाही बसलेली आजतागायत.

परवा जिम मध्ये असताना - डिस्कव्हरीवर व्हेल्स ना वाचवण्यासाठी माणसांनी केलेले अथक प्रयत्न पाहिले. काही ठिकाणी जीव धोक्यात घालूनही. खरंच डोळे भरून आले शेवटी. वाटलं ही खरी माणूसकी! नाहीतर रस्त्यावरच्या कुत्र्यांना सोडा, माणसांनाही दगड मारणारी भारतातली लोकं! कसली संस्कृती अन कसलं काय! भूतकाळ सोडून दिला तरी आजही काही उत्साहवर्धक चित्र दिसत नाही! Sad

नानबा छान लिहिलं आहेस.. तरीपण तुझं शेवटचं पोस्ट पटलं नाही!!

नाहीतर रस्त्यावरच्या कुत्र्यांना सोडा, माणसांनाही दगड मारणारी भारतातली लोकं! कसली संस्कृती अन कसलं काय! भूतकाळ सोडून दिला तरी आजही काही उत्साहवर्धक चित्र दिसत नाही! >>> इतके निराश होउन चालत नाही... माझा अजूनही माणसातल्या माणुसकीवर विश्वास आहे.. वाईट प्रसंग येतात.. पण तितकेच चांगले प्रसंगदेखील येतात. पण ते जास्त कुणाच्या लक्षात राहत नसतील बहुतेक!!

बाबरी मस्जिद पाडल्यावर दंगे उसळले होते तेव्हा आम्च्या कॉलनीमधे फक्त आमचा एक बंगला हिंदूचा होता. राजिवड्यामधे वगैरे गडबड झालिये हे ऐकून आमच्या गल्लीतले मुसलमान पोरं रात्रभर आमच्या गेटासमोर बसून होती. आम्हाला कसलाही त्रास होऊ नये म्हणून!!!

२६ जुलैला मुंबईमधे पूर आला होता तेव्हा लोक रस्त्यावर येऊन बिस्किटे/चहा वाटत होते. कुण्या एकाने कबूतरासाठी खास घरे बनवून त्यामधे जखमी कबूतराची शुश्रुषा केली होती.

अमेरिकेत काळ्या लोकाना काही कमी त्रास झालेला नाही पण आजचं तिथलं चित्र वेगळं आहेच ना?? तिथेदेखील विद्यार्थ्यानी गोळीबार केलेल्या घटना घडतातच ना??

डिस्कव्हरीवर व्हेल्स ना वाचवण्यासाठी माणसांनी केलेले अथक प्रयत्न पाहिले. काही ठिकाणी जीव धोक्यात घालूनही. खरंच डोळे भरून आले शेवटी. वाटलं ही खरी माणूसकी!>>> यामधे अमेरिका आणि भारत याची तुलना करायचा मुद्दा समजला नाही.. मुळात दोन देशाची तुलना करणे चूक आहे असे मला वाटते..
कारण प्रत्येक समाजाचे प्रश्न/ समस्या आणि त्यावर उपाय शोधायचे मार्ग हे वेगवेगळे असतात.
समाज हा कायम बदलणारा असतो. तसंच तो चांगला अथवा वाईटदेखील असत नाही. तो फक्त नित्य स्थित्यंतरामधे असतो.. त्यामधलं चांगलं बघाय्चं का वाईट हे ज्याने त्याने ठरवायचं... Happy

नानबा, चांगलं लिहिलंय. पण केदारला अनुमोदन. यातून कुठल्याच काळात कुठल्याच समाजाची सुटका नाही.

जाळत जाताना माणुसकीला, मी असते हस्तक सैतानाची- फक्त घेते देवाधर्माचा चेहरा >>> हे अगदी लाखमोलाचं वाक्य. सुरेखच लिहिलं आहेस नानबा, अगदी मनापासून.

तू लिहितेस इतकं छान मग विचार का समतोल करत नाहीस
>> हा हा हा! माझं लिखाण म्हणजेच माझे विचार आहेत ना! तिथेच तर दिग्याचा जन्म झाला ना! जर तुला माझं काही लिखाण आवडत असेल- तर तुला माझे काही विचारही आवडताहेत (असं मला वाटतं)

तुलना करण्याचं कारणः
दिशाच नसेल तर सुधारणा कुठल्या दिशेनं होईल रे? काहितरी बेंचमार्क हवा अन त्यापर्यंत पोचण्याची आपली इर्षा हवी.
बघ, माझं जगण्यावर मनापासून प्रेम आहे. पण फक्त माझ्या आत्ताच्या आयुष्यात मी समाधानी राहिले तर मी पुढे जाण्यासाठी कधीच प्रयत्न करणार नाही. प्रगतीची माझी व्याख्या पैसा, नोकरीत वरचं पद हे नाहिये.
माणूस म्हणून मी संपन्न होणं ही आहे. त्याकरता हा संघर्ष माझ्या आत चालू रहाणारच! राहिलाच पाहिजे.
आपला समाज वाईट असं सरसकट कधीच नसतं - पण वाईटही काही असतं हे मान्य करावचं लागतं - सुधारण्याकरता वाईट बघून त्यावर उपाय करावाच लागतो - असं मला वाटतं.
हे विचार एकांगी वाटत असतील तर काहीच पर्याय नाही! I have to stand by what I believe in!

नंदिनी, तू छान अनुभव सांगितलास! वेळप्रसंगी कुणाची प्रेरणा होऊ शकतो हा प्रसंग!

सुंदर छान लिहीलेस्.सुगीचे आलेले धान्य, दागिने,फक्त माणसे सोडून सगळं घर वाडा (जनावरे सुध्दा) जाळली होती निगडीला.माई आजी सांगायची ते आठवले.आणि वाटेकय्राला शिवले म्हणुन अंघोळ करायला लागलेली असे सांगणारे दादाही आठवले.माणसाचा बुरखा पांघरलेला सईतान कधी जागा होईल सांगता येत नाही.ज्यांनी अन्याय केला,ज्यांच्यावर केला ते सगळे वर गेले.आणि जर ते वाईट आहे असे आपल्याला वाटत असेल, तर पुन्हा तेच करणे कितपत बरोबर? ज्यांना संधी मिळते तेच असे वागतात्.आणि बाकी संधीविना.....?. आजकाल ब्राह्मणांना शिव्या देणे सोपे म्हणून जो उठतो तो बोलतो.पण पेशवे सोडले तर मागे हरिहर बुक्कराय पर्यंत १ही ब्राह्मण राज्यकर्ता नव्ह्ता.जे वाईट वागले ते कधीच समर्थनीय नाही.पण आपण विनाकारण एखाद्या समाजाला बदनाम करतो का हाही विचार व्हावा.सर्व समाज सुधारक आठ्वा. ९०%ब्राह्म्ण आढ्ळतील्.आजही कोणत्याही वादात न पडता नवीन नवीन गोश्टीत ते पुढे जातात. बर ज्यांनी अन्याय केला असे वाट्ते त्यांनी त्याची किंमत जळीतात मोजली. आज का?
'मी असते हस्तक सैतानाची- फक्त घेते देवाधर्माचा चेहरा!" हेच खरे.

पुन्हा वाचले...अजूनच आवडली.
प्रयोग आणि नंदिनी ला अनुमोदन असले तरी मलाही बर्‍याचदा आपल्या इथली परिस्थीती पाहुन निराश व्हायला होतं. नंदिनी ने सांगितल्याप्रमाणे काही आशादायी घटनी असतीलही, पण असे किती दिवस काढायचे अशा काही प्रसंगांवर. समाज, देश म्हणून आपण पुढे जातोय असे मला या काही प्रसंगांवरून वाटत नाही. technology, पैसा केवळ यावरच प्रगती ठरवता येणार नाही. अजुनही basic rights साठी आपल्याला बर्‍याचदा झगडावे लागते.

अमेरिकेमधे वंशवाद होता आणि तो काही प्रमाणात आजही आहे. पण गेल्या ५० वर्षामधे हा वंशवाद कित्येक पटीने कमी आला आहे. आपल्याकडे मला तो कमी न होता दिवसेंदिवस वाढतच चालला आहे असे वाटते. आणि राजकारणी लोकं त्यात आणखी भर टाकतच असतात.

'हे आयुष्य सुंदर आहे' असा आशावाद बाळगायला नक्कीच हवा पण आजकालची परिस्थीती बघता तो फक्त आशावादच राहिल की काय अशी भिती वाटते.

वाईट इतकेच वाटते, की जे आज भरल्या पोटाने ब्राह्मण समाजाविरुद्ध इतरांना चिथावत आहेत त्यांनी कधी तरी आपण त्या जागी असतो तर? हा विचार केलाय का? >> कदाचित तेहि (जे आज भरल्या पोटाने ब्राह्मण समाजाविरुद्ध इतरांना चिथावत आहेत) कधितरि यातुन गेले असतिल. द्वेश असा विनाकारण तर नाहि ना उत्पन्न होत? दुसरे लोक असे का करत आहेत त्यामागे सुद्धा काहितरि कारण असते ना.

कदाचित तेहि (जे आज भरल्या पोटाने ब्राह्मण समाजाविरुद्ध इतरांना चिथावत आहेत) कधितरि यातुन गेले असतिल. द्वेश असा विनाकारण तर नाहि ना उत्पन्न होत? दुसरे लोक असे का करत आहेत त्यामागे सुद्धा काहितरि कारण असते ना.
>> जादू हे जरी खरं असलं तरी किती दिवस आपण हे ओझं घेऊन जगणार? प्रेमानं प्रेम वाढतं, द्वेषानं द्वेष. आपला तर जन्मही झाला नव्हता जेव्हा हे सगळं घडलं. मग तेव्हा ब्राह्मणांची घरं जाळली म्हणून मी आज दुसर्‍या कुणाची घरं जाळायची, मग त्यांचे नातू माझ्या नातवंडांची- हे सगळं कधीतरी थांबायला हवं ना! जर फक्त विद्वेषात आपण अडकून पडलो तर विकासाचा विचार कधी करणार?
आपल्याला असलेले पाणी, वीज, रस्ते असल्या बेसिक प्रोब्लेम्सचा विसर पडावा म्हणून तर संधीसाधू लोक आपल्याला द्वेष करायला प्रवृत्त करतात ना! मग आपण असा विचार केला तर त्यांचा हेतू सफल होतोय! Sad

रिचर्ड बाख च्या एका पुस्तकात रशिया आणि अमेरिकेच्या तत्कालीन शीतयुद्धाकरता एक छान अ‍ॅनॅलोजी वापरली आहे.
तुमचे तुम्ही न पाहिलेले दुरचे काका तुमच्या साठी त्यांचा बंगला सोडतात.
तुम्ही त्या बंगल्यात शिफ्ट होता. बघता तर तुमच्या खिडक्यांमधून समोरच्या घरावर बंदूका डागलेल्या दिसतात - तसंच समोरच्या घराकडून तुमच्या घराकडे! तुम्ही घाबरता. समोरचा तुमचा शत्रू आहे हे तुम्हाला चांगलंच कळतं.
समोरच घरही असंच त्या समोरच्या माणसाच्या पुतण्याला जातं - तो शिफ्ट होतो. ह्या बंदुका बघून त्यालाही कळतं की समोरच्या घरातला आपला शत्रू आहे. मग इन्सेक्युरिटीच्या भावनेनं तो आणखीन काही बंदुका वाढवतो - ते बघून तुम्हीही.
वास्तविक तुमच्या आवडी खूप जुळणार्‍या असतात - तुमचे विचारही - इतपत की तुम्ही खास मित्र होऊ शकाल. पण तुमच्या काकांच्या वैरामुळे (ज्यात तुमचा काहीच सहभाग नव्हता) तुम्ही आयुष्यभर गैरसमजात रहाता.
पुढे तुम्हीही जाता, तुमचे वारस येतात, बंदुकींची संख्या वाढतच रहाते!
मग एके दिवशी एका ठिकाणहून चुकून गोळी सुटते (आणि मग इतिहास घडतो!)
Sad
---------------
अशाच धर्तीचं आणखीन एक:
शत्रू असेल म्हणून घाबरून त्यानं ज्या घरात बॉम्ब ठेवला, तिथं एक प्रेयसी आपल्या प्रियकराची वाट पहात होती, एक आई आपल्या बाळाला दुध पाजत होती, एक म्हातारा आपल्या गेलेल्या बायकोची जुनी पत्र हृदयाशी कवटाळून बसलेला... तिथे फुलं नुकतीच उमलत होती.
ज्यानं बॉम्ब ठेवला त्याला हे कधी कळलंच नाही! Sad

Pages