फक्त माणूस म्हणून जगायची संधी मला मिळेल कधी?

Submitted by नानबा on 18 February, 2010 - 15:39

गोष्ट तशी जुनी. फारा वर्षांपूर्वीची. जेव्हा भारतवर्षावर सवर्णांचं राज्य होतं. सवर्ण म्हणजे कोण? तर राज्यकारभार बघणारे क्षत्रिय आणि ब्राह्मण. जातीनुरुप समाजरचनेचा काळ होता. स्पृश्यास्पृश्य भेद होते, पण भरडल्या जाणार्‍या घटकालाही जाणीव नव्हती की तो भरडला जातोय! पूर्वसुकृत, प्रारब्ध अशा गोंडस नावाखाली प्रत्येकानं आपलं जगणं बिनभोबाट स्विकारलेलं (किंवा त्यांना स्विकारायला भाग पाडण्यात आलेलं)
काबाडकष्ट केल्यानंतर पोटाला मीठ-भाकर मिळणं हीच मोठी गोष्ट. मग समाजात मान, माणूस म्हणून वागणूक वगैरे गोष्टी बहुसंख्य लोकांना कल्पनेतही माहित नव्हत्या, मग त्या प्रत्यक्ष अनुभवणं तर दुरची गोष्ट! तसे, एखादे एकनाथ असायचेही, जे समाजाचा विरोध पत्करूनही जातपातीच्या पलिकडचा माणूस पाहू शकायचे, ज्यांना खरं ब्रह्म कळलेलं! किंवा एखादे शिवाजी महाराज- जे माणसाला जाती धर्मापेक्षा नियत आणि योग्यता बघून ओळखायचे. पण संत लोक वगळता अशांची संख्या कमीच! कुणी अशी वेगळं वागण्याची हिम्मत केलीच तर तोच वाळीत टाकला जायची शक्यता जास्त! त्यामुळे मनात असणारेही धाडस करू शकायचे नाहीत.
तर अशा चरकात आपला समाज सापडला असतानाची ही गोष्ट. दिग्या नावाच्या माणसाची. दिग्याचं खरं नाव काय होतं कुणास ठावूक, पण जातीवरून माणसाला हाक मारण्याच्या काळात लोक त्याला दिग्या म्हणायचे हेच विशेष!
दिग्याचा बाप गावच्या पाटलाकडे वेठबिगारी करायचा. त्याच्या बापाच्या बानं मोठ्या पाटलाकडून कर्ज घेतलेलं म्हणे - अन तेव्हापासून बाप पाटलाकडे कामाला लागला. थोडा मोठा झाल्यावर बापाबरोबरच दिग्याही जायला लागला पाटलाकडे.
"दिवसभर राब राब राबल्यानंतर पाणी पिण्यासाठी आपल्याला दुसर्‍यापुढे ओंजळ का पसरावी लागते?", "गोठ्यातल्या गुरांचा होत नाही, पण आपल्या सावलीचाही विटाळ कसा होतो?", "आपण किती वर्ष असं भाकरतुकड्याकरता दिवसदिवस मरायचं" असले प्रश्न दिग्याला कधी पडलेच नाहीत. कदाचित आपलं माणूस असूनही माणूस नसणं एखादेवेळेस जाणवलं असेलही, पण हे असलं जगणं एक प्रकारच्या अपरिहार्यतेनं सगळ्यां इतकंच दिग्यानही स्विकारलेलं होतं - एकतर ही सर्वमान्य समाज व्यवस्था होती, त्यातून दिग्याचा बराचसा वेळ जायचा तो त्याच्या विठूरायाच्या स्मरणात! जळी, स्थळी, काष्ठी पाषाणी फक्त विठ्ठ्ल! त्याच्या स्मरणात तो तहानभूकही विसरायचा!
असंच काहिसं आजही झालं. पाटलाची गुरं राखता राखता त्याच्याही नकळत तो पांडुरंगाच्या भजनात रंगला. भक्ताची चाकरी करण्याचा नावलौकिक असणार्‍या विठोबानही आज भक्ताची कसली परिक्षा पहायचं ठरवलं कुणास ठावूक! इकडे दिग्या भजनात गुंतलेला असताना तिकडे गुरांनी पिकाची नासाडी केली. पाटलाला हे कळलं अन तो भडकला. आधीच जाग्या झालेल्या पाटलाच्यातल्या सैतानाला जागं करायचं काम कुलकर्ण्यांनं केलं. दिग्यानं झालेली तूट भरून द्यावी असा पाटलानी हुकुम सोडला. दिग्यानं चुक मान्य केली - पण त्याच्याकडे द्यायला होतंच काय? त्याची जमीन दोन पिढ्यांमागेच पाटलाकडे गहाण पडलेली. घाबरतच त्यानं ह्या गोष्टीची वाच्यता केली, मात्र पाटील आणखीनच भडकला. दिग्याला अन इतर कामकर्‍यांना वेळीच जरब बसावी, म्हणून पाटलानं दिग्याला फटक्यांची शिक्षा सुनावली. विठ्ठलाचं नाव घेऊन पाठीवरचा एकएक कोरडा सहन करणार्‍या दिग्याला बघून पाटलाच्या संतापात आणखीनच भर पडत होती- त्याचबरोबर कोरड्यांचा जोरही. आणखीन जोरात- जोरात - अशाच एका क्षणी दिग्याला कळलं की आपण काही ह्यातून वाचत नाही.
पांडुरंगाला कधीच काही न मागणार्‍या दिग्यानं त्या क्षणी मात्र एक मागणं मागितलं "पुढल्या येळेला मला पाटलांच्या नायतर कुलकर्ण्याच्याच घरी जल्माला घाल. मी ह्ये समदं बदलीन."
त्या सत्शील माणसानं मरतानाही कुणाचं वाईट चिंतलं नाही - हे असं पहिलं अन शेवटचं मागणं मागून त्या विठ्ठलभक्तानं शेवटचा श्वास घेतला.
----------------------------------------
१९४० सालातली गोष्ट. भाऊराव आणि त्यांचे वडील बंधू दादासाहेब कुलकर्णी, दोघांनाही साधारणतः महिन्यापूर्वी अटक केलेली. घरात पुरुषमाणूस कुणीच नाही - अशात भाऊरावांच्या पत्नी सौ पार्वतीबाईंचे दिवस भरत आलेले. खरंतर लग्नानंतर बरेच वर्ष मुलबाळ नाही म्हणून किती लोकांनी भाऊरावांना दुसर्‍या लग्नाचा सल्ला दिला. ते फक्त हसून म्हणायचे " माझा दुसरा विवाह आधीच झाला आहे. ह्या हिंदुस्थानाशी!"
नऊ महिन्यापूर्वी मात्र त्यांचा दत्त त्यांना पावला. पार्वतीबाईंना दिवस गेले. खरंतर किती कोडकौतुक व्हायला पाहिजे होतं त्यांचं! पण देशाकरता सर्वस्वाची होळी करण्याचे दिवस होते ते - त्यात स्वतःच्या छोट्या मोठ्या कष्टांची तमा कुणाला होती!
त्या दिवशी सकाळ पासून पार्वतीबाईंना कळा येत होत्या. नुसतीच घालमेल! तशी आक्का सुईण होतीच मदतीला! अखेर रात्री बाराच्या आसपास सुटल्या पार्वतीबाई! मुलगा झालेला त्याना. मुलाचा पायगुण चांगला म्हणून भाऊराव आणि दादासाहेबही सुटून आले तुरुंगातून. दत्त दिगंबरांचा प्रसाद म्हणून मुलाचं नावही दिगंबरच ठेवलं. आईचं (आणि तुरुंगात नसतील तेव्हा वडिलांचं) कौतुक झेलता झेलता दिगू दिसामाशी मोठा होत होता.

१४ ऑगस्ट १९४७ - भाऊरावांसारख्या अनेक स्वातंत्र्यसेनानींच्या प्रयत्नांना अखेर यश आलं होतं. आज रात्री बारा वाजता - म्हणजे १५ ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळणार होतं. गुलामगिरीचे दिवस आता गेले होते - आता गांधीबाबाचं राज्य येणार! सगळं वातावरण कसं भारलेलं होतं!
स्वातंत्र्य मिळालं खरं - पण पाठोपाठ सुरू झाल्या त्या हिंदू मुसलमान दंगली. लाखोंनी निरपराध लोक मारले गेले! सगळं वातावरणच गढूळल्यासारखं झालं! ह्या सगळ्याप्रकाराला एक वर्षही झालं नसेल, पण इंग्रजांची जागा 'देशी' साहेबांनी घ्यायला सुरुवात केलेली! अर्थातच स्वातंत्र्यानंतर रामराज्य येईल हा फुगा अजून पूर्णपणे फुटला नव्हता. अशातच ३० जानेवारी १९४८ ला गांधिजींचं मुस्लिम विषयक धोरण सहन न होऊन नथुराम गोडसे नं गांधीजींवर गोळ्या झाडल्या! गांधीजी अनंतात विलिन झाले.
गांधींचा मृत्यू, नथुराम गोडसे अन नाना आपट्यांना फाशी- येवढ्यावर हे प्रकरण संपलं नाही. हिंदू मुसलमानांचं रक्त अजून सुकतच होतं - तोच एक नवीन लाट पसरली - गोडसे ब्राह्मण असल्यानं - ब्राह्मण विरोधी लाट. पुरोगामी म्हणवल्या गेलेल्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी ब्राह्मणांची घरं जाळली गेली, होती नव्हती ती संपत्ती लुटली गेली, काही ठिकाणी तर पोरीबाळींची विटंबना करण्याचे घाटही घातले गेले होते. जे नशीबवान होते, ते आहेत त्या वस्त्रांनिशी पळून गेले. पण सगळ्यांचच नशीब एवढं चांगलं नव्हतं!
भाऊराव कुलकर्ण्यांना हे सगळं होणार ह्याची कुणकुण लागली. अत्यावश्यक गोष्टींचं गाठोडं बांधून ते कुटुंबासहित बाहेर पडणार तर दाराला बाहेरून कडी असल्याचं लक्षात आलं. काय घडतंय हे लक्षात आल्यानं त्यांच्या काळजात चर्र झालं. निदान दिगूला तरी बाहेर काढलं पाहिजे ह्याविचारांनी त्यांनी मागचं दार, खिडक्या सगळं पाहिलं - पण खूप उशीर झालेला. लोक वाड्याभोवती जमलेले. त्यांना भाऊरावांचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचे कष्ट/हालअपेष्टा आठवल्या नाहीत, नाही दिसला मुलाच्या काळजीनं काळवंडलेला पार्वतीबाईंचा चेहरा, दिगू तर अजून उमललाही नव्हता- पण ह्यातलं काहीच दिसत नव्हतं त्या जमावाला. कळत होतं तर इतकच की हे ब्राह्मण आहेत अन त्यांना जाळायचं आहे.
पेटलेल्या वाड्यात आकांत माजला. बायकापोरांच्या किंचाळ्या , हुंदके एकच कल्लोळ झाला. अप्पा कुलकर्ण्यांनी बाधलेल्या त्या वाड्याबरोबर जळताना दिगूला त्याचे सगळे जन्म आठवले! हो सगळे जन्म! एका जन्मात तो विठ्ठलभक्त दिग्या होता - आणि जातीमुळे नागावला गेलेला. ते सगळं बदलायला तर तो ह्या जन्मी ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेला ना! पण त्याला मोठं व्हायची संधीही मिळाली नव्हती! बाहेरच्या जमावात आडनाव बदललेला, जात बदललेला तोच पाटलाचा, अप्पा कुलकर्ण्याचा चेहरा दिसत होता!
अन मग असे इतर अनेक जन्म :- जर्मन छळछावण्यात मारला गेलेला ज्यू, मुसलमानी राजवटीत धर्मांतराकरता छळला गेलेला हिंदू, दंगलीत मारला गेलेला मुसलमान, गुलाम म्हणून विकला गेलेला आफ्रिकन, ग्रीक साम्राज्यात लोकांच्या मनोरंजनासाठी भुकेल्या वाघाबरोबर कुस्ती करणारा गुलाम, नवर्‍याबरोबर चीतेला जबरदस्तीनं बांधला गेलेला अन नंतर सती म्हणून मंदीरात उभा असणारा दिगू! असे किती गेलेले जन्म! असे किती येणारे जन्म!
=========================
दिगूची ही कथा ऐकून मी सुन्न झाले. ही कथा फक्त दिगूची नाहिये, तुमची माझी- आपल्यातल्या कुणाचीही असू शकते! सैतानाला कुठली जात, कुठला धर्म नसतोच मुळी. तो फक्त आपल्याला आपण सगळेच माणूस आहोत हे विसरायला भाग पाडतो. मग सुरु होतं - मी मुसलमान- तू हिंदू, मी ब्राह्मण- तू मराठा, मी पुरुष तू बाई, मी गोरा- तू काळा, तू ह्या देशीचा - मी त्या देशीचा. भेद होतच रहातो प्रत्येक पातळीवर. जगात फक्त मुसलमान धर्मच राहिला तरी ते सुन्नी शिया म्हणून एकमेकांना मारतीलच. एकाच जातीचे लोक राहिले तरी पुन्हा पोटजाती असतीलच! अगदी सगळे भेद नष्ट केले तरी बाई-पुरुष, गरीब-श्रीमंत, छळणारा- छळ सहन करणारा असे भेद कधी जातील?

जगाच्या दृष्टीनं मी भारतीय असते, भारतात महाराष्ट्रातली अन हिंदू, हिंदूंमध्ये मी ब्राह्मण असते, ब्राह्मणात देशस्थ (त्यातही पुन्हा ऋग्वेदी), स्त्री हे आणखीन एक वर्गीकरण.
मग पेटत रहाते मी वेगवेगळ्या भेदांवरून.
श्रेष्ठ मानत रहाते- माझाच देश, माझंच राज्य, माझाच धर्म, माझीच जात, माझंच स्त्रीत्व!
मला कुठलं नाव नाही, नाहिये कुठला चेहरा!
धर्म- जात पेटण्यापुरतं, मला नाहीच कुठला सोयरा!
अशीच मी धुमसत रहाते, रहाते पेटत पुन्हा पुन्हा!
जाळत जाताना माणुसकीला, मी असते हस्तक सैतानाची- फक्त घेते देवाधर्माचा चेहरा!

गुलमोहर: 

छान लिहिले आहे. पण केदार च्या पोस्टशी मी सहमत नाही.
अगदी काही दशकांपूर्वी अमेरिकेत वंशवाद, eugenics वगैरे गोष्टींचा बराच प्रभाव होता.
eugenics च्या नावाखाली मतिमंद असण्याच्या नुसत्या शंकेवरून लहान मुलांना त्यांच्या आईवडिलांपासून तोडण्याचे प्रकार होत असत. आज परिस्थिती बरीच सुधारली आहे पण हे एका रात्रीत झालेले नाही.

खर्‍या अर्थाने शोषणमुक्त समाज अस्तित्वात येणे शक्य नसेल कदाचित, पण म्हणून हे असेच रहाणार हा निराशावाद ठेवायची गरज नाही. नंदिनीने लिहिल्याप्रमाणे माणूसकीची उदाहरणे आपल्याकडेही आहेतच.
यल्लम्मा देवीला लहान मुली अर्पण करणे, त्या मुलींचे गावातील धनदांडग्यांकडून शोषण, मग तिची रवानगी मुंबईच्या वेश्यावस्तीत, हे चक्र कुणाच्या तरी प्रयत्नाने थांबलेच ना? आज निदान मुंबई पुण्यात तरी आंतर जातीय विवाह होत आहेत हे आशादायक नाही का?

आईन रँड फार हुषार असेल कदाचीत, पण ती देव नाही.

जादू हे जरी खरं असलं तरी किती दिवस आपण हे ओझं घेऊन जगणार? प्रेमानं प्रेम वाढतं, द्वेषानं द्वेष. आपला तर जन्मही झाला नव्हता जेव्हा हे सगळं घडलं. मग तेव्हा ब्राह्मणांची घरं जाळली म्हणून मी आज दुसर्‍या कुणाची घरं जाळायची, मग त्यांचे नातू माझ्या नातवंडांची- हे सगळं कधीतरी थांबायला हवं ना! जर फक्त विद्वेषात आपण अडकून पडलो तर विकासाचा विचार कधी करणार? << मान्य आहे कि हे ओझे किति दिवस घेऊन जगणार हे लोक. पण तुच बघ ना माझ्या पोस्टच्या आधि इथे किति अनुभव लिहिले आहेत कि ज्यांच्या नातेवाईकांचि घरे जाळलि. ज्यांनि लिहिले आहेत ते तर हे ओझे अजुनहि बाळगुनच आहेत. मला नाहि वाटत त्यावेळि ज्यांनि अनुभव लिहिला त्या लोकांचा सुद्धा जन्म झालेला असेल.
मान्य हे कधितरि थांबायला हवे. पण जातपद्धत बंद झाल्याशिवाय हे बंद होणार नाहि. इथे तर शिक्षण सुद्धा मदत करु शकणार नाहि.

खरे आहे नानबा.पाणी, वीज, रस्ते,महागाई,या सगळ्यापासून आपले लक्श विचलीत होण्यासाठी ही आफूची गोळी आहे.आपण तावातावाने आपला अन्याय मांडायला लागतो.मग वादाने वाद वाढतो. मूळ मुद्दाच बाजूला रहातो.
'<<<'वास्तविक तुमच्या आवडी खूप जुळणार्‍या असतात - तुमचे विचारही - इतपत की तुम्ही खास मित्र होऊ शकाल. पण तुमच्या काकांच्या वैरामुळे (ज्यात तुमचा काहीच सहभाग नव्हता) तुम्ही आयुष्यभर गैरसमजात रहाता.
पुढे तुम्हीही जाता, तुमचे वारस येतात, बंदुकींची संख्या वाढतच रहाते!
मग एके दिवशी एका ठिकाणहून चुकून गोळी सुटते (आणि मग इतिहास घडतो!)''>>>
बहूतेक वेळा असेच होते
---------------

जादू तू म्हणतोस<< <<"मान्य आहे कि हे ओझे किति दिवस घेऊन जगणार हे लोक. पण तुच बघ ना माझ्या पोस्टच्या आधि इथे किति अनुभव लिहिले आहेत कि ज्यांच्या नातेवाईकांचि घरे जाळलि. ज्यांनि लिहिले आहेत ते तर हे ओझे अजुनहि बाळगुनच आहेत. मला नाहि वाटत त्यावेळि ज्यांनि अनुभव लिहिला त्या लोकांचा सुद्धा जन्म झालेला असेल.
मान्य हे कधितरि थांबायला हवे. पण जातपद्धत बंद झाल्याशिवाय हे बंद होणार नाहि. इथे तर शिक्षण सुद्धा मदत करु शकणार नाहि.">>>. पण हे लक्शात ठेवणारे कुठे कुठे अन्याय करताना दिसतात?
ते मागे ठेवले म्हणून तर पुढे जाउ शकले. बघ नुसते जातीचा विचार सुरु झाला कि शब्द नाच करु लागतात. आपण स्वत: पुरते तर ठरवू शकतो.

अमेरिकेत वंशवाद>>> विकुंशी सहमत. अमेरिकेला कोणालाही ह्युमन राईटस शिकवता येईल अशी परिस्थिती नव्हती दुर्दैवाने.
नानबा शोषणाची प्रवृत्ती तर जगात सगळीकडे आहे ( म्हणून आपल्याइथले शोषण जस्टीफाय होत नाही हे मान्य).
बिल्डर पैसे खातात का?>> हो. पैसे खाणारी जमात जगात सगळीकडे असते. वीजपुरवठ्याच्या नावाखाली अफरातफर होते, दिडशे वर्ष जुन्या बँका बुडतात त्याबरोबर हजारो लोकांना घेऊन बुडतात, राष्ट्राध्यक्ष लाचखाऊ निघतात. राजकारण्यांना तेवढी जात नसते, किंबहूना राजकारण्यांची जातच जगभर तेवढी सारखी असे म्हणता येईल.

हो. पैसे खाणारी जमात जगात सगळीकडे असते. वीजपुरवठ्याच्या नावाखाली अफरातफर होते, दिडशे वर्ष जुन्या बँका बुडतात त्याबरोबर हजारो लोकांना घेऊन बुडतात, राष्ट्राध्यक्ष लाचखाऊ निघतात. राजकारण्यांना तेवढी जात नसते, किंबहूना राजकारण्यांची जातच जगभर तेवढी सारखी असे म्हणता येईल.
>>हो ग, पण कॉन्ट्रॅक्टर लाच खातो म्हणून खड्यांमधे अधून मधून दिसणारे रस्ते तरी दिसत नाहीत!
वीज, पाणी अशा बेसिक सुविधांचा तुटवडा तरी नसतो! Sad
आणि सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यावर तेवढा डायरेक्ट परिणाम भारतातल्या इतक्या प्रमाणात होताना तरी दिसत नाही. असं नाही की अमेरिकेतलं सगळंच चांगलं आणि भारतातलं सगळंच वाईट.
आणि हे ही मान्य आहे की आपला देश विकसनशील आहे - पण त्याची ढाल नको व्हायला इतकच!

परवा एक पुस्तक वाचत होते. १९७६ सालात लिहिलेलं. तेव्हाचा डॉलर रुपये दर बघून मला चक्कर यायची बाकी होती! १डॉ = ९ रु!!!
आता ही आपली अधोगती का त्यांची प्रगती हे ईकोनॉमीची जाण असलेल्या व्यक्तींनी सांगावं!
असो! खूपच विषयांतर झालं बोलता बोलता! ह्यात मुळ मुद्दा बाजूला नको पडायला!

खर्‍या अर्थाने शोषणमुक्त समाज अस्तित्वात येणे शक्य नसेल कदाचित, पण म्हणून हे असेच रहाणार हा निराशावाद ठेवायची गरज नाही >> माझ्या पोस्ट मध्ये निराशावाद कुठे दिसला तुम्हाला? फक्त आहे हे असं आहे अस म्हणत आहे. ह्या चौकटी (जाती पातीच्या) मोडतील (मोडाव्यात ही वैयक्तीक आशा) पण तेंव्हा दुसरे काही तरी नविन सुरु होऊ शकते.
अमेरिका सारखा प्रगत देशही हाय लेवलचा भ्रष्टाचार करतोच. हे पण एक प्रकारचे शोषन. जात पात नसलेले. नीट विचार केला तर लक्षात येईल की दिस ईज नॉट आयडियल. (उदा इराक वॉर भलेही अमेरिका सोसायटी म्हणून त्या देशासाठी चांगली आहे, पण इतर देशांसाठी?? )

हे सायकल आहे एवढेच माझे म्हणने. इथे माणूस विचारात घेतला, कुठलाही देश, जात विचारात नाही घेतली. असो !

आणि ब्राह्मणांना जाळले, ब्राह्मणांना जाळले हे म्हणने सोडा. ती एक घटणा होती, तसेच १९८४ मध्ये काँग्रेसीलोकांनी शिखांनाही जाळले, मारले. आणि दलितही भरडल्या गेले. हिंदूही मेले, मुसलमानही. म्हणून उद्या दंगल होणार नाही काय? हे ही सामान्य जनतेच शोषनच की.

जाता जाता ..........

आयन रँड देव नाहीच. हुशार आहे की नाही हे पण रिलेटीव्ह आहे. ते माझे मत आहे असे म्हणून पाहूया.

म्हणून उद्या दंगल होणार नाही काय? हे ही सामान्य जनतेच शोषनच की
>> ह्म.. आंतरजातीय विवाह हा जातींची बंधन तोडण्यासाठी उपयोगी पडू शकेल कदाचित.
ह्यासंदर्भात नीरजा सारख्या माणसांनी उचललेल्या पावलांचं कौतुक व्हायला पाहिजे!

>>ह्म.. आंतरजातीय विवाह हा जातींची बंधन तोडण्यासाठी उपयोगी पडू शकेल कदाचित.<<
जातींची बंधनं तुटणं हा एक आपण अपेक्षित करत असलेला बायप्रॉडक्ट इतकंच म्हणून बघितला पाहीजे. आंतरजातीय विवाहातून जन्मलेली संतती ही जातीच्या भिंती मानत नाही असे ५०% दिसते असं म्हणायला हरकत नाही (माझ्या अनुभवाप्रमाणे ५०%). वडिलांच्या जातीत मिसळून जाण्यासाठी आपण किती घट्टपणे वडिलांच्या जातीचे आहोत हे दाखवण्याची गरज पडणारे आणि त्याप्रमाणे वागणं असणारेही बरेच जण आहेत. आईच्याच जातीत लग्न करून परत बॅलन्स साधला असं मानणारेही काही जण आहेत.

>>ह्यासंदर्भात नीरजा सारख्या माणसांनी उचललेल्या पावलांचं कौतुक व्हायला पाहिजे!<<<
अजिबात नाही. आंतरजातीय विवाहांचं कौतुक आणि सजातीय विवाहांकडे बुरसटलेले म्हणून बघणं हे मला अजिबात मान्य नाही.
आम्ही दोघं एकमेकांना आवडलो आणि आम्ही वेगवेगळ्या जातीत जन्माला आलो होतो हा केवळ योगायोग आहे. किंवा आवडल्यानंतर वेगळी जात हा मुद्दा असला तरी महत्वाचा करायची गरज वाटली नाही इतकंच. एकाच जातीत जन्माला आलो असतो तर लग्न केलं नसतं का? तर नाही. तरीही लग्न एकमेकांशीच केलं असतं.

जातीच्या भिंती मोडण्यासाठी इत्यादी आम्ही एकमेकांशी लग्न केलेलं नाही. तश्या काही विचाराने आंतरजातीय विवाह कुणी करू बघत असेल तर त्या विवाहाचा पायाच चुकीच्या गोष्टींवर आहे त्यामुळे तो विवाह टिकण्याची शक्यताही कमी. आंतरजातीय विवाह करून मी किंवा कुणीही फार काही सामाजिक तीर मारलेला नाही. मारत नाही. विवाहाला आताच्या समाजामधे तरी हे असे संदर्भ लावण्यात अर्थ नाही.

माझ्या लहानपणी मी एका कुठल्या तरी सभेला गेले होते जिथे आंतरजातीय विवाह करणार्‍यांचे सत्कार केले जात होते. सत्कार झालेला प्रत्येकजण मी कशी जात तोडण्यासाठी धडपडतो इत्यादींचे पुरावे भाषणात देत होता. ते सगळंच मला खोटं आणि हास्यास्पद वाटलं. कारण जात दोघांच्याही मनातून पूर्ण गेलेलीच नव्हती.

आंतरजातीय विवाह करूनही मी चित्पावन संमेलनात सामील होते. चित्पावनी भाषा, चित्पावनांचा इतिहास, खाद्यपदार्थ इत्यादी सगळ्यांचा त्या वेळेला मी अभ्यास केला होता. कारण माझ्या जन्माने मिळालेलं ते हेरिटेज आहे. जे जपणं मला महत्वाचं वाटतं.

असंच काही माझ्या नवर्‍याच्या जातीचं हेरिटेज त्याच्याकडे आहे ते त्यानंही जपलं पाहीजे हे तितकंच महत्वाचं.

पुढच्या पिढीला दोन्हीपैकी कुठल्याही जातीने ओळखलं जाऊ नये अशी इच्छा आहे. आणि शास्त्रीयदृष्ट्या ते योग्यही आहे. त्याच बरोबर दोन्ही जातींचं हेरिटेज वारश्याने पुढच्या पिढीला मिळावं आणि पुढच्या पिढीची समृद्धता वाढावी अशीच इच्छा आहे. पण आपल्याकडे अजूनही बहुतांशी कागदपत्रात जात लिहावी लागते. बापाची जात गृहीत धरली जाते जरी मुलामधे अर्धा अंश आईचा म्हणजे आईच्या जातीधर्माचा असतो हे शास्त्राने सिद्ध झालेलं असलं तरी... घोळ तिथे आहे.

माझं लग्न ही माझी खाजगी बाब आहे हे हेरिटेज जपण्यापासून भिंती तोडण्यापर्यंत कुठेही त्याचा काहीही संबंध नाही.

नानबा.
छान लिहिलं आहेस. अंगावर काटा आला वाचुन.
सुरुवात वाचल्यावर मधे एके ठिकाणी "आजकाल पुर्वी सवर्ण समजल्या जाणार्‍यांवर कसे अत्याचार होतायत बघा.." टाईप शेवट आहे का काय वाटलं होतं पण नाही. आणि एकुणच फार छान मांडलं आहेस...

माझंही नंदिनीला अनुमोदन. तुलना केली जाणारच, पण काही चांगल्या तर काही वाईट गोष्टी असतातच की कुठल्याही समाजात... (माहित आहे, तुला माहित आहे, पण तरीही :))

अजुन कोणीतरी लिहिलंय तसंचः - समाजात अशा गोष्टी रहातातच असं दिसुन आलंय. इथुन पुढे बदल होईल का, माहित नाही.

माझ्याही एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे लहान मुलांच्या मनात (जनरली) असल्या काही गोष्टी नसतात, पण कॉलेजला गेले किंवा नोकरी करु लागले, की इतर बाबतीत "सर्वधर्मसमभाव" वाले लोकही ह्या बाबतीत "भेद" करु लागतात... कॉलेजच्या पोरांमधे फेमस असलेल्या ओर्कुट वर धर्माच्या कम्युनिटीज निघतात.
ह्यावरुन, ते मी ब्राह्मणात देशस्थ (त्यातही पुन्हा ऋग्वेदी) वगैरे लिहीणं पटलं.

नीधप च्या या कमेंटला १०००% अनुमोदन.
>>कारण माझ्या जन्माने मिळालेलं ते हेरिटेज आहे. जे जपणं मला महत्वाचं वाटतं.
>>असंच काही माझ्या नवर्‍याच्या जातीचं हेरिटेज त्याच्याकडे आहे ते त्यानंही जपलं पाहीजे हे तितकंच महत्वाचं.

लिहीत रहा. पु.ले.शु.

>>जातीच्या भिंती मोडण्यासाठी इत्यादी आम्ही एकमेकांशी लग्न केलेलं नाही. तश्या काही विचाराने आंतरजातीय विवाह कुणी करू बघत असेल तर त्या विवाहाचा पायाच चुकीच्या गोष्टींवर आहे त्यामुळे तो विवाह टिकण्याची शक्यताही कमी.

फार महत्वाची गोष्ट लिहिलीत तुम्ही.

जातीच्या भिंती मोडण्यासाठी इत्यादी आम्ही एकमेकांशी लग्न केलेलं नाही. तश्या काही विचाराने आंतरजातीय विवाह कुणी करू बघत असेल तर त्या विवाहाचा पायाच चुकीच्या गोष्टींवर आहे त्यामुळे तो विवाह टिकण्याची शक्यताही कमी.

>> १००% नीरजा! पण केवळ जात वेगळी आहे म्हणून आवडूनही लग्न न करणारेही असतातच ना! मी त्या संदर्भात लिहिलं होतं! वेगळं वाटलं असेल तर नीट न लिहिण्याबद्दल माझी चूक.

माझ्या लहानपणी मी एका कुठल्या तरी सभेला गेले होते जिथे आंतरजातीय विवाह करणार्‍यांचे सत्कार केले जात होते. सत्कार झालेला प्रत्येकजण मी कशी जात तोडण्यासाठी धडपडतो इत्यादींचे पुरावे भाषणात देत होता. ते सगळंच मला खोटं आणि हास्यास्पद वाटलं. कारण जात दोघांच्याही मनातून पूर्ण गेलेलीच नव्हती.
>> मला वाटतं त्यांनी आंतरजातीय लग्न केली तरी ती मुलगा/गी बघूनच केलेली असतील.
आणि जर असं ठरवून लग्न केलं म्हणून हे लोक हास्यास्पद होत असतील तर विधवेशी विवाह करणार्‍या मधल्या काळातल्या समाजसुधारकांनाही हास्यास्पदच म्हणायचं का? आणि मुलगी बघून लग्न करणार्‍यांनाही?

जबरदस्त लिहीलयस...हे सगळ्यांनाच कळलं तर किती बरं होईल.
>> अग, त्यात मी पण आलेच Sad
त्या एका 'खर्‍या इतिहास' वरून मी पण पेटून पोस्ट लिहितच होते.. पण मग एका पॉईंटला काय होतंय ते जाणवलं! मग स्वतःच्यातच खूप खोल डोकावताना जे जाणवलं ते ह्या कथेत आलं.

नानबा... अग काय सुंदर लिहतेस तु...?
वाचलं आणि त्यातुन बाहेर पडणं किती जड जातय....

......आणि हेच तुझ्या लिखाणाच यश आहे. तु तुझ्या 'पंख्यांची' लिस्ट केली नसशील तर लगेच कर आणि केली असशील तर त्यात सगळ्यात वर माझं नाव टाक....

तुझी शैली, शब्द, लिहण्याची पद्धत हे सगळं वाखाणण्याजोगं आहेच पण त्याहीपेक्षा तु एक NICE SOUL, खुप छान HUMAN BEING आहेस ह्याचा जास्त आनंद.....
लिहित रहा... आम्ही वाचतोय......

आज खुप दिवसांनी लिहावस वाटतय... बसेन लवकर......

प्रयोग, तुझ्या घटनेतील पुजारी, वेडा म्हणून जगण्याइतपत तरी नशिबवान होता!
तेव्हाही असन्ख्यजण, अन येथुन्पुढेही कित्येक, नशिबवान असतिलच अस नाही.
असो.
नानबा, गोष्टीचा प्रयत्न चान्गला आहे, सगळेच मान्य आहे असे नाही. पण प्रयत्न चान्गलाच आहे Happy
(अस हात राखुन म्हणण्याच कारण की, गान्धी "वधाचे" निमित्त साधुन वडाचि साल वान्ग्याला त्यान्नी लावली नि तुम्बड्या भरुन घेतल्या बामण मारुन,
तुझ्या गोष्टीत, पुनर्जन्माच्या निमित्ताने अशाच साली बदलल्यात, मजकुरात आरोपीच्या पिन्जर्‍यात मात्र "कुलकर्णीच" राहिलाय, जे मला मान्य होणे त्रिकाल अशक्य आहे! )

ब्रह्म्यहत्येच पातकच नव्हे, तर त्यान्चा तळतळाटदेखिल भोगायला लागतोच लागतो
लिम्बीच्या गावी त्यान्चे घर जाळण्यात (जिवे मारायचा प्रयत्न करणार्‍यात) सहभागी असलेल्या गाव व पन्चक्रोशीतल्यान्चे कुणीही सख्खे "वन्शज" अर्थात पुरुष सन्तती आज शिल्लक नाही हे देखिल एक महान सत्यच आहे, भडकवायला सान्गली/कोल्हापुरकडून पत्रीसरकारची हुजरेगिरी करणारे जे गुण्ड/मवाली आले होते, त्यान्च्या सद्य कथा माहिती नाहीत. शोधले पाहिजे.
बाकी ठिकाणची वास्तपुस्त सन्शोधन केले पाहिजे, नाही का? Wink

मी त्या संदर्भात लिहिलं होतं! वेगळं वाटलं असेल तर नीट न लिहिण्याबद्दल माझी चूक.<<
नाही गं तसं नाही. पण मला तो संदर्भ कुठल्याही लग्नाच्या दृष्टीने तितकासा महत्वाचा वाटत नाही एवढंच.

बाकीचं विषयांतर नको म्हणून विपु मधे लिहीते.

छान!! पन मला शिर्षक बघुन वाट्ले की स्त्री-पुरुष भेद भावा बद्दल लिहिले असेल..तो हि एक अमानुश आणि सार्वत्रिक ( काहि प्रमानात समाज मान्य ही) प्रकार आहे Sad

>ब्रह्म्यहत्येच पातकच
>कुणीही सख्खे "वन्शज" अर्थात पुरुष सन्तती

ही विधाने मागे घ्यावीत अशी विनंती.

स्त्री संतती ही पुरुषाइतकीच सख्खी असते हे मान्य नसेल, तसेच एका माणसाचा मृत्यू, हत्या दुसर्‍या माणसाच्या मृत्यूहून कमी अधिक महत्त्वाची नसते हेही मान्य नसेल तर सांगावे.

Pages