त्रिपदी - श्री. गो. नी. दाण्डेकर

Submitted by चिनूक्स on 17 February, 2010 - 02:18

'त्रिपदी' हा श्री. गो. नी. दाण्डेकर या बहुआयामी आणि बहुप्रसव लेखकाच्या चोखंदळपणे निवडलेल्या स्फुटलेखांचा नवीन संग्रह. वेगवेगळ्या काळांत, वेगवेगळ्या निमित्तानं लिहिले गेलेले हे लेख आजवर कुठेही संग्रहित झाले नव्हते, ते आता या पुस्तकाच्या रूपाने एकत्रित वाचकांसमोर आले आहेत. या लेखांची प्रकृती लक्षात घेता या लेखांची सामान्यतः व्याक्तिविषयक, आत्मपर आणि ललितलेख अशी विभागणी करता येईल. म्हणून या लेखांच्या संग्रहाचं नाव 'त्रिपदी'.

या सार्‍या स्फुटलेखांतून गोनीदांचं समृद्ध अनुभवविश्व, हे अनुभव शब्दबद्ध करण्याची त्यांची विलक्षण हातोटी, भाषेच्या नियोजनाचं सामर्थ्य, भाषेतील उत्कटता, त्यांच्या लेखनातील चित्रवर्णनता असं सारं मनाला भिडतं. एक परिभ्रामक, लेखक, अभ्यासक, छायाचित्रकार अशा अनेक भूमिकांतून गोनीदा या लेखांच्या निमित्तानं आपल्या भेटतात. लता मंगेशकरांचं 'शिवमयी' रूप, आशाताईंचं निखळ मन, सोनोपंत दाण्डेकर, सातवळेकर शास्त्री, बाबासाहेब पुरंदरे अशांची व्यक्तिचित्रे, किंवा सृष्टीची विविध रूपं रेखाटणारे लेख वाचून या भाषाप्रभूच्या लेखनसामर्थ्याची प्रचिती येते.

'त्रिपदी' या गोनीदांच्या स्फुटलेखसंग्रहातील हा एक लेख. शीर्षक - 'माझी बायको'.

c2.JPG

माझी बायको

मी लग्न करावे, असा माझें गुरुजी महामहोपाध्याय श्रीधरशास्त्री पाठक यांचा आग्रह होता. नाना प्रकारचे युक्तिवाद करुन त्यांनीं मला ती गोष्ट पटवून दिली. ते म्हणत,

'अरे, ब्रह्मचारी आहेत, ते जीवनापासून पळालेले. गृहस्थ नसला, तर त्यांना जेवायला कोण घालील? 'धन्यो गृहस्थाश्रमः' | या चारी आश्रमांच्या उदरभरणाची चिंता वाहणारा गृहस्थाश्रम हाच श्रेष्ठ, तोच धन्य.'

मी म्हणे,
मग हे सर्व ब्रह्मचारी पळपुटे का?
ते म्हणत,
'किती वंदनीय असले, तरी हे सगळे संसाराच्या समरांगणांतून पळालेले. ताठपणें उभे राहून या सर्वच समस्यांना तोंड देण्याची एकाचीही हिंमत नाहीं.'
'मग मी जगूं कसा?'
'सध्यां काय करतोस?'
'भिक्षा मागतों.'
'तशीच भिक्षा माग.'
'मी, पत्नी, मुलेंबाळें...'
'मग? प्रवचनें करीत जा ! म्हणजे कोणाचें कानकोंडें नको!'
'पण मला मुलगी कोण देईल?'
'ते बघतां येईल. अगोदर तूं तुझें सांग.'
'आपली आज्ञा मी पाळीन.'

मंडलेश्वरीं एक कीर्तनकार कुटुंबासह आले. ते स्वतः, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असें त्यांचें कुटुंब होतें. थोरली मुलगी ही वडिलांप्रमाणेच कीर्तन करीत असे. गुरुजींनीं त्यांच्यासमोर माझ्या विवाहाचा प्रस्ताव मांडला. थोरली मुलगी त्या प्रस्तावाला अनुकूल दिसली. शेष कुटुंबही त्या मुलीसवें होतें. मात्र केवळ वडील या प्रस्तावाला अनुकूल दिसले नाहींत. त्यांचें म्हणणें असें, की वर काहीं शिकलेला नाहीं.
'मीं मुलगी दिली, तर हा तिला जेवूं कसें घालणार? कपडालत्ता?'
'अहो, पण यांचे प्रवचन ऐकलें का?'
'नुसत्या कीर्तन-प्रवचनांवर जगायचे दिवस संपले! मी प्रत्यक्ष भोगलें आहे की! काहीं वर्षांपुर्वी मी माझ्या कुटुंबाचे पालन सुखेनैव करु शकत होतों. इतकेंच नव्हे तर साथीदारही मी मजबरोबर वागवीत होतों. आतां मला परवडेनासें झालें आहे. ज्या गांवीं मी जातों, तिथल्या साथीदारांचे पाय मला धरावे लागतात.'

अशा रीतीनें पहिलें वधूसंशोधन अयशस्वी झालें.

आतां कथा दुसर्‍या वधूसंशोधनाची. तेंही गुरुदेवांनीच केलेलें. या प्रकरणांत सगळे हितसंबंधी अनुकूल असूनही हें अर्धवट राहिलें. तडीस गेलेंच नाही. मंडलेश्वरीं एक प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध वकील होते. त्यांच्या घरींच माझी हरिकीर्तन पाठशाळा होती. त्यांची मुलगी ही त्या पाठशाळेंतील एक विद्यार्थिनी होती. चांगली देखणी आणि हुशार मुलगी होती ती. तिजकडून मी कीर्तन तयार करवून घेतलें होतें, आणि ते डॉक्टर मुंज्यांच्या अध्यक्षतेखालीं रावेरीखेडी इथें जो पहिल्या बाजीरावाचा पुण्यस्मृति उत्सव झाला, त्यांत करविलें होतें.
अर्थ असा की, वकिलांच्या घरची सर्वच मंडळी गुरुदेवांच्या प्रस्तावाला अनुकूल होती.

मग असे असतांही हें का जमलें नाहीं?

मुलीचे काका खरगोणला असत. त्यांचा आग्रह असा, की मुलीच्या लग्नाचा सगळा खर्च मी करीन.
झालें, काम लांबणीवर पडलें. केव्हां होणार, ते सांगता येईना. वाट पाहाता पाहातां मी थकलों आणि गुरुदेवही थकले.

त्यानंतर मी पुण्याला आलों. संघाच्या परिवारांत वावरु लागलों. संघचालक श्री. विनायकराव आपटे यांच्याशी परिचय झाला. त्यांच्या घरीं माझीं वेदान्तावर प्रवचने होऊं लागली. या प्रवचनांच्या निमित्ताने प्रेमजीभाई आसर या चिपळूणच्या कार्यकर्त्याशी परिचय झाला. मी लग्नाच्या बाजारात उभा आहें, हें त्यांच्या लक्षात आले. प्रेमजी हा मनुष्य देखणा मुळचा काठेवाडी, पण कित्येक वर्षे महाराष्ट्रात तो चिपळूणला रहात होता. त्याच्या शेजारी एके काळचे संघाचे एकनिष्ठ कार्यकर्ते दादा सहस्रबुद्धे राहात होते. त्यांची भाची तिच्या लहानपणापासून त्यांच्याकडेच राहात होती. तिचं माहेर जें वर्‍हाडातलं दर्यापूर, तिथून लहानपणीच तिची मावशी तिला घेऊन चिपळूणला आली होती. नांव विमल नामजोशी. जाता जाता तिच्यासाठीं मुलें पाहाणें हाही प्रेमजीच्या उद्योगांपैकीं एक उद्योग होता.

प्रेमजीभाईंनीं मा. विनायकराव आपट्यांकडे माझी चौकशी केली. त्यांच्याकडून हिरवा सिग्नल मिळाल्यावर प्रेमजीभाई मला भेटले.
'मुलगी बघितली पाहिजे.' मी.
'चला ना चिपळूणला.' प्रेमजी.
मी पुण्याहून चिपळूणला पोचलों. तिथे माझी आतेबहीण शांताबाई लेले, ही राहायची तिच्या घरी उतरलों. मुलीकडच्यांना ती ओळखीत होती. मुलीविषयीं तिचं मन अनुकूल होतं.
मुलीकडे निरोप द्यायला बहुधा कोणी हाताशीं नव्हतं. म्हटलं, मीच प्रेमजीभाईंकडे जाऊन, आम्ही उद्यां सकाळीं येतों, असं सांगून येतों.
गेलों. प्रेमजीचं घर हुडकून काढलं. जिन्याशीं पोचलों. तिथं न्हाणीघरांत एक मुलगी कपडे धूत होती.
ठेंगणी, रंगानं उजळ, दिसायला सुंदर, काहींशी कृश. इतकी ही देखणी मुलगी आपल्यासाठी असणं शक्य नाही, असे चिंतून मी तिचा विचार करणें सोडून दिलें आणि तिला विचारलं,

'प्रेमजी आसर इथंच वर राहातात का?'
ती म्हणाली,
'हो!'
प्रेमजी घरी नव्हते. त्यांकडे निरोप सांगितला अन् परतलों.

दुसरे दिवशीं सकाळीं मी आणि शांताताई, दोघं मिळून प्रेमजींकडे गेलो. ते दारांतच उभे होते. या, म्हणाले. त्यांच्याबरोबर शेजारच्या जिन्याने चढून वर पोंहोचलों. दादा सहस्रबुद्धे स्वागत करायला होते. या, बसा, झालं. चहा मी घेत नसे. सरबतांचे प्याले घेऊन नियोजित वधू बाहेर आली.

तीच ती काल पाहिलेली मुलगी. म्हणजे आम्ही दोघांनीही एकमेकांना काल पाहिलं होतं. एकच वाक्य का होईना, एकमेकांशीं बोललों होतो. तेव्हा हा पाहिजे तर परिचयोत्तर विवाह म्हणावा.

मीं तिला विचारलें,
'नांव काय?'
'विमल विष्णु नामजोशी.'
दादा बोलले,
'तिकडे वर्‍हाडांत असतात आमचे साडू! दर्यापूरला!
'दर्यापूर?'
'हो! कां?'
'नव्हे, माझा जन्म अचलपुराजवळ परतवाड्यास झाला. दर्यापूर तिथून जवळ.'
'अरे, वा! मग तर तुम्ही दोघेंही वर्‍हाडांतली!'
'हो! अरे! यांचं शिक्षण कुठे झालं?'
'तें मात्र इथंच चिपळूणला झालं. म्हणजे झालं काय, की ही लहान होती तेव्हाच आपल्या मावशीकडे राहायला आली. आम्हांला मूल नव्हतं, म्हणून. पुढं आम्हालाही एक मुलगी झाली. प्रभे, ये, नमस्कार कर!'
एका दहा वर्षांच्या मुलीनं येऊन नमस्कार केला.
'बाळा प्रभावती, कितवीत शिकतेंस?' मी विचारलं.
'मी यंदा फायनलला आहे.'
'आणि तुझी ताई किती शिकली?'
'तीही फायनल झाली.'
'कोणत्या वर्षी?'
'दोन वर्षे झालीं.'

अशी जुजबी चौकशी झाली. मग तुम्ही काय करतां, आम्ही काय करतों. मी खरं बोलायचं, तर काहींच करीत नव्हतों. लेखनास प्रारंभ झाला नव्हता. संघाच्या प्रचारकपदावरुन नुकताच माघारा आलों होतों. म्हणजे पेन्शनींत निघालों होतों. पेन्शनींचा आकडा फारच मोठा होता. म्हणजे काहींच नव्हता. पुढं काय करायचं, हेंही ठरलं नव्हतं.

उमाळा येऊन मी म्हणालों,
'हें पाहा, एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. आज मजपाशीं काहीं नाहीं. उद्यां काय मिळेल, हे सांगतां येत नाहीं. पण जीवनात पैसा मिळवणं हेंच साध्य आहे, असं मी मानत नाहीं. हें ध्यानीं घेऊन मला पत्करायचं असेल, तर पाहा!'

मुलगी थोडीशी हसली.
आम्ही उठलों.

दुसरे दिवशी मी आणि प्रेमजी पुण्यास निघालों.

गाडीत बसल्यावर प्रेमजींनी मला विचारलं,
'तर मग बोला. पुढला बेत काय? मुलगी पसंत आहे ना?'
'प्रेमजी, मुलगी पसंत असण्याचा प्रश्नच नाही. ती कुणालाही पसंत पडेल, अशीच आहे. प्रश्न मी तिला पसंत आहे, कीं नाही, हा आहे. मी आचरटासारखं बोलून सगळे दोर माझ्या हाताने कापून टाकले आहेत.'
प्रेमजी हांसून म्हणाले,
'ते तुमचं स्पष्ट बोलणंच त्या लोकांना आवडलं आहे. आतां पुढलं बोलायचं.'
कांही बोलण्याजोगं नव्हतंच.

तीन मे, एकोणीसशे पंचेचाळीस, या दिवशीं विमल वामन नामजोशी नांवाची मुलगी सै. नीरा गोपाल दाण्डेकर होऊन माझें घर उजळीत प्रवेशली.
एकेक ध्यानीं येऊं लागलं, की ही मुलगी मानी आहे. परिस्थितीला सामोरी जाणारी आहे. तिच्यासमोर सहज वाकणारी नाहीं.
घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. मला नोकरी अशी नव्हती. या महिन्याचं त्या महिन्याला जेमतेम नेऊन पोचवायचं. ही लग्न होऊन नुसती घरीं आलेली. कांही संकल्प असतील. कांही योजना असतील. कांही रचलेलें बेत असतील. तें सगळे विस्कटून गेलें.
आमचे बहुधा सगळे नातलग सुखी होतें. घरचे संपन्न होतें. माझ्या आईच्याच अंगाखांद्यावर वाढलेलें होतें. तेव्हा माझ्या या नव्या संसाराला कांहीं हातभार लावणं त्यांना सहज शक्य होतं.
पण बायकोनं कांही याचना करण्यासाठी त्यांच्या दारी जाणं नाकारलं. आई त्यांच्या घरी जायची. कधींमधीं काय काय आणायची. त्या क्षणी माझ्या बायकोच्या कपाळावर नापसंतीची एक बारीकशी आठी उमटलेली दिसायची. तिला तें आवडायचं नाही. ते कांहीबांहीं ती टाकून द्यायची नाहीं खरी, पण आपलं उदासीनपण जाणवेल, अशी ती वागायची.
पुण्यास मी माझ्या धाकट्या भावाच्या घरी असे. स्वतंत्र नव्हतों. तसं कोणी काही जाणवून देत नसे. पण एका अर्थें तें ओशाळेपणच होतं. तें बायकोला सतत बोचत असे.

अचानक औंधची पंडित सातवळेकरांकडची नोकरी चालून आली. त्यांच्या 'पुरुषार्थ' आणि 'वैदिकधर्म' या दोन मासिकांचा सहसंपादक म्हणून मी तिथं रुजू झालों. पंडीतजींच्या बंगल्यामागची दोन खोल्यांची सपरी राहयला. त्या सपरींत बायकोनं तिचा संसार मांडला. तिथं ती अतिशय सुखावली. विहीर होती, तिचं पाणी ओढून काढावं लागे. धुणींभांडी घरीं होतीं. पण तिनं त्याचं काहीं मानलं नाही. पगार साठ रुपये महिना. पण तेवढ्या त्या पगारांत मोठ्या नेकीनें ती प्रपंच चालवूं लागली. औंधांत तिला खूप सुख लाभलं.
आमच्या घराजवळ पोस्टामागं एक फकिरीण म्हातारी राहायची. तिची म्हैस होती. तिजकडे आम्हीं दुधाचा उकाडा लावला. चांगलं, उत्तम निरसं दूध ती आणायची. तिचं हिचं छान जमलं. या मुलीवर त्या म्हातारीची माया बसली. तासन् तास ती हिच्या घरीं येऊन बोलत बसायची. तिचं एक माझ्या बायकोच्या लक्षांत गच्च रुतून बसलं आहे.
'बेटा, संसाराचा पसारा पसरणं आपल्या हातीं असतं. तो सुईसारखा बारीक होतो, मुसळासारखा जडाही होतो. हें जाणून संसार करा!'

मी संघाचा कार्यवाह. मजघरीं तरुणांचा सतत राबता असे. उमदे, बलदण्ड, उत्साहभरले, असे ते पंधरा-वीस स्वयंसेवक सतत मजघरीं येत. त्यांचंही हवं-नको ही पाहायची. माहेरचं संघाच्या संस्कारातलं हिला वळण होतं. त्यामुळं हिला त्यात नवीन असं कांहींच नव्हतं. तोच उदात्त स्नेह. तेच या सगळ्या मुलांचं वहिनी वहिनी करणं. तेच थेट स्वयंपाकघरात शिरणं. डबे धुंडाळणं. गूळ-शेंगदाणे हुडकून तोबरे भरणं. त्यांच्या घुडगूइसानं ही कधीं कंटाळली नाहीं, की कधीं हिनं नापसंतीचा एकही सूर काढला नाहीं, ती त्यांची थोरली वहिनी होऊन गेली.

संघाच्या निमितानं कोण कोण मजघरीं जेवायला येत असत. जात विचारण्याचा आमचा प्रघात नव्हता. नंतर कळे, की हा भाट. हा चांभार. हा महार. पण या सर्वांचे पाट माझ्या पाटाशेजारीं मांडून, ती आम्हाला असेल तें जेवायला वाढायची. जेवणं झाल्यावर उष्टं खरकटं स्वतः काढायची. यांपैकी कुणालाही कधींच तिनं तें काम करूं दिलं नाहीं.

स्वर तिचा बरा होता. काहीं गाणीं ती चांगलीं, भावनांना आवाहन करणारी म्हणायची. त्यांतलं एक होतं:
कधिं नच घडो स्वराज्यीं माझ्या।
कुलस्त्रियांची विटंबना॥
औंधच्या राजांना कीर्तनं स्वतः करायची आणि दुसर्‍याकडून करवायची मोठी हौस. वाटालं, की हिजकडून एखादं कीर्तन तयार करवून तें राजांसमोर कां करूं नये?
झांशीच्या राणीचं आख्यान लिहून काढलं. तें तिनं उत्तम पाठ केलं. तबला- पेटीवर नीट बसवून घेतलं. पंडितजींनी राजांना सांगितलं. त्यांना मोठा आनंद झाला. मग कराडदेवीसमोर हिचं कीर्तन. स्वत: राजे आणि पंडितजींसारखे श्रोते. सभागृह तुडुंब भरलेलं. धीटपणें बायको उभी राहिली. न चुकतां सगळं कीर्तन तिनं लख्खपणं साजरं केलं.

राजे संतुष्ट झाले. म्हणाले,
’उत्तम! आई जगदंबेची अशीच सेवा करीत जा. ती तुम्हांला येश देईल.’

महात्माजींचा वध झाला. औंध सोडून पुन्हां पुण्यास परतावं लागलं. आतां मीं ठरवलं, की लेखनावर जगायचं. संकल्प साहसी होता. बायकोचा आधार न लाभता, तर तो पार पडणं कठीण होतं. पण ती एखाद्या वडाच्या भरभक्कम बुंध्यासारखी मागं उभी राहिली. म्हणाली,
’राहायला छप्पर, अन जेवायला मीठभाकरी, एवढं मला पुरे. बाकी मग सगळं मी नीट करत्यें, कीं नाहीं, तें पाहा!’

तिनं आपला शब्द खरा केला.पुणं सोडून आम्ही तळेगांवीं राहायला आलों. इथं तिसर्‍या मजल्यावर राहायची जागा. पाणी तळमजल्यांत. तिथून ते दोन जिने चढून भरावं लागे. मासिक उत्पन्न अनियमित. कुछ रोटी, कुछ लंगोटी. पण हे सगळं तिनं अतिशय बाणेदारपणं, घरचं उणं बाहेर दिसूं न देतां निभवलंन. एवढंच नव्हे, तर तळेगांवच्या सांस्कृतिक जीवनांतला आपला वाटाही तिनं मोठ्या हौसेनं उचलला.

माणसं जोडायचं अन तीं सांभाळायचं व्रत तिनं इथेही निष्ठेनं पाळलंन. मजघरीं कोणकोण येत. मित्र. प्रकाशक. लेखक. स्वयंसेवक. कधीं एकटे : कधी कुटुंबासह. मी कांहींसा फकिरी वृत्तीचा. हे सगळे येत. आणि त्यांच्या वहिनीजवळ आपण आल्याची वर्दी देत. कुणी मुंबईचे. कुणी कराडचे. कुणी सांगलीचे. कुणी इंदूरचे. कुणी कोल्हापूरचे. कुणी पुण्याचे. या सगळ्यांचं आतिथ्य ती मोठ्या अगत्यानं करायची. त्यामुळं माझ्या लेखनाच्या खोलीपेक्षां हिचं स्वयंपाकघरच अधिक गजबजलेलं असे.
तळेगांवीं नाटकं होत असत. हिच्या रुपानं त्या काळांत एक उत्तम अभिनेत्री तळेगांवकरांना मिळाली. एकदा आम्हीं ’बेबंदशाही’ केलं. मी शाहीर. ही शाहिराची बायको. ’राजा, वैर्‍याची रात्र आहे, जागा राहा’, अशा आर्त स्वरांत हिनं मारलेल्या हांका ऐकताच प्रेक्षकांच्या अंगांवर कांटा उभा राहात असे. त्याही वेगळीं केवळ स्त्रियांचीं पांच-सात नाटकं झालीं. त्यांत प्रमुख भूमिका बहुधा हिच्याकडे असे.

पहिले कष्टभरले दिवस हळूहळू संपूं लागले. आर्थिकदृष्ट्या बरे दिवस येऊं लागले. पण याही बर्‍या दिवसांत ही उतली नाहीं. मातली नाहीं. आपल्याला चार पैसे मिळतात, त्यांतला सामाजिक ऋणाचा भाग आहे, तो दिला पाहिजे, अशी जाणीव हिच्या मनीं सारखी सतत जागी राहिलीं.
माझा भाचा, भाची, पुतण्या अशी कित्येक जणं मजघरी आली. दोन-दोन, चार-चार वर्षें राहिलीं. शिकलीं. कमावती झालीं. त्या सर्वांचं हिनं निष्ठेनं केलं. एकाला उणं आणि दुसर्‍याला दुणं करावं, असं कधीं हिच्या मनांत देखील उभं राहिलं नाहीं.

आमची वीणा शिकत होती. तिजबरोबर आमच्या मोलकरणीची मुलगी--तिला हिनं बळंबळं शाळेंत घातलंन्. तिचा पुस्तकांचा, वह्यांचा, फीचा खर्च हिनं केला. अन् तें कांहीं विशेष केलं, असंही हिनं कधी मानलं नाही.

मी नैष्ठिक आस्तिक खरा, पण कर्मकांडावर माझा फारसा विश्वास नाहीं. संध्येपलिकडे मी पूजापाठांतलं कांहीं करीत नाहीं. तें सगळं मी हिजकडे सोंपवून दिलं आहे.

तिचं देवघर तिनं बरं सजवलं आहे. घरचे कांहीं देव होतेच. मी त्यांत भर टाकीत गेलों. एक उमेची मूर्ति. एक रायगडावरची विष्णुमूर्ति. एक स्वत: कातलेलं निळं तेजस्वी शिवलिंग. एक नर्मद्या गणपती. अशा पांच-दहा मूर्ति तिनं सांभाळल्या आहेत.

रोज तास, अर्धा तास त्यांची सशास्त्र पूजा झालीच पाहिजे. त्यांचं स्नान. गंधलेपन. धूप, दीप, नैवेद्य. मग तिचं देवाचं म्हणणं. एक कुठलं कुण्या कवीनं रचलेलं गणपतिस्तोस्त्र. पण तें निष्ठेनं म्हटलं पाहिजे. त्यानंतर 'श्री अंबिके भगवते, वर दे भवानी.' तेही रोज झालंच पाहिजे. पूजेंत असली, म्हणजे ही कुणाची नव्हे. त्या देवांची.

नवरात्रांत अष्टमीला देवी बसवतात. होमहवन असतं. त्या दिवशीं सकाळपासून ही भानावर नसते. म्हणजे घरांतलं सगळं काम सुरूच असतं. पण एक निराळी तंद्री त्या दिवशीं हिला घेऊन असते. बहुधा आमच्या शेजारींच विट्ठलमंदिरांत देवीचा मांड मांडतात. ही संध्याकाळींच तिथं जाते. घागर उचलते. अन् तो सगळा समारोह संपेपर्यंत घागर फुंकीत राहते. एरवीं हिला काय काय होत असतं. कंबर दुखते, पाठ धरते, अशक्तपणा आलेला असतो. पण त्या रात्रीं ते चार्-पांच तास घागर फुंकीत देवीसमोर नाचतांना हिला लवलेश कष्ट जाणवत नाहींत. त्या घागर फुंकण्यामुळं दुसरे दिवशीही हिच्या कार्यक्रमांत - दैनंदिन कार्यक्रमांत खण्ड पडला आहे, असं कधीं झालेलं मला स्मरत नाहीं.

तशी ती अतिशय कठोर आहे. आपल्या शब्दाची पक्की. तुमचं काय वाटेल तें होवो. ती आपल्या म्हणण्यावरून ढळायची नाहीं. काहींशी ती उदासीन आहे. इतकी कोणकोण, मजघरीं येत असतात. राज्यपाल असतांना काकासाहेब गाडगीळ येऊन गेले. मंत्री स. गो. बर्वे, माझे गुरू सोनूमामा दांडेकर, धुंडामहाराज, लताबाई, आशा, हृदयनाथ. या सर्वांचं ती अगत्यानं करायचं, तेंकरील. पण हीं थोरमोठीं आलीं, म्हणून हर्षानं फुलून गेलेलीं मीं कधीं पाहिली नाहीं. आपली दृढ भूमिका तिनं कधींच सोडली नाही.

तसा मी थोडासा उधळ्याच आहें. पण हें माझं उधळेपण तिनं निभवून नेलं आहें. शासनाला सोन्याची गरज होतीं. हिनं आपल्या गळ्यांतली एक तोळ्याची सांखळी काढून माझे हाती दिली. म्हणाली, हीं शासनाकडे नेऊन पोंचवा.
साहित्य अकादमीच्या पुरस्कारचे पांच हजार सामाजिक कार्यांना देऊन टाकताना अगदीं अर्धा क्षणदेखील हिचा हात थरकांपला नाहीं, कीं त्यांतून गुंजभर सोनं आपल्यासाठी खरेदी करण्याचा शब्द तिनं काढला नाहीं.

आणीबाणी उठली. जनता पक्ष निर्माण झाला. पुण्याला एक प्रचंड सभा आयोजित केली होती. पु. ल. देशपांडे बोलणार होते. त्याच दिवशीं मला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमासाठीं नागपुरी जायचं होतं. पुण्याच्या सभेंत मी बोलावं, असा बेत. मग मी तोड काढली. मीं माझं भाषण लिहून काढलं. तें बायकोनं सभेंत वाचून दाखवावं, असं ठरलं. नंतर मला कळलं, की प्रचंड सभा झाली. पु.लं.चं भाषण उत्तम झालं. त्यावर कुणी बोलणं, ही बोलणाराची परीक्षा होती. पण बायको ताठ उभी राहिली. खणखणीत स्वरांत, स्पष्टपणं तिनं तें भाषण वाचून दाखवलं. मित्र म्हणाले, की तुम्ही नव्हतांत, हेच बरं झालं. तुमच्यापेक्षां वहिनींचंच वाचन अधिक सरस झालं!

असं हें सामाजिक ऋण मानणारी बायको मला मिळाली, हें माझं महद्भाग्य! मतभेद होतातच. ते सुरूच असतात. काहीं अंशीं माझं तर्‍हेवाईक वागणंच त्या वादांना कारणीभूत असतं. संबंध राखावेत, हें मला जरा कमीं कळतं. त्या बाबतींत मी मधुकरवृत्तीचा आहे. बायकोचं म्हणणं मात्र असं, की एकदा निर्माण झालेले संबंध शेवटपर्यंत कायम टिकले पाहिजेत. या बाबतींत ती प्रयत्नशील असते. माझं, आज हें, तर उद्या तें, हें वागणं तिला अजिबात आवडत नाहीं.

मला वाटतं, की मला स्वयंपाकांतलं कळतं. मला पथ्य असतं, तरी चवीचे चार पदार्थ मी सुचवीत असतों. त्यांचा आग्रह धरीत असतो.
पण त्या बाबतींत तिचींही कांहीं मतं आहेत. ती सुग्रण आहे. चांगली चिंचगूळ घातलेली सुरबुरीत आमटी, एखादी भाजी, थोडं डावंउजवं, असा तिचा स्वयंपाक असतो. थंडसा ताकभात तिला आवडतो. तो मीही खावा, असा तिचा आग्रह असतो. ती म्हणते, की जो काही प्रकाश पाडायचा, तो तिकडे कागदावर लेखणीने पाडा. इकडे स्वयंपाकघरांत नको! म्हणजे आला पुन्हा वादाचा मुद्दा!

पण आतां या कुरबुरीची संवय झाली आहे. कित्येकदां मी चिंतनांत गढलेला असतो. दिवसदिवस एक शब्द काहीं बोलत नाहीं. अशा वेळीं हिचं कांहींबाहीं बोलणं कानीं न पडलं, तर घर केवळ मौनगृह होऊन जाईल.

नाना कारणांनी रागावलेली, रुसलेली, अशी बायकोची अनेक रुपं माझ्या परिचयाचीं आहेत. मात्र परवां साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यावर तासगांवला सत्कारासाठी जातांना वाटेंत कराडाजवळ आमच्या गाडीला अपघात झाला, तो क्षण मी विसरूं शकत नाहीं. माझ्या भुंवईला खोक पडली. सगळं अंग रक्तानं भरून गेलं. कांहीं क्षण मला झांज आल्यासारखी झाली.
बायको त्या क्षणीं मुखीं पाणी घालीत होती. विचारीत होती.
’आतां बरं वाटतं ना?’
त्या क्षणी तिच्याही बरगड्या चिरल्या होत्या.

********************

त्रिपदी

लेखक - श्री. गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर

पृष्ठसंख्या - २३०
किंमत - रुपये १७५

मृण्मयी प्रकाशन, पुणे

********************

टंकलेखन साहाय्य - साजिरा, श्रद्धा

हे पुस्तक मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.
http://kharedi.maayboli.com/shop/Tripadi.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोनीदांचं समृद्ध अनुभवविश्व, हे अनुभव शब्दबद्ध करण्याची त्यांची विलक्षण हातोटी, भाषेच्या नियोजनाचं सामर्थ्य, भाषेतील उत्कटता, त्यांच्या लेखनातील चित्रवर्णता असं सारं मनाला भिडतं. >>>> अगदी अगदी Happy

छानच! एक शब्द अडला - परिभ्रामक. ह्याचा अर्थ काय? कोणीतरी प्लीज सांगा.

परिभ्रमण - म्हणजे सदैव भ्रमंती, भटकंती करणे - त्याचेच कर्त्याचे रुप म्हणजे सदैव भटकत असणारा - परिभ्रामक.

ही नविन आवृत्ती आहे का ?
(कारण हे नविन पुस्तक नसावे, माझ्याकडे गेल्या काही वर्षांपासून आहे जुलै २००० ची आवृत्ती.)

मीही हे पुस्तक पूर्वी वाचल्याचे आठवतेय. एके काली या गोनीदांचे मला भयंकर ऑब्सेशन होते. पुढे ते निवळले. विशेष्तः साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी गरज नसताना त्यानी जे काही केले त्यामुळे. पण त्यांची भाषा. बाप रे बाप. एवढी प्रासादिक भाषा आणि बोली भाषांचा प्रचन्ड अनुभव. एकमेवाद्वितीय मराठी साहित्यात. त्यांच्या लेखनिकांचा लेख वाचनात आला होता त्यात ते डिक्टेशन देताना वाघासारखे येरझारे घालायचे अन सलग सांगायचे अस्खलित. अं, अं नाही की काही नाही. वाक्यात बदल नाही. म्हनजे लिखान किती 'शिजलेले' असेल त्यांचा मेन्दूत !

आम्ही रानडे इन्स्टीट्यूटला असताना बहुधा मिलिन्द कोकजेने त्यांची मुलाखत घेतली होती.
एकदा एस टी बसम्ध्ये दर्शन झाले होते. शिरूरला. एकदा संघाचे शिबीर होते तळजाईला तिथे.(मी संघवाला नाही पण जातो कधी कधी त्यांचेकडेही. :फिदी:)

किती गोड लिहिलंय! जुन्या पद्धतीची भाषा वाचायला फार गोड लागते, तसे अनुनासिक बोलले तर ऐकायलाही गोड! गोनिदांच्या भाषाप्रभुत्त्वाला काय बोलावं? निर्मळ आणि सहज! वा! धन्यवाद चिनूक्स, श्रद्धा आणि साजिरा.

विशेष्तः साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी गरज नसताना त्यानी जे काही केले त्यामुळे.>> काय केले त्यांनी रॉबीनहुड?

"मायबोली मराठीचा अभिमान बाळगा, लाज तर अजिबात नको !!"

आज मराठी दिनी उत्तम काहीतरी वाचण्याचा योग आला !

-सुनील, पुणे

मस्त. छान वाटले वाचायला. लेखनाची शैली आणि फ्लो खरंच सही आहे. चिन्मय, साजिरा, श्रध्दा यांना धन्यवाद. Happy