ढोलकी गळ्यात नि डोक्यावर देव्हारा
आधार नसुनही सावरते डोलारा
विटलेले हिरवे लुगडे, मळवट भाळी,
अंगात खणाची ठिगळांची काचोळी
काखेत पिरपिरे एक, एक धरि हाती,
अन् अंश आणखी एक उपाशी पोटी
सावळ्या मुखावर गर्भतेज सुकलेले,
ओढीत चालते माय पाय थकलेले
पदपथी सावली हेरुन बसली खाली,
टेकले देव, पोरांना खाऊ घाली
तो तिचा सोबती, राकट, कभिन्न काळा
हळदीचा मळवट, टिळा तांबडा भाळा
कमरेस झोळणा चिंध्यांचा कसलेला,
केसांचा बुचडा मानेवर रुळलेला
चाबूक वाजवी, गळा कवडिची माळ,
अनवाणी पायी छमछमणारे चाळ
दगडांचा मांडुन खेळ चिमुरडी रमली,
लक्ष्मीच्या हाती तशी ढोलकी घुमली
हातीचा चाबुक पुजुन सज्ज तो झाला,
घातले साकडे, कौल लावि देवाला
हातात उतरली कडकलक्षुमी नियती,
आसूड ओढते उघड्या पाठीवरती
क्षण एक गर्दिचे काळिज लक्कन हलले
जणु फटक्यांचे वळ मनामनावर उठले
संपता खेळ त्याचा, गर्दी हळहळली,
पसरता हात त्याने, माघारी वळली!
कडकलक्ष्मी
Submitted by क्रांति on 13 February, 2010 - 10:59
गुलमोहर:
शेअर करा
क्डकलक्शुमीवर पण कविता? फारच
क्डकलक्शुमीवर पण कविता? फारच सुन्दर.
तिच्या वेदनांचा वेगळाच हा
तिच्या वेदनांचा वेगळाच हा पसारा ... !!!
सलाम !!!
अप्रतिम, शब्दाची ढोलकी इतकी
अप्रतिम, शब्दाची ढोलकी इतकी सुंदरच घुमलेय
कि कडकलक्ष्मी डोळ्यासमोर सचित्र उभी राहिली !!
शुभेच्छा !!!
देवनिनाद
अप्रतिम!! एक एक ओळ हृदयावर
अप्रतिम!!
एक एक ओळ हृदयावर कोरू ठेवावी अशी.
परत टॉप टेन मध्ये उल्लेख.
शरद
संपता खेळ त्याचा, गर्दी
संपता खेळ त्याचा, गर्दी हळहळली,
पसरता हात त्याने, माघारी वळली!
मनाला लागणारं वास्तव...
छान गं. गिरीशला मोदक.
छान गं. गिरीशला मोदक.
कविता छान आहे .मुळात
कविता छान आहे .मुळात कडकलक्ष्मीच्या खेळातला पुरूष जो आपल्या अंगावर स्वेच्छेने आसूड
ओढतो तो ईश्वराला प्रार्थना करत असतो की '' हे देवा सर्वाना सुखी ठेव ,त्यांच्या भागातल दु:ख मी
स्वेच्छेने स्व्त:वर आसूड ओढून घेतो .'' सकाळी येणार्या वासुदेवाप्रमाणे हाही एक पारंपारीक प्रकार
आहे .बदलत्या काळात या परंपरा पहाताना वास्तव अस्वस्थ करतच पण यात आता काही तथ्य असाव
का हाही एक प्रश्न आहे .
<<संपता खेळ त्याचा, गर्दी
<<संपता खेळ त्याचा, गर्दी हळहळली,
पसरता हात त्याने, माघारी वळली!>> खरच वास्तव...
किती सुंदर वर्णन केले आहे.
मी तर अशा चाबूक मारून घेणार्यांना खर तर घाबरते, आणि कधी कधी तर तोंडून निघतही काहिहि करतात... पण आज हे वाचल आणि उमजल ते सर्व काहिहि नाही..... आपल्या संसारासाठी करतात.
क्रांती, चित्रदर्शी कविता
क्रांती, चित्रदर्शी कविता आहे.....एकदम कडक!
संपता खेळ त्याचा, गर्दी
संपता खेळ त्याचा, गर्दी हळहळली,
पसरता हात त्याने, माघारी वळली!
आधार नसुनही सावरते डोलारा
छान ओळी आणि ह्रुदयद्रावक वास्तव.