ती

Submitted by बिपिन कार्यकर्ते on 12 February, 2010 - 15:37

अजून अंधार पडायला खूपच वेळ होता पण उन्हं कलायला लागली होतीच. तशात थंडीचे दिवस म्हणजे अंधार लवकर आणि हवेतला गारठा वाढत जाणारा... टेकून बसल्यामुळं आणि हवेतल्या गारव्यामुळं तिला हलकीशी डुलकी लागलीच.

तेवढ्यात हळूवार पण अगदी ताकदीने मारलेल्या दोन तीन लाथा तिच्या पोटात बसल्या. दुर्लक्ष करावं असं वाटता वाटता अजून एक लाथ बसली आणि आता हे टाळणे शक्य नाही हे समजून तिने डोळे उघडले. समोरच, तो हसत हसत मस्त पहुडला होता मांडीत. तिला एकदम हसूच आलं. एवढंसं कार्टं पण बरोब्बर सगळं मनासारखं करून घेतं... एकदम लबाड पण गोड आहे. कायम हिच्याच कडेवर. तिने सारखं याच्याशी खेळायचं. मस्ती करायची... तिलाही ते खेळणं आवडलंच होतं.

तो यायच्या आधी तिला एकटीला खूप कंटाळा यायचा.

आत्ता सुद्धा जवळ एक चांदी पडली होती... तीच पकडायचा प्रयत्न चालला होता त्याचा. ते जमत नव्हतं... म्हणूनच मग त्या लाथा आणि ढुशा. मस्त वार्‍याच्या झुळकीमुळे छान वाटत होतं. तिने त्याला थोडं घट्ट जवळ ओढून घेतलं. टोपडं नीट केलं. पण सराईतासारखी तिची नजर आजूबाजूला भिरभिरतच होती. वेळ चुकवून चालत नाही हे तिला माहित होतं... शिवाय आत्ताशी कुठे चालू होत होता तिचा दिवस. अजून आख्खी संध्याकाळ जायची आहे.

तशात, एकदम बाजूला वेगाने पळणार्‍या गाड्या मंदावल्या... त्यासरशी ती उठलीच... सिग्नल पिवळा... ती भक्ष्यावर झडप घालताना शेवटच्या क्षणी संपूर्ण अंग ताठ करणार्‍या वाघासारखी पूर्ण फोकस्ड... पुढच्या सगळ्या अ‍ॅक्शन्स ठरलेल्या... किती वेळात सिग्नल लाल होणार... गाड्या थांबे थांबे पर्यंत किती सेकंद लागणार... सगळं सरावाचं...

सिग्नल लाल... तिने पूर्ण ताकदीने त्याच्या ढुंगणावर चिमटा काढला... तो कळवळला... आकांत सुरू...

त्याला काखेला मारून ती पहिल्याच गाडीसमोर तोंड वेंगाडून हात पसरून उभी राहिली...

गुलमोहर: