अनामिका

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

झाड दिसलं कि त्याचा फोटो काढायचा. त्याचं नाव शोधायचं. उपयोग शोधून काढायचे. कुणी सांगितलेत हे उद्योग. कुणीच नाही. पण मी करतो. स्वतःच्या समाधानासाठी.

पण या झाडाने माझी खोड जिरवली. अजूनही ओळख पटवली नाही. खरे तर हि झाडे गोव्यात विपुल आहेत. हिरवी पोपटी पानांची हि झुडुपे नदीच्या खाडीच्या आजुबाजुला खुप दिसतात. उन्हात तर जास्तच पोपटी दिसतात, पण ती दलदलीत असल्याने कधी जवळ जाता आले नव्हते.

पण एकदा धाडस केलेच. घुसलो तसाच. आणि डोळ्याना हा मस्त नजारा दिसला. पानापानागणिक अशी मौल्यवान रत्ने जडली होती. अक्षरशः पाणीदार. हिरव्या कोंदणात जडवलेली.

100_3297.jpg

नाव शोधलं, नाहि सापडलं. फुले कशी असतात, माहित नाही. यापेक्षा देखणी असतात का, माहित नाही. कधी येतात, माहित नाही.

आणि हो काय उपयोग असतो. झाडाचा, फुलाचा, फळाचा, नाहि माहीत.

पण एक उपयोग आहेच ना. मौल्यवान काय असतं आणि अमुल्य काय असतं, हे मला एरवी कसं कळतं ?

विषय: 
प्रकार: 

फळे अतिशय छान दिसताहेत. अगदई माणका सारखी. खाउन पाहिली काय>>?

दिनेश, ह्याचे नाव गोंदण्या आहे. आत गोंदासारखा दाट रस असतो म्हणून गोंदण्या. तुम्ही हे फळ फोडून पाहिले का?

आभार बी,
पण हे छोटे झाड होते. आणि गोव्यात खुप करून खाडीकिनारी दिसते. तिथल्या एकदोघाना विचारले पण त्याना माहित नव्हते.
अश्याच एका फळाचे झाड आम्हाला अंबोलीला दिसले होते, आणि एक नरेंद्र डोंगरावर. गोवा हा समुद्रकिनारी भाग आणि बाकिचे दोन डोंगराळ. तिथली झाडे मोठी आणि पाने थोडी वेगळी होती. त्या फळांचा रस चिकट होता. पण या फळांचा नाही बघता आला. खुप दलदल होती.
हे झाड तूमच्या भागात कसे असते ? असेच असते का ? असेच नारिंगी फळे येणारे झाड माझ्या बघण्यात आहे. त्याचा पण फोटो देईन इथे.

बहुतेक आता या पुढे अनामिका १, २, ३.... अशी नामावळी चालू करावी लागतील. किती फिरता हो तुम्ही, छान आहेत सगळी प्रकाशचित्र आणि माहिती. कमोचाही अभिप्राय येथेच देत आहे. वाचले परंतु वेळेअभावी अभिप्राय लिहायला विसरलो. निसर्ग अमर्याद आहे नाही.

आभार किशोर,
फार नाहि फिरता येत. पण चौकस नजरेने बघत फिरतो एवढेच. रोजच्या वाटेवर पण मग अनेक नजारे दिसतात, आणि या बाबतीत नजर एकदम तयार झालीय आता.

दिनेश, वरील चित्र बघितल्या बरोबर मला गोंदण्या हे नाव आठवलं. हो असच दिसायच हे झाड आमच्याकडे. झाडाची पाने निलगिरीच्या पानांसारखी आहेत् ना.. मग ते गोंदणीच.

>>झाडाची पाने निलगिरीच्या पानांसारखी आहेत् ना.. मग ते गोंदणीच.
मला गोंदणीबद्दल माहिती नाही. पण या झाडाची पाने निलगीरीसारखी नाहीत हे नक्की. निलगीरीची लांबट असतात. हे पहा
निलगीरीचे पान

लेख छान आहे...
शब्दांकन आणि छायाचित्र दोन्ही सुरेख!
वनस्पती निरीक्षण आणि संशोधन ही तुमची आवड की व्यवसाय?
केवळ छंद म्हणुन करत असाल तर मानल बुवा तुम्हाला...
Happy

नमस्कार गोबु.

झाडांची, फुलांची, फळांची, गाण्यांची फक्त आवड.
या आवडीचा व्यवसाय नाही केला.
आणि व्यवसाय आवडीचा नाही. असो, प्रतिक्रियेबद्दल आभार. यापुर्वीही बरेच पोस्टलेय इथे.

अजय मला पण जरा शंकाच आहे, कारण बी ने लिहिलेला उपयोग आणि नाव, गोव्यात माहीत आहे, असे दिसले नाही. पाने पण निलगिरीपेक्षा खुपच छोटी.
आज अजुन एका फळाचा फोटो पोस्ट करीन.

दिनेश फोटो मस्तच आहे. पण चौकशी न करता खाऊन नका बघू.
बी हो मलाही गोन्दणंच वाटली ही पण रंग जरा वेगळा नाहीये का?
आम्ही लहानपणी तासन्तास काकांच्या वाड्याच्या परसातल्या गोंदणाच्या झाडावर काढायचो. सगळे हात कपडे चिकट होऊन जायचे. एकदम वेगळ्याच चवीचं फळ असतं हे. याचं खरं नाव गोधन असं आम्हाला कुणीतरी सांगितलेलं पण त्याच्या चिकटपणामुळं गो पेक्षा गोंदाशी जास्त जवळ वाटतं हे झाड.
पण त्यांचा रंग केशरी होता. त्यामुळं शंका वाटतेय.

संघमित्रा,
आज आणखी एक फोटो देतोय. ते असावे बहुतेक. पण त्या झाडाचा पण काहि उपयोग त्या घरातल्या माणसाना माहित नव्हता.

गोव्यातील एक कौतुकाची बाब म्हणजे, तिथे कुणीहि, अगदी लहान मुलेही झाडांशी झटापट करताना दिसत नाहीत. सगळ्यांच्या झाडावरची फुले फळे, झाडावरच शाबुत असतात.

आळस म्हणायचा कि शिस्त, ते मात्र नाहि माहित !!!