आम्हा दोघांची भ्रमणगाथा

Submitted by बागुलबुवा on 1 February, 2010 - 02:27

"पंधराव्या मिन्टाला ठाण्यात पोहोचतोय" गेल्या तासाभरात पाचव्यांदा आलेल्या फोनला मी उत्तर दिलं आणि गाडी हाकायला लागलो. पुण्यावरुन निघतानाच मला किरुचा फोन आला होता आणि तेव्हापासून मी हेच उत्तर देत होतो. आमच्यात दिलेला शब्द बदलत नाहीत. गेला आठवडाभर मी सतत ड्रायव्हिंग करत होतो, वर्षानुवर्ष वेताळाचा पिच्छा पुरवणार्‍या, गोष्टीतल्या विक्रमासारखा. त्यात विक्रमाच्या पाठीवर वेताळ असतो, इकडे माझ्या पोटाशी एक पिल्लू होतं एव्हढाच फरक.

सगळं सांगतो आहेच तर आता सुरूवातीपासून सांगतो. ह्या कहाणीची खरी सुरूवात फार पूर्वीच झाली होती. कुत्र्यांचं माझं वेड फार फार जुनं, अगदी लहानपणापासूनचं. (घाबरु नका, हे माझ्या आयुष्याच्या प्रवासाचं वर्णन नाहीये) त्यात मागच्या खेपेला, मामाने शिकारी कुत्रे बाळगण्याची तयारी दाखवली आणि त्या आनंदाच्या भरात मी त्याला ते शोधून आणून द्यायच कबूल करुनही टाकलं. अगदी कशाचा कशाला पत्ता नसताना. मला नाही ना पाळायला जमत, मग निदान मामाकरवी तरी हि इच्छा पूर्ण करुन घेउ, म्हणत सुरु झाला एक शोध प्रवास. अखेर महत् प्रयासाने आणि कट्टेकर मल्लीनाथाच्या अथक प्रयत्नांनी, एकच का होईना पण पिल्लू मिळवलं आणि ते घेउन घरी ठाण्याला दाखल झालो. ह्या संशोधनकार्यात संपूर्ण शनिवार आणि पाउण रविवार खर्च करुन बसलो होतो. ड्रायव्हिंग करुन आलेला थकवा वेगळाच, कारण ऑलरेडी दीड एक हजार किलोमीटर्स झाले होते आदल्या बुधवारपासून. पण आता माझ्या हातात एक गोजिरवाणं पिल्लू होतं. ती गाडीत बसताच "अप्सरा आली" गाण वाजलं आणि मी मनात तेच नाव पक्क ठरवलं तीच्यासाठी (निदान बायको, मला धरुन हाणेपर्यंततरी)

घरी ठाण्याला आल्यानंतर काहीही टेन्शन नव्हतं, कारण मला आणखी एका नादखुळ्याची साथ मिळाली होती. मनाने कोकणातच रमलेला अजून एक कट्टर कट्टेकर किरण सामंत उर्फ किरु. कोकण सफर म्हंटल्यावर एका पायावर तयार होते साहेब. ड्रायव्हिंगचा अतोनात उत्साह, कोकण दर्शनाची अनिवार ओढ आणि कुत्र्यांवरच खुळं प्रेम घेउन आम्ही रविवार संध्याकाळच्या साडेसहाच्या गोरज मुहूर्तावर मार्गी लागलो. प्रथमग्रासे म्हणतात तसं कळव्याच्या जरा पुढेच पटनी कॉम्प्युटर्सजवळ ट्रॅफिकजाम मध्ये अडकलो. निरंकारी संत समागमामधलं पब्लिक सुटलं होतं. हताशपणे वाट बघण्याशिवाय काहीच हातात नव्हतं आमच्या. तरी बरं 'अप्सरा' शांत होती आणि प्रवास एंजॉयही करत होती. साधारण अर्धा एक तास टाईमवेस्ट झाल्यानंतर आणि त्या न बघितलेल्या स्वामी, त्यांचे भक्त आणि भक्तगणांचे वाडवडील यांच्याबद्दलची प्रामाणिक मतं एकमेकांना ऐकवून झाल्यावर परत मार्गक्रमणास सुरुवात केली.

गाडीने बर्‍यापैकी वेग पकडला होता आणि प्रवासही विनासायास सुरु होता, स्टिअरिंग अर्थातच किरुने सांभाळलं होतं. सोबतीला होती मस्त गाणी. अप्सरेला त्रास होणार नाही अशा बेतानं आवाज ठेवून गाणी ऐकताना पुणं कधीच मागे पडलं आणि बघता बघता आम्ही सातार्‍यावरुन कोल्हापूरच्या वाटे लागलो. कोल्हापूरवरुन गगनबावडा मार्गे कणकवलीपर्यंत जायचं आणि तिथून पुढे मुंबई गोवा महामार्ग पकडायचा अशी प्रवास योजना होती. पण कोल्हापूरवरुन गगनबावडा फाटा नक्की कसा पकडायचा ते कुणा लेकाच्याला ठाउक होतं ? गाडी कोल्हापूरला एखाद्या हॉटेलाजवळ थांबवायची आणि चौकशी करायची असा प्लान ठरला.

प्रत्यक्षात कोल्हापूरला पोहोचलो कधी तेच समजलं नाही आणि समजे पर्यंत उशीरच झाला होता. ह्या गधड्यांना हायवे गावाबाहेर बांधायचं नक्की काय नडलं होतं देव जाणे, आणि त्यात गगनबावडा फाटा शोधेपर्यंत आम्हीच बावरे व्हायची वेळ आली होती. डावीकडे दिसलेल्या पहिल्या हॉटेलाशी गाडी लावली आणि पोटपूजेच्या कामी लागायच ठरवलं. घड्याळाकडे लक्ष जाताच दचकलोच. साडे अकरा वाजले होते. म्हणजेच ठाणा ते कोल्हापुर अंतर आम्ही चक्क साडे चार तासात कापलं होतं !

हॉटेलात शिरुन ऑर्डर देतानाच माझी चूक माझ्या लक्षात आली. "अर्रर्र, अप्सरेच्या दुधाची सोय करायला विसरलोच." मी तात्काळ कबूली दिली. "मिळेलं रे हॉटेलात" किरुने आशा पुन्हा पल्लवीत केली. पण, खाणं देखील सुखासारखच नशीबात असाव लागत बहुतेक. त्या हॉटेलात बसणारे चहा पिणार्‍यातले नसणार बहुधा, कारण रात्री चहा मिळत नाही आणि दूधही संपलय असं अत्यंत विनम्रपणे आमच्या वेटराने सांगितल्याबरोबर आमचा चेहरा खेटराने मारल्यासारखा झाला. "पुढे बघू" असं ठरवून आम्ही आमची ऑर्डर दिली आणि त्या हॉटेलवाल्याचं गेल्या जन्माचं देणं फेडून टाकलं.

पोटोबा नंतर विठोबा न्यायाने मार्गदर्शनासाठी शोधकाम सुरु केलं. मुळात कोल्हापुरात शिरायचा रस्ता कुठला हेच समजत नसताना आम्ही मालकाकडे गगनबावडा फाट्याची चौकशी सुरु केली. बराच वेळ एकमेकांशी करपल्लवीत बोलल्यानंतर आम्हाला काहीही न समजल्याचं मालकाला समजावून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो. बिच्चारा, आपली गाडी काढून आम्हाला रस्ता दाखवायला आला. त्याच्या मागे टो केल्यासारख जाताना आम्हाला एव्हढच लक्षात आलं की निव्वळ नशीबाने आम्ही कोल्हापूरच्या अजिबातच पुढे गेलो नव्हतो. अभिमन्यु चक्रव्युहात शिरावा तसे आम्ही त्याच्यामागून उजवी डावीकडे वळत एका ठिकाणी थांबलो.

"हिकडून सरळ गेलात की रक्काळा" मालक वदते झाले. आम्ही खुळ्यासारखे एकमेकांकडे पहात बसलो. "गगनबावडा" आणि "रंकाळा" ह्यात काहिही उच्चारसाधर्म्य नसताना रात्री साडेबाराच्या सुमारास हे बेणं आम्हाला रक्काळा का दावतय ते आमास्नी उमजनास झाल. आमच्या हताश मुद्रा पाहून "हेच काय फलं मम तपाला" छापाचा चेहरा करत मालक पुढे उत्तरले "रक्काळ्यावर्न उजवी घेतलात की सरळ गगनबावड्याला पोचाल."

हे ऐकून आम्ही धन्य धन्य झालो. त्याने ज्या रस्त्यावरुन आम्हाला आणलं तो रस्ता आम्हाला परमेश्वराने समजावूनही समजला नसता. हे जाणूनच, तो बापडा पाच किलोमीटर वाकडी वाट करुन आमच्या वाटेला आला होता. परमेश्वरपण कुठच्या रुपात मदत करायला उभा राहिल काय सांगता येतं नाही. असो, रात्र बरीच झाली असल्याने आम्ही आभारप्रदर्शनात जास्त वेळ न घालवता पुढचा रस्ता पकडला. अर्थात रस्ता पकडला हे फक्त वाच्यार्थाने, कारण तो रस्ता बराच काळपर्यंत दगड, माती, रेती आणि तत्सम पदार्थांच्या रुपातच व्यक्त होत होता. एकंदरीत रस्त्याच्या उत्क्रांतीच्या सर्व अवस्था आम्ही सर्वांगाने यथेच्छ अनुभवल्या.

त्यात भरीस भर म्हणून अप्सरा गायला लागली होती. आधी मला वाटलं की तिलापण अबिदा परवीनच गाण आवडतं, मग माझ्या लक्षात आलं की हा अनाहत नाद कलेच्या आनंदाप्रीत्यर्थ नसून पोटातल्या भूकेपायी उमटत होता.

"काय झाल ?" किरुने विचारलं.

"बाळ रडतय" खरतर हे सांगताना मीच रडकुंडीला आलो होतो.

भुकेने पोटात कावळे कोकलतात हे वाचल होतं पण हिच्या बोंबलण्यात मांजराच्या आवाजातल कारुण्य, बेडकाच्या ओरडण्यातल गांभीर्य आणि गाढवाच्या खिंकाळण्यातलं सातत्य होतं. नशीबाने (आमच्या) पुढच्या नाक्यावर चहावाला दिसला. पहिल्यांदा जाउन दुधाची चौकशी केली.

नसीब ** तो क्या करे पांडू ? तो सद्गृहस्थ किटलीत भरुन रेडिमेड चहा विकत होता, त्यामुळे त्याच्याकडे दूध नव्हतं. मेलो. आता पुढचा सगळा प्रवास संगीतमय होणार होता, पण त्यापेक्षाही एका मुक्या प्राण्याला उपाशी ठेवल्याची जाणीव फारशी सुखावह नव्हती.

"काय ब्र क्राव?" ??????

"युरेक्का" (म्हणजे काय देवास ठाउक) चहावाल्याकडे चक्क बिस्किटचा पुडा होता. पोटाच्या भुकेला भलते चोचले परवडत नाहीत. आईच्या दुधावरच वाढलेल्या त्या पिल्लाने सहज त्या बिस्किटांचा फन्ना उडवला. आम्ही आमची पाठ थोपटून घेतली. वोभी खुश, हमभी खुश.

आता थंडी जाणवायला लागली होती. झोपेने माझा ताबा घ्यायला सुरुवात केली. इतका वेळ पोटाशी धरुन ठेवलेली 'अप्सरा' मी हळुच बॅकसीटवर ठेवली. तिला तो बदल अजिबात रुचला नाही. तिने परत निषेधाचा सूर लावला. झोप नको पण कुत्रं आवर म्हणत मी परत तिला पोटाशी ठेवलं. कांगारुना पोटाशी पिशवी का असते ह्याच कोड मला उलगडलं होतं.त्याच समाधानात एव्हाना माझा चांगलाच झोपाळू गणपती व्हायला लागला होता. अप्सरेला रस्त्याची अवस्था आवडली नव्हती का रात्री ती जास्त अ‍ॅक्टीव्ह झाली होती ते कळायला मार्ग नाही, पण मी झोपतोय हे बघून हळूहळू तिने किरुकडे मोर्चा वळवला. ड्रायव्हिंग करत असताना अचानक किरुच्या पायांवर तिने बस्तान ठोकलं आणि ती किरुचा स्टिअरींग व्हीलवरचा कंट्रोल तपासू लागली. शेवटी घाट उतरेपर्यंत मी तिला दामटून धरुन ठेवली. आणि ह्याचा धिक्कार करत ती घाट संपताच किरुच्या आश्रयाला गेली. तशीच गाडी हाकत साधारण सकाळी चार वाजता आम्ही कुडाळमध्ये शिरलो आणि मावशीला उठवून, झोपायच्या तयारीला लागलो.

अर्थात आमच्या आधी तीची बडदास्त राखली गेली होती. दूध तापवून, निववून तीला प्यायला दिलं आणि आम्ही अंथरुणं गाठली. दूध पिउन हुश्शार झालेली अप्सरा आता खेळायला लागली होती. एकंदरीत सगळी टेन्शन्स आजच्यापूरती संपल्याने आम्ही थकून भागून कधी झोपलो ते कळलच नाही.

जाग आली तेव्हा 'अप्सरा' आम्हाला चाटून उठवण्याच्या प्रयत्नात होती. आम्ही आजचा प्लान ठरवत बसलो. किरुला त्याच्या आजोळच्या घरी "दुतोंडला" जाउन यायच होत, तर मला अप्सरेला धामापूरला मामाच्या हवाली करुन तिथून एक मोठी जर्मन शेफर्ड फिमेल घेउन यायची होती. मावशीला माझ्या आजोळी "कोंडुर्‍याला" जायचं होतं. दुसर्‍या दिवशी सक्काळी मालवणला बैलांच्या झुंजी बघायला जाउन तिथून परस्पर मुंबईला जायचं असा प्लान ठरला. किरुने त्याच्या भावाला फोन लावला तर झुंजी कॅन्सल झाल्याची बातमी कळली. आमच्या शेड्यूलमधला तेव्हढा भाग वगळून आम्ही पुढच्या कार्यवाहीला लागलो. तोपर्यंत मावसबहिणीशी तीची चांगली दोस्ती झाली होती. मामाने मला आधीच वॉर्न केलं होतं. तू मावशीकडे उतरणार आहेस, माझ्यासाठी आणलेलं पिल्लू तिकडेच ठेवशील तर बघ. मग मावसबहिणीला अजून एक पिल्लू प्रॉमिस करुन निघायच्या तयारीला लागलो.

आंघोळ आणि "इन साफ" करुन आम्ही सर्वात पहिल्यांदा दुतोंडच्या रस्त्याला लागलो. डांबरी रस्त्यावरुन कच्च्या रस्त्यावर करत करत दुतोंडला पोहोचलो. किरुचं येणं नक्की झाल्यादिवसापासून किरुकडून वर्णन ऐकून ऐकून मला ते बघायची खूप उत्सुकता लागून राहिली होती. नारळी पोफळीच्या बागांमधून जाणारा तो नागमोडी रस्ता आम्हाला घरापर्यंत पोहोचवू शकत नव्हता. गाडी रस्त्याच्या कडेला लावून आम्ही व्हाळात उतरलो. व्हाळाला पाणी नव्हत त्यामुळे पार करण अगदी मजेचं होतं. व्हाळ पार केल्यावर समोरच होत किरुच घर. स्वच्छ सारवलेल्या अंगणात असलेल्या तुळशीवृंदावनाने आमच स्वागत केलं. सारवलेल्या अंगणाचा फीलच वेगळा होता. थोडावेळ पावलांना ते सुख अनुभवू दिल्यावर देवळात जाउन आलो. पायर्‍या असलेल्या विहिरीच्या बाजूलाच असलेलं टुमदार देउळ, बांधून काढलेल्या पाराचा औदुंबर, गाभार्‍यात दरवळणारा उदबत्त्यांचा आणि तेलवातीचा वास आणि बॅकग्राउंड म्युझिकला नीरव शांतता......समाधी लागली नसती तरच नवल. घरातून हाक आल्याबरोबर घावत घरात शिरलो. कोपभर चाय तयार होती. नाही म्हणायची हिम्मत नव्हती नाहितर परस घोपटण्याच काम चालू होतंच, परसाबरोबर आम्हालाही धोपटण्यात आलं असतं. जेवणाच्या आग्रहाला बळी पडलो असतो तर आमचा पुढचा कार्यक्रम बोंबलला असता. मामाकडे जेवणार असल्याची थाप मारुन शेवटी तिकडून निसटण्यात आम्ही कसेबसे यशस्वी झालो.

किरुच्या मावसभावाचा निरोप घेउन आम्ही धामापूरच्या वाटेला लागलो. वास्तवीक 'मामाच्या गावाला जाउया' हे गीत साभिनय गायचा माझा विचार होता, पण 'अप्सरेचे' निषेधगीत ऐकून आणि किरुचे भेदरलेले डोळे पाहून मी माझा विचार रद्द केला आणि निमूट मार्गस्थ झालो.

अचानक एका वळणावर कर्ली नदीने आम्हाला जणू रोखूनच धरलं. वळणावरुन अलगद वहात आलेली नदी, तीच्यावरचा सुबक पूल, दोन्ही बाजूंचे डोंगर, काठावरची नारळाची झाडं आणि नदीच्या पात्रात पडलेली त्याची प्रतिबिंब. वाह ! डोळे निमाले आणि मन तृप्त झालं आमचं.


मनसोक्त फोटो काढून तिथून आम्ही निघालो ते थेट धामापूरला भगवतीच्या देवळात.

देवदर्शनानंतर दर्शन घेतलं ते तळ्याचं. प्रचंड विस्तार असलेलं हे निळभोरं तळ सगळ्या बाजूंनी हिरव्या डोंगरानी वेढलेलं आहे. जणू हिरव्या पाचूंच्या मधोमध जडवलेला नीलमणी. आमची भूक एकदोन फोटो काढून शमणारी नव्हती.




मामाकडे उशीरा पोहोचणं क्रमप्राप्तच होतं. अधाशासारखे फोटो काढून झाल्यावर आम्ही मामाकडे निघालो.
स्वागत मात्र जोरदार झालं आमचं, एखाद्या व्ही.आय.पी. ला रिसीव्ह करायला याव तसा मामा स.कु.स.प. दारी उभा होता. 'अप्सरे'चं हे स्वागत आमच्यासाठीच असल्याचा गोड गैरसमजात आम्ही घरात दाखल झालो. मामाची डबल बॅरल, त्यांनी डेव्हलप केलेल्या वाईन्स यांची माहिती घेता घेता बराच वेळ गेला. त्यात मामाने 'जिमी'ला तिथेच घर शोधून ठेवल्याने आमची तीही जबाबदारी आटोपली होती. आत्तापर्यंत मामा, मामी, आजी आणि मामाघरची जिमी ह्यासगळ्यांची ओळखपरेड आटोपल्याने अप्सरा घरचीच झाली होती. शेवटी लेक सुस्थळी पडल्याच्या समाधानात आम्ही परत यायच्या बोलीवर घर सोडलं आणि पिंगुळीला मावशीच्या घराच्या दिशेने कूच केलं.

तोपर्यंत पोटात भुकेने कुकूचकू करायला सुरुवात केलीच होती. भ्रमंतीच्या नादात दोन्ही घरचे पाव्हणे उपाशीच राहिले होते. कुडाळ एस्टी स्टॅन्डावर जाउन पोटपूजा आटोपली आणि बर्‍याच वेळा ठरवलेला गजालीकर "बाबल्याभेटीचा" कार्यक्रम उरकुन घेतला. मायबोलीचे लाल (का मरुन) टिशर्ट घातलेले दोन टोणगे बाबल्याच्या दुकानात शिरलो आणि बाबल्यासमोर उभे ठाकलो. स्वतःच्या छातीकडे बोट दाखवून "मायबोली" असं दरडावताच बाबल्याला क्षणात ओळख पटली (निदान त्याने तसं सांगितल तरी). बाबल्याशी गप्पा मारुन पिंगुळीला आलो आणि तसेच मावशीला घेउन कोंडुरा गाठायला निघालो. सूर्यास्ताची वेळ जवळ येत चालली होती आणि रथाच सारथ्य माझ्याकडे होतं. कुडाळ वेंगुर्ला (मठ मार्गाने) जात असताना आम्हाला लागलेल्या चेकपोस्टावरुन आमची गाडी तशीच पुढे नेताच शिट्ट्या वाजल्या. कर्तव्यदक्षतेचा अटॅक आलेल्या त्या चेकपोस्टवर पोलीसांचे मनोरंजन करण्याचे पवित्र कर्तव्य पार पाडून आम्ही परत मार्गी लागलो. गाडी चेक होण्याचा ह्या प्रवासातला हा पहिला आणि एकमेव प्रसंग.

धावपळ करत कोंडुर्‍याला जाताना माझ्या डोळ्यासमोर फ्लॅशबॅक चालू झाला होता. सुट्ट्या पडताच गावाला जायची घाई व्हायची, त्यात आजी आजोबांइतकीच ओढ असायची ती कोंडुर्‍याच्या समुद्राची. दोन डोंगरांच्या मध्ये वसलेलं हे उण्यापुर्‍या पाच पन्नास वस्तीचं गाव तस खूपच छोटं. डोंगरांमधून वहाणारा व्हाळ (वहाळ) समुद्राला मिळतो तिथेही फारसं पाणी नाही जमायचं, पण दोन्ही डोंगर समुद्रात घुसल्यामुळे तयार झालेला तो छोटासा त्रिकोणी निर्मनुष्य समुद्र किनारा तुम्हाला अंतर्मुख केल्याशिवाय रहात नाही. समोर अंधुक दिसणार दिपगृह, उजव्या हाताच्या डोंगरापल्याड असलेले असेच काही समुद्रकिनारे आणि डाव्या हाताच्या डोंगराच्या समुद्रात घुसलेल्या दगडी कपारी. अर्थातच दृश्य पूर्णत्वाला नेण्यासाठी आवश्यक असलेल छोटसं देउळ. अ पर्फेक्ट पिक्चर.

मनाच्या कोपर्‍यात जपलेल्या गेल्या कित्त्येक वर्षांच्या आठवणी अजून सुखावत होत्या, कमंडलूतल्या थंडगार तीर्थासारख्या. फोन नव्हते त्यावेळी, एस्टी बदलून गावच्या स्टॉपवर उतरलो की पत्र मिळाल्याने न्यायला आलेले आजोबा दिसायचे. वाट बघत कधीपासून थांबलेले असायचे देवजाणे. आम्हाला बघितल्यावर डोळे का डबडबायचे त्यांचे, ते तेव्हा नव्हतं कळलं, आता त्यांच्या आठवणीने भरुन येतं तेव्हा लख्ख जाणवतं. स्टॉपवर उतरुन आजोबांशी गप्पा मारत सड्यावरुन चालायला लागलो की त्या वैराण माळावरुन बर्‍याच लांबून दिसायचा तो कोंडुर्‍याचा समुद्र. "कोंडुरो गराजता" म्हणून पंचक्रोशीत फेमस होती त्याची गाज. "आजोबा, घर आलं" आम्ही ओरडायचो. घर म्हणजे समुद्रदर्शन आणि समुद्रदर्शन म्हणजे घर हा साधा, सोपा आणि सरळ हिशेब होता. आता बर्‍याच आतपर्यंत गाडीरस्ता झालाय त्यामुळे ह्या दूरच्या समुद्रभेटीचा आनंद किंचित उणावलाय. पूर्वी घरात दाखल झाल्याझाल्या आम्ही "वेळेवर" पळायचो. वेळ म्हणजे समुद्रकिनारा. आजही तेच केलं, कारण न बदललेला असा तोच उरला होता अख्ख्या गावात.

त्या अफाट विस्ताराकडे बघून जो स्वतःत डोकावत नसेल असा माणूस विरळा. वाळूत पाय खुपसून बसताना मनात जाणवलं; मुळं वाढायला आवश्यक असतं ते पाणी आणि जमीन, मग ती मुळं झाडाची असोत वा माणसाची. अर्थात थोड्याच वेळात ह्या आध्यात्मिक जाणीवेतून आम्ही बाहेर आलो ते मावशीकडे बघून. पाय दुखत असताना ती घाटी उतरुन आली होती ते वाळूत खेळण्यासाठी. छोट्या कुर्ल्यांच्या मागे तिला पळताना पाहून आम्ही किंचित हसलो. थोडं तीला, थोडंस आम्हालाच. लहानपणच्या आठवणी जागवणारे आम्ही एकटेच नव्हतो तर.

किरुकडून फोटोग्राफीतले काही धडे घेउन आम्ही सूर्यास्त टिपत तिथेच रेंगाळलो. थोडा कॅमेराने टिपला, थोडा डोळ्याने आणि बराचसा मनात टिपून ठेवला.



सूर्य बुडताक्षणी अंधार व्हायला सुरुवात झाली होती, आणि आम्हालाही आता परतीचे वेध लागले होते. मुक्काम पोस्ट पिंगुळीला रात्री डेरेदाखल झालो. येताना कोंडुर्‍यावरुन आठवण म्हणून एक जराशी पिकलेली आजी घेउन आलो. इकडे मुंबईत माझी आजी घरी एकटी रहायला नको, म्हणून तिची गावातली सोबतीण. आता ही आजी आम्हाला परत ठाण्याला घेउन यायची होती.

तिला प्रवास झेपेल का ? गाडी तर लागणार नाही ना ? वाटेत कितीवेळा गाडी थांबवायला लागेल ? हे प्रश्न मनात घेउन दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाच्या तयारीला लागलो. माहेरवाशीणीची तयारी करावी तसं गाडीत सामान चढवण्यात येत होतं. हातसडीचे लाल पोहे, शेवेचे लाडू, शेळी (शहाळी हो, तुम्हाला काय वाटलं ?) एकामागोमाग एक पिशव्या ठासल्या जात होत्या. "कॅरियर लावून घे रे पुढच्या वेळेसाठी" किरुने चिमटा काढलाच. कोकणच पाणी आहे ते, गुण दाखवल्याशिवाय नाय रहाणार.

सामान डिकीत ठेवून आम्ही आजींसह स्थानापन्न झालो आणि आठवलं. अजून एक माबोकर आणि एक्स कट्टेकर योगेश प्रभूणे उर्फ प्रयोग गोवा दौर्‍यावर होते. योग्ज परतीच्या वाटेवर असल्याने त्याला सावंतवाडीला भेटायचं ठरलं. नाहीतरी ह्यावेळी आम्हाला आंबोली घाट करायचा होताच आणि गोव्याला येताना योग्ज ह्याच वाटेने आला होता. भेटल्यावर मायबोलीच्या आठवणी जागृत होण अटळ होतं. बाबल्याच्या फोन नंबरसाठी दक्षिणाबरोबर फोनाफोनी झालेली होतीच. आता तिघे टवाळ भेटल्यावर तिला पिडायचा मोह आवरेना. फोन लावून, आम्ही इकडे केलेल्या आणि न करता आलेल्या सगळ्या गमती जमती सांगून तिला मनसोक्त छळताना आम्हाला दुपारच्या उन्हाची जाणीव होउ लागली. योग्जबरोबर, यष्टी स्टांडावर्च्या ल्येमनसोड्याच्या साथीने घनघोर चर्चा झाल्यावर; आम्हाला आंबोली मार्ग घेण्यापासून परावृत्त करण्याच्या त्याच्या प्रयत्नांना न जुमानता आम्ही मार्गस्थ झालो.

आंबोली घाटात परत एकदा कॅमेरागिरी झाल्यावर वाटेतल्या निसर्गप्रलोभनांकडे दुर्लक्ष करायच ठरवून गाडी हाकू लागलो. ह्यात निसर्गाच्या हाकेकडे मात्र काणाडोळा करुन चालण्यासारख नव्हतं. बिच्चार्‍या आजी मात्र आमचा मोकाट टाईमपास सहन करत निमूट होत्या. कागलला दुपारी जेवताना त्यांनी जे काय तोंड उघडलं तेव्हढच.

तिथून पुढे परत चक्रधराचे कर्म किरुच्या माथी मारणात आले. वाटेतले उस वहातूकीचे डंपर्स, त्यांचा पाठलाग करत चालणारे आणि अचानक उजव्या लेनमध्ये बेडूकउड्या मारणारे ट्रक्स, रस्त्यावर शिवाशिवी खेळणार्‍या बाईक्स आणि ह्या सगळ्याचा आपल्याशी कसलाच संबंध नसल्याच्या थाटात चाललेल्या एम एच १२ आणि एम एच १४ ह्या सगळ्यांना चकवत आम्ही ठाण्यात शिरलो. एकंदरीत ही कुत्रमित्रांची 'चित्र'विचित्र सफर मस्त पार पडली होती.

छोटीशी आणि सुबक अशी ही उण्यापुर्‍या दोन दिवसांची कोकणसफर आम्हाला आमच्या आत डोकावायला लावून गेली होती. "प्रवास हा अंतराचा नसून अंतरीचा असतो" हे जाणवलं आम्हाला.

सुखरुप पोहोचल्याचे फोन्स केले गेले आणि मावसबहिणीशी बोलताना तिने तिला दिलेल्या पिल्लाच्या प्रॉमिसची आठवण करुन दिली. किरु आणि मी एकमेकांकडे बघून हसलो. पुढच्या ट्रिपसाठी आम्हाला पर्फेक्ट कारण सापडलं होतं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार मानायला सुरुवात करताना सगळ्यात पहिले नाव आलं पाहिजे ते मल्लीनाथाचं. त्यांने पिल्लू शोधलं नसत तर पुढचं काहिच होणार्‍यातलं नव्हतं. गुरुवर्य चिमण्रावांच्या आशिर्वादाने किरु आणि मी, लिखाणाला सुरुवात तर केली; पण प्रवासाहून आल्याआल्या लिखाण लवकर पूर्ण करण्यासाठी दक्षिणाकडून धमक्या मिळायला लागल्या होत्या. केवळ तिच्या धमक्यांना घाबरुन लिखाण संपवल. लालू गटगला जाताना कट्टेकरीण मनिषा लिमये ह्यांनी गाडीत त्याचं वाचन पार पाडलं. (इतकं छान वाचन केल्याबद्दल मनिषासाठी जोरदार टाळ्या होउन जाउद्या.) लिखाणातल्या चुका असह्य होउन अजून एक कट्टेकरीण ललिता_प्रिती उर्फ लल्लीबाय ह्यांनी मास्तरणीच्या आवेशात त्या सुधरून दिल्या. तोपर्यंत किरुदादांनी फोटोंना फिनिशिंग टच देउन संपवला होता. अशा रितीने अखेर काल रात्री ह्या सगळ्यांची सगळी मेहनत संपवून आजच्या शुक्रवारी हा पिक्चर रिलीज केला..

अम्या
लेखन अप्रतिम झालंच आहे, पण सर्वात आवडल्या त्या फोटोवर छापलेल्या दोनोळ्या... कुणी केल्यात? तुच का काय?
माझ्या आवडत्या १० लेखात गेलाय हा लेख... Happy

असाच भ्रमत रहा, आणि आम्हाला सफरी घडवून आण.
(कधीतरी खरी खरी पण घडू दे :फिदी:)

पुलेशु, पुभ्रशु इत्यादी इत्यादी.. Happy

हा वृतांत मला किरुच्या बायकोपर्यंत पोचवायला आवडेल. Wink
अमित, मस्त लिहिलयस मित्रा! Happy शेवटी बाबल्या भेटलाच म्हणयचा.

हा वृतांत मला किरुच्या बायकोपर्यंत पोचवायला आवडेल. >>>:हहगलो:
किरु लगेच हे सेन्सॉर करायला लावेल्...:डोमा:
मस्त आहेत फोटो आणि वॄतांत Happy पुढच्या वेळेला मी येतो नक्की ...पण घरी सांगून्..:डोमा:

अप्रतिम, केवळ अप्रतिम. गाडीत वाचलं असलं तरी आत्ता हे सचित्र वाचायला अजून मजा आली.

अम्या, किरु, मला पण घेऊन जा ना एकदा अशा भटकंतीला. पाहिजे तर मी एक भुभूचं पिल्लू घेऊन येईन.

त्या दोन दोन ओळी कुणी लिहिल्या? किरुची करामतपण मस्तंय.

सुंदर फोटोंसह सुंदर वर्णनही......वा वा...येवा कोकण आपलाच असा

"प्रवास हा अंतराचा नसून अंतरीचा असतो"....आवडलं

>>>फोन नव्हते त्यावेळी, एस्टी बदलून गावच्या स्टॉपवर उतरलो की पत्र मिळाल्याने न्यायला आलेले आजोबा दिसायचे. वाट बघत कधीपासून थांबलेले असायचे देवजाणे. आम्हाला बघितल्यावर डोळे का डबडबायचे त्यांचे, ते तेव्हा नव्हतं कळलं, आता त्यांच्या आठवणीने भरुन येतं तेव्हा लख्ख जाणवत>>><<< सकाळी सकाळी रडवलंस ... आत्ता गावाला जायला काहीच कारण नाहिय.. Sad
लेख माझ्यापण आवडत्या १० मध्ये... Happy

अप्रतिम, केवळ अप्रतिम.... मल हेवा वाटला तुमच्या दोघांचाही. गाडीत वाचलं तेव्हा मी नव्हते, त्यामुळे माझ्यासाठी हे अगदीच नवं, त्यात फोटोंचीही मेजवानी... त्यामुळे पूर्ण लेख खरंच खूपच भावला. फोटोंवरच्या दोनोळी कोणाच्या आहेत?

जल्लां किरू काय घरातून पळून आलेला की काय? शप्पथ सांगते, लेख वाचला तेव्हा माझ्या मनात हाच विचार येत होता की ह्या किरूची बायको दर शनिवार-रविवार ह्याला एवढ्या लांब भटकायला कशी काय पाठवते..... पुढचे प्रतिसाद वाचले तेव्हा उलगडा झाला. Wink

अफाट वर्णन केलस रे. फोटो जास्त सुंदर की तुझ शब्दवैभव ह्या प्रश्नात पडलोय.
उत्तर नाही सापडल तरी चालेल फक्त हाच प्रश्न तुझ्या फोटो असणार्‍या प्रत्येक लेखात पडायलाच हवा Happy

म्हणजेच ठाणा ते कोल्हापुर अंतर आम्ही चक्क साडे चार तासात कापलं होतं>>> क्रेझी ड्रायव्हींग..
Happy

आयला किरु म्हणजे तु सांगत होतास ते, असुदे बरोबर गेलेलास कोकणात Happy बायकोला ऑफिसच्या कामाला जातोय सांगून ???

अमित...

सध्या कोकण भ्रमंतीला चांगले दिवस आलेले दिसतायत... हल्ली वाचलेला हा तिसरा 'भ्रमंती वृत्तांत' - पहिला किरु, दुसरी शैलजा आणि आता तू... पण एक आहे, तीनही वृत्तांत वेग-वेगळे आहेत. त्यामूळे आपल्याच गावा बद्दलचं - खरं तर सिंधुदूर्गा बद्दलचं, तुम्हा तिघांच्याही नजरेने टीपलेलं आकर्षक पण वेग-वेगळं रुप पहायला मिळालं...

मनःपूर्वक धन्यवाद...

Pages