डायरी..तीची-३

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

तिसरीत आल्यापासून मी आणि मोरे शाळेत बरोबर जातो. मोरे माझ्याच वर्गात आहे, जवळच राहते. मोरेचं घर पण एका खोलीचं आहे पण ती वेगळीच आहे. ती खूप हसते. दंगा करते. आज शाळा सुटल्यावर मी आणि मोरे येत होतो. तर एक माणूस गाडीवर लाल रंगाची फळं विकत होता.
कोकऽऽम..!
कोकम? म्हणजे काय ..? मी विचारलं
अगं मस्त फळ आहे, तू खाल्लं नाहीस कधी? मी गाडीकडे बघतबघत 'नाही' अशी मान डोलावली
पुढे आल्यावर "नीलम" च्या दुकानाशी मोरे एकदम खूप हसायला लागली ती नेहमीच अशी खूपच हसते. मी पहातच राहीले
काय झालं? का हसतेस उगीच?
तीनी तीचा हात माझ्यासमोर धरला हातातला रुमाल उलगडला आणि त्यात कोकऽऽऽम..
आँ! तुझ्या हातात कसं काय गं?
अगं ढापलं .. मोरे पुन्हा खदाखदा हसत बसली
म्हणजे चोरलंस..? चोरी केलीस ? कशी काय मला कसं नाही दिसलं?
हे! हे! जाता जाता गाडीला धरुन पुढे जायचं नाटक केलं हातातल्या रुमालाखाली एक कोकम उचललं.. हे घे खाऊन बघ तू खाल्लं नाहीयेस ना ?
चोरी करणं चांगलं नाही ना गं पण.
काही होत नाही एक कोकम नेल्याने.. खा..
मी चव घेऊन पाहीली ते फारच आंबट होतं मग तीनेच खाल्लं
पण कोकम मस्त गुळगुळीत आणि लाल रंगाचं असतं.
मोरेकडे कधी कधी पैसे पण असतात. बाबांच्या खिशातून चोरले असं सांगते कधीतरी. त्या पैशातून शाळेशेजारी असलेल्या छोट्या दुकानातून काहीबाही घेते मग. मला पण देते. त्यात मोदकाच्या आकाराचा साखरेचा गोड आणि रंगीत गोळा चिकटवलेलं बिस्कीट असतं ते मला आवडतं. आम्ही एकदा साखरेच्या सिगरेटी पण घेतल्या होत्या. मोरे सिगरेट ओढायची नक्कल करुन हसत बसली मग थोड्या वेळाने चोखुन चोखुन संपवून टाकल्या सिगरेटी.
--
काल दप्तर आवरण्यासाठी उलटं केलं सगळी वह्या पुस्तकं दप्तरात होतं ते सगळं एकदम धडामकन पाडलं खाली. मी असंच करते दप्तर आवरताना. अचानक नाणी पडल्याचा आवाज झाला. बाबा बाजूलाच बसले होते ते एकदम विचारायला लागले पैसे कुठून आले तुझ्याकडे ? दप्तरात कशाला पैसे ठेवलेत? मी सांगत होते की तुम्ही शाळेत परवा भरायला पैसे दिले त्यातले उरलेले तुम्हाला परत द्यायचे राहीलेत. पण बाबा खूप जोरात ओरडले. मग मला खूप ओरडले. पैशाला हात लावशील पुन्हा, तर बघ .... आणि काय काय... मी घेतले नव्हते पैसे.
--
शाळेतून आले की मी आमटी पोळी खाते मग आम्ही वाड्यात खूप खेळतो. वाड्याचं अंगण मस्त आहे. तिथे आम्ही सगळ्या खेळतो. खालच्या जोशीकाकांकडे एका पेटीत सगळी अमर चित्र कथांची पुस्तकं आहेत ती आम्ही एकत्र बसून वाचतो. पण ती पुस्तकं ते फक्त मे महीन्याच्या सुट्टीतच बाहेर काढतात. एरवी आम्ही असंच काहीतरी खेळतो. माझ्याकडे फार खेळणी नाहीयेत पण आज्जीनी माझ्यासाठी थोडी भातुकली जमवलीये ती मात्र सॉलीड आहे. कुणाकडेच नाहीये तशी. स्टीलची छोटी कपबशी तर एकदम मस्त आहे.
--
आज मी दुपारी पेन्सिलला टोक करत होते त्याचं मस्त फुलपाखरु बनत होतं ते पहात पहात. इतक्यात जगूदादा आला. त्याच्याकडे सुंदर सुंदर वासाची सुंदर सुंदर रंगाची खूप खोडरबरं होती.
आह! काय मस्त वास आहे. आणि प्रत्येक खोडरबरावर किती मस्त चित्र आहे. मला देतोस का रे एक? कुठून आणलीस एवढी..
मी स्वतः तयार केलीत
तयार?
हो, हे फुलपाखरु आहे ना पेन्सिलच्या टोकाचं ती साठवायची
आणि?
त्यात रोज पाणी घालायचं दोन थेंब मग खूप दिवसांनी खोडरबर तयार होतं.
खरंच?
मग मी एक वाटी आणली सगळी टोक करुन मिळालेली फुलपाखरं त्यात जमा केली. जरा कमीच वाटली. मग अजून टोक केलं अर्धी वाटी झाली मग दोन थेंब पाणी घालून खिडकीच्या कट्ट्यावर एका कोपर्‍यात ठेऊन दिली.
--
सकाळी उठल्या उठल्या मी रबर बनलंय का पहायला गेले. अजून झालं नव्हतं. जगूदादा म्हणलाच होता खूप दिवस लागतील. मी दोन थेंब पाणी घातलं. रात्री स्वप्नात पण रंगीबेरंगी चित्रवाली खोडरबरं दिसत होती. माझ्या रबरांवर कुठली चित्र बनतील कोण जाणे..? संध्याकाळी आज्जी आवराआवरी करत होती तीला ती वाटी सापडली.
ई ई ऽऽ हे काय ठेवलंय इथे?
अगं ते खोडरबर बनवायला ठेवलंय..
हॅत मुर्ख कुठची असं कधी खोडरबर बनतं का? कार्ट्या उगीच पसारा करुन ठेवतात आवरायला.
अगं ऽऽ जगूदादा....
आज्जीनी माझं काही ऐकलं नाही सगळं बनत आलेलं रबर फेकुन दिलं वर माझ्या पाठीत एक दणका घातला. मी चिडले आणि रडायला पण लागले. आज्जी गेली निघून तीच्या पुढच्या कामाला
--
आमच्या खिडकीच्या बाहेर एक पाईप आहे जमिनीला लागून आणि त्यावर एक गोल झाकण आहे. ते झाकण उघडून पाहीलं तर आतून पाणी वाहताना दिसतं. कधी कधी गटार तुंबलंय म्हणून मग ते उघडून आज्जी पहाते. काल मी तिथे उकीडवी बसून ते झाकण उघडून आत पहात होते आत पाणी वाहताना दिसत होतं. जगुदादा पण आला माझ्याशेजारी बसला.
काय बघतेय?
काही नाही.... ! गटाराचं झाकणं खाली वर करत मी म्हणले
तुला माहीतेय हे काय आहे?
काय ?
हा ना भुयारी रस्ता आहे..
भुयारी रस्ता?
हो. इथून आत आत खूप आत चालत गेलं ना की एक मोठ्ठा सुंदर महाल आहे त्यात एक सुंदर राजकन्या राहते.
होऽऽऽऽ???
मी आत वाकुन वाकुन पाहीलं पण तसं काही दिसलं नाही..
---
(काल्पनिक)

आधीचे भागः
http://www.maayboli.com/node/9230
http://www.maayboli.com/node/9689

विषय: 
प्रकार: 

तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. झकासराव खरंय रे वेळ मिळाला की लिहीते त्यामुळे पटापट लिहून होणं जरा अवघडच आहे.