Submitted by pulasti on 4 March, 2008 - 13:52
गंध इथले वेगळे पण श्वास माझा तोच आहे
बंध हे रेशम जरी मी त्यात गुदमरलोच आहे
नेमकेपण येत आहे आपल्या नात्यात आता
बोलतो केव्हातरी अन त्यातसुद्धा खोच आहे
मी किती हुसकावले, दुर्लक्ष केले, टाळलेही
सारखा दारापुढे तो पारवा घुमतोच आहे
ताठ होते सर्व येताना मनाच्या मद्यशाळी
हाय आता मनसुबा प्रत्येक डळमळतोच आहे!
कोण अंधारास त्याच्याएवढे समजून घेतो?
दूर कोनाड्यात एकाकी दिवा जळतोच आहे!
संत थकले! नाहिसे अज्ञान त्याचे होत नाही...
पीठ तो भलत्या जनीसाठी किती दळतोच आहे!
कोरडे होतील डोळे - आसवे असतील जर ती
कोण डोळयातून संततधार ओघळतोच आहे?
या अटळ अपुरेपणाची फारशी मज खंत नाही!
दु:ख हे सलते उरी की - मी तरी उरलोच आहे...
गुलमोहर:
शेअर करा
शंका
पुलस्ति, मतल्यानुसार तुमचा रदीफ 'तोच आहे' आणि स्वरकाफिया (आ) ठरतो ना?
मग नंतर 'खोच आहे', 'उरलोच आहे' वगैरे कसं चालेल? खरंतर सगळ्याच कवाफी (असंच म्हणतात ना?) चुकीच्या वाटतायत मला.
Having said that,
खोच आणि दिव्याचा शेर आवडले.
रदीफ
स्वाती,
मतल्यानुसार तसे आहे. पण माझी समजूत होती की, दुसर्या (सानी) शेराने clarification करता येतं. दुसर्या शेरानुसार, "आहे" रदीफ, "च" काफिया आणि "ओ" अलामत होते. अशी तरतूद चालते ना? (नसेल तर मी दुसर्या मतल्याचा विचार सुरू करतोच... :))
-- पुलस्ति
नवा मतला
मतला बदलला आहे.
नवीन मतला
छान आहे.
दुसर्या शेरमधे जमीन स्पष्ट करण्याबद्दल पूर्वी एका चर्चेत वाचल्याचं अंधुक आठवलं तुम्ही उल्लेख केल्यावर. पण तो नक्की काय नियम होता हे मला आता अजिबातच आठवत नाही.
तुम्हाला कुठे संदर्भ सापडला तर जरूर कळवा.
मराठीगझल वर...
माझ्या एका प्रश्नाच्या उत्तरात असा संदर्भ होता.
http://www.marathigazal.com/node/44
- नचिकेत
हाच.
हाच संदर्भ आठवायचा प्रयत्न करत होते. धन्यवाद, नचिकेत.
एकूण या(ही) बाबतीत दुमत आहे तर.
पुलस्ति, उगाच तुम्हाला मतला बदलायला लावला मी.
जो जे वांछिल तो ते लिहो..
वाह वा!
गंध इथले वेगळे पण श्वास माझा तोच आहे
बंध हे रेशम जरी मी त्यात गुदमरलोच आहे
नेमकेपण येत आहे आपल्या नात्यात आता
बोलतो केव्हातरी अन त्यातसुद्धा खोच आहे
ताठ होते सर्व येताना मनाच्या मद्यशाळी
हाय आता मनसुबा प्रत्येक डळमळतोच आहे!
कोण अंधारास त्याच्याएवढे समजून घेतो?
दूर कोनाड्यात एकाकी दिवा जळतोच आहे!
संत थकले! नाहिसे अज्ञान त्याचे होत नाही...
पीठ तो भलत्या जनीसाठी किती दळतोच आहे!
या अटळ अपुरेपणाची फारशी मज खंत नाही!
दु:ख हे सलते उरी की - मी तरी उरलोच आहे...
- हे सर्व शेर फार सुंदर!
रेशमाचे बंध, जनीसाठी आणि मनाची मद्यशाळा आणि 'उरणे' छानच.
अगदीच असंही काही नाही
मी तिथल्या वैभवच्या मताशी सहमत आहे...
मतला हेच सगळंकाही... तिथे जे असेल तेच व्याकरण काटेकोरपणे वापरलं गेलं पाहिजे.
नाहीतर मग दुसर्या शेरात बदल करून काफिया किंवा रदीफ बदलायचा, मग तिसर्या शेरात परत आणखी काही तरी बदल करायचा, मग चौथ्याही...
असं कसं चालेल?
मी तरी उर्दूमध्ये अशी गझल वाचली नाही... (तसंही माझं वाचन लिमिटेडच आहे बरं का
)
सारंग
मतला
केव्हाच बदलला आहे. नियमाबद्दल गैरसमज होता म्हणून चुकीचा मतला आधी लिहिला गेला. नसती तडजोड मलाही आवडत नाही.
आणि तसेही वैभव, सारंग, स्वाती, चित्त या सर्वांचे मत पटायला मला कधी फारसा वेळ लागत नाही
आता त्या "नसलेल्या" मतल्याबद्दलच्या चर्चेवर पडदा टाकुया का?
छान
पुलस्ती छान आहे गझल. खोच, दिवा आणि मक्त्याचा शेर आवडले फार. बाकीही चांगले आहेत. फक्त कोरडे होतील डोळे.. मधे जरा शब्दांची आणि कल्पनेचीही ओढाताण वाटतेय.
पण एकूणच तुमच्या गझलांची तबियत आवडते.
खूप आवडली गज़ल
तो रेशम शब्दं अगदी खास.
सगळेच शेर एकसे बढकर एक आहेत.... (एक डोळे... सोडल्यास)
पारवा आणि दिवा अगदी भिडले.... तरी शेवटच्या शेराने खल्लास...
सुंदर !
पुलस्ति,
"नेमकेपण येत आहे आपल्या नात्यात आता
बोलतो केव्हातरी अन त्यातसुद्धा खोच आहे
मी किती हुसकावले, दुर्लक्ष केले, टाळलेही
सारखा दारापुढे तो पारवा घुमतोच आहे
कोण अंधारास त्याच्याएवढे समजून घेतो?
दूर कोनाड्यात एकाकी दिवा जळतोच आहे!
या अटळ अपुरेपणाची फारशी मज खंत नाही!
दु:ख हे सलते उरी की - मी तरी उरलोच आहे..."
हे सर्व शेर खूपच सुंदर आहेत. जनीचा आणि आसवांचा हे शेर तितकेसे भिडले नाहीत.
एक सुचलं म्हणून फक्त, 'वळचणीला सारखा तो पारवा घुमतोच आहे' कसं वाटतं? दारापुढे हे प्रॉमिनण्ट लोकेशन आहे आणि वळचण ही सहज वेधली न जाणारी जागा अशा कल्पनेनं हे म्हणतो आहे.
सुचवण्या मागची भावना तुम्ही समजाल ही खात्री वाटते म्हणून लिहिलं आहे.
-सतीश
नेमके
छानच आहे गझल,
नेमके शब्द,
सगळेच शेर मस्त
पण "खोच" अप्रतीमच
सुधीर
वळचण
सतीशजी, क्या बात है! चपखल सुचवणी आहे! "वळचणीचा" मधे असलेले पदर आणि त्यामुळे होणारा परिणाम "दारापुढे" पेक्षा कितीतरी सरस आहे. धन्यवाद!!
धन्यवाद
प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद!
डोळे शेराबद्दल फेर-विचार करीन...
दु:ख हे सलते उरी की
गंध इथले वेगळे पण श्वास माझा तोच आहे
बंध हे रेशम जरी मी त्यात गुदमरलोच आहे
नेमकेपण येत आहे आपल्या नात्यात आता
बोलतो केव्हातरी अन त्यातसुद्धा खोच आहे
मी किती हुसकावले, दुर्लक्ष केले, टाळलेही
सारखा दारापुढे तो पारवा घुमतोच आहे
ताठ होते सर्व येताना मनाच्या मद्यशाळी
हाय आता मनसुबा प्रत्येक डळमळतोच आहे!
या अटळ अपुरेपणाची फारशी मज खंत नाही!
दु:ख हे सलते उरी की - मी तरी उरलोच आहे..>>>व्वा व्वा फार फारच आवडले हे सगळे शेर
क्या बात
क्या बात है ! शेवटचा शेर खासच !
आवडली...
आवडली... नियमांबद्दल मि अज्ञानी असल्याने आहे तशीच गजल आवडली..
सुपर्ब ....
सुपर्ब ....
कोण अंधारास त्याच्याएवढे
कोण अंधारास त्याच्याएवढे समजून घेतो?
दूर कोनाड्यात एकाकी दिवा जळतोच आहे!
या अटळ अपुरेपणाची फारशी मज खंत नाही!
दु:ख हे सलते उरी की - मी तरी उरलोच आहे...
>> व्वाह!!