एस एल भैरप्पा यांचे सार्थ आणि आवरण

Submitted by कैवल्य on 20 January, 2010 - 01:39

मी हा लेख पुर्वीच वाचु आनंदेमधे टाकला होता. आता सार्वजनीक कसा करायचा कळला. म्हणुन परत सार्वजनिक करुन टाकतो आहे.
एस एल भैरप्पा यांचे सार्थ आणि आवरण
मी नुकतीच प्रख्यात कन्नड लेखक श्री. एस् एल् भैरप्पा यांची सार्थ आणि आवरण ही दोन् पुस्तके वाचून् संपवली. वाचून् सम्पवली हे म्हणणे केवळ शारीर पातळीवर आहे. कारण भैरप्पांचे कोणतेच पुस्तक मानसिक अथवा बौद्धिक पातळीवर संपत नाही. त्याचा विचार तुमच्या डोक्यात चालुच राहतो. आणि हे फक्त याच नव्हे तर त्यांच्या सर्वच पुस्तकांच्या बाबतीत होते.

मला आधी "आवरण" वाचायला मिळाले आणि "आवरण मध्ये सार्थचा संदर्भ वाचून् मी तेही मिळवून वाचले. त्यामुळे खरे पाहता आधी आवरणबद्दल लिहीले पाहिजे. परन्तु या दोन् पुस्तकांबद्दल वेगवेगळे लिहीणे अवघड आहे. कारण ही पुस्तके अगदी शब्दार्थांनी नाही परन्तु क्रमश: आहेत. आधी थोडे भैरप्पांच्या लिखाणाबद्दल लिहीतो.

भैरप्पांचे लिखाण, त्यांची कथावस्तू मांडण्याची शैली इतकी अप्रतीम आहे की वाचणारा त्याच्या प्रभावापासून् वाचूच शकत नाही. त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लिखाणामध्ये कोणताही अभिनिवेष, ढोंगीपणा नसतो. त्यांच्या सर्वच् लिखाणामधून् त्यांचा अभ्यास, त्यांचे कष्ट जाणवतात्. परन्तु ते आपल्याला जाणवावेत यासाठी मुद्दाम कष्ट केलेत् असे म्हणू शकत नाही. विचारांचा सच्चेपणा, नि:संदिग्धता आणि पारदर्शकता हे त्यांच्या लिखाणाचे मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यांच्या लिखाणावर अनेक संभावित निधर्मीवादी हल्ला करतात. ते समाजात भेदभाव पसरवणारे लिखाण करतात अशीही टीका हॊते. परंतु मला तरी त्यांच्या लिखाणात् कधीही कुठल्या जाती-धर्माबद्दल विद्वेष दिसलेला नाही. भैरप्पा नेहेमीच जाती, धर्मांच्या जुनाट कल्पना, अंधश्रद्धांपासून दूर राहायला आणि सत्याची कास धरायला सांगतात्. त्यांच्या सर्वच लिखाणामध्ये अतिशय शास्त्रीय पृथक्करणात्मक दृष्टीकोन दिसून येतो.

इथे उदाहरणच द्यायचे तर पर्वचे देता येईल. महाभारतावरील इतकी उत्कृष्ठ कादंबरी माझ्या वाचनात अजूनतरी आलेली नाही. "व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्" असे का म्हणतात हे पर्व वाचल्यावर अधिक स्पष्ट होते. जगात संपूर्ण काळे आणि संपूर्ण पांढरे असे काही नाही. सर्वच व्यक्तीमत्वे ही काळ्या-पांढरयाचे मिश्रण असतात हे लक्षात येते. कृष्णाचे चमत्कारविरहीत व्यक्तिमत्व पर्वमध्ये जेवढे उठून येते तेवढे इतर् कोणत्याच पुस्तकात येत नाही. कृष्णाच्या विचारांमध्ये परिवर्तन् कसे होत गेले, त्याचे विचार सर्वसमावेशक कसे झाले, त्याने इतक्या स्त्रियांशी लग्न केले, त्यांच्या मुलांना आपले म्हंटले याचे कारण काय, कंस राक्षस का व कसा झाला आणि सर्वात मुख्य म्हणजे कृष्ण गीता का सांगू शकला, दशावतारांपैकी इतर कोणाला तो अधिकार का प्राप्त झाल नाही या प्रश्नांची उत्तरे आपल्याला पर्वमध्ये मिळतात. क्रुष्णाने त्या काळात जी दूरद्रुष्टी दाखवली, परित्यक्ता अत्याचारग्रस्त स्त्रियांना आपल म्हंटल, ते आपण पुढील् काळात कधिही केले नाही. धर्माधिष्ठीत, नितीवान अशी मजबूत केंद्रीय सत्ता असणे ही किती आवश्यक गोष्ट आहे हे त्या योगिपुरुषाने जेवढे जाणले तेवढे आजही आपण लक्षात् घेताना दिसत नाही. अनेकांचे शिव्याशाप आणि आशिर्वाद सारख्याच समबुद्धीने स्विकारत् अंतीम ध्येयाकडे वाटचाल करणारा तो खरा योगिपुरूष होता. भारताच्या सिमेपलीकडून् इथल्या आचार-विचारांवर होणारे आक्रमण् या बाबींचा योग्य परामर्श भैरप्पा घेतात. युद्धाची भिषणता किती असते, त्याची झळ फक्त सामान्य मणसांनाच नव्हे तर सत्ताधिषांना देखील कशी लागते आणि सर्वनाशानंतरचे पुनर्निर्माण सामान्य माणसांच्या हातूनच कसे सुरू होते याचे यथार्थ चित्रण पर्वमध्ये वाचायला मिळते. आर्य, आर्येतर, सूत, क्षत्रिय यांच्या आचार्-विचारांमध्ये घडत असलेल्या संकराचे उत्कृष्ठ शब्दचित्रण आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते.

सार्थमध्ये यापुढील् भाग येतो. आठव्या शतकातील भारतीय समाजरचना, बौद्ध् धर्मीयांचे वैदीक धर्मीयांवरील आक्रमण, आणि त्याचवेळेस वायव्य सिमेवरून सुरू झालेले म्लेंच्छांचे आक्रमण याचे सुरेख चित्रण सार्थमध्ये येते. नागभट्ट हा वैदिक ब्राह्मण राजाच्या सांगण्यावरून व्यापारातील सूत्र त्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी बाहेर पडतो, आणि मथूरेत येतो. मथुरेतून काशीला जाण्याचा त्याचा बेत लांबणीवर् पडत जातो. मथुरेत त्यावेळी चालू असणा-या बौद्ध स्तुपाच्या मुख्य वज्रपादाशी त्याची चर्चा होते. मथुरेतच क्रुष्णजन्माच्या निमित्ताने एका नाटकाचे आयोजन होते. आणि नागभट्टाला कृष्णाची भूमिका दिली जाते. रुक्मिणीचे काम करणाया चन्द्रीका या नटीबरोबर त्याचे सूत जुळते. गावागावात जाऊन नाटकाचे प्रयोग केल्यावर नागभट्टाला त्याचा कंटाळा येतो. एका योग्याच्या उपदेशावरून् तो ध्यानधारणा शिकतो, आणि वामाचारी मार्ग स्विकारतो. या प्रवासादरम्यान त्याची पुन्हा एकदा चंद्रिकेशी भेट होते व ती त्याला वामाचारावरून परत फिरवते. परंतु तिच्याकडून लग्नाला नकार मिळ्यालावर तो नालंदेला व तिथून गयेला जातो. या सर्व प्रवासात त्याला बौद्ध व वैदिक धर्मातील तत्वज्ञानाचा परिचय होतो. त्याचबरोबर बौद्ध धर्मीयांचा धर्मप्रसारातील कावेबाजपणा, वैदिक पुराणातील कथांना नवीन् वस्त्रे चढवून् वैदीक कर्मकांडांना नावे ठेवत स्वता:च्या धर्मातील कर्मकांडांचा प्रसार आणि वैदीक ज्ञानालाच वेगळ्या शब्दात मांडण्याचा ढोंगीपणा जाणवतो. नालंदा इथे त्याला वैदीक धर्मातील कर्मकांडांचे पुरस्कर्ते व अतीशय ज्ञानी म्हणून प्रख्यात पावलेले कुमारील् भट्ट यांचे दर्शन होते. यांना नालंदेतून हाकलून दिलेले ऐकून नागभट्टही त्यांच्या पाठोपाठ प्रयाग इथे येतो. गुरूला फसवले व वेदांचा अपमान ऐकावा लागला म्हणून कुमारीलभट्ट् स्वेच्छामरण स्विकारतात. आदी शंकराचार्यांचे वादाचे आव्हान ते स्विकारत नाहीत व आदी शंकराचार्यांना स्वत:चे शिष्य व शालक मंडणमिश्रांशी वाद घालण्यास सांगून ते अग्नीत प्रवेश करतात. नागभट्टही त्यांच्यापाठोपाठ महिष्मती (आजचे महेश्वर) येथे येतो. तिथे मंडणमिश्रांचा शंकराचार्यांबरोबर झालेल्या वादातील पराभव बघून मथूरेला परत येतो. (या अतिशय सुप्रसिध्ध वादामध्ये मंडणमिश्रंच्या सुविद्य पत्निंनीच न्यायाधिशाची भूमिका बजावली होती हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.) या दरम्यान वायव्य सीमेवर् म्लेंच्छांनी आक्रमण करून् तेथील व्यापार ताब्यात घेतलेला असतो, आणि त्यांच्या संस्कृतीनुसार(?) तलवारीच्या धारेवर धर्मप्रसार सुरू झालेला असतो. तेथील जनतेतील शैथिल्य हटवणे व त्या भागावर पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी मथुरेचे(कान्यकुब्जचे) अधिपती योजना आखतात आणि त्या योजनेनुसार नागभट्ट आणि च्ंद्रीका मुलस्थानात (आजचे मुलतान्) कृष्णाचे नाटक घेऊन जातात. परंतु तिथे त्यांना कैद केले जाऊन नंतर सोडून दिले जाते. मथुरेचे सैन्य देखील युद्ध न करताच परत येते. यावेळेस नागभट्टावर धर्मांतरासाठी अत्याचार केले जातात. तो तेथील नबाबास धर्म-ईश्वर य विषयांवर वादाचे आव्हान देतो.

या सर्व कथानकातील नागभट्टाच्या प्रवासादरम्यान आपल्याला भारतातील विविध धर्म-पंथ, त्यातील साम्य-भेद, यांचे यथार्थ् चित्रण् भैरप्पा करतात. भारतातील या विचार-भेदांना परस्परांशी वादविवाद करून् जिंकण्याच्या प्रथेचे आणि म्लेंच्छांचे तलवारीच्या धारेवर धर्मप्रसार करण्याचे मार्ग अतिशय समर्थपणे आपल्यासमोर उभे राहातात. भैरप्पांचे लिखाण वाचताना तो काळ आपल्यासमोर इतक्या अचूक तपशिलात उभा राहतो की जणू आपण स्वत:च एखाद्या कालयंत्रातून त्या काळात गेल्याचा अनुभव येतो.

"विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणा-या मायेला आवरण म्हणतात आणि असत्य बिंबवणा-या कार्याला विक्षेप म्हणतात्. व्यक्तिगत पातळीवर चालणा-या या क्रियेला अविद्या म्हणतात आणि सामुहीक पातळीवर चालणा-या क्रियेला माया म्हणतात."

"मागे कुणितरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खर्ंच, पण मागच्यांशी नातं जोडून आपण त्यांचेच वारसदार या भावनेत आपण अडकणार असू तर् त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारी स्विकारावी लागेल" भैरप्पानी आवरणच्या प्रस्तावनेत् मांडलेला हा मुद्दा किती यथार्थ आहे हे आपल्याला रोजच्या जीवनात सतत जणवते. विषेशत: राजकीय घडामोडींचे विश्लेषण करताना. इंग्रजांनी पेरलेल्या दुहिची बिजे आणि त्याहीपेक्षा त्यांनी आपल्या लोकांचे केलेले ब्रेनवॉशींग किती खोलवर भिनले आहे आणि आपले सध्याचे (अ)राजकारणी आणि संभावित निधर्मीवादी, मार्क्सवादी, साम्यवादी देखील ब्रिटीशांचे धोरण कसे राबवत आहेत याचे चित्रण "आवरण" मध्ये आहे. आवरणचे लिखाण इतके अप्रतीम जमले आहे की आपण एखाद्या चित्रपटाची पटकथा वाचत आहोत असे वाटते. अर्थात भैरप्पांच्या सर्वच कादंब-या वाचताना हा आनंद मिळतो. "आवरण" ही अतिशय सत्याधिष्टीत कादंबरी आहे.

बाबरी मशीद पडल्यानंतर सरकार धार्मीक सलोखा निर्माण करण्यासाठी काही योजना आखते. त्यानुसार आपल्या देशातील प्राचीन वास्तू व शिल्पकलांवर आधारीत डोक्युमेंट्रीज् निर्माण करण्याचे काम रझीया (पुर्वाश्रमिची लक्ष्मी) आणि तिचा नवरा अमिरवर सोपवले जाते. याच्या अभ्यासासाठी ते दोघेही विजयनगरला आलेले असतात. तेथील उध्वस्त देवळे बघून रझीयाच्या मनात विचारमंथन सुरू होते. तिला तिच्या लहानपणी तिच्या आणि दुस-या गावात घडलेली दंगल आठवते आणि हेही आठवते की तेव्हा अशी देवळे उध्वस्त केली नव्हती. लक्ष्मीने प्रेमात पडून अमीरशी लग्न करतांना धर्मांतर केलेले असते आणि बाटग्याची बांग मोठी या न्यायाने त्या वयात तिच्या मुळ धर्मावर टीका केलेली असते. तिच्या या सर्व गोष्टींमध्ये तिच्या गावचे एक तथाकथीत पुरोगामी विचारांचे प्राध्यापक "शास्त्री" यांची साथ मिळते. थोडी वर्षे गेल्यावर अर्थातच तिचा भ्रमनिरास होतो आणि मुस्लिम धर्मातील जाचक चालिरिती आणि रुढी, खास करून स्त्रियांची केली जाणारी मुस्कटदाबी आणि अमीरने दिलेली तलाकची धमकी यामुळे ती हादरते. वेगळे घर केल्यावर तिची काही वर्षे यातून सुटका होते. परंतु विजयनगरमधील हिंदू मंदिरांचा विध्वंस बघून तिचे विचारमंथन पुन्हा सुरू होते. ती या डॉक्युमेंट्रीचे लेखन करण्यास नकार देते. याचसुमारास तिच्या गांधीवादी वडिलांचे निधन होते व ती सुमारे २०-२२ वर्षांनी गावाला जाते. तिच्या वडिलांनी या सर्व काळात म्लेंच्छ धर्म, त्यांच्या चालिरिती, त्यांची आक्रमणे, भारतात व भारताबाहेर देखील त्यांनी घडवलेला विध्वंस या विषयांवर असंख्य ग्रंथ जमवून त्यांचा अभ्यास केलेला आहे हे तिला आढळते. तिच्या वडिलांनी तिच्या मुस्लिम धर्मांतरास आणि विवाहास विरोध केलेला असतो. वडिलांचा व्यासंग बघून तीसुद्धा तिथेच राहून या पुस्तकांचा अभ्यास करण्याचे ठरवते. गावातच राहून तिच्या वडिलांचे मित्र शास्त्री (लक्ष्मीला धर्मांतरास प्रोत्साहन देण्या-या शास्त्रींचे वडील) यांच्या सांगण्यानूसार प्रायश्चित्त घेऊन वडिलांचे श्राद्ध्कर्म करते. वडिलांनी जमवलेली पुस्तके आणि काढलेली टिपणे यांच्या सहाय्याने कादंबरी लिहिते. ही कादंबरितील कादंबरी फारच अप्रतीम् आहे. ती प्रत्यक्ष वाचण्याचा आनंद प्रत्येकाने घ्यावा. या काळात तिचा मुलगा "नझीर्" जो अमेरिकेसारख्या प्रगत देशात पेट्रोकेमीकलमध्ये शिक्षण घेऊन सौदी अरेबियामध्ये नोकरी करत असतो. तो शास्त्रींच्या कॅथलीक मुलिशी तिचे धर्मांतर करून "निकाह" (शरियत कायद्यानूसार विवाह) करतो. अमिर मुस्लीम धर्मातील कायद्यानूसार तिला तलाक न देता दुसरा विवाह करतो. तिच्या मुलाचे विचार देखील एवढं आधुनिक शिक्षण घेऊनही अतिशय बुरसटलेले असल्याचे तिला जाणवते. याच दरम्यान शास्त्रींच्या आइचे निधन होते व त्यांचे श्राद्धकर्म करण्यासाठी शास्त्रींचे जावई, मुलगी व लक्ष्मी काशीला जातात. शास्त्री स्वत:सुद्धा गुप्तपणे काशीला जातात आणि आईचे श्राद्धविधी करतात. त्यानंतर अमिर आणि इतर अनेक तथाकथीत पुरोगामी मंडळींची शास्त्रींच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे एक परिषद आयोजीत केलेली असते. शास्त्रींनी लक्ष्मीला देखील या परिषदेसाठी आमंत्रण दिलेले असते. इतिहासाचे पुनर्लेखन करणे व अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करण्याचा बेत लक्ष्मीच्या अभ्यासपूर्ण विरोधी मतांमूळे त्यावेळी बारगळतो. लक्ष्मीला पुढील परिषदेचे आमंत्रण दिले जात नाही. या परिषदेमध्ये लक्ष्मीने मांडलेले अभ्यासपूर्ण मुद्दे मुळातच वाचले पाहिजेत् असे आहेत. हा सर्वच कथाभाग अतिशय सुरेख आहे. लक्ष्मीला विरोध करणारे, केवळ विरोधाला विरोध या भुमिकेतून कसा विरोध करतात हे वाचून हसावे की रडावे समजत नाही. हिंदू विरोध करत नाहीत म्हणून त्यांना झोडपत राहण्याचे धोरण अजुन् किती काळ चालणार असा प्रश्न पडतो. लक्ष्मी जेव्हा परिषदेमध्ये मुस्लिम धर्मात स्त्रीदेवता का नाही, अल्लाह हा पुरूषच का असला पाहिजे असा प्रश्न करते, तेव्हा परिषदेतील इतर स्त्री सदस्या तिला अडवू बघतात तेव्हा उद्विग्न व्हायला होते. लक्ष्मी परिषदेमध्ये जेव्हा ऐतिहासीक ग्रंथांचे संदर्भ देते तेव्हा तिला पर्शियन येते का? अनुवादाचा आधार घेऊन असे मुद्दे मांडता येणार नाहीत् असे मत् इतर् सदस्य मांडतात्. हिंदू धर्मातील मनुवादातील चुका सुधारून घेऊन सर्व समाजाला समान पातळीवर आणाण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु असा कोणाताच बदल मुस्लिम समाजात दिसून येत नाही. परिषदेला आलेले एक प्राध्यापक तिला खाजगीत अनुमोदन देतात. लक्ष्मी त्यांना विचारते की सभेत मला पाठिंबा का दिला नाहीत? तेव्हा ते निर्ल्ज्जपणे तिला म्हणतात "तुम्हीच सांगीतलं ना, मुस्लिम राजवटीनं संपूर्ण भारताला शिखंडी बनवल म्हणून." हे वाचून खरोखरच विषण्णता येते. भैरप्पांनी हा सर्वच भाग इतका अप्रतीम रेखाटला आहे की आपण अक्षरश: नि:शब्द होतो. काशीच्या विश्वनाथ मंदीराचा औरंगजेबाने केलेला विध्वंस, त्याच्या एकंदरच वेड्या धर्मप्रेमाच्या कल्पना, सर्वच मुस्लिम राजांनी केलेल्या अत्याचारांचा आढावा अतिशय समर्पक शब्दात भैरप्पा मांडतात. हे करताना ते कोठेही अन्य धर्मियांचा तिरस्कार करावा असे चुकूनही सुचवत नाहीत.

"कुणाचा तिरस्कार करणं, हेटाळणी करणं, मनं कलुषीत करणं हा इतिहासाचा उद्देश कधीच नसतो. असता कामा नये. आपल्या आधी होऊन गेलेल्यांच्या चुका डोळसपणे समजून घेऊन आपण आजचं जीवन शक्यतो निदान त्या दोषांपासून तरी मुक्त करून
घेतलं पाहिजे. म्हणूनच ऐतिहासिक सत्याला कुठलाही रंग न देता थेट त्याकडे पाहण्याचा प्रामाणीकपणा हवा."

लक्ष्मीच्या तोंडच्या या संवादातून भैरप्पांची तर्कनिष्ठ सत्याधिष्टीत भूमिकाच स्पष्ट् होते. आठव्या शतकातील नागभट्टाशी धर्म- ईश्वर या संकल्पनेवर वाद घालायला नकार देणारा नबाब आणि सध्याचा तथाकथीत पुरोगामी समाज यांच्यात काहीही फरक नाही. जग इतकं विकसीत झालं, शास्त्र एवढं प्रगत झालं तरी मुस्लिम समाज अजुनही त्याच जुनाट कल्पनांना कवटाळून बसलेला आहे. त्यांच्यातील स्त्री-शिक्षणाचं अत्यल्प प्रमाण, त्यामूळे असलेली गरिबी आणि थोडक्या अमिषापायी गुन्हेगारीकडे, दहशतवादाकडे वळणारा तरुणवर्ग. या सगळ्या गोष्टी भारताला, जगाला कुठे नेणार आहेत या विचाराने खरोखरच खिन्नता येते. भैरप्पानी अतिशय उत्कटतेने "आवरण" मध्ये हे विचार मांडले आहेत्. किती लिहू आणि काय काय लिहू! "हॅटस् ऑफ्"!!!.

सौ. उमा कुलकर्णिंचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पुर्ण होऊच शकत नाही. त्यानी केलेल्या अचूक व अर्थपूर्ण अनुवादाशिवाय आपल्याला हे उत्कृष्ठ साहित्य मराठीत वाचायला मिळालेच नसते हे नि:संशय. उमाताई आणि विरुपाक्षकाका शतश: धन्यवाद.

सार्थ - एस एल भैरप्पा. अनुवाद सौअ उमा कुलकर्णी.
प्रुष्ठसंख्या: २७१.
मुल्य: रू. २००/-
पद्मगंधा प्रकाशन.

आवरण - एस एल भैरप्पा. अनुवाद सौ उमा कुलकर्णी.
प्रुष्ठसंख्या: २७०.
मुल्य: रू. २५०/-
मेहेता पब्लिशिंग हाऊस, पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भावे, आलं एकदाचं वाचता! हा धागा फक्त 'वाचू आनंदे' च्या सभासदांसाठी ठेवलाय.
तुम्ही तो 'सार्वजनिक' का नाही करत आहात?

परिक्षण मस्त जमलय! तुम्ही रेकमेंड केलेली आत्तापर्यंतची पुस्तकं उत्तम निघाल्यानं (आणि ऑन टॉप ऑफ दॅट भैरप्पांची पुस्तक असल्यानं) - भारतात आल्या आल्या नक्की वाचेन.

वा, सुरेखच परिचय करुन दिलात. मनापासून धन्स....

"पर्व" मुळे भैरप्पांची ओळख झाली व त्यांच्या लेखणीची जादू समजली, आता या दोन पुस्तकांच्या परिचयानेच एवढी भुरळ घातलीये की ही पुस्तके वाचल्याशिवाय दुसरी गतीच नाही ...

भैरप्पांचे कोणतेच पुस्तक मानसिक अथवा बौद्धिक पातळीवर संपत नाही. त्याचा विचार तुमच्या डोक्यात चालुच राहतो. आणि हे फक्त याच नव्हे तर त्यांच्या सर्वच पुस्तकांच्या बाबतीत होते.>>>>> +१००.
"पर्व" वाचल्यापासून मिळतील तितकी त्यांची पुस्तकं वाचतेय. आवरण बद्द्ल संपूर्ण सहमत. (सार्थ अजून मिळाल नाही आहे. )

ग्रेट, इथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
अनुवाद केल्याबद्दलही सौ उमा कुलकर्णी यान्चे आभार.
ही पुस्तके संग्रही हवीत.

पर्व मधला मला सर्वात जास्त आवडलेला भाग म्हणजे श्रीकृष्णासकट सर्वांचं गुणदोषंासहित केलेलं, 'माणूस' म्हणून चित्रण! सार्थ आणि आवरण वाचून खरंच भैरप्पंाच्या व्यासंगाबद्दल प्रचंड आदर निर्माण होतो. त्यांची ' वंशवृक्ष' आणि 'तंतू' ही अजून दोन वाचनीय पुस्तके.

नुकतेच "आवरण" वाचायला मिळाले - जबरदस्त आहे हे पुस्तक ...

<<<< परंतु मला तरी त्यांच्या लिखाणात् कधीही कुठल्या जाती-धर्माबद्दल विद्वेष दिसलेला नाही. भैरप्पा नेहेमीच जाती, धर्मांच्या जुनाट कल्पना, अंधश्रद्धांपासून दूर राहायला आणि सत्याची कास धरायला सांगतात्. त्यांच्या सर्वच लिखाणामध्ये अतिशय शास्त्रीय पृथक्करणात्मक दृष्टीकोन दिसून येतो. >>>>+१००

अनुवादक - सौ. उमाताई आणि विरुपाक्षकाका शतश: धन्यवाद. - अतिशय सुंदर अनुवाद.

हा बाफ पाह्यला नव्हता.
सार्थ वाचल्यावर खूप कंटाळा आला.
नंतर त्यांची तडा नावाची महाभिकार कादंबरी वाचली. इतके स्त्रीद्वेष्टे लिखाण फक्त महाजालावर विविध पोस्टींमधे असते अश्या समजाचा चक्काचूर झाला.

भैरप्पा नेहेमीच जाती, धर्मांच्या जुनाट कल्पना, अंधश्रद्धांपासून दूर राहायला आणि सत्याची कास धरायला सांगतात्. <<<
याला काळे फासेल अशी कादंबरी आहे तडा म्हणजे.

छान परिक्षण!! हे वाचून पुस्तकांबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. नक्की वाचून पहिन.

.

तडा सुरुवातिला असा समज करुन देते की ती स्त्रीद्वेष्टे लिखाण करणारी आहे. पण निट वाचली तर लक्षात येते की केवळ मत मिळवण्यासाठी कसे चुकीचे कायदे केले जातात आणि अनेक स्त्रिया त्या कायदांचा कसा गैरफायदा घेतात. भैरप्पांच्या मनात स्त्रियांबद्दल अतिव आदर आहे. हे त्यांच्या इतर कादंब-या वाचल्या की लक्षात येते.

"आवरण" ही अतिशय सत्याधिष्टीत कादंबरी आहे." प्रचंड अनुमोदन!

आणि त्याच्या शेवटी असलेली संदर्भ ग्रंथांची यादी! चाट पडतो आवरण वाचून की किती अभ्यास असेल लेखकचा!

अनुवाद सहज सोपा आहे. आजवर ६-७ परायण झलीत आवरण ची पण तरी डोक्यातून ते काही केल्या निघत नाही. आता तडा वचेन. Happy