बजेटची गझल!

Submitted by प्रसाद शिर on 29 February, 2008 - 05:12

तसेच ते खुळे ठराव वाचतो बजेटमधे
सदैव वाढतात भाव, पाहतो बजेटमधे

अजून राहिलेत द्यायचे जुनेच कर तरी
नवीन कर, नवीन घाव झेलतो बजेटमधे

करोड अब्ज खर्व पद्म चालतात खेळ पण
इथे ठिगळ, तिथे भराव घालतो बजेटमधे

निवांत थांबले समोर खर्च डोंगरापरी
सुखा तुझा कधी निभाव लागतो बजेटमधे?

उदंड फक्त घोषणा न ठोस पाउले कुठे
निवडणुके, तुझा सराव चालतो बजेटमधे!

प्रसाद
www.sadha-sopa.com

गुलमोहर: 

तसेच ते खुळे ठराव वाचतो बजेटमधे
सदैव वाढतात भाव, पाहतो बजेटमधे

मतला झकास!

मिटरः लगालगा लगालगा लगालगा लगाल लगा

अजून राहिलेत द्यायचे जुनेच कर तरी

पुढे सगळीकडे लगालगा X ४ आणि लगालगा X ३ + लगाल लगा असं झालं आहे.

वाचताना ते जाणवत नाही कारण बजेट मधला जे आणि मिळून एक गुरू एवढा वेळ लागतोय... म्हणजे उच्चारशास्त्राप्रमाणे मिटर बरोबर वाटते आहे. पण मराठी व्याकरणाप्रमाणे चूक आहे.

सुधारणा: तसाही बजेट हा परभाषीय (आंग्ल) शब्द वापरला आहेसच, तर त्याऐवजी बजट (हिंदी) असे वापरल्यास दोन्ही शास्त्रांमध्ये गझल बसते आहे!

जाणकार लोक प्रकाश टाकावा... (चित्त, स्वाती, प्रसाद, वैभव)

सारंग

सारंगचीच शंका मलाही आहे.

सारंग

तुझी शंका आणि विश्लेषण रास्तच आहे. बजेटमधे हा रदीफ मी उच्चारशास्त्रानुसारच वापरला आहे.

दोन कारणांमुळे असं करणं मला समर्थनीय वाटतं

१. परभाषेतून एखादा शब्द आपण मराठीमधे जसाच्या तसा घेतो तेंव्हा आपण तो मराठी मूळाक्षरं आणि चिन्हांनी मांडतो खरा, पण त्य शब्दाचा मूळ उच्चार आपण मराठी चिन्हांमधे मांडू शकतोच असं नाही. अशा वेळी त्या शब्दाच्या मात्रा उच्चारनुसार मोजाव्यात असं वाटतं

२. गझलेमधे वापरलेल्या जोडाक्षरांच्या मात्रा आपण उच्चारानुसार मोजतो (व्याकरणाच्या काटेकोरपणाने नाही), हाच नियम (किंवा अपवाद!) परभाषीय शब्दांनाही वापरावा असं मला वाटतं...

चु. भु. दे. घे.

साधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगायचं!
www.sadha-sopa.com

<<<वाचताना ते जाणवत नाही कारण बजेट मधला जे आणि ट मिळून एक गुरू एवढा वेळ लागतोय... म्हणजे उच्चारशास्त्राप्रमाणे मिटर बरोबर वाटते आहे.>>>
मराठीच्या उच्चारशास्त्राप्रमाणे जे आणि ट एकत्र वाचले जात नाहीत; त्यामुळे तीनच मात्रा होतात. Sad
म्हणूनच मराठीमध्ये 'चेहरा" या शब्दाच्या पाच मात्रा होतात तर हिन्दीत त्या शब्दाच्या चार मात्रा होतात.

प्रसाद,
खूप दिवसांनी अवतरलास..... तुझी 'गुंड लोकांचे' ही डोंबिवलीच्या मुशायर्‍यातील गझल अजूनही आठवतेय.

करोड अब्ज खर्व पद्म चालतात खेळ पण
इथे ठिगळ, तिथे भराव घालतो बजेटमधे

निवांत थांबले समोर खर्च डोंगरापरी
सुखा तुझा कधी निभाव लागतो बजेटमधे?

उदंड फक्त घोषणा न ठोस पाउले कुठे
निवडणुके, तुझा सराव चालतो बजेटमधे! ... वा हे शेर अगदी खणखणीत.. मस्त
काव्य-प्रेमींना मला असे सांगावे वाटते की, परप्रांतीय शब्द गझलेत घेण्यासंबंधी आता अधिक व्यापक दृष्टीकोन हवा असे माझे मत आहे. टी. व्ही., फ्रीज, स्कूटर, कार ह्यांना आपण त्याच मूळ इंग्रजी नावानेच संबोधतो.

काजू भुने पिलेटमे, व्हिस्की गिलास में
उतरा है राम-राज्य, विधायक निवास में... असा एक शेर इथे स्मरतो आहे.
लिहीत रहावे
-मानस६