शेतकरी पात्रता निकष.

Submitted by अभय आर्वीकर on 11 January, 2010 - 02:27

१} नवीन शेतीसाठी विचारात घ्यायच्या बाबी कुठल्या? या बाफवर नानबा यांनी "एखाद्या माणसानं कधीच शेती केली नसेल - आणि त्याला शेती करायची असेल तर कुठले मुद्दे विचारात घ्यावेत? म्हणजे, मी आर्थिक, मानसिक, शारिरीक आणि कायदेशीर सर्व बाबींबद्दल विचारतेय.तुमचा अनुभव/मते सांगा - प्लीज! "असा प्रश्न विचारला आहे.
त्याबद्दल थोडेसे.....
.......................................................................................

या प्रश्नाचे उत्तर फारच अवघड आहे.असा प्रश्न मला आजवर कोणी विचारलाच नाही."इधरसे बाहर निकलनेका रस्ता है,अंदर आनेके लिये रस्ता तो हैही नही".
शेती सोडून जे अन्यत्र गेले त्यांच्या आयुष्याचे सोने झाले याउलट जे बाहेरुन शेतीत आले ते गेले,कामातुनच गेले,मातीमोल झाले.
हे जर मला माहीत असेल तर मी काय माहीती द्यावी? आम्ही कवी माणसं.कविता करतांना पतंगाला सहज अग्निज्योतीवर उड्डान घ्यायला सांगतो आणि प्रेमाच्या आहुतीची महती गातगात कविता पुर्ण करतो.पण जित्याजागत्या जिवाला शेती करायला लावणे म्हणजे खोल डोहात बुडण्यासाठी आमंत्रीत करण्यासारखे आहे. तरीपण मी उत्तर द्यायचा माझ्यापरी प्रयत्न करणार आहे.
.
या प्रश्नाचे दोन विभाग पडतात.शेती कशासाठी करायची ?

अ) हौसेखातर शेती. (उपजिविकेसाठी अन्य सोर्स आहेत अशांसाठी.)
हौसेखातर शेती करायची असेल तर कशाचीच अडचन नाही.घरात दोन पिढ्या जगतील ऐवढी संपत्ती असेल,पुढारीगिरी करुन माया जमविता येत असेल किंवा घरातले कोणी सरकारी नोकरीत असुन पगाराव्यतिरिक्त माया जमविण्याचे अंगी कौशल्यगुण असेल तर त्यांच्यासाठी काळ्या पैशाला पाढर्‍यात रुपांतरीत करण्यासाठी शेती एक वरदानच ठरत आली आहे.
ब) उपजिविकेसाठी शेती.
उदरभरनासाठी शेती ( उदरभरन हाच शब्द योग्य.लाईफ बनविने,करिअर करणे, जॉब करणे सारखे शब्द सुद्धा येथे फालतु आहेत.) करायची असेल तर मग गंभीरपणे विचार करावा लागेल.त्यासाठी कायकाय हवे आणि कायकाय नको अशा दोन याद्या कराव्या लागतील.
१] प्रथम आर्थीक खर्चाची यादी करू.अंदाजे किंमतीसह.

१) १० एकर शेतजमीन.........२०,००,०००=००
२) बांधबंदिस्ती : ....................२०,०००=००
२) विहीर पंप :.....................१,५०,०००=००
३) शेती औजारे :................... ३०,०००=००
४) बैल जोडी :....................... ६०,०००=००
५) बैलांचा गोठा :............... १,००,०००=००
६) साठवणूक शेड :..............१,००,०००=००
-----------------------------------------------
एकूण अंदाजे भांडवली खर्च : २४,६०,०००=००
-----------------------------------------------

सर्वसाधारणपणे अंदाजे २५,००,०००=०० एवढी भांडवली गुंतवणुक करावी लागेल.

शारिरीक गरजा :
१) त्वचा जाडी भरडी असावी.सहजासहजी काटा रुतायला नको.
२) रंग घप्प असावा.शक्यतो डार्क ब्लॅक.
३) गोरा,निमगोरा,गव्हाळी वगैरे रंग इकडे घेऊन येऊ नये.चार-सहा महिण्यातच रंग बदलण्याची हमखास शक्यता.त्यासाठी एक उन्हाळा पुरेसा आहे.
४) पायांना चपलेची आदत नसावी.चिखलात चप्पल चालत नाही.
५) शरीरात रक्त जास्त नको,जेमतेम असावे कारण काटा रुतला तर भळाभळा वाहायला नको.
६) हाडे कणखर आणि दणकट असावी.
७) शरीरात चपळता असावी.बैल पळाल्यास धावुन पकडता येणे शक्य व्हावे.
८) ५०-६० किलो वजन २-४ किलोमीटर वाहुन नेण्याची क्षमता असावी.

मानसिक गरजा :-
१) बिपीचा आजार नकोच.नाहीतर शेतीत पहिल्याच वर्षी जर घाटा-तोटा आला तर लगेच " रघुपती राघव राजाराम" हे गित घरासामोर वाजंत्री वाजविण्याची शक्यता......राम नाम सत्य है...
२) हाजीहाजी करण्याची सवय हवी.कारण इथे पुढार्‍यावाचुन बरीच कामे अडतात.आर्थिक पाठबळ नसल्याने जागोजागी हाजीहाजी केल्यावाचुन गत्यंतर नसते.
३) मिनतवारी करणे हा अंगिभुत गुण असावा कारण प्रत्येक ठीकाणी उधारीपाधारी शिवाय इलाज नसतो.
४) आत्मसन्मान वगैरे वगैरे अजिबात नको.हमालानेही अरे-कारे,अबे-काबे म्हणुन दोन शिवा हासडल्या तर वैषम्य वाटायला नको.शेतकर्‍यासोबतची सर्वांची बोलीशैली ठरली आहे.७० वर्षाच्या शेतकर्‍याला १२ वर्षाचा व्यापारी पोरगा सुद्धा याच भाषेत बोलत असतो.
५) मुलाबाळांना उच्चशिक्षण द्यायच्या महत्वाकांक्षा नकोत.नाहीतर अपेक्षाभंग व्हायचा.
६) चांगले जिवनमान जगण्याची हौस नसावी.अनेक पिढ्या उलटूनही तसे शक्य होत नाही.
७) थोडाफार मुजोरपणा हवा.
सावकार - बँका कर्जवसुली मागण्यास आल्या तर - पुढच्या वर्षी देतो, होय देतोना, पळुन गेलो काय, होईन तवा देईन, नाही देत जा होईनते करुन घे. अशी किंवा तत्सम उत्तरे देता आली पाहीजेत.तरच चार वर्षे पुढे जगता येईल.
८) मनाचा हळवेपणा अजिबात नको. जर का तुम्ही संवेदनाक्षम-हळव्या मनाचे असलात तर चार लोकात झालेली फटफजिती सहन न झाल्याने गळफास लावुन घ्यायचे.म्हणुन मुजोरपणा हवा हळवेपण अजिबात नकोच.
९) पंखा,कुलर,फ्रीज,टिव्ही वगैरेची आवड नको. दिवसभर शेतात काम झाले की आलेला शिन-थकवा एवढा भारी की खाटेवर पडल्याबरोबर ढाराढूर झोप लागत असते.
१०) विचार करण्याची प्रवृत्ती नको नाहीतर चिंतारोग व्हायची भिती.

कायदेशिर गरजा:-
कायदेशिर ज्ञान नसले तरी चालते. खिशात पैसे असेल तर हवा तेवढा सल्ला वकिल मंडळीकडून घेता येतो.

माझ्या मते जर कोणाला नव्याने शेती करायची (गावरानी भाषेत जिरवुन घ्यायची) हौस असेल तर त्यांनी एवढा विचार नक्किच करायला हवा.
देशाच्या पोशिंद्याची ही चार प्रश्नांची कहानी अठरा उत्तरी सुफळ संपुर्णम.....!
पोशिंद्याचा विजय असो....!!

. गंगाधर मुटे
===================================================================
२} वांगे अमर रहे या लेखावर आज पंकज यांची एक प्रतिक्रिया आली ती खालीलप्रमाणे...
.....................................................................................
बटाटा अमर रहे ! .......
मुटे साहेब आज प्रामाणिक पणे वाटते की शेतीला आयकर नसावा...
काल ७०१० रु. ला आठ क्विंटल बटाटा मोडून आलोय.
संपूर्ण उत्पादन खर्च १०,६०० रु आला होता.
१०,६०० - ७०१० = ३५९० येवढा तोटा झाला.

पण कमी तोटा झाल्याबद्दल वडील थोडेसे समाधानी होते. इतर लोकांचा तोटा ऐकुन फार वाइट वाटले...
अर्थात एक एकर बटाटा निदान १५ क्विंटल निघेल आणि दर सरासरी १२ रु किलो मिळेल अशी अपेक्षा होती (म्हणजे साधारण १८००० रु). बटाटा पुण्याला आणणार होतो. त्यामुळे वडिल गावाकडून टेंपो पाठवून देणार होते आणि मी येथे व्यवहार करणार होतो. पण प्रत्येक्षात उत्पादन कमी मिळाल्यामुळे माल तिकडेच विकुन टाकला...
.......................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळ बाफवर या लेखा संबधी दोन प्रतिक्रिया आल्यात त्या महत्वाच्या म्हणुन येथे पुन्हा पेस्ट करित आहे.
साधना
गंगाधरजी, खुप छान लिहिलेत.. तुमचे शेतीबद्दलचे प्रेम आणि व्यथा तुमच्या लिखाणातुन अगदी ठळकपणे उठुन दिसते. love hate relationship सारखेच आहे तुमचे हे शेतीप्रेम... शेतक-याच्या शारिरीक, मानसिक गरजा वाचुन हसावे की रडावे तेच कळेना..
चंपक
@ गंगाधरजी:
अहो असे कटु सत्य लिहिले तर कोण शेती करेल? अन मग पोशिंदे च राहणार नाहीत! लाख मेले तरी चालतील पण पोशिंदा जगला पाहिजे....... !

गंगाधरजी
खूप गरिबीत बालपण गेले...रस्त्यावर भाजी विकणारी आई आठवते आज....शेती नसली तरीही शेती करायची जबरदस्त इच्छा आहे. काळ्या मातीत घाम गाळायचा आहे..पण हे करतांना जे करू ते व्यवस्थित हा बाणा आहे. त्या दॄष्टीने तुमचे लिखाण नेहमीच आवडते. तुम्ही अशीच माहीती देत रहा...एक दिवस आपण माझ्या (प्रस्तावित ) शेतामधे हुरडा पार्टी करू..

बाफ, बीबी हे शब्द फार छळून राहीलेत.. कुणी उलगडा करू शकेल का ?
हा प्रश्न मी पण बरेचदा विचारला.
पहिल्यांदा प्रश्न विचारला - बाफ म्हणजे काय?
उत्तर मिळाले -बाफ म्हणजे बीबी.
दुसर्‍यांदा विचारले बीबी म्हणजे काय ?
उत्तर मिळाले -बीबी म्हणजे बाफ. Happy
बाफ म्हणजे बीबी.आणि बीबी म्हणजे बाफ. पुढे कोणीच जायला तयार नाही.
आणि मला बीबी म्हणजे बायको एवढेच माहीत आहे.
ही माझी बीबी आहे.... Lol

मुटे साहेब,
फारच माहीतीपुर्ण लेख आहे.

एकूण अंदाजे भांडवली खर्च : २४,६०,०००=००
>> एवढं भांडवल असेल तर माणुस खरच शेती करायला जाईल असं मला तरी नाही वाटत. उलट होटल, टान्स्पोर्ट किंवा इतर काही व्यवसाय करायाप प्राधान्य देणार. आणी जो शेती करणारा सर्वसाधरण शेतकरी आहे त्याच्याकडे वडिलोपर्जित शेती, गोठा असतो. बाकी इतर Working Capital लागतो, तो लागतोच.

वरचे आकडे पाहुन शेतीत गुंतवणुक करणे जरा अवघडच वाटतेय, तरी हे कटु सत्य मांडल्या बददल तुमचे आभार.

नानबा सारखेच. २५ लाख!! एव्हढा खर्च. (शून्ये बरोबर मोजलयत ना मी?)

शेती करू इच्छिणार्‍यांचे दोन प्रकार दिलेत त्या पेक्षा वेगळ्या अशा तिसर्‍या प्रकारात मी आहे.
- उत्पन्नाचे साधन आहे. पण दोन पिढ्यांना पुरणार नाही
- पैसा काळा नाही, पांढराच आहे.
- राजकारणाशी नाते नाही.

अश्या लोकान्ना शेती करता येत नाही का? म्हणजे, उद्योगांत भागीदारीत धंदा असतो तसे, थोडे पैसे आणि कष्ट आम्ही तिसर्‍या विभागातले लोक घालू, नि जमीन आणि अनुभवाचे भांडवल सध्याच्या शेतकर्‍याने घालावे. असे काही मॉडेल चालणार नाही का?

खरच सही होईल ना तसं झालं तर - शेतकर्‍याला रनिंग खर्च नाही त्यामुळे तो फायद्यात - मृदुला स्वतःचा सध्याचा व्यवसाय चालू ठेवेल म्हणजे तिला फायनान्शियल रिस्क कमी..
पण शेती करणारा माणूस विश्वासातला पाहिजे.
खांडानं शेती घेतात करायला त्याचीच आणखीन सुधारित आवृत्ती, बरोबर?

२५ लाख खुप कमी सांगितलेत त्यांनी , नदीच्या / कॅनॉल च्या काठावर शेती घ्यायची असेल तर ५ लाख प्रती एकर पर्यंत रेट्स आहेत . नदीपासुन २-४ किलोमीटरच्या अंतरापर्यंत ३-४ लाख प्रति एकर रेट्स आहेत . हे सोलापुरसारख्या दुष्काळी जिल्ह्यातले रेट्स आहेत , कोल्हापुर , नाशीक , बारामती , पुण्याच्या आसपासचे तालुके यासारख्या ठिकाणचे रेट्स तर काहीच्या काही आहेत .

कोल्हापुर , नाशीक , बारामती , पुण्याच्या आसपासचे तालुके यासारख्या ठिकाणचे रेट्स तर काहीच्या काही आहेत .
>>>> एस ई झेड चा परिणाम. मोकळी बहुतेक शेती संपल्याने उरलेल्या शेतीला हिर्‍याचा भाव आलाय!

माझ्या गावात, २-३ वर्षांपूर्वी ८ लाख एकर जमीन होती.. अर्थातच आठ लाख नव्हते! नाही घेतली..
आत्ता १५ लाख आहे Sad

<< गंगाधर, तुमचे एक एक मुद्दे ऐकून मी खचतच गेले की हो मी. >>
<< अर्थातच माझ्याकडे २५ लाख नाहियेत गुंतवायला. >> नानबा,
<< शेती करू इच्छिणार्‍यांचे दोन प्रकार दिलेत त्या पेक्षा वेगळ्या अशा तिसर्‍या प्रकारात मी आहे. >> मृदुला.
<< माझीही अगदी नानबा सारखीच मनस्थिती आहे. मला शेती निसर्गाच्या जवळ राहायचंय म्हणुन करायचीय.. विकत घ्यायची तयारी सुरू केलीय, पण स्वतः कसायला अजुन काही वर्षे लागतील.. >> साधना.
...

माझ्या शेतिविषयक लिखानाबाबत एक बाब नेहमी लक्षात घ्यायची की मी शेतीविषयावर लिहितांना १-२ शेतकरी डोळ्यासमोर ठेवुन लिखान करित नाही,तर एकंदरित शेतीसमस्येचा विचार करुन लिहीत असतो. देशातल्या किमान ९० टक्के शेतकरीवर्गाशी संबधित असेल तेच लिहायचा प्रयत्न करतो. कारण शेतीमधिल भयान वास्तव जे कधिच चव्हाट्यावर येत नाही,ते चव्हाट्यावर येणे आवश्यक आहे असे माझे नुसतेच मत नाही तर दुराग्रही मत झाले आहे.
त्यामुळे ते व्यक्तिगत पातळीवर विचार करतांना उपयोगाचे असेलच असे म्हणता येत नाही.
नानबा,
खचुन जाण्याचे काहीच कारण नाही. जे काही आर्थीक पाठबळ असेल त्या आधारे शेती करता येते. तुम्हाला सोईचे असेल असे ठीकाण निवडुन प्रयत्न करा.
मृदुला,
उद्योगांत भागीदारीत धंदा असतो तसे, लागवडीचा नगदी खर्च करुन शेत कसणार्‍या सोबत भागिदारी करायची असे भागीदारीचे मॉडेल शेतीमध्ये पुर्वापार चालत आलेले आहे. त्याला काही भागात 'बटई' म्हणतात.
ज्या शेतकर्‍याकडे भांडवल नसते असे शेतकरी या प्रकाराने शेती करतात.
साधना,
विदर्भात शेतीच्या किंमती कमी आहेत.
बघा काही जमल्यास...
नानबा,मृदुला आणि साधना..
शेती करण्यासाठी विदर्भात या .. माझ्याकडुन तुम्हाला निमंत्रण ..!!
.. गंगाधर मुटे.
.

<< बाफ म्हणजे बातमीफलक आणि बीबी म्हणजे बुलेटिन बोर्ड.
बीबीचं मराठीकरण म्हणजे बाफ.
>>
माहितीबद्दल धन्यवाद राजसीजी.....!!

लेख आवडला!! खूपच माहिती मिळाली... माझ्या बघन्यात बरेच शेतकरी असुनही हे इतकं खर्चीक काम असेल असं कधी वाटलच नव्हतं.. कदाचीत त्यांचे पारंपारीक व्यवसाय असल्याने ते बर्‍यापैकी स्थिर असावेत.. आमची जिरायती शेती गावाकडे असल्याने, आणि नदी, कालवा इ. ठिकाणाहुन पाणी आनन्याची काहीच शक्यता नसल्याने आम्हीही इतर ठिकानी बागायती शेती बघत होतो.. पण भाव ऐकुनच तो निर्णय सोडावा लागला..

खरं पहायला गेलं तर मनुष्यबळ कमी असल्याने शेतकरी सगळा माल, व्यापार्‍याला विकुन टाकतो.. शेतकर्‍याला मिळनारा मालाचा भाव आणि तिच वस्तु ग्राहकाला घेन्यासाठी असनारा भाव यात जबरदस्त तफावत आहे. इथे फक्त आडत्याचाच फायदा होतो... जर शेतकर्‍यांना थेट ग्राहकापर्यंत पोहोचता आले तर मला वाटतं शेती हा नक्कीच फायद्याचा व्यवसाय होवु शकेल. (यावर तज्ञांची मते ऐकायला आवडतील). पण बरोबर जोड्व्यवसाय हवेतच... यासर्वांसाठी पैश्यांबरोबरच मनुष्यबळ हवेच... शक्यतो घरतील मानसेच शेतात काम करायला तयार असतील तर, इतर काम करनार्‍यांवर लक्षपण राहतं आणि त्यांच्याकडुन काम चांगलं पण करुन घेता येतं. आपन जर फक्त कामगारांवर लक्ष ठेवायला गेलो तर जमनार नाही, तिथे त्यांच्याबरोबरीने काम केलं तरच फायदा होतो. तसेच कामगार मिळणे ही देखील सध्या एक समस्याच आहे...
पण शेतीसारखा उत्तम व्यवसाय नाही, असं मला तरी वाटतं.. Happy

मनुष्यबळ, पाणी आणि मार्केट इतक्या गोष्टी असल्या तर शेतीसारखा व्यवसाय खरेच नाही. कष्ट भरपुर आहेत पण त्याची परतफेड दामदुपटीने होते. पण वर उल्लेखलेल्या तिनही गोष्टी दुर्दैवाने शेतक-याच्या हातात नाहीत.

पण शेतीसारखा उत्तम व्यवसाय नाही, असं मला तरी वाटतं.. >>>>> तुम जियो हजारो साल! Happy

माझ्या लहाणपणी, माझ्या मामाच्या घरात एक बोर्ड लावलेला होता, पत्र्यावर पेंटर ने रंगवलेले:
उत्तम शेती
मध्यम व्यापार
अन कनिष्ठ नोकरी!
.....
आता सगळे उलटे झाले आहे. पण शेती हा आजही शाश्वत धंदा मानला जातो! (मनातः असा शाश्वत कि ज्यात करणार्याची काहीही शाश्वती नाही :()

शेती हा अधिकृत सरकारी भाषेत व्यवसाय मानला गेला नसला, तरी जर तो व्यावसायिकपणे/ प्रोफेशनली केला, तर नक्कीच परवडतो. एक्दम कोटीत नाही, पण लाखात पैसा मिळु शकतो. जास्त हाव केली कि लाखाचे बारा हजार व्हायला वेळ लागत नाही!

आता तुम्ही बोर्ड लावा.
उत्तम चाकरी,
मध्यम व्यापार,
अन कनिष्ठ शेती,
..................................
आता सगळे उलटे झाले आहे. पण शेती हा आजही शाश्वत धंदा मानला जातो! (मनातल्यामनातः- असा शाश्वत कि ज्यात शेती करणार्‍याची काहीही शाश्वती नाही ) .. Lol पिडादायक असला तरी शब्दाने विनोदनिर्मिती होतेच.
.......

तुमचे वाक्य मी माझ्या तर्हेने वाक्यांतर करुन माझ्या आवडीचे बनवले. ( हे धर्मांतरासारखच असते.)
शेती हा सरकारी भाषेत अधिकृत व्यवसाय मानला गेला नसला, तरी जर तो व्यावसायिकपणे/ प्रोफेशनली केला, तर नक्कीच परवडतो. कोट्यावधी शेतकर्‍यात एखाद्या शेतकर्‍याला कोटीत पैसा मिळु शकतो.आणि लाखो शेतकर्‍यात एखाद्या शेतकर्‍याला लाखात पैसा मिळु शकतो. जास्त हाव केली कि लाखाचे उणे (मायनस) लाख व्हायला वेळ लागत नाही!
वाक्यांतर केल्याने वरिल वाक्य माझ्या आपुलकिचे वाटते.
आता कसं बरं वाटतं

शेती जरी उत्तम व्यवसाय वाटत असला तरी खरं काय ते शेती करुन पाहिल्याखेरीज कसं कळनार?? शेवटी म्हनतात ना ज्याचं जळतं त्यालाच कळतं... गंगाधरजी मला असं वाटतय की तुम्हाला शेतीचा बराच अनुभव असावा.. सर्व गोष्टीजरी वेळेवर जुळुन आल्या तरी शेतीत शेवट्पर्यंत कसलाही भरवसा देता येत नाही.. ही एक ऐकलेली पण गावच्या जवळच घडल्याने माहीत असलेली सत्य घटना.. त्या शेतकर्‍याचा गहु काढायला होता.. त्याचे आपले हातावर पोट..२ एकर जमीन.. स्वतःची जमीन कसुन, दुसर्‍यांच्याही शेतात काम करुन घर चालवनारे... २ एकर जमीनी करता त्यांना गहु काढणीची मशिन परवडनार नव्हतीच.. काही कारनाने शेतात त्या रात्री राखण करायला जमले नसावे.. पन एका रात्रीतुनच कोनितरी त्यांचा २ एकर गहु मशिनने काढुन नेला... अशी चोरी मी पहिल्यांदाच ऐकली Sad

मी शेतीमधिल वास्तव मांडायचा प्रयत्न करतो याचा अर्थ नव्याने कुणी शेती करु नये असा थोडाच आहे.तुमची इच्छा जर शेती करायची असेल तर नक्किच करावी.प्रश्न आवडीचा,भावनेचा आहे.शेती केल्याने तुम्हाला आनंद मिळणार असेल तर अजिबात विलंब करु नये.मी आजच्या स्थितीबद्दल बोलतोय,उद्याचे काय माहीत. समजा तुम्ही आज २ एकर शेती २ लाखात घेतली तर दोनच वर्षात कदाचीत त्या जमिनीचा भाव २० लाख झालेला असेल.
.......................................................
सर्व गोष्टीजरी वेळेवर जुळुन आल्या तरी शेतीत शेवट्पर्यंत कसलाही भरवसा देता येत नाही.. ही एक ऐकलेली पण गावच्या जवळच घडल्याने माहीत असलेली सत्य घटना.. त्या शेतकर्‍याचा गहु काढायला होता.. त्याचे आपले हातावर पोट..२ एकर जमीन.. स्वतःची जमीन कसुन, दुसर्‍यांच्याही शेतात काम करुन घर चालवनारे... २ एकर जमीनी करता त्यांना गहु काढणीची मशिन परवडनार नव्हतीच.. काही कारनाने शेतात त्या रात्री राखण करायला जमले नसावे.. पन एका रात्रीतुनच कोनितरी त्यांचा २ एकर गहु मशिनने काढुन नेला... अशी चोरी मी पहिल्यांदाच ऐकली
या सर्व बाबींवर इलाज आहे,पण शासन शेतकरी धोरणाबाबत उदासिन आहे..

शासन शेतकरी धोरणाबाबत >>> त्यांनी इतके उदास व्हावे कि काही धोरण च थरवु नये! तो दिन एकदम सोनियाचा म्हणु! नाहीतरी, धोरणं ठरवुन काही होईना... एकदा हे पण करुण पाहु!

शेतकरी पात्रता ...
१.सरकारकडुन फुकट्च्या सवलती,पॅकेज घेण्याची सवय नसणारे..
२.बळीराज्याच्या भल्यासाठी प्रामाणिक पणे लढणारया नेत्याला पाठींबा देणारा,मग तो कुणीही असो,कोणत्याही पक्षाचा असो
३.शेतकरी विरोधी धोरणास जोरात विरोध करण्याची धमक असली पाहिजे, चार पैशे दिले की शेपुट घालणार्याना,त्यांच्या पिकाना मग दर कमी मिळु शकतो .
४.दिवस उजाडण्या पुर्वी,रात्री-अपरात्री आपल्या रानात जाण्याची तयारी असली पाहिजे,कारण भार्-नियमन.
५. नुसती शेती परवडत नाही,तोट्यात जाते, असं बोलुन इतरानां भीती घालणारे असू नयेत्,त्यापेक्षा आपले दोष, व्यवस्थेमधील,सरकारमधील दोष निवारण करता प्रसंगी लढणारे .
६.शक्यतो लाचार नसलेले .

Gangadharji,
tumacha mhananae ekdam practical aahe.Me navinach join zaloy like first day first show, new to maayboli new to blog.Sarwat aagodar eka jwalant vishayala sparsha kelyabaddal abhinandan.Punha bhetu bhashecha adsar dur zalyavar.