वसुंधरा

Submitted by गणेश भुते on 27 February, 2008 - 03:14

अनपेक्षित आगमनाने वरुणाच्या जाहली हर्षभरा
रोमांच फुलले सर्वांगावर हासली वसुंधरा

तिच्या पदराशी वारा खेळला
मंद मृद्गंध दरवळला
लखलखुन कडाडत्या विजेने बावरली वसुंधरा
रोमांच फुलले सर्वांगावर हासली वसुंधरा

झरझर झरझर आल्या धारा
आसमंती बहरला शहारा
स्पर्शात प्रियाच्या देह निथळला लाजली वसुंधरा
रोमांच फुलले सर्वांगावर हासली वसुंधरा

दिशा भिजल्या क्षितिजही भिजले
तिचे गुपित सार्‍यांना समजले
धुंद आवेगात पर्जन्यराजाच्या भिजली वसुंधरा
रोमांच फुलले सर्वांगावर हासली वसुंधरा

---गणेश भुते
('अलगद' या माझ्या काव्यसंग्रहात पुर्वप्रकाशीत)

गुलमोहर: 

चित्रदर्शी कविता.
सुरेख!!
कल्पना सगळ्या छान आहेत.