महारूख

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मारुति चितमपल्लींच्या लेखनात नेहमी महारुख या झाडाचा उल्लेख येतो. एकदम भव्य असे हे झाड आपले नाव सार्थक करते असे त्यांचे म्हणणे.
त्यानी जे काहि मजेशीर उल्लेख केलेत, त्यापैकी एक म्हणजे हे झाड खुप वर्षे जगते, भराभर वाढते आणि जसजसे वय होते तसे त्याच्या खालच्या फ़ांद्या आपोआप झडुन जातात. या झडलेल्या फ़ांद्यांच्या खुणा झाडाच्या बुंध्यावर राहतात. आणि या खुणांवरुन झाडाच्या वयाचा अंदाज बांधता येतो.
पण त्यांच्या लेखनातला एक महत्वाचा उल्लेख म्हणजे, या झाडांवर पक्ष्यांचा बहिष्कार आहे. कुठलाच पक्षी या झाडावर बसत नाही.

त्यांचे वर्णन वाचुन हे झाड बघायची खुप इच्छा होती पण मुंबईत किंवा कोकणातही हे झाड नाही. ते बघितले ते नागपूरात. नागपूर ते रामटेक परिसरात पण बरिच झाडे दिसली. आणि एकदा नजरेला ओळख पटली त्यावेळी ते झाड पुण्यातल्या साधु वासवानी चौकातही दिसले.

maharukh.jpg

याची उंची २० ते २५ मीटर्स पर्यंत वाढु शकते. याचे नाव महारुख म्हणजे बहुदा, महावृक्ष या शब्दाचा अपभ्रंश असावा. याच्या फ़ांद्याहि दणकट असतात. पाने गोलाकार आणि फ़ांद्याच्या टोकाशी येतात.

maharukh_paane.jpg

वरच्या फ़ोटोवरुन नीट कल्पना येणार नाही, हा फोटो कडुनिंबाचाच वाटेल आणि तसे ते खरेही आहे, या झाडाची पाने कडुनिंबासारखीच असतात, पण फ़रक असतो तो आकारमानात. एकेक संयुक्त पान सहज मीटरभर लांबीचे असू शकते.
याच्या पानाच्या पसार्‍यात आणि हिरव्याच रंगामुळे फुलोरा नीट दिसत नाही.

maharukh_fule.jpg

पण दिसलाच तर तो थोडासा वेगळा दिसतो. कारण या गुच्छात स्त्रीलिंगी, पुलिंगी आणि उभयलिंगी अशी तिनही प्रकारची वेगवेगळी फ़ुले असतात. तपकिरी लांबट शेंगा वार्‍याने उडत जातात आणि या झाडाचा प्रसार होतो.

याचे शास्त्रीय नाव Ailanthus excelsa एलॅंथस म्हणजे स्वर्गीय झाड आणि एक्सेल्सा म्हणजे लंबू. आहे कि नाही योग्य असे नाव ?

एवढे भव्यदिव्य झाड असले तरी फ़ारसे उपयोगाचे नाही. पाला बकर्‍याना देतात, पण घाण वासामुळे त्याना तो फारसा आवडत नाही, अगदीच नाईलाज झाला तर त्या खातात. लाकुडही ठिसुळ असते आणि किरकोळ कामासाठीच वापरतात.
पण सावलीसाठी हे झाड चांगले आहे. याचे मूळ बहुदा भारतातलेच असावे.

विषय: 
प्रकार: