प्रश्न

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

काल एक ज्ञानेश्वरीचं भाषांतर चाळत होते सहज. अठराव्या अध्यायात त्याग अन संन्यास यातला फरक स्पष्ट करताना अशी ओळ वाचली ' मूला नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचा जसा त्याग करतात ( करावा असेल कदाचित. ) त्या प्रमाणे कर्माच्या फलांचा त्याग करावा'

एकूण नक्षत्रे सत्तावीस, जन्माला येणारी मुलं जर या सत्तावीस नक्षत्रांमधे सारखीच विभागली गेली असतील तर जवळ जवळ शेकडा चार टक्के मुलांचा त्याग करावा लागेल. मग त्या मुलाचा त्याग केल्याचं पाप नाही का लागणार आई बापांना? त्याग नाहीच केला तर काय होईल? जर मूला नक्षत्रावर जन्मणे हे त्या मुलाचे प्राक्तन असेल तर मग त्याचे परिणाम भोगणे हे आई बापांचे प्राक्तन नव्हे का? फळाची इच्छा न धरता यथाशक्ति त्या मुलाचे पालन पोषण करणे हे आई बापांचे कर्तव्य नव्हे का? ज्या प्रदेशात किंवा संस्कृतीत पत्रिका, जन्म नक्षत्र वगैरे संकल्पनाच नाहीत तिथली मुलं काय मूला नक्षत्रावर जन्माला येतच नाहीत?

साधी दोन चार पानं चाळली तर किती हे प्रश्न? पूर्ण जर वाचायची ठरवली ज्ञानेश्वरी तर माझ्या डोक्याची किती शकलं होतील?

प्रकार: 

काय बीन बोलते गळ्या शोनू तू... इतके प्रश्न माझ्यासाठी काहीच नाहीत Happy

कुठले भाषांतर चाळत होतीस तू शोनू? बरे झाले माझ्या आई वडिलांच्या हातात असले काही लागले नाही, नाहीतर माझे काय झाले असते? Sad

आणि त्यांचही काही फार वाईट झालय (माझा त्याग न केल्याने) असे मला वाटत नाही. Happy
अर्थात त्यांना काय वाटते हे त्यांना विचारायला पाहिजे म्हणा. Happy

त्याग केल्यास काही वाईट होत नाही आणि त्याग न केल्यास वाईट होते याचे काही पुरावे / दा़खले आहेत का कुठे?
सहजच विचारले हं.

शोनू, मी मूळ नक्षत्रातलीच आहे. त्यामूळे शांत वगैरे केली होती पण माझं हे मूळ नक्षत्र माझ्या वडीलांच्या नोकरीच्या मूळावर आहे त्यामूळे संकट कायम राहील असं त्यावेळी गुरुजींनी सांगितलं होतं. पण आज आम्हा दोघी बहिणींची शिक्षण होऊन, लग्न होऊन, मुलं बाळं झाली तरी बाबा अजून नोकरीत (ती सुद्धा लोकांनी हेवा करावा अशी) आहेत आणि रिटायर्ड व्हायला अजून ४ वर्ष बाकी आहेत. :))

बर मुलाचा त्याग करुन काय होणार??
त्याग करणे म्हणजे काय?
त्या व्यक्तीला मारणे कि सोडुन देणे??
समजा सोडून दिले आणि जर जिवंत राहिली तर ती मुळ नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती मुळे वडिलाना त्रास का होत नाही??
हे कस काय??

बरय माझ्या आई वडिलाना असल काही माहित नव्हते ते.
मी मुळ वालाच आहे. Happy

अश्या मुलाची गाईच्या पोटाखालून फिरवून काढून शांत करतात.मग ते मूल आपले नसून गाईचे आहे असे मानतात.
ज्ञानेश्वरीचा काळ हा ७०० वर्षापूर्वीचा काळ असल्यामुळे अशा अनेक कल्पना तेव्हा प्रचलित होत्या.त्यांना आजचे मापदंड लावून कसे चालेल?
ज्ञानेश्वरीत असे अनेक दॄष्टांत आहेत ते सर्व असे literally घेणे योग्य नाही.
ज्ञानेश्वर इतकच सांगत आहेत की तुम्ही जे कर्म करता नित्य अथवा नैमित्तिक त्या सगळ्याचे फळ तुम्हाला हवे असो किन्वा नसो ते मिळणारच.
फक्त त्याची फलाशा तुम्ही सोडून दिली पाहीजे जसे की मूळ नक्षत्रावर जन्मलेले मूल.
अन्जलि

अनेक गोष्टी काल सापेक्ष असतात खरंय. पण अजून सुद्धा या 'मूळ' नक्षत्राबद्दल अनेक श्रद्धा/अंधश्रद्धा आहेत. त्याबद्दल फार विषाद वाटतो अन मनाला पटेल असं एक्स्प्लनेशन सापडत नाही. शिवाय ज्ञानेश्वरांना स्वतःला त्यांच्या काळच्या रुढींविरुद्ध किती मोठा लढा द्यावा लागला होता. असं असताना त्यांनी ' मुलाचा त्याग करणे अनिवार्य असावे' असा उल्लेख केला त्याने माझं आईचं मन कचरलं. वाईट गोष्ट उच्चारली, मनात आली की माझी पणजी 'तुम्ब्याकाल तप्पु' असं म्हणायला लावायची. अचानक अनेक वर्षांनी ती आठवण आली त्या ओळी वाचून.

माझ्याप्रमाणे इतरांनाही असेच प्रश्न आहेत हेही वाचून बरं वाटलं.

ज्ञानेश्वरी ही मुळात अभिजनांसाठी असल्यामुळे गीतेच्या संक्षिप्त श्लोकांचे विस्तारपूर्वक निरूपण केले आहे.
हे निरूपण करताना ज्ञानेश्वर अनेक दॄष्टांत वेळोवेळी देतात्.जसे की चन्द्र उगवल्यावर चन्द्रकांत मणी पा़झरतो, कमलिनी फुलतात,राजहंस आपल्या चोचीने दूध पाणी वेगळे करतो, परीसाने लोखंडाचे सोने होते,कल्पवॄक्ष फळतो ,अमॄताने अमॄतत्व मिळते इ.इ.
त्या सर्व आपण कवी कल्पनाच मानतो ना. मग ह्या दॄष्टांताचा वेगळा विचार का करायचा?
मुळात ज्ञानेश्वरांनी १८ अध्यायात धनप्राप्तीसाठी अमुक करा, स्वर्गासाठी हा यज्ञ करा,ऐहिक सुखासाठी हे कर्म़कांड करा असे एकदाही सांगितले नाही आहे.उलट ऐहिक सुखापलिकडले प्राप्त करण्याचा मार्ग त्यांनी सर्वांसाठी खुला केला.असे असताना त्यांनी मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाला टाकून देण्यास सांगितले असे म्हणणे म्हणजे त्यांच्यावर अन्यायच नाही का?
सन्दर्भ सोडून एक ओवी उदधॄत केल्याने इतरांची दिशाभूल होण्याची संभावनाच जास्त.
चु.भू.द्या.घ्या.

अन्जलि

अगदी अगदी अंजली, पुर्ण सहमत.

शोनु, ज्ञानेश्वरांनी ते उदाहरण म्हणुन घेतले आहे. त्यांच्या समोर बसलेला श्रोता कसा आहे, त्यांच्या श्रद्धा, अंधश्रद्धा, कल्पनाविलास यांचिइ ज्ञानेश्वरांना पुर्ण जाणीव होती. दिवसभर कबाड कष्ट करणारा, निरक्षर, ज्यांची धर्माच्या नावाने आधीच दिशाभुल झाली अशा लोकांना गीतेतल तत्वज्ञान मराठीतुन नुसत सांगायचे नाही तर ते त्यांना पुर्णपणे पटवुन द्यायचे कार्य ज्ञानेश्वरांनी हाती घेतले होते.
ते उदाहरण नाही अस नाही पण त्यामागे ते श्रोत्याना सांगताना त्या काळात रुढ असलेले उदाहरण त्यांनी वापरले. त्यांचे ज्ञानेश्वरीतले दृष्टांत हे आजच्या काळातल्या तत्वज्ञानींना पण चकितच करतात.

शोनू, असेही असू शकेल का?

कोणत्याही आई वडिलांना आपल्या अपत्याचा त्याग करणे, महाकर्मकठीण आहे, मग ते मूल मूळ नक्षत्रावर जन्माला येवो वा इतर कोणत्याही. प्रत्यक्ष पोटच्या गोळ्याचा त्याग करण्यासाठी मन किती घट्ट करावे लागेल? हे मूल मोठे होईल, आपल्या म्हातारपणीचा आधार होईल, अश्या इच्छांना मुरड घालून अन मुख्य म्हणजे, आपल्या पोटच्या गोळ्यासाठी वाटणारी अपार माया ममता बाजूला सारुन अलिप्तपणे त्याचा त्याग करणे अतिशय कठीण काम आहे. तसेच सामान्य माणूस जे जे कर्म करतो त्यापासून सामान्यतः त्याला फळाची आशा असतेच असते. त्यापासून तो स्वतःला अलिप्त ठेवूच शकत नाही. त्याकाळी असलेल्या रुढीनुसार, जर मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचा त्याग जर आईवडीलांना खरच करावा लागत होता, तर त्यासाठी त्यांना मन किती घट्ट कराव लागत असेल?? आपल्या अपत्याविषयीची माया, ममता, त्याच्या भविष्याची स्वप्नं ह्या सार्‍याला तिलांजली देऊन पोटच्या गोळ्याचा त्याग करणं सोपं नाही... त्याचप्रमाणे, माणूस कर्म करतो आणि मग त्याला त्या कर्माच्या फलाची आशा सोडता सोडवत नाही, तेही तसेच कठीण आहे. त्याकालच्या जनमानसाला समजेल अश्या भाषेत ज्ञानेश्वरी समजावण्यासाठी त्यांच्याच आयुष्यक्रमातली उदाहरणे घेणे प्राप्त होते कदचित. आणि याहून अचूक उदाहरण कोणते??

अर्थात, ज्ञानेश्वरीवर बोलण्याचा माझा काहीदेखील अधिकार नाही, तेह्वा क्षमस्व.

मला वाटले कि इथे आपलेच दु:ख ज्ञानेश्वरानी मांडले असावे. त्या भावंडांचाही त्यागच केला गेला होता ना. बाकि ती रुढी जर त्या काळि असेल तर त्यामागची वेदनाच त्यानी मांडली असेल. समर्थन नक्किच नाही इथे.