कापूसकोंड्याची गोष्ट

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
1’

आज मला शलाकाची प्रकर्षाने आठवण येतेय. आज जर ती माझ्याबरोबर असती तर कदाचित आम्ही आज सर्व एकत्र असतो. आम्ही म्हणजे मी, शलाका आणि आमच पिल्लू अक्षत. पण तिला खूप मोठ व्हायच होत.उंच उंच उडायच होत. माझ्या सारख्या 'सामान्य वकूबाच्या माणसाबरोबर'....

'मी सामान्य वकूबाचा माणूस' हे तीने मला कित्येकदा ऐकवल होत. आहेच मी सामान्य, नाहीये मला उडण्याची जीद्द. पण म्हणून मी जगायला, संसाराला नालायक होतो का? कदाचित हो. नाहीतर आज मी असा एकटा नसतो.
_________________________________________________
"बाबा गोष्ट सांग" अक्षत आज सकाळपासून मागे लागलाय. बिछान्यात पडून पडून कंटाळलाय बिचारा. दिवस भर एकटाच असतो. मी कधी कधी कामासाठी बाहेर जातो. पण अक्षत कुठे जाणार? जन्मापासून पांगळा आहे तो. त्याची आई त्याच्याजवळ नाही. मग मीच त्याची आई आणि बाप दोन्हीही. " आत्ता नाही मग सांगतो. आत्ता काम आहेत खुप" मी त्याला सांगतो. मग त्याचा हिरमूसला चेहेरा बघवत नाही अज्जीबात. मग मी त्याच्याजवळ जातो. त्याच्या केसातन हात फिरवतो आणि मग त्याला म्हणतो " बर सांगतो हा बाबा गोष्ट"

"कसली गोष्ट सांगू"
"कसली तरी नव्वीन"
"नव्वीन "
"हो नव्वीन"
खूप विचार करतोय. पण गोष्ट काही सुचतच नाहीये. अक्षत आसूसलेपणाने बघतोय माझ्याकडे. "एक असतो राजा आणि ... "
"अस काय रे. तुला गोष्ट सांगायला पण जमत नाय"
अगदी खर रे माझ्या राज्या. मला काहीच जमत नाही. अगदी बायको- संसार सांभाळायला सुद्धा जमत नाही तुझ्या बाबाला. शलाका सारख हेच म्हणायची.
इतक्यात मला गम्मत करायची लहर येते. लहानपणी बाबा मला गोष्ट सांगायचे. कापूस कोंड्याची गोष्ट.
"बर हा अक्षत तुला आता कापूस कोंड्याची गोष्ट सांगतो"
"सांग" अक्षत सरसावतो
" सांग काय म्हणतोस कापूसकोंड्याची गोष्ट सांगू "
"सांग ना रे "
" सांग ना रे काय म्हणतोस कापूसकोंड्याची गोष्ट सांगू "
" सांग ना रे गोष्ट "
" सांग ना रे गोष्ट काय म्हणतोस कापूसकोंड्याची गोष्ट सांगू "
"ए अस काय रे "
" ए अस काय रे काय म्हणतोस कापूसकोंड्याची गोष्ट सांगू "
"ही ही "
" ही ही काय हसतोस काय म्हणतोस कापूसकोंड्याची गोष्ट सांगू"
आता मात्र मला आणि अक्षतला दोघांनाही हसू आवरत नाही आम्ही दोघही डोळ्यात पाणी येइपर्यन्त हसत रहातो.
------------------------------------------------------------------------------------
त्यादिवशी मी घरी आल्यावर अक्षत अगदी शांत होता. एरवी मी आल्यावर ओरडून ओरडून घर डोक्यावर घेतो.
"आज काय केलस रे "
" काय नाय गेम खेळलो थोडावेळ"
" आणि मग ?"
" मग कापूसकोंडा आलेला"
"काय्य ... कोण्ण. कोण आलेला ? "
" अरे ओरडतोस काय. कापूस कोंडा आपल्या गोष्टीतला"
" अच्छा अच्छा"
लहान मूलांच एक बर असत. एखादी गोष्ट त्यांना सांगितली की तीच त्यांना खरी वाटते. मग दिवस भर त्याच गोष्टीचा ते विचार करत रहातात. इतका की ती गोष्ट खोटी आहे हे सांगूनही त्यांना खरी वाटत नाही. मीही मग त्याला समजावायच्या फंदात पडलो नाही आणि आज दमायलाही झालेल खूप.
----------------------------------------------------------------------------------
मी ही काही दिवस खूप कामात होतो. आणि उशीरा यायचो तेंव्हा अक्षत झोपलेला असायचा. आज मी थोडासा फुरसतीत होतो.
" काय रे अक्षत काय चाललय ?"
" काही नाही रे बाबा. वाट बघतोय"
"वाट बघतोयस. कूणाची ?"
"कापूस कोंड्याची"
"कोण ?"
" कापूस कोंडा"
" ह्म्म. आज येणारे का तो ?"मी ही त्याच म्हणण तेवढ सीरीयसली घेत नाही.
" हो मला प्रॉमीस केलय त्याने"
" हो का. बर बर"
" चला आता दूध-नाश्ता घेउया. बाबाला बाहेर जायचय"
--------------------------------------------------------------------------------आज काल अक्षत अशक्त वाटतोय. खरच झालाय अशक्त का मलाच तस वाटतय. डॉक्टरला बोलवायला हव. पण त्याचा चेहेरा अगदी आनंदी वाटतोय.
" कसा आहेस बेटा?"
" एकदम मस्त बाबा."
" बर नाही वाटतय का ? "
" नाही रे एकदम छान वाटतय. "
" कंटाळा येतोय का ? "
" नाही रे कंटाळा कसला. आज काल कापूसकोंडा येतो रोज "
" अरे कोण कापूसकोंडा? असा कोणी नसतो" मला काळजी वाटतेय अक्षतची
" असतो रे बाबा. रोज भेटतो मला. आता उद्यापासून माझ्याबरोबरच रहायला येणार आहे. तस प्रॉमीस केलय मला"
" तू बघीतलास त्याला?" मला थोडी भिती वाटतेय
"हो"
" कसा दिसतो ?"
" पूर्ण कापसाचा असतो. डोळे चेरी सारखे. थोडासा आपल्या टेडी बेयर सारखा"
------------------------------------------------------------------------------------
काल डॉक्टर देशपांडे येऊन गेले. त्याला कसल तरी टॉनीक दिलय अशक्त पणा साठी. बाकी सगळ नॉर्मल आहे म्हणाले. मीही त्यांना कापूसकोंड्या बद्दल काहीच सांगीतल नाही. त्यांनी ते कदाचित हसण्यावारी नेल असत. अक्षत आज काल गप्प गप्प असतो. फारसा बोलत नाही. त्या दिवशी अचानक रात्री अक्षत च्या खोलीतून खिदळण्याचा आवाज आला. जाऊन बघतो तर अक्षत जागाच.
" ए बाबा बघ ना रे हा मला गुदगुदल्या करतो"
" कोण बाळा ? "
"हाच तो कापूस कोंडा"
" चूप एकदम. काय लावलय सारख सारख कापूसकोंडा कापूसकोंडा म्हणून. एकदा सांगितल ना. अस कुणी नसत म्हणून" मला राग येतोय खूप अगदी म्हणजे अगदी आवरत नाहीये. पण मला सांभाळायला हवय स्वतःला. स्वतःला आणि अक्षतला.
" अरे बाळा तू आता सारखा सारखा विचार करू नकोस झोप बघू थोडा. विश्रांती घे जराशी" अक्षतला बोर्नविटा देऊन मी माझ्या खोलीत आलोय. शलाकाला बोलवून घ्याव का. तीला तिच्या करीयर मधून वेळ मिळेल का आमच्यासाठी.
------------------------------------------------------------------------------------
सकाळी उठलो तेंव्हा डोक खुप दूखत होत. काल रात्रीचा प्रसंग आठवला आणि लगेचच मी अक्षतच्या खोलीकडे वळलो. अक्षत गाढ झोपला होता. खुप दमल्यासारखा दिसत होता. आणि त्याच्या बाजूला. अरे बापरे हे काय? अक्षत एवढा हिंस्त्र कधीपासून झाला? त्याच्या बाजूला टरकावलेला टेडी बेयर होता. त्यातून कापूस बाहेर आलेला. हा अस का वागतोय? एवढा विचीत्र. हा टेडी बेयरलाच कापूसकोंडा समजतोय. त्यादिवशी मी ती गोष्ट सांगून चुक केलीये. त्याची अशी गम्मत करायला नको होती. खरच. मला खुप अपराधी वाटतय.
" गूड मॉर्नींग बाबा " अक्षत उठलाय
" अ"
" गुड मॉर्नींग आय से "
" अ हो. व्हेरी गुड मॉर्नींग टू यु. आता कस वाटतय "
" काल आम्ही खुप धमाल केली. खुप मस्ती खोर आहेतो. त्याने बघना टेडीला कसा घाबरवलाय"
" तू अस का बोलतोहेस? तुला अजून बर वाटत नाहीये का? मी आत्ताच्या आत्ता जाऊन देशपांडेना बोलवून आणतो"
" तो आता मला न्यायला येणार आहे." अक्षतच माझ्याकडे लक्षच नाहीये.
त्याच डोक थोडस गरम लागताय. त्याला ताप येतोय का ? मी देशपांडेंना फोन करतो आत्ताच. अक्षतला काही झाल तर. मला खुप भिती वाटतेय. इतकी भिती मला कधीच वाटली नव्हती. कुठे बर लिहीलाय देशपांडेंचा नंबर. सापडत का नाहीये. काय हा इतका हलगर्जी पणा.
" बाबा तो आला." अक्षत थोडासा घाबरलाय का?
" कुठे आहे रे. इथे कुणीच नाहीये तुझ्या-माझ्याशिवाय" मी अक्षतची आणि माझी स्वतः ची समजूत काढतोय."
" बाबा मला त्याची भिती वाटतेय. त्याचे डोळे एकदम लाल भडक दिसताहेत. गुंजासारखे"
त्याला रक्ता सारख म्हणायच होत का. माझ्या अंगावर पाल फिरल्या सारखा शहारा येतो. अरे देवा मी आता काय करू. जाऊन लगेच देशपांडेंना घेउन येतो. खर तर अक्षतला एकट सोडून जाता कामा नये. पण दुसरा इलाज नाही त्याला.
"बाळा मी येतो लगेच. थोडीशी कळ काढ "
" बाबा तो माझ्या जवळ आलाय अगदी. तुम्ही जाऊ नका प्लीज "
ही वेळ गुंतून पडण्याची नाही. मला लगेच जाऊन डॉक्टरला आणायचय.
मी दरवाजाजवळ जातो न जातो तोच अक्षतची एक मोठ्ठी किंकाळी ऐकू आली. माझ्या काळजाच पाणी झाल. मी उलट्यापावली परत फिरलो. बघतो तर कसल्यातरी झटापटीच्या खुणा दिसल्या. माझ्या कानात किण्ण झाल. काही ऐकू येत नव्हत. दिसत होता तो खोलीभर पसरलेला उशीतला कापूस, माझ्या अक्षतचे पांढरे फट डोळे आणि त्याच्या नाका-तोंडातून बाहेर आलेला कापूस.............

विषय: 
प्रकार: 

:(..... .....

जुन्या माबोवर लिहिली होती काय?? मला कुठेतरी सेम हीच गोष्ट अगदी त्यातल्या बायकोच्या संवादासकट वाचलेली आठवतेय...

केदार काय भयंकर लिहिल आहेस!(उगाच वाचले मी हे)
मला पण अगदी असंच वाटतंय........पाणी आल डोळ्यात माझ्या.......

छे! ऊगाच काहितरी..... नाकातोंडातून बाहेर यायला तो काय साबणाचा फेस आहे का? का शिंच्या धोंडोपंतांच्या बिडी चा धूर? Happy

तीरकस Happy

ज्यांना आवडली नाही त्यांचेही कथा वाचण्याबद्दल आणि प्रतोक्रीया दिल्या बद्दल मनापासून आभार Happy

खरच वाचुन घाबरायला झाल, मला तर रात्री झोप ही लागत नव्हती, सारखि शेवटचा प्रसंग च डोळ्यासमोर येत होता......

Pages