ते माझे घर

Submitted by नरेंद्र गोळे on 21 December, 2009 - 09:57

घर कसे असावे याबाबत निरनिराळ्या संकल्पना प्रचलित आहेत.
"पोस्टातील मुलगी" सिनेमात गदिमांनी केलेले वर्णन लक्षात राहण्यायोग्य आहे.
ते आहे असेः

ते माझे घर, ते माझे घर
जगावेगळे असेल सुंदर
असेल सुंदर !

नक्षिदार अति दार तयाचे
शिल्प तयावर बुद्धकलेचे
चक्रे, वेली, मूर्ती मनोहर !

अंगणी कमलाकृति कारंजे
वरी अप्सरा एक विराजे
झरतिल धारा ओलेतीवर !

आकार मोठा, तरिही बैठा
आतुन वेरुळ आणि अजिंठा
वरी लालसर असेल छप्पर !

पागोड्यांची शिखरे वळती
तशी छप्परे छपरावरती
कृष्णकमळिच्या वेली त्यावर !

गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: सुधीर फडके
स्वर: आशा भोसले
चित्रपट: पोस्टातली मुलगी (१९५४)
राग: ललत (नादवेध)

त्यावरून मला असा विचार करावासा वाटला की आदर्शवत घर असावे तर ते कसे?
त्यावर सुचलेले विचार खालीलप्रमाणे आहेत.

उरास लाभे ऊर्जा सत्वर, ते माझे घर, ते माझे घर

उरास लाभे ऊर्जा सत्वर, ते माझे घर, ते माझे घर || धृ ||

नगर वसवले औरस-चौरस, उभे-आडवे मार्ग समांतर |
आजूबाजूला जागा सोडून, वस्ती घरांची ओळीत सुंदर |
कृष्णकमलकुंजातून चाले, वाट घराची जिथे मनोहर |
ते माझे घर, ते माझे घर || १ ||

पडवी, ओसरी, पुढेच बैठक, शयनकक्ष हे दोन्ही बाजूस |
मधल्या चौकातून पुढे मग, विहीर असावी, रहाट त्यावर |
पाठीस कोठी, स्वयंपाका घर, जिथे नेतसे जिना छतावर |
ते माझे घर, ते माझे घर || २ ||

भव्य पटांगण घरासमोरी, शस्य चहुकडे, परसदारीही |
दृष्टिसुखास्तव फुले बहरती, रुची राखण्या फळेही पिकती |
जीवनसत्त्वे भरून ज्या घरी, हरित शाक उपजते निरंतर |
ते माझे घर, ते माझे घर || ३ ||

बारा महिने सदा प्रकाशित, वारा वाहे मंद सदोदित |
दिवा न दिवसा, पंखा नसता, मनही प्रफ़ुल्लित राहे, ते घर |
पाऊसकाळी भरत जलाशय, गरजा सार्‍या पुरवी निरंतर |
ते माझे घर, ते माझे घर || ४ ||

घरात एका, एक कुटुंबच, कुटुंब छोटे, परिजन तोषक |
गजबज नसली नसो, तरीपण असोत अतिथी, विद्यार्थीजन |
सदस्य उद्यमी, सदा प्रफ़ुल्लित, करिती जेथे वास निरंतर |
ते माझे घर, ते माझे घर || ५ ||

घरास देती सदस्य घरपण, समाजाशीही घेती जुळवून |
कला-उद्यमे होती विकसित, सोबत उजळती स्नेह्याचे घर |
सारी साकारण्यास स्वप्ने, सारे कष्टती जिथे पुरेपूर |
ते माझे घर, ते माझे घर || ६ ||

गीत: नरेंद्र गोळे २००७१०२२

मात्र, आजकालच्या फ्लॅटसंस्कृतीत असे घर कुठले मिळायला!
म्हणून मग नेहमी आढळणार्‍या घराचाच विचार करता येतो. तो असाः

घर संसार

एक भागता दोन, दोन भागता चार | छोट्या छोट्या गोष्टींतून, विभागला संसार || धृ ||

देश भागता प्रांत, प्रांत भागता शहरे | वस्त्या घडवती शहरे, सुंदर, सुबक, विहार ||
वस्तीचे भाग निवारे, त्यांचे किती प्रकार | निवारे सजवती वस्ती, नीटस टूमदार || १ ||
वस्तीत असती चाळी, बंगले, इमारती अन् | घरे, छप्परे, टपर्‍या, ह्यांचे असंख्य प्रकार ||
घरातही मग खोल्या, न्हाणीघरे, संडास | ह्यांचेविना कुठेही, होई न घर साकार || २ ||
खोलीला प्रवेश एक, दुसरीला त्यातून वाट | खिडकीचा शोभे थाट, थाटांच्या तर्‍हा अपार ||
पल्ले, झडपा, दारे, कुठे सरकत्या काचा | कमान नसो नसली तर, असो चौकट खुबीदार || ३ ||
दारातच दिवाणखाना, छन्नमार्ग हमखास | मार्गी सुविधा सगळ्या, कपडे सुकण्याला तार ||
तेथून दिसे ती गृहिणी, जी राणी घरची खास | साम्राज्य तियेचे सारे, स्वयंपाकघर व्यवहार || ४ ||
ती दाखवी मार्बली ओटा, फिरत्या तोटीसह तस्त | ना भांडे सोडू शिस्त, ह्याची करीत शिकस्त ||
भांड्यांची बंद कपाटे, कप्पेही सरकते त्यास | देवांचे मुख पूर्वेला, त्यांचा मांडणीत विहार || ५ ||
पाण्याचा साठा करण्या, माळ्यावरती टाकी | कलंकहीन पोलादी गाळणीत पिण्याचे पाणी ||
न मावो न्याहरीमेज, न असोत रंगीत पाट | फरश्यांस सुसंगत रंगाचे हवेच शीतकपाट || ६ ||
शेजारीच शयनी कक्ष, त्यालाही सुरेख गवाक्ष | त्या, विशेष वायुवीजन, व्हावे ह्यावरती लक्ष ||
दूरदर्शन इथे प्रतिष्ठित, असे दूरध्वनीही इथेच | रंगसंगतीस इथल्या, पडद्यांनी येई बहार || ७ ||
ह्यापरी जरी हे तुकडे, संसारी दिसत सर्वत्र | एकसंध घर ते घडण्या, ह्यांचीच शक्ती अपार ||
घर, घरा जोडूनी वस्ती, वस्त्यांनी वसते नगर | नगरांचे उद्यम मिळता, समृद्ध होतसे प्रांत || ८ ||
प्रांतांतही जे सूत्र, विविधतेत विणते ऐक्य | ते श्रद्धा, सबूरी आणि सृजनशीलता ह्यात ||
असे हीच संस्कृती अमुची, ह्यांनीच घडतसे देश | हे तुकडे, तुकडे सारे जणू भारतास आधार || ९ ||
एक भागता दोन, दोन भागता चार | छोट्या छोट्या गोष्टींतून, विभागला संसार ||
वस्ती, नगरे, प्रांत हे घडती देशा थोर | छोट्या छोट्या गोष्टींतूनच, सजतो घर संसार || १० ||

गीत: नरेंद्र गोळे २००७१०२०

माझ्या अनुदिनीस
http://nvgole/blogspot.com/
इथेही अवश्य भेट द्या! धन्यवाद!!

गुलमोहर: 

नानबा, शिरोडकर, चिन्नु आणि देसाई सर्वांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

"येतेघयेमेघ" ने घराची आगळीच समस्या उजेडात आणली होती म्हणूनच
तो सिनेमाही माझ्या लक्षात राहिलेला आहे.