बाकी आहे...!

Submitted by मी अभिजीत on 20 February, 2008 - 06:03

सरला प्याला झिंग जराशी बाकी आहे
अजून थोडे दुःख उराशी बाकी आहे

दिसतो जो मी केवळ वरचा तरंग आहे
माझे 'मी'पण खोल तळाशी बाकी आहे.

तुम्ही हव्या तर सुखे आठवा श्रावणधारा
हिशोब माझा जुना उन्हाशी बाकी आहे.

नैवेद्याचा परवा होता गाजावाजा
काल ऐकले देव उपाशी बाकी आहे.

हवी नको ती सुखे तुझ्यास्तव मागून झाली
अता मागणे काय नभाशी बाकी आहे ?

नको भास्करा किरणांसाठी तुझी मुजोरी
दीप येथला स्वयंप्रकाशी बाकी आहे.

-- अभिजीत दाते

(मार्गदर्शन अपेक्षित...)

गुलमोहर: 

दिसतो जो मी केवळ वरचा तरंग आहे
माझे 'मी'पण खोल तळाशी बाकी आहे.

तुम्ही हव्या तर सुखे आठवा श्रावणधारा
हिशोब माझा जुना उन्हाशी बाकी आहे.

>>> आवडले हे दोन..

नैवैद्य आणि शेवटच्या शेरात 'बाकी आहे' नीट निभावले गेले नाहीये असे वाटते..

चु. भु. द्या घ्या..

जाणकार मार्गदर्शन करतीलच... (वैभव्,प्रसाद, स्वाती कुठे आहात?)

visit http://milindchhatre.blogspot.com

अभिजित, उत्तम गझल!!
उन्हाशी, उपाशी आणि स्वयंप्रकाशी हे शेर तर फार फार आवडले!!

सुंदर झालीये गझल..
मिल्या म्हणतो तसं नैवेद्याच्या शेरात आणि किरणांच्या शेरात बाकी आहे थोडं अस्थानी वाटतं. पण कल्पना छान आहेत.
हे मार्गदर्शक गेलेत कुठे सारे?

दिसतो जो मी केवळ वरचा तरंग आहे
माझे 'मी'पण खोल तळाशी बाकी आहे.>>>>>>>>

छान जमलिय!! किती छान कल्पना.......

छानच झाल्ये

हिशोब माझा जुना उन्हाशी बाकी आहे.

खासच

सुधीर

अभिजीत,
दीप स्वयंप्रकाशी आहे हे गजलवरून सिद्ध होतंच आहे.
तरीही 'मार्गदर्शन अपेक्षित' म्हटल्यामुळे तो दीप स्निग्धही आहे असं वाटलं.
त्यामुळे मार्गदर्शनाचं 'स्नेह' ज्येष्ठ पुरवतीलच.
छान गजल! 'श्रावणधारा' चा शेरही आवडला.
-सतीश

मस्त आहे गझल. मला पण उन्हाशी सगळ्यात आवडला.

देव उपाशी बाकी आहे जरा वाचायला नी ऐकायला खटकत आहे.

गझल आवडली.

मिल्याच्या म्हणण्याप्रमाणे जाणकार मार्गदर्शन करतीलच, पण शेवटच्या कंसातल्या वाक्यासाठी...

सरला प्याला झिंग जराशी बाकी आहे
अजून थोडे दुःख उराशी बाकी आहे

मतल्यात जराशी आणि उराशी मध्ये ज आणि उ नंतर समान अक्षरसमुह येतो. म्हणजेच अलामत भंग केली आहे, त्यामुळे पुढच्या प्रत्येक काफियात राशी हा अक्षरसमुह येणे गरजेचे आहे...

रदीफ बाकी आहे मस्तच आहे! पण तो सगळ्याच शेरांत यथाशक्ती निभावला गेला नाहीये...

गझल मात्रावृत्तात आहे... त्यामुळे भरपूर स्कोप आहे...!

गझलेतले भाव आवडले!

लिहित रहा, छान लिहिता!

सारंग

खुपच छान...
पहिल्या शेर पासुनच एकुण चढती भाजणी आहे...

नको भास्करा किरणांसाठी तुझी मुजोरी
दीप येथला स्वयंप्रकाशी बाकी आहे.

हा कळसाध्याय तर केवळ ग्रेट Happy

तुम्ही हव्या तर सुखे आठवा श्रावणधारा
हिशोब माझा जुना उन्हाशी बाकी आहे.

सुंदर.
नैवेद्याचा परवा होता गाजावाजा
काल ऐकले देव उपाशी बाकी आहे.

येथे बाकी हा शब्द शिल्लक या अर्थी न वापरता, बाकी काय म्हणा, आपण तर .. वगैरे म्हणतांना
आपण जसे बोलीभाषेत वापरतो, तसे म्हटले आहे ना?

असे नसेल तर ..
काल ऐकले पूजा देवाशी बाकी आहे , असे नाही का चालणार?