बागलाणची शान : साल्हेर-सालोटा-मुल्हेर-मोरा

Submitted by आऊटडोअर्स on 15 December, 2009 - 05:06

बर्‍याच वर्षांपासून महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील बागलाण प्रांतात जायची इच्छा होती ती साल्हेर व मुल्हेर या किल्ल्यांमुळे. परंतू जायचा कधी योग येत नव्हता. यतीन तिथे ट्रेक टाकतोय कळल्याबरोबर जायचं ठरवलं. इच्छा कितीही असली तरी दुखणार्‍या गुडघ्याचा मोठ्ठा प्रश्न होता. पण या वेळेस काहीही झाले तरी जायचंच असं ठरवलं कारण अशी संधी परत आली नसती. बरोबर आवडतं मसक्युलर स्प्रेनचं क्रीम व नी कॅप घेतली आणि ट्रेकला जायची तयारी सुरू केली. ट्रेक ३ दिवसांचा होता व फक्त साल्हेर, सालोटा हेच किल्ले न करता बरोबर मुल्हेर व मोरा हे २ किल्ले ही करायचे होते. माझ्यासाठी हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा... सारखं झालं.

बागलाण हा महाराष्ट्र व गुजरात यांच्या सीमेवरचा प्रदेश असल्याने येथील लोकांवर महाराष्ट्रीय व गुजराती अशा संमिश्र विचारांचा प्रभाव आहे. त्यांची बोली भाषा ही संमिश्र आहे. सह्याद्रीच्या दक्षिण-उत्तर डोंगररांगांची सुरूवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. सह्याद्रीच्या उत्तरेकडून सुरू होणार्‍या डोंगररांगेला सेलबारी व डोलबारी रांग म्हणतात. या सेलबारी-डोलबारी रांगांवर न्हावीगड, तांबोळ्या, साल्हेर, सालोटा, हरगड, मुल्हेर व मोरा हे गडकिल्ले व मांगी-तुंगी हे सुळके आहेत. याचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे दुसर्‍या सुरत लुटीनंतर शिवाजी महाराजांनी बागलाण मोहिम काढली व त्या मोहिमेत साल्हेर, मुल्हेर व इतर किल्ले जिंकून स्वराज्यात सामील करून घेतले.

२५ सप्टेंबरला रात्री ९.३० ला मुंबई सेन्ट्रल बसस्थानकावर जमायचं होतं. त्याप्रमाणे ट्रेन पकडली व यतीनला फोन केला. तर तो डोंबिवली स्टेशनवरच होता. मग तो मला म्हणाला सरळ दादर स्टेशनवर उतर आपण टॅक्सीनेच मुंबई सेन्ट्रलला जाऊ. त्याप्रमाणे आम्ही दादर स्टेशनवर भेटलो. ठाण्याहून एक काकूही आल्या होत्या. मग आम्ही चौघेजण टॅक्सीने मुंबई सेन्ट्रलला गेलो. तिथे आणखी एकजण आधीच येऊन आमची वाट बघत होता. आमच्याबरोबर असलेल्या विशालच्या ऑफीसमधले २ जण पण येणार होते. ते मुंबईत नवीन होते. त्यांची वाट बघण्यात आमचा बराच वेळ गेला. बसची चौकशी केली असता ११.३० वा. ची त्र्यंबकेश्वर बस आहे असं कळलं. एका बसजवळ जाऊन उभं राहिलो व चौकशी केल्यावर कळलं की तीच त्र्यंबकेश्वर बस लागणार होती. बाकी सगळे लोक यायच्या आधीच आम्ही आमच्या सॅक्स ठेऊन स्थानापन्न झालो. आम्ही चपळाईने जागा पटकावल्या होत्या म्हणून बरं झालं कारण नंतर बस चांगलीच भरली. बस अगदी वेळेवर सुटली. एकंदर प्रवासाची सुरवात तर चांगली झाली.

सकाळी ४.३० वा. आम्ही नाशिक बसस्टँड ला उतरलो. इथे आम्हांला डोंबिवलीचा आणखी एक मुलगा येऊन मिळाला. तिथून आम्हांला लगेचच मुंबई-नवापूर बस मिळाली. आता आम्हांला 'ताहराबाद' या गावात उतरायचे होते व तिथे पोचायला १-१.३० तास लागणार होता. म्हणून मग राहिलेली झोप या बसमध्ये पूर्ण केली. ७ च्या सुमारास ताहराबाद ला उतरतोय तोच सटाणा-उनाई बस आली. त्या बसमध्ये चढलो व साधारण १५-२० मिनीटांमध्येच 'मुल्हेर' गडाच्या पायथ्याच्या गावात 'मुल्हेरवाडी' ला उतरलो.

मुल्हेरवाडीला जात असताना झालेले मांगी-तुंगी सुळक्यांचे दर्शन
Mangi-Tungi.JPG

गावात उतरून चौकशी केल्यावर कळले की एक श्री उद्धव महाराजांचे मंदिर आहे व तिथे राहाण्याची व्यवस्थाही होते. मग तिथली व्यवस्था बघणार्‍यांनाच आमची सकाळच्या नाश्त्याची व रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्याची विनंती केली. मंदिरात सामान ठेऊन फ्रेश झालो. नाश्ता येईपर्यंत भरपूर टाईमपासही करून झाला. आम्ही आमच्या सॅक मधल्या मौल्यवान वस्तू, तहानलाडू व भूकलाडू २ सॅकमध्ये काढून घेतले. व बाकी सगळ्या सॅक्स तिथेच ठेऊन खोलीला कुलूप लावले. गरम-गरम उपमा व चहा झाल्यावर मात्र लगेच मुल्हेर-मोरा या गडांकडे कूच केले. मुल्हेरच्या पायथ्यापर्यंत पोचायला गावापासून २ कि.मी. ची तंगडतोड करावी लागते.

हे मुल्हेरवाडीतून होणारे मुल्हेर-मोरा गडांचे पहिले दर्शन
Mulher Fort.JPG

मुल्हेरवाडीतून दिसणारा हरगड
Hargad from Mulherwadi skewed.JPG

मुल्हेर ह्या गडाची उंची ४२९० फूट आहे. हा किल्ला बराच प्राचीन म्हणजे महाभारतकालीन आहे. इ.स. १६३८ मध्ये मोगलांनी बागलाणवर हल्ला करून मुल्हेर किल्ला जिंकून घेतला. किल्ल्यावर महंमद ताहिर याची किल्लेदार म्हणून नेमणूक करण्यात आली. त्याने मुल्हेरजवळ 'ताहिर' नावाचे गाव वसवले. कालांतराने त्याचे नाव 'ताहिराबाद' असे झाले. साल्हेरच्या लढाईनंतर फेब्रुवारी १६७२ मध्ये मराठ्यांनी मुल्हेरगड काबीज केला. गडाचे दोन भाग आहेत. मुल्हेरमाची व मुल्हेरचा बालेकिल्ला. माचीवर गणेशमंदिर व सोमेश्वर मंदिर आहेत. इथे बयाच दिवसांत पाऊस झाला नव्हता आणि चहा-नाश्त्याची वाट बघण्यात आमचा बराच वेळ वायाही गेला होता, त्यामुळे ऊन चांगलेच लागत होते. फोटो काढत काढत गणेश मंदिरापाशी पोचलो व एक छोटा ब्रेक घेतला. मंदिरातून सगळ्या डोंगररांगांचे छान दर्शन होत होते. इथून २ वाटा निघत होत्या. म्हणून आमचा लीडर वाट बघण्यासाठी एकटाच थोडा पुढे गेला. पण तरीही अंदाज येईना म्हणून आम्ही तसेच थोडे पुढे चालत गेलो. रानात काही बायका लाकूडफाटा तोडत होत्या त्यांना विचारल्यावर त्यांनी याच वाटेने ५ मिनीटे गेलात की सोमेश्वर मंदिर लागेल म्हणून सांगितलं. मंदिर छान प्रशस्त होते. बाजूलाच पाण्याची पण सोय होती, त्यामुळे इथे निवार्‍याची पण सोय होऊ शकते. इथे तळघरात शंकराची पिंड आहे. देवाचे दर्शन घेतल्यावर सर्वानुमते इथेच दुपारचे जेवण उरकून पुढे जायचं असं ठरलं. कारण मुल्हेर-मोरा गडांना जोडणारी भिंत नजरेस पडत होती. एकूण काय तर ह्यापुढे पूर्ण चढाई दिसत होती. पोळ्या आणि त्याबरोबर भरपूर लोणच्याने तोंड भाजल्यावर पोटभर पाणी पिऊन चढाईला सज्ज झालो.

हे मुल्हेरमाचीवरील गणेश मंदिर
Ganeshmandir, Mulher skewed.JPG

सोमेश्वर मंदिर
Someshwar Mandir skewed.JPG

सह्याद्रीतले वैभव
Flower1.JPGFlower2.JPG

मोरागड चढताना दिसणारे सोमेश्वर मंदिर
Someshwar mandir view from Moragad skewed.JPG

टळटळीत उन्हात तासभर चढाई केल्यावर आम्ही त्या तटबंदी (??) वर पोचलो. थोडं पुढे गेल्यावर मोरा गडाच्या पायर्‍या आणि दरवाजा नजरेस पडत होतं. तसं पाहिल्यास मोरा गड हा मुल्हेर किल्ल्याचा दुसरा बालेकिल्लाच म्हणतात. त्याची इतिहासात कुठेही स्वतंत्र नोंद नाही. ह्या गडाची उंची ४४९० फूट आहे. मुल्हेरगडाकडे जाणार्‍या वाटेवर पाण्याचा साठा दिसला व जीवात जीव आला. कारण इथपर्यंत चढून येईतो सगळ्यांकडचं पाणी संपलं होतं. गडावर जाताना ३ दरवाजे लागतात. मोरा गडावर एक चक्कर मारली व मुल्हेर कडे निघालो.

मोरागडाचा दरवाजा व भक्कम पायर्‍या
Mora Entrance skewed.JPG

मोरागडावरून मुल्हेर व हरगड
Mulher from Mora skewed.JPG

मुल्हेरगडावरून मोरा
mora from mulher skewed.JPG

मुल्हेरवरील भडंगनाथाचे मंदिर
Bhadangnath temple.JPG

मुल्हेरगड उतरताना लागलेली प्रशस्त गुहा
Cave on Mulher skewed.JPG

मुल्हेरच्या बालेकिल्ल्यावरचा कातळात कोरलेला मारूती
Hanuman statue at Mulher skewed.JPG

मुल्हेरमाचीवरून मुल्हेरच्या बालेकिल्ल्याचे दर्शन
Mulher Balekilla as seen from Mulhermachi.JPG

मुल्हेरचा बालेकिल्ला म्हणजे प्रशस्त पठार आहे. बालेकिल्ल्यावरच भडंगनाथाचे छोटेसे मंदिर व पाण्याची ८-९ टाकी आहेत. बालेकिल्ल्यावरून लगेचच उतरायला सुरूवात केली. उतरताना मात्र हरगडाच्या बाजूच्या खिंडीतून उतरायला सुरूवात केली. इथे कातळावर एक मारूती कोरला आहे व हा मारूती अगदी खालून सुद्धा व्यवस्थित दिसतो. दुखर्‍या पायाने सिग्नल द्यायला सुरूवात केल्यावर फक्त एका ठिकाणी थांबून नी कॅप चढवली व कुठेही न थांबता भराभर उतरायला लागलो. पायथ्याला येईपर्यंत मिट्ट काळोख झाला होता. गावात आल्यावर उद्या वाघांबे गावापर्यंत जायला जीपची सोय होईल का ते चौकशी केली. नशिबाने १ जण तयार झाला. त्याच्याशी पैशांची बोलणी झाल्यावर परत मंदिरापाशी परतलो. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी एक मोठी बस आलेली दिसत होती. मग यतीन म्हणाला की, पुण्याहून निनाद बेडेकरांचा ग्रूप येणार होता. फक्त त्यांचा प्रोग्रॅम आमच्या अगदी विरुद्ध होता. म्हणजे ते आज साल्हेर करून आले होते व उद्या फक्त मुल्हेर करून परतणार होते. आम्ही आमचे सामान खोलीत ठेऊन कुलुप लावले होते, त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. पण बघितलं तर आम्ही सामान ठेवलेली बंद खोली उघडून सगळी त्यांची माणसं बसली होती. आम्ही सरळ आमचं सगळं सामान उचललं व बाहेर व्हरांड्यात आलो. तिथल्या लोकांना सांगून लाईट्स व्यवस्था करून घेतली व तिथेच पथार्‍या पसरून जेवण यायची वाट बघत बसलो. जेवण आल्यावर मात्र सगळे तुटून पडले. त्यात मिरचीचा जो ठेचा होता तो एकदम टेम्प्टींग होता. जेवण झाल्यावर सगळं आवरून लगेचच सगळे आडवे झालो. उद्या सकाळी जीप सांगितली होती ती ७.३० वाजता येणार होती. आजच्यासारखा उशीर उद्या करून चालणार नव्हता. आणि चांगलंच दमल्यामुळेही निद्रादेवी ही लगेच प्रसन्न झाली.

दुसर्‍र्या दिवशी लवकरच उठलो. आन्हिकं उरकून फोटो वगैरे काढले. काल इथे आल्यापासून आमचा प्रोग्रॅम तोंडी खूपवेळा बदलला होता. यतीन ने ठरवलं होतंच की सालोटा करून साल्हेरला किल्ल्यावर मुक्काम करायचा. सालोट्याला तसं बघण्यासारखं काहीच नाही, परंतू सालोट्याहून साल्हेरचे दर्शन अप्रतिम होते. मला मात्र मनातून आपल्याला जमेल की नाही याची धास्ती वाटत होती. काकूंचा विचार आणखीन काही वेगळाच होता. त्या म्हणत होत्या, आपण सालोट्याला वर न चढता सरळ साल्हेर करू व जो दिवस वाचेल तो आपण वणीच्या देवीच्या दर्शनाला कारणी लावू. त्या मला म्हणाल्या तू काय मोकळीच आहेस नां, मग कोणी नाही आलं तर आपण दोघी वणीला जाऊन येऊया. आणि आज नेमकी काकूंची तब्येत जरा बिघडली. त्यांचं डोकं खूप दुखत होतं आणि त्यामुळे उलट्याही सुरू झाल्या. आधी काकू म्हणाल्या मी सालोटा न चढता साल्हेर-सालोट्याच्या खिंडीत बसून राहीन. पण नंतर मात्र ते ही झेपणार नाही असं दिसलं तेव्हा त्या म्हणाल्या की मी दोन्हीकडे न येता आराम करते. झालं आमचा प्रोग्रॆम परत बदलला. वाघांबे गावात जायला ठरवलेली जीप वेळेवर आली. वाघांबे गावात पोचल्यावर आम्ही दुसरी जीप करून साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात 'साल्हेरवाडी' ला पोचलो. रविवार होता त्यामुळे गावातलं ग्रामपंचायतीचं ऑफिस बंद होतं. त्याच्या बाहेरच्या जागेतच सामान टाकलं. काकू लगेचच आडव्या झाल्या. त्यामुळे कालच्या सारखंच मौल्यवान वस्तू, व तहान-भूक लाडू आमच्याबरोबरच्या २ सॅक मधे घेऊन आम्ही बाकीच्या सॅक्स तिथेच ठेवल्या. परत एकदा वाघांब्याला जाणार्‍र्या जीप मध्ये स्वत:ला कोंबलं व निघालो. मी मुलगी म्हणून मला जीपमधली स्पेशल सीट मिळाली होती, कारण बाकीचे काहीजण टपावर विराजमान झाले होते तर काहीजण मागे लटकत होते. वाघांब्याला पोचल्यावर एक वाटाड्या बरोबर घेतला व निघालो. आता आम्हांला साल्हेर किल्ल्यावर राहाता पण येणार नव्हते. काकू खालीच थांबल्या होत्या त्यामुळे लगेच उतरायला लागणार होते.

वाघांबे गावातून साल्हेर (उजवीकडे)-सालोट्याचे (डावीकडॆ) प्रथम दर्शन
Salher-Salota.JPG

वाघांब्यापासूनच चढाला सुरूवात झाली होती, त्यामुळे पुढे काय वाढून ठेवलंय याची व्यवस्थित कल्पना येत होती. तरी पण फार विश्रांती न घेता एका लयीत चालण्याचा प्रयत्न करीत होतो. बर्‍र्यापैकी चढल्यावर एका पठारावर आलो. इथे जणूकाही फुलपाखरांची शाळाच भरली होती. आमच्याबरोबरच्या अभिजीत ला किती फोटो काढू आणि किती नको असं झालं होतं. आता इथून खिंडीपर्यंत सरळ वाट दिसत होती. भरभर खिंडीत पोचलो. सालोटा डाव्या बाजूला व साल्हेर समोर उभा ठाकला होता. इथून साल्हेरची कड्याच्या पोटातून जाणारी वाट स्पष्ट दिसत होती. मात्र पायर्‍र्या अजून नजरेस पडत नव्हत्या. सर्वानुमते सालोट्याला जितकं जाता येईल तितकं जायचं ठरलं. सालोट्याचे दरवाजे खालून दिसत होते, परंतू वाट मात्र चांगलीच घसरडी होती. यतीन ने थोडं पुढे जाऊन साधारण अंदाज घेतला. व त्याच्या मताने उतरताना फार जोखमीचं झालं असतं तसंच अजून साल्हेर किल्ला चढून फिरायचाही होता. आणि परत किल्ल्यावर मुक्काम न करता सुर्यास्तापूर्वी साल्हेरवाडीत पोचायला हवं होतं. त्यामुळे सालोट्याचा लांबूनच निरोप घेतला व साल्हेरकडे निघालो. साल्हेर किल्ल्याच्या पायर्‍र्यांपर्यंत आम्हांला सोडून आमचा वाटाड्या मागे फिरला. बिच्चार्‍र्याची आमच्याबरोबर येऊन पंचाईतच झाली होती. जाताना तो अक्षरश: माकडासारख्या उड्या मारत १० मिनीटांत अर्ध्या वाटेत पोचला.

साल्हेरला जाताना दिसणारा सालोटा
Salota as seen from salher.JPG

साल्हेरच्या पायर्‍या
Steps on Salher skewed.JPG

साल्हेरच्या पायर्‍या चढताना सालोटा पार्श्वभूमीवर
on steps of salher skewed.JPG

सह्याद्रीतल्या सगळ्या गडकिल्ल्यांमध्ये सर्वाधिक उंचीचा मान साल्हेरचा (५१४१ फूट) व सर्वाधिक उंचीच्या शिखरांच्या मानात कळसूबाईच्या खालोखाल. साल्हेरला जसे ऐतिहासिक महत्त्व आहे तसेच पौराणिक महत्त्व देखील आहे. हा किल्ला परशुरामांची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते की, जिंकलेल्या पृथ्वीचे दान करून स्वत:साठी भूमी मिळविण्यासाठी त्यांनी सागराला मागे हटवायला बाण सोडला तो इथूनच. ऐतिहासिक महत्त्व म्हणजे इ.स. १६७१ मध्ये शिवाजी महाराजांनी बागलाण मोहिम काढली व साल्हेरवर विजय मिळवला. इ.स. १६७२ मध्ये मुघलांनी परत हल्ला केला. त्यावेळेस मराठे व मुघल यांच्यात जी जोरदार लढाई झाली, त्यात मराठ्यांचा विजय झाला. या लढाईत मिळवलेल्या विजयाला मानही पहिला आहे. एवढा मोठा विजय महाराजांना त्यापूर्वी कधीही मिळाला नव्हता.

सालोट्याच्या बाजूने चढताना साल्हेरच्या दुसर्‍या दरवाजाजवळील शिलालेख
shilalekh at the 2nd entrance of salher skewed.JPG

साल्हेरची कड्याच्या पोटातून जाणारी वाट
the traverse of salher.JPGtraverse of salher skewed.JPG

अंगावर येणार्‍र्या पायर्‍र्या चढून आम्ही कड्याच्या पोटात असणार्‍र्या वाटेवर आलो. येताना बरेच दरवाजे लागतात. अर्थात सगळेच आता भग्नावस्थेत आहेत. इथेच कड्याच्या पोटात काही टाकी पण आहेत. गडावर रेणुकामातेचे व गणपतीचे मंदिर आहे. त्याच्या बाजूलाच २ टाकी व गंगासागर तलाव ही आहे. आम्ही आमच्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. देवाचे दर्शन घेतले व श्री परशुराम मंदिराकडे चढायला सुरवात केली. या शिखरावरून दिसणारे दृश्य केवळ अप्रतिम होते. ह्या परशुराम शिखरावरून संपूर्ण बागलाणचे दर्शन होते. साल्हेरच्या सोबत्याचे 'सालोट्या'चेही दर्शन होते, तसेच हरणबारी धरण व इतरही बरेच गड-किल्ले दिसतात. श्री परशुराम मंदिरात त्यांची मूर्ती व पादुका आहेत. तिथेच पेटपूजा उरकली व साल्हेरवाडीकडे कूच केले. वाटेत एका टाक्यातून सगळ्यांनी पाणी भरून घेतले कारण आता वाटेत कुठेच पाणी नव्हते. या वाटेवरून जाताना सहा दरवाजे लागतात. पायर्‍र्याही चांगल्याच उंच आहेत. पण वाट चांगली मळलेली असल्याने चुकण्याची शक्यता अजिबात नाही. अध्येमध्ये फार वेळ न दवडता भराभर उतरत होतो, कारण अंधार पडायच्या खाली पोहोचायला हवं होतं.

रेणुकादेवीचे मंदिर
Renuka mata mandir skewed.JPG

हे सह्याद्रीतील दुसर्‍या क्रमांकाचे शिखर, श्री परशुराम मंदिर
Sri Parshuram Mandir, 2nd highest peak in sahyadris.JPGSri Parshuram mandir.JPG

श्री परशुराम मंदिरातून दिसणारा सालोटा
Salota from Sri Parshuram Mandir.JPG

गंगासागर तलाव, परशुराम मंदिरातून
gangasagar lake as seen from parshuram mandir.JPG

आमच्या बरोबर साल्हेरवाडीच्या बाजूच्या गावातलेच एक मामा पण होते. त्यांनी आम्हांला वाटेत भरपूर कढिपत्ता पण काढून दिला. रस्त्याला लागल्यावर त्यांनी आमचा निरोप घेतला. साल्हेरवाडीला उद्या दसर्‍यानिमित्त मोठी जत्रा होती व आजूबाजूच्या गावातली सगळी लोकं ह्या जत्रेला येतात अशी त्या मामांनी माहिती दिली. त्यांनाही घरी जाऊन परत साल्हेरवाडीला उद्याच्या जत्रेकरिता यायचे होते. जाताना ते तुमच्याकरिता आमच्या शेतातली काकडी घेऊन येतो असं न विसरता सांगून गेले. इथे मुबलक पाणी असल्याने बागायती शेती खूप मोठ्या प्रमाणावर चालते. त्यामुळे इथला शेतकरीही सधन आहे.

श्री परशुराम मंदिर, साल्हेरमाचीवरून
Parshuram Mandir as seen from salher machi.JPG

साल्हेरवाडीला जाताना पठारावरून होणारे साल्हेरचे दर्शन
Salher view from plateau.JPG

आल्यावर बाजूच्याच हॉटेलमध्ये चहा पिऊन फ्रेश झालॊ. काकूही विश्रांती घेतल्यामुळे ठणठणीत झाल्या होत्या. तोंड वगैरे धुवून झाल्यावर थोड्यावेळाने रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू केली. मुगाच्या डाळीची ट्रेक स्पेशल खिचडी, पापड व लोणचं असा मेनू होता. यतीन ने कढई आणली होती. पण ती आम्हांला पुरेशी नव्हती. म्हणून मग मी व विशाल बाजूच्याच एका दुकानात गेलो व त्याला मोठं पातेलं द्यायची विनंती केली. त्याने आम्हांला ५ लिटरचा कूकर दिला पण त्याबरोबरच माझ्या स्वयंपाकातल्या ज्ञानावरून (??) माझी शाळा घेतली व जाता-जाता तुमच्या मुंबईत असं कोणी मदत करत नाही असंही ऐकवलं. त्याचं म्हणणं अगदीच चुकीचं ही नव्हतं. खिचडी एकदम फर्मास झाली होती. सगळी खिचडी फस्त करून झाल्यावर कोणीतरी बातमी आणली की, आज गावात जत्रेनिमित्त तमाशा पण आहे. झालं आमच्यातली समस्त पुरुषमंडळी खूष झाली. आमच्याबरोबर दोघे जण होते त्यातला एक होता नेपाळचा व दुसरा होता रांचीचा. ते मुंबईत फक्त ३ महिन्यांपूर्वी आले होते. त्यांना तमाशा हा काय प्रकार असतो तेच माहित नव्हतं. त्यातला एक म्हणाला, ये अच्छा पॅकेज है. ट्रेक के साथ एन्टरटेनमेंट फ्री. कॅरीमॅट्स व स्लिपींग बॅग्ज अंथरून सगळेजण कपडे वगैरे बदलून तमाशाला जायला सज्ज झाले. काकूंना ही बरं वाटत होतं व त्यांनी यापूर्वी कधी तमाशा बघितला नव्हता, त्यामुळे त्या ही म्हणाल्या मला ही यायचंय. मी सोडून सगळे तमाशा बघायला गेले. १० मिनीटांत खूप कर्कश्य आवाज येतोय म्हणून काकू अर्ध्या वाटेतूनच परत आल्या व बाकीची उत्साही मंडळी पण १५-२० मिनीटांत परतली. त्यांनी लवकर यायचं कारण सांगितलं ते पण अगदी भारी होतं. तमाशात बायकांच्या ऐवजी सगळे तृतीयपंथी Proud होते. बिच्चार्‍यांच्या उत्साहावर अगदी पाणी पडलं.

शेवटचा दिवस सालोटा रद्द झाल्यामुळे वणीच्या देवीच्या दर्शनाने सत्कारणी लावायाचा असं ठरवलं होतं. त्याप्रमाणे चहा पिऊन पहाटेची लवकरची एस.टी. पकडली व देवीच्या दर्शनाने ट्रेकची सांगता केली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर फोटो नी त्याला साजेसं वर्णन. यावेळी वर्णन लिहीण्यात हात आखडता घेतलेला दिसत नाहीये. Wink
तमाशात बायकांच्या ऐवजी सगळे तृतीयपंथी>>>> Lol

छान

सुरेख फोटो आणि वर्णन. Happy
हेच फोटो मोठ्या साईज मध्ये बघायला आवडेल. अजुन छान दिसतील.
लिन्क द्या.

एक प्रश्ण , हे भूकलाडू,तहानलाडू काय प्रकार आहे? कधी एकला नाही म्हणून विचारतेय. Happy

ऑउटडोअर्स... खुप छान माहिती नि छायाचित्रे मस्तच ! परशुराम मंदिराचा फोटु तर खासच ! बघु कधी जमतय तिथे जायला Happy

मांगी-तुंगी सुळक्यांचे प्रकाशचित्र मस्त आहे. बाकी छान लिहिलय.
हा गड ट्रेकला किती अवघड आहे?? कारण मला एका वर्षात १-२ ट्रेक झेपतात. Sad मागच्यावेळी तोरण्याला गेलो होतो, तर उतरताना सर्व देव आठवत होते.

मस्त फोटो आणि वर्णन , दुखर्‍या गुडघ्यांचा त्रास फक्त मोठ्या माणसाना होतो, थोरले महाराज, पुलं आणि !!!

सुन्दर आहे माहिती आणि छायाचित्रे... अगदी मनापासुन आभार. या किल्ल्यांना भेत द्यायला नक्की आवडेल.

भ्रमन्ती आवडली फ़ोटो खुपच छान!
भूकलाडू,तहानलाडू काय प्रकार आहे? कोणी रेसीपी देनार का?

फारच छान !
मुल्हेर मोरा बघताना, मुल्हेर गडाच्या उजव्या बाजुच्या खिन्डितुन गेल्यास हरगडावर जान्यास
पायवाट लागते. विशेष म्हण्जे एका दिवसात हरगड-मुल्हेर्-मोरा पाहु शकतो.

Pages