पाऊस - (जुनीच)

Submitted by दाद on 19 February, 2008 - 16:49

मनिषाची 'सहज' वाचली अन माझी एक जुनी कविता परत एकदा टाकायचा मोह टाळता आला नाही.... (admin, वाटली तर खुशाल उडवून टाका इथून)

पाऊस

आपल्या आत आत एक
पडत असतो पाऊस
कोणी पुसलं की
दडत असतो पाऊस

मनाच्या शिवारात
सयींच्या मोसमात
पापणीच्या शिंपीत
घडत असतो पाऊस

कधी बनून हुंदका
बंद असतो मुठीत
कधी अनावर होऊन
झडत असतो पाऊस

ठेवतो आपण फुलवून
खळीभर हसू
मग नको त्यालाच कसा
दिसत असतो पाऊस?

भरून येत आणि
कोसळतही नाही
निळा निळा असा
गडद असतो पाऊस

न सांगता सवरता
भेटतो आणि,
कळत नकळत असा
जडत असतो पाऊस
-- शलाका

गुलमोहर: 

अप्रतिम कविता दाद !!!

किती अलवार, मनातलं पकडल आहेस शब्दांत!! तुला दाद द्यायलाही शब्द तोकडे पडतात!! खूप खूप सुंदर....

एकदम झकास!
जुनी असली तरी माझ्यासाठी ती नवीन आणि खुपच सुंदर कविता.
अजुन येऊ देत........

सुंदर कविता आहे. छान वाटले वाचताना.

छान कविता शलाका.
ठेवतो आपण फुलवून
खळीभर हसू
मग नको त्यालाच कसा
दिसत असतो पाऊस? - हे फारच आवडलं!!

अभिनंदन ,खुप आवडली, अशा छान छान कवितांचा आम्हाला आनंद घ्यायला मिळो.

मनाच्या शिवारात
सयींच्या मोसमात
पापणीच्या शिंपीत
घडत असतो पाऊस

अगदी अगदी खरयं! कविता आवडली.

"पापणीच्या शिंपीत घडत असतो पाऊस
"
काय गोड कल्पना आहे

व्वा !