आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी: २

Submitted by वरदा on 5 December, 2009 - 01:21

भाग १ - आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी (सचित्र) http://www.maayboli.com/node/11999

भाग २:
दिवस - दमवणारा
आज जरा लांबचा पल्ला गाठायचा होता, त्यामुळे थोडीशी लवकरच निघाले. मदतनिसाच्या सांगण्यावरून स्टँडकडे न जाता गावाबाहेर जाणार्‍या रस्त्याकडे पावलं वळवली. त्याच्या मते आजच्या पहिल्या गावाला जाण्यासाठी तिथून बस, खाजगी गाड्या असे वेगवेगळे पर्याय असतील. गाव जिल्ह्याकडे जाणार्‍या मोठ्या रस्त्यावर आहे, सगळ्याच लांबपल्ल्याच्या एस्ट्या तिथे थांबतात असं नाही.
फाट्यावर पोचलो. पाहिलं तर आसपास जिपा नाहीत. तिकडे जाणार्‍या गाड्या अर्ध्या तासापूर्वी निघून गेलेल्या. पुढची फेरी परत दीडतासानंतर. आणि कुठल्यातरी नव्या नियमामुळे बसगाड्याही इथे थांबत नाहीयेत. एकदम चिडचीडच झाली. मदतनिसाचा चेहेरा एवढुस्सा झालेला! गाव क्र. १ या रस्त्यावरून ६ किमी. पण इथे असं वाट पहात उभं किती वेळ रहाणार? त्यापेक्षा चालायला सुरूवात केली. सकाळच्या वेळी मस्तपैकी गुळगुळीत मोठ्या डांबरी रस्त्याच्या कडेकडेने गार वारा अंगावर घेत चालायला मजा येत होती. तरी सगळं वेळापत्रक पुढं ढकललं जातंय आणि तेही दिवसाच्या सुरवातीलाच म्हणून थोडं वैतागल्यासारखंच झालं होतं. शिवाय जाणार्‍या-येणार्‍या वाहनातली लोकं थोडीशी विचित्रपणे पहात होती, की या मोठ्या रस्त्यावर हे दोघंजण असे मधेच कुठे चालत निघालेत.. मोटरसायकली मुद्दाम जवळून जात होत्या. एकदोनदा शिट्ट्या, कॅटकॉल्स पण ऐकून घ्यावे लागले. शांतपणे मान खाली घालून चालत राहिले. व्वा! मागनं बस आली आणि आम्ही हात दाखवल्यावर चक्क थांबली. उरलेले ३ किमी ५ मिनिटात संपले.

गाव क्र. १. या गावातल्या पाटील कुटुंबाशी बादरायण ओळख आधीच काढून ठेवली होती. त्यांना काल निरोपही गेला होता की मी सकाळी जाणार आहे म्हणून. आमची वाट पाहून पाटीलकाका शेतावर गेले होते. त्यांच्या कॉलेजात जाणार्‍या मुलाने अगत्याने बसवून घेतले. शेतावर निरोप पाठवला आणि आमच्या चहापाण्याची व्यवस्था करायला आत जाऊन सांगून आला. गावातल्या जरा सधन-सुखवस्तू कुटुंबात गेलं की साहजिकच बायकांचा भाग वेगळा असतो. पाहुणी म्हणून मला बैठकीत बसवलं जातं आणि पुरुषमाणसंच माझ्याशी बोलतात. घरातल्या सास्वा-सुना-लेकींचं दर्शन फक्त चहा-बिहा देताना, तेही बैठकीच्या उंबर्‍यावरूनच. त्याही टकामका बघत असतात की ही कोण पाहुणी अवतरलीये म्हणून.
खरंतर त्यांच्याशी गप्पा मारायला मला आवडतात. एरवी न कळणारी अनेक माहिती, आख्यायिका, समज, श्रद्धा अशा खास बायकांच्या विश्वातल्या गोष्टी कळतात. म्हणजे गावातले म्हातारेकोतारेही या गोष्टी सांगतात पण बायकांची version थोssडीशी वेगळी असते बर्‍याचवेळा - कुठेही कधी न ग्रथित होणारी ही परंपरा. आधीच आपल्याकडे कागदपत्र सोडून मौखिक परंपरेला/ इतिहासाला फार क्वचित विचारलं जातं. आणि त्यातही ही मौखिक माहिती बहुदा गावातले पुरुषच देणार. आपल्याकडे इतिहासाच्या साधनसामग्रीतही शुचितेची उतरंड आहे, एक उच्चनीच भेदाभेद आहे. त्यात ही बायकांची मौखिक परंपरा उतरंडीच्या कायम तळातच!!
पण अशा घरांमधे हा संवाद साधणं जिकिरीचं आणि वेळखाऊ असतं. वर्षभरात संसारातून वेळ काढून २-३ महिन्यात धावतपळत फील्डवर्क, इतर अभ्यास, माहेर, मित्रमैत्रिणी अशी तारेवरची कसरत करणारी मी अगदी काट्यावर चालत असते. त्यामुळे दुर्दैवाने याचा पाठपुरावा करण्याइतका वेळ माझ्याकडे कधीच नसतो. नुसत्या नजरानजरीवर, स्मितहास्यावर आणि 'येते हं मावशी/ ताई/ वहिनी/ आजी' या वाक्यावर आमचा संवाद संपतो. याउलट गरिबाच्या घरांमधे जागेच्या कमतरतेमुळे सगळं कुटुंबच समोर असतं. आणि मग अशा घरांमधल्या आज्ज्या पुढाकार घेऊन, अगदी कानामागून पदर घेऊन, सखोलपणे माझी तपास-चौकशी करतात. चार अनुभवाच्या शहाणपणाच्या गोष्टी सांगतात. एखादी शाळकरी नातबित असेल तर तिच्या पाठीत एक धपाटा घालून मी कसं एवढं शिकून सवरूनही कुंकू-मंगळसूत्र घालायला विसरले नाहीये हे तिला दाखवण्यात येतं.

असो. तर काका शेतावरनं परतले. त्यांनी गावाची जुजबी माहिती दिली. त्यांच्या लहानपणी गावात एक ताम्रपट मिळाल्याची आणि पुण्याचे काही प्रसिद्ध इतिहास संशोधक तो घेऊन गेल्याची गोष्टही सांगितली. पण तो ताम्रपट काही कारणाने कधीच प्रसिद्ध न झाल्याने मी त्यांना काहीच माहिती देऊ शकले नाही. मी आज या गावात आलेय कारण याच्या पंचक्रोशीतल्या गावात एका यादवकालीन शिलालेखात एका देवस्थानासाठी इथली जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. तेव्हा हे गाव यादवपूर्वकालीन हे तर नक्की. त्याचा पुरातत्त्वीय पुरावा आहे का हे पडताळून पहायचंय.
गावाची पहाणी करायला बाहेर पडलो. इथे पण गाव पांढरीवर आहे. आणि मोठ्या रस्त्यावर असल्याने सिमेंटची बांधकामं पण बरीच आहेत. खापरं मिळणं अवघडच दिसत होतं. तेवढ्यात कुणीतरी खबर आणली की रेशनच्या दुकानात खणाखणी चाललीये परवापासून आणि तिथे खापरंही मिळतायत. तिथे गेलो तर दुकान बंद. मग मालकाला बोलावून उघडलं. जुन्या वाड्यातलं ते दीडखणी दुकान. आधीच खूप अंधारं आणि त्यात दिवे गेलेले (तसेही ग्रामीण भागात रोज १२-१४ तास दिवे नसतातच!). दुकानाचा पाया खणून पूर्णपणे आतून नव्यानी दुकान बांधून काढायचा घाट मालकाने घातला होता. सगळी जमीन खणून ४ फूट तरी खाली गेले होते. त्या अंधारात खड्डाच काय पण बाजूची भिंतसुद्धा दिसत नव्हती. तेवढ्यात कुणीतरी कंदिल आणला, टॉर्च आणला. थोड्या वेळाने एक मिणमिणता इमर्जन्सी लाईटही आणला. मग मी खड्ड्यात उडी मारली. कारण चढा-उतरायला काही व्यवस्था नव्हतीच. त्या अंधारातच मी माती सावडून खापरं गोळा केली. आता पुढचा प्रश्न! त्या चारफुटी खड्ड्यातनं जेमतेम पाचफुटी मी शिडीशिवाय कशी बाहेर पडणार? अर्थात हे माझ्या डोक्यात येण्याआधीच बाकीच्यांच्या डोक्यात आलं होतं आणि ३-४ विटा आणवल्या होत्या. मग त्या एकावर एक रचलेल्या विटा, मधेच अर्धवट बाहेर आलेला एक दगड आणि वरून दोघांनी दिलेले हात अशा मदतीने अस्मादिक बाहेर पडले!
बाहेर येऊन उजेडात खापरं पाहिली तर फुस्स! सगळी मराठाकालीन किंवा थोडीशी आधीची. मुकाट पिशवीत भरली आणि गावाला चक्कर मारायला बाहेर पडले. गावात एक हेमाडपंती/ यादवकालीन मंदिरही आहे. तिथे गेलो. नेहेमीप्रमाणेच वरच्या शिखराची पडझड झालीये. आत फोटो-बिटो काढून झाल्यावर ते काका सहज म्हणाले, की त्यांच्या लहानपणी या शिखराची डागडुजी करायचे प्रयत्न झाले होते. मी विचारलं 'कशी केली ही डागडुजी?' ते उत्तरले 'जे दगड उरले होते वरती ते पांढरीच्या मातीने लिंपून' (पांढरीची माती जशी खत म्हणून उत्तम, तशीच ती उपयोगी पडते मातीची घरं सारवायला. गावोगाव सिमेंटची घरं सर्रास बांधायला सुरवात झाली त्याच्या आधी हीच माती सारवण म्हणून, डागडुजी करायला म्हणून वापरली जात असे! कारण या मातीत एक चिकटपणा असतो आणि त्याने मातीच्या घराच्या भिंती जास्त टिकतात..) माझे डोळे लकाकले! म्हणजे त्या मातीबरोबर नक्की खापरं असणार, निदान त्यांचे छोटे तुकडे तरी! मग उत्साहाने काका आणि मदतनीस दोघांनाही घेऊन बाहेरच्या मंडपाच्या चौथर्‍यावरून छताला वेंगून वरती चढले. वरती आता काहीच नाही. ४ -५ दगड आणि सपाट छप्पर. पण माझ्या अंदाजाप्रमाणे छोटी छोटी खापरं होतीच. आणि त्यात काही सातवाहनकालीन खापरंही मिळाली!!! एवढ्या खटाटोपाचं सार्थक झालं म्हणायचं!

गावाच्या बाहेर १-१॥ किमी वर एक ओढा नदीला मिळतो. त्या संगमावर एक छानसं देऊळ आहे. आहे उत्तर मराठाकालीनच पण एकदम निवांत. शिवाय देवळाच्या बाहेर पारावर आणि आजूबाजूला बरेचसे वीरगळ आणि गणपतीची मूर्ती. म्हणजेच हे देऊळ/स्थान मुळात निदान यादवकालीन तरी असणारच. नंतर त्याचा जीर्णोद्धार होत राहिला असणार. देवळाच्या मागच्या बाजूला मोठीमोठी झाडं आणि मधेच सपाट मोकळवण. अगदी मस्त पिकनिक स्पॉट!
निवांत पाय पसरून बसले आणि गावाची आणि देवळाची माहिती लिहायला घेतली. तेवढ्यात मोबाईल खणखणला. नवरा. आत्ता? या वेळी फोन? वाईट बातमी देण्यासाठी होता. आमच्या अत्यंत जिवलग मित्राच्या वडलांना कामनिमित्त कलकत्त्यात आले असता ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने आयसीयूत ठेवल्याची खबर कळली. माझा हा अगदी सख्खा मित्र - आत्तापर्यंतच्या आयुष्यातली माझी एक महत्त्वाची कमाई. आत्ता तो काकांबरोबर एकटाच होता. बाकी कुटुंब शेकडो मैल दूर. परत हा प्रचंड हळवा! मलाच गलबलून आलं. त्याला फोन लावला. मी तरी काय बोलणार त्याच्याशी आणी तो तरी काय सांगणार? मी त्याक्षणी तिथे असते तरी काय करू शकले असते? जे काही शक्य होतं ते माझा नवरा करतच होता. पण काकांचं काही खरं नाहीये याची कल्पना नवर्‍याने आधीच दिली होती.
अर्थात मला काही माझं काम थांबवता येणार नव्हतंच. तेव्हा या हतबलतेला तात्पुरतं तरी निग्रहाने बाजूला ठेवून पुढच्या वाटचालीसाठी उठले.

संगमाच्या त्या बाजूला, ओढा ओलांडून गाव क्र. २. शाळेच्या इमारतीतच एका बाजूला पंचायत ऑफिस. गावात जर कुणाची ओळख नसेल तर सरळ शाळेत किंवा पंचायतीत घुसायचं. म्हणजे निदान गाव हिंडून दाखवायला कुणी स्थानिक सोबत मिळते. या पंचायतीत कसली तरी मीटिंग चालली होती. एकूणच पंचायत सदस्य थेट कुठल्यातरी ग्रामीण मराठी चित्रपटातून/ तमाशापटातून आणून बसवल्यासारखे. मी गावात कशासाठी आलेय (इतिहास संशोधक आहे - गावाचा इतिहास - जुन्या मूर्ती/ देवळं आहेत का?, इ. इ.) हे बहुदा सगळं डोक्यावरून गेलं असणार. कारण माझ्या प्रास्ताविकानंतर पाच मिनिटं गाढ शांतता पसरली होती. तेवढ्यात काहीतरी अर्ज द्यायला एक गावकरी शिक्षक आत आले. तेव्हा घाईघाईने सरपंचाने माझी व्यवस्था त्यांच्यावर सोपवली.
गावात/ गावाबाहेर पांढर वगैरे असल्याचं कधी त्यांच्या ऐकिवात नाही. पण गावात एक मारुतीचं प्राचीन देऊळ आहे, फक्त ते सध्याच सिमेंटमधे नव्याने बांधून काढलंय अशी 'उत्साहवर्धक' माहिती कळली. मारुतीच्या देवळाबाहेर २-३ वीरगळ, एक गणपती. म्हणजे गाव निदान यादवकालीन! गावात खरंचच कुठं पांढर असल्याचं जाणवलं नाही. फक्त मारुतीच्या देवळापाशी पुसट शंका यावी अशा खुणा दिसल्या. २-४ छोटी खापरंही मिळाली पण मध्ययुगीन.
गावाच्या समोर, नदीच्या पल्याडच्या काठाला आणखी एक गाव. तिथे पांढर आहे का? या प्रश्नावर गावकर्‍यांमधे दोन तट पडले. आहे - नाही वरून. निर्णय काही लागेना. शेवटी खुद्दच जाऊन पहावे म्हणून निघाले. गावापासून खाली सुमारे १ किमी वर एक बंधारा. बंधारा ओलांडून थोडं चढावर गाव. दुपारी १२॥ -१ ची वेळ. एकंदरीतच गावात शुकशुकाट होता. डावीकडे एक मोठी शाळा होती. आत गेलो. शिक्षकांच्या खोलीत. सगळेचजण उत्सुकतेने गोळा झाले. पण इथे स्थानिक शिक्षक कुणीच नव्हते. सगळेच परगावचे. मग एका गावकर्‍याला पकडून आणलं. त्याने सांगितले की इथे पांढर वगैरे काही नाही. (हे गाव काही दशकांपूर्वी जुन्या जागेतून २ किमी स्थलांतर करून आलंय, आणि त्या जुन्या गावात मोठी पांढर आहे. पण ही बातमी मला अजून २ आठवड्यांनी कळणार होती!) तेवढ्यात तिथल्या एका शिक्षकाने त्याच्या गावाला मोठी पांढर आहे अशी खबर दिली. ठीक आहे. माहिती टिपून घेतली. हेही नसे थोडके म्हणून परतीच्या मार्गाला लागले.
परत नदी ओलांडून गाव क्र. २ ला आले. इथून गाव क्र. ३ गाठायचंय. अंतर फार नाही. ७-८ किमी. पण जायला डांबरी रस्ता नाही. तालुक्याच्या गावातून वर्तुळाच्या त्रिज्येसारख्या फुटणार्‍या दोन शेजारशेजारच्या रस्त्यांवर गाव क्र. १ आणि गाव क्र. ३. त्यांना जोडणारी मधली पायवाट शेता-शिवारातून जाणारी. वळणा-वाकणाची. गाव क्र. २ सोडून जिल्ह्याकडे जाणार्‍या डांबरी सडकेला लागलो. थोड्या पुढे डावीकडे पायवाट लागली. बैलगाड्या/ ट्रॅक्टर जाऊन जाऊन त्यात खोल चाकोर्‍या पडलेल्या. एकूणच रस्ता खाचखळग्यांचा. वरून ऊन मी म्हणायला लागलं होतं. मला काही भूक लागली नव्हती पण माझा मदतनीस वाढत्या वयाचा पोरगा. तो काही बोलत नाही पण भूक लागल्याचं चेहर्‍यावर स्पष्ट दिसतं. त्याला चालताचालताच केळी खाऊ घातली. दोन्ही बाजूला उभी शेतं - माणसंच काय, काळं कुत्रं सुद्धा दिसत नव्हतं आसपास. रस्ता चुकलो तर नाही ना असाही संशय एकदा मनात डोकावून गेला. तब्बल दीड तास पायपीट केल्यावर समोर गाव दिसायला लागलं.

गावात दुपारचा शुकशुकाट. शाळाही बंद होती. थोडं पुढं गेल्यावर एक मारुतीचं देऊळ, त्याच्या बाहेर ठेवलेल्या काही यादवकालीन मूर्ती, वीरगळ दिसले. त्याचे फोटो काढले. आसपास नजर टाकल्यावर लक्षात आलं की गाव पांढरीवरच आहे. गावाच्या मध्यभागी असलेल्या घरांखालचा उंचवटा अगदी स्पष्ट दिसत होता. पण अजूनही गावकरी दृष्टीस पडत नव्हते. एकदोघी बायका दिसल्या. त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर त्या चक्क तोंड फिरवून घरात गेल्या आणि धाडकन दारं बंद केली. मग आजूबाजूला पडलेली ३-४ खापरं उचलली. (आणखी काही खापरं दिसायचा चान्सच नव्हता या सिमेंटच्या घरांभोवती). त्या पांढरीच्या उंचवट्याचा फोटो काढणार इतक्यात एक मध्यमवयीन बाई 'काय ग ए भवाने! कशाचा फोटु काढतीयेस?' म्हणून खेकसून अंगावरच आली. ती माझी कुठलीच गोष्ट/ स्पष्टीकरण ऐकायला तयार नव्हती. शेवटी तिचा नाद सोडून गावाच्या वेशीकडे निघाले. पंचायतीचं ऑफिसही बंद. त्याच्या समोर चारपाच गुंडांसारखी दिसणारी आडमाप उग्र माणसं बसली होती. चिक्कार प्यायलेली. तो भपकारा मला इतक्या लांबूनही जाणवत होता. प्रश्नोत्तरांचं सत्र सुरू झालं पण ते 'तुम्ही कोण? कुठल्या? काय काम?' इतक्यावरच आटपलं. त्यांनी सांगितलं की 'तालुक्याच्या गावाला पार्टीचे साहेब आल्याने सगळी पंचायत, शाळाशिक्षक ही मंडळी त्यांच्या बरोबर मीटिंगला गेलीयेत. सरपंचाच्या परवानगीशिवाय आम्ही गावाची काहीही माहिती देऊ शकत नाही. एवढंच काय, पुरुषमाणूस नसताना तुम्हाला गावात हिंडायची परवानगीही देऊ शकत नाही. तेव्हा तुम्ही आपलं जायचं बघा!' ('पुरुषमाणूस नसताना' हा विनोद मला आत्ता आठवून जाम हसू येतंय पण त्या क्षणी संताप संताप झालेला!). माझी तरीही थोडी वाद घालायची तयारी होती पण मदतनिसाने जवळजवळ हाताला खेचतच मला गावाबाहेर काढले. तो म्हणाला, 'ताई, हे गाव प्रसिद्धच आहे आडमुठेपणा आणि गुंडगिरीबद्दल! तू उगाचच त्यांना उचकवू नकोस. आत्ताच्या आत्ता चल इथून.' तो स्थानिक असल्याने त्याला माझ्यापेक्षा नक्कीच जास्त माहित! गुपचूप गावाबाहेर पडले.

शेजारीच ओढा ओलांडून गाव क्र. ४. इथे मी २-३ वर्षांपूर्वी एकदा येऊन गेलेय.. इथलीही लोकं अशीच आडमुठी आणि अज्जिबात मदत न करणारी. गेल्या वेळी मला आणि माझ्या मैत्रिणीला थोडी टिंगलटवाळीही सहन करायला लागली होती. पण पंचायतीच्या शिपायाने आणि एका म्हातारबुवांनी खूप मदत केलेली. या गावात पण पांढर वस्तीखालीच आहे. गाव साधारण १०-१२ व्या शतकातलं तर निश्चितच. माझ्या आधी १९६० च्या दशकात संशोधकांना इथे ४००० वर्षांपूर्वीची खापरं सापडलेली, पण आता त्याचा कुठे मागमूसही नाही. गावात गेले आणि पाहिलं तर काय! निर्मल ग्राम योजनेअंतर्गत सगळ्या रस्त्यांवर खडी-डांबर ओतून पक्के रस्ते केलेले. त्यामुळे उरलीसुरली पांढरही पूर्णपणे दबली गेलीये. जाऊन तिथल्या देवळाच्या पायर्‍यांवर बसले. देऊळ उत्तर मराठाकालीन पण आत विष्णुची १२ व्या शतकातली एक अतिशय सुरेख मूर्ती आहे. समोरच वीरगळ, इतर मूर्ती अस्ताव्यस्त पडलेल्या. या सगळ्याचं फोटो डॉक्युमेंटेशन आधीच्या भेटीतच केलंय. पायर्‍यांवर बसून पाच मिनिटं दम खाल्ला, थोडं पाणी प्यायलं, आणि त्या पंचायतीच्या शिपायाला शोधायला निघाले. इथले लोकपण हो-नाही सांगायलाही तयार नाहीत. शेवटी बर्‍याच शोधाशोधीनंतर कळलं की तो शिपाई दोन दिवसांसाठी बाहेर गेलाय.
एवढं सगळं होईपर्यंत ४॥-५ वाजले होते. तेव्हा आता परतीची वाट धरणं गरजेचं होतं. आणि या गावात आणखी काहीही शोधाशोध करता येणार नाहीये हेही स्पष्टपणे कळलं होतं. मुकाट गावाबाहेर पडले. स्टॉपवर उभं राहिल्यावर कळलं की अजून तासभर तरी बस नाहीये. एवढ्यात आजूबाजूला निरुद्योगी रिकामटेकडी लोकं जमायला सुरवात झाली. आता कुठल्याच प्रश्नोत्तरांचा सामना करायची ताकद संपली होती. आणि इथे या चौकशीतून काही साध्यही होणार नव्हतं. शेवटी मी आणि माझा मदतनीस दोघंही चालतच तालुक्याच्या गावाच्या दिशेने निघालो. आम्ही इतकं ७-८ किमी चालणार नव्हतोच पण निदान लोकांची कटकट टळली! आसपासची जमीन सुपीक, हिरवी. उतरत्या उन्हात हिरव्या पोपटी छटा मस्त खुलून दिसत असणार. पण आज त्याचंही मला फारसं आकर्षण वाटत नव्हतं. २-३ किमी चालल्यानंतर मागनं एक टमटम आली. खचाखच भरलेली. आम्ही दोघंजण शिकली सवरलेली म्हणून त्यातच सरकून आम्हाला आतमधे जागा करून दिली. दहा मिनिटात तालुक्याच्या गावाला परत!

घरी आल्यावर नेहेमीची चक्रं सुरू झाली - आवरणं, कपडे धुणं, वृत्तांत लिहिणं इ. इ.
आज पहिलं गाव सोडलं तर ठोस असं काहीच हातात आलं नाही. नुसतीच शारिरीक आणि मानसिक दमणूक झाली असं खूप तीव्रतेने वाटून गेलं, पण असतात असेही काही दिवस अशी स्वतःचीच समजूत घातली आणि उद्या काय करायचं त्याची आखणी करायला सुरूवात केली!

आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी: ३ http://www.maayboli.com/node/12477

गुलमोहर: 

अप्रतिम गं वरदा! तुझं खूप कौतुक वाटतं..... छान लिहिलं आहेस.... विशेषतः गावाकडे येणारा अनुभव अगदी बोलका केला आहेस! तुझ्या आधीच्या लेखाप्रमाणे हाही लेख सुन्दर! आवडला Happy तुला खूप खूप शुभेच्छा!!

दमवणारा दिवस होता खरा Happy आणि पुन्हा हाती जास्त काही आलं नाही तर अजूनच थकवा जाणवत असेल पण जिद्दी आहेस!

फार फार आवडतेय ही लेखमाला.

प्रचंड कष्ट आहेत हो! नुस्तं वणवण भटकून कामं होत नाहीत, तर स्थानिक लोकांशी, तिथल्या यंत्रणेशी, सगळ्याशी जुळवून घेत, डील करत काम करायचं! खरंच जबरजस्त!

वरदा तुझे अनुभव खरोखरच रोमांचकारक आहेत.
तुला वेळोवेळी आलेले वाईट अनुभव वाचुन खुपच वाईट वाटलं .

खूप कौतुक वाटलं वाचून. तुमच्या वाटचालीला शुभेच्छा.

निर्मल ग्राम योजनेत डांबराखाली खापरं लपून गेली हे वाचून काय प्रतिक्रिया द्यावी समजेना. गाव सुधारले म्हणून आनंद की ऐतिहासिक ठेवा हरवतो आहे म्हणून दु:ख?
माझ्यामते टाऊन प्लानिंग मध्ये तुमच्यासारख्या तज्ञांचा समावेश असायला पाहिजे.

छान लिहिलयस. आधीच्या लेखाप्रमाणेच सुंदर.
गावागावात मिळणारी वागणुक आणि त्याबाबतचा कडवटपणा न बाळगता तु काम करतेयस हे खरोखरच कौतुकास्पद आहे. तुझ्या जिद्दीला सलाम!

छान.

वरदा, हा भाग पण खूप आवडला. तुम्ही नुसते फील्डवर्क करत नाही तर त्याबरोबर तुम्हाला त्यासाठी गावातले लोक कसे मदत करतील हे बघणे, त्यांचा विश्वास संपादन करणे, शारीरिक आणि मानसिक थकवा आला तरी काम करणे अश्या कित्येक गोष्टींवर मात करत करत काम करता ह्याच फार कौतुक वाटले.

हा ही भाग मस्तच. बर्‍याच गावांमधून, गावातल्या लोकांकडून ही अशी वागणूक मिळत असतानाही दुसर्‍या दिवशी उठून,न कंटाळता, नेटाने आवरुन पुन्हा त्याच कामाला लागणं ह्या चिकाटीबद्दल हॅटस ऑफ.

कमाल आहे हं तुझी... लेख आवडत्या १० त!
ही खापरं म्हणजे नेमकं काय? (फार फार जुनी मातीची भांडी)? अशी जमिनीवरती पडलेली सापडतात?
आणि बघुन कसं काय कळतं कितव्या शतकातली आहेत ते?
अजुन वाचायला आवडेल.

छानच Happy

>>> निर्मल ग्राम योजनेत डांबराखाली खापरं लपून गेली हे वाचून काय प्रतिक्रिया द्यावी समजेना. गाव सुधारले म्हणून आनंद की ऐतिहासिक ठेवा हरवतो आहे म्हणून दु:ख?
माझ्यामते टाऊन प्लानिंग मध्ये तुमच्यासारख्या तज्ञांचा समावेश असायला पाहिजे.

याला अगणित मोदक.

तुमच्या संशोधनाला खुप शुभेच्छा..
माझ गाव मंजरथ आहे, माझ्या गावात तुम्हाला संशोधनाला खुप वाव आहे.
गावाचा उल्लेख गुरुचरीत्रात आहे. जर तुम्हाला कधी वाटल तर मला ई मेल करा. मला तुम्हाला मदद करण्यात आनंद होईल.
माझा ई मेल आय्-डी. karanjkar.kishor@gmail.com

हम्म.
कसल चिकाटीच काम आहे हे.

बाय द वे, जर एखादी दुचाकी (गीअरवाली जसे की स्प्लेन्डर) शिकली तर जाण्यायेण्याचा प्रचंड त्रास आणि वेळ कमी होउ शकेल.
बघा प्रयत्न करुन. Happy

सगळ्यांना मनापासून धन्यवाद! Happy

नानबा, सॅम - तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच्या पहिल्या भागात आणि त्याखाली प्रतिक्रियांमधे मी काही स्पष्टीकरणं दिली होती त्याच्यात मिळतील.

झकासराव - तुमचं म्हणणं खरं आहे. मी पक्की पुणेकर असल्याने मला गीअरचीही दुचाकी उत्तम चालवता येते. पण माझी पाठ मोडकी आहे. जास्त ड्रायव्हिंग केलं की पाठ खूप दुखते. शिवाय काही अपवाद वगळता बहुतेक मोटरसायकल वरून माझे पाय पुरत नाहीत - कारण माझी उंची. शिवाय जिथे जिथे जाते तिथे पुण्याहून दुचाकी घेऊन जाणं शक्य नसतं आणी बाहेरगावांत एखाद्या मुलाला जितक्या सहजपणे दुचाकी उधार मिळू शकते तितकी मुलींना मिळत नाही Sad यावर उपाय म्हणजे दुचाकीवाला मदतनीस शोधते मी. पण सगळीकडे तेही शक्य नसतं...

किश्या - तुम्हाला नंतर मेल करेन.

पुढचा भाग (बहुतेक सध्यातरी शेवटचा!) टायपणं चालू आहे. मग मी या वर्षीच्या फील्डवर्कच्या मागे लागणार Happy

अरेच्या हा पुढचा भाग वाचलाच नाही की मी . मस्त ग वरदा . खुप छान लिहितेस . समाज आणि संशोधक यांच्यातली दरी तू दोन अर्थानी कमी करतेय्स. एकतर जेथे काम करतेस तिथल्या लोकांशी संवाद साधून अन दुसरे इथे तुझे अनुभव शेअर (मराठी शब्द काय बर????) करतेस म्हणूनही Happy
मस्त ! खुप खुप शुभेच्छा !

Pages