गुंड लोकांचे...

Submitted by प्रसाद शिर on 14 February, 2008 - 23:16

भक्त झाले लोक सगळे गुंड लोकांचे
भोवताली भव्य पुतळे गुंड लोकांचे

रोजची चतकोर पत्रे सभ्य लोकांची
अन पहा हे भव्य मथळे गुंड लोकांचे!

पांढर्‍या कपड्यांतली ही पाहुनी 'ध्याने'
चाहते होतात बगळे गुंड लोकांचे...

दंगली करतात त्यांना दंड देताना
न्यायमूर्ती नाव वगळे गुंड लोकांचे

जाळले संसार थोडे, मोडले थोडे
एवढ्याने भाग्य उजळे गुंड लोकांचे

दोस्तहो तलवार नाही, लेखण्या परजा
लेखणीने तख्त निखळे गुंड लोकांचे...

- प्रसाद

गुलमोहर: 

प्रसाद

दोस्तहो तलवार नाही, लेखण्या परजा
लेखणीने तख्त निखळे गुंड लोकांचे...

मस्त गझल

सावरकरांची आठवण झाली, स्फोटक वस्तू म्हणून पेन दाखवलं होत ब्रिटीश पोलीसांना...
त्यांना त्याचा अर्थ किती कळला माहीत नाही

सुधीर

प्रसाद, आवडली, अगदी. काही ठिकाणी मी शिवी दिल्यासारखं 'गुंड लेकाचे' असही वाचलं.... शिवीच्या ठेक्यात हं.... 'लेकाचे.' कसली शिवी होतेय Happy
दोस्तहो तलवार नाही, लेखण्या परजा
लेखणीने तख्त निखळे गुंड लोकांचे...
सगळ्यात आवडला.....

प्रसाद बरेच दिवसांनी... छानच आहे गजल..

ताज्या राजकीय घडामोडींवर अचूक भाष्य
बगळे आणि शेवटचा शेर खूप आवडला...

दाद : अगदी अगदी मी पण गुंड लेकाचे असेच वाचले Happy

visit http://milindchhatre.blogspot.com

रोजची चतकोर पत्रे सभ्य लोकांची
अन पहा हे भव्य मथळे गुंड लोकांचे!

हे तुझं निरीक्षण मला फारच आवडलं
बाकी मी मिल्याशी सहमत सध्याच्या परीस्थितीवर अगदी छान ताशेरे ओढलेस.

दोस्तहो तलवार नाही, लेखण्या परजा
लेखणीने तख्त निखळे गुंड लोकांचे...

जाळले संसार थोडे, मोडले थोडे
एवढ्याने भाग्य उजळे गुंड लोकांचे

खूपच मस्त!

दुसरा शेरही अचूक...
बगळ्यांचा शेर मला नीट समजला नाही... बगळे गुंडांचे चाहते होतात्,हे नीटसे नाही कळले..

व्वा अप्रतिम.
दोस्तहो..वा. सलाम.

गिरी

'बक'ध्यान'माहित आहे का? - बगळा ध्यान लावून उभा असल्यासारखा एका पायावर उभा रहातो पण त्याचं सगळं लक्ष हे मासे पकडून खाण्याकडे असतं... त्याचा संदर्भ आहे या शेरामधे!

>दोस्तहो तलवार नाही, लेखण्या परजा
लेखणीने तख्त निखळे गुंड लोकांचे...
तख्त "पलटे" असे मुद्दामून लिहीले नाहीस असा अन्दाज आहे.. लेखणीच्या संदर्भात निखळे अधिक योग्य वाटत.. छान जमलिये.

दंगली करतात त्यांना दंड देताना
न्यायमूर्ती नाव वगळे गुंड लोकांचे

दोस्तहो तलवार नाही, लेखण्या परजा
लेखणीने तख्त निखळे गुंड लोकांचे...

हे दोन्ही शेर खासच....
मान गये ...