गुणसुत्र

Submitted by हर्ट on 12 February, 2008 - 03:39

गुणसुत्र..

शृंगार रसाने ओतप्रोत भरलेल्या
अनेक रात्रीच्या मिलनानंतर
आपल्या प्रेमाचे फलित म्हणून
तुझा एक शुक्राणू अन्
माझा एक बिजाणू
येऊन भेटलेत परस्परांना
आणि रुजू लागले इवलूसे अंकूर
ह्या उदराच्या चिमुकल्या पिशवीत..

तुझ्याकडे होते XY गुणसुत्र
दोन्ही वेगवेगळे.. अन्
माझ्याकडे होते XX गुणसुत्र
दोन्ही एकसारखेच...

आपल्या ह्या अंकूराचे गुणसुत्र
नेमके कुठले आहे.. ह्यावरून ठरणार होते
त्याचे ह्या जगात येणे अन्
आपले भाग्य दुभाग्य ठरविणे..

बारा आठवड्यांचा काळ उलटला
तशी वाटायला लागली भिती क्षणाक्षणाला
तो XY की XX हे माहिती होणार होते
म्हणून अनावर झाले होते भावनांना..

रे माझ्या दयाघना
नर नारी समानतेच्या नार्‍याखाली
तू मला एक अभय दे
कारण ते फक्त तुच देऊ शकतोस...

पुढ्ल्या युगाची निर्मिती करताना
त्यात थोडासा बदल कर,
आमच्या गुणसुत्रांच्या जोड्यांसहीत
त्यातली भिन्न अक्षरे देखील सारखीच ठेव...

गुलमोहर: