रिंगण

Submitted by अज्ञात on 12 November, 2009 - 15:04

चंद्र आळवीतो; मन झिंगलेले
ढगांच्या पताका; काळीज भुकेले
कोसळल्या धारा; पाट रंगलेले
मातीचा मुलामा; तृण माखलेले

एक की दिलासा; बीज गाभुळले
अंकुरल्या आशा; सण भावुकले
ओहळ सुखाचे; वृंदावन झाले
तुळस फुलाला; मोहरून आले

सयीचा सुगावा; रान काहुरले
हरले हरवलेले; सावरून गेले
अंग अंग अंगणास; कण बिलगले
अवसेच्या पारी; पार रिंगण घातले

रिंगणात छाया, रिंगणात माया
रिंगण आभास रिंगणच वेडा ध्यास
रिंगण रिंगण रिंगणात सारी रास
रिंगणाच्या पटावर खेळे हा प्रवास

................अज्ञात

गुलमोहर: