देवगाणी

Submitted by आशूडी on 11 November, 2009 - 23:25

काल यशवंत देव यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या "देवगाणी" या कार्यक्रमाला गेलो होतो. स्वतः देव ही उपस्थित होते. शब्दप्रधान गायकीचा नवा ठसा मराठी संगीतावर उमटवणारे अशीच त्यांची ख्याती. सांगा कसं जगायचं, भेट तुझी माझी, नको नको रे पावसा, या जन्मावर,अरे संसार संसार, माघाची थंडी, बोलगाणी, दिवस तुझे हे फुलायचे, भातुकलीच्या.. अशी एकेक गाणी ऐकताना असं वाटलं की खरंच या शब्दांना जर इतका न्याय मिळाला नसता तर ती अजरामर झाली असती? कवितेचा अर्थ श्रोत्याला समजावून सांगणारं संगीत अशीच त्यांची संगीताची व्याख्या. ते म्हणाले ,"कवींना काय सांगायचं आहे ते त्यांनी आधीच शब्दातून पुरेपूर सांगितलेले होते, मला जास्त अक्कल चालवावी लागली नाही!" केवढी विनम्रता! हिर्‍याला खरा उठाव ,सौंदर्य त्याच्या सोन्याच्या कोंदणामुळे मिळते. तशाच या कविता कालातीत होऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवू शकल्या त्या त्यांना लाभलेल्या अर्थवाही समांतर संगीतामुळं!! देव काकांच्या नर्मविनोदी शैलीने कार्यक्रमात अजूनच रंगत आली. या वयातही त्यांच्या उत्साहाचं कौतुक करावंसं वाटतं.. त्यांच्या "जेथे गाभारा तेथेच कळस" या कविता संग्रहाचे प्रकाशन या कार्यक्रमात सुप्रसिध्द कवी सुधीर मोघे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी देवकाका म्हणतात,"मला जर गायका कडून कवीच्या कवितेला न्याय हवा आहे तर आधी मला त्याचा अर्थ समजायला हवा. शिवाय मला कवितेतलं निदान इतकं तरी समजायला हवं की मी क्वचित कवीला पर्यायी शब्द सुचवू शकेन. मी कविता करायला लागलो ते या ध्यासानं. कवी होण्यासाठी किंवा म्हणवून घेण्यासाठी नाही तर संगीत, चाल बांधताना कवींच्या कवितेला जास्तीत जास्त न्याय देऊ शकण्यासाठी! " व्वा! हेच उद्गार केवळ प्रेक्षागृहात टाळ्यांच्या कड्कडाटात घुमू शकतात या प्रसंगी! " महाराष्ट्राला अनेक थोर, महान दिग्गनज लाभले पण अगदी "लाडकी" व्यक्तिमत्व दोनच..! पुलं आणि बाबूजी! " ( एक संगीतकार दुसर्‍या संगीतकाराची अशी ओळख क्वचितच करुन देत असेल! ) असे सांगत पुलं च्या प्रथम पुण्यस्मरणी त्यांनी केलेली कविता स्वत: ऐकवली आणि पुलं व सुनीताबाईंच्या आठवणीने सर्वांचे डोळे ओलावले. सध्याच्या आधी चाल व मग कविता लिहायच्या नवीन फॅशन वरुन त्यांनी एक अभिनव प्रयोग केला आहे. ५५ हिंदी चित्रपटातील २८ संगीतकारांची (हो, रेहमानपर्यंत! )६६ गाणी शोधून त्यावर त्याच चालीची ,जमल्यास त्याच अर्थाची, कधी विडंबने, हिंदी गझलवर मराठी गझलच अशी ७५ नवीन गाणी लिहिली आहेत. रिमिक्स नाही, उपहास नाही! त्याची झलक त्यांनी दाखवली.
(हिंदी गाणं मनात म्हणून बघा, मग त्याच चालीवर हे गाणं म्हणा.)
उदा. : पियू बोले पिया बोले क्या ये बोले जानू ना
--> त्याचे डोळे, तिचे डोळे
कसे भिडले सांग ना!!
पुढे फार सुंदर प्रेमगीत आहे.. सॉरी, सर्व शब्द लक्षात नाही राहिले..
२.(हे बहुधा जुनंच विडंबन आहे, माहितही असेल तुम्हाला.)
उदा. : ढगाला लागली कळ
--> राजकारणात साठलाय मळ
त्याची भोगतोय फळं!
या गाण्यांचा स्वतंत्र कार्यक्रम डिसेंबर मधे होणार आहे.
ही गाणी ऐकवल्यावर ते म्हणतात, "मराठी साठी काही करायचं असेल तर हे करा!!"
क्या बात है! वयाच्या ८४ व्या वर्षी ही प्रयोगशीलता, सृजनशीलता पाहून 'तेथे कर माझे जुळती ' ची प्रचिती येते! खरोखर मराठी साहित्य-संगीतावर या काही लोकांचे अनंत उपकार आहेत. Happy
तटी : हा कार्यक्रम लवकरच साम मराठी वर प्रक्षॅपित होईल पण एडिटिंग मधे काय काय काटतील याचा नेम नाही म्हणून हा प्रपंच! Wink

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशु, मस्त कार्यक्रम. त्याची बहुतेक गाणी साधी सोपी आणि म्हणायला सहज आहेत. म्हणून कदाचित जास्त आवडतात!! Happy

अ‍ॅडमिनने माझी ही पोस्ट स्वतंत्र धाग्यावर हलवल्याने त्यात अजून भर टाकण्याचा व तुम्हाला जास्तीत जास्त वर्णनात्मक अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद अ‍ॅडमिन. Happy

आशु लकी आहेस ग! मस्त झाली असणार गाणी. मी त्यांची " तीने सांजा एकटीने खाल्ला " आणि "संथ गातसे .... " हि विडंबन ऐकलीयेत
धनु.

व्वा! मस्तच.
आमच्यापर्यंत हे पोचवल्याबद्दल आशू तुला धन्यवाद.

तो कार्यक्रम टिव्हीवर कधी लागेल तेव्हा प्लिज सांग.