रुमाली रहस्य - श्री. गो. नी. दाण्डेकर

Submitted by चिनूक्स on 2 November, 2009 - 12:24

श्रेष्ठ कादंबरीकार गो. नी. दाण्डेकर यांनी लिहिलेली एकमेव रहस्यकथा, किंवा कादंबरिका म्हणजे 'रुमाली रहस्य'. बालवयात गोनीदांवर नाथमाधव आणि ह. ना. आपट्यांच्या कथा-कादंबर्‍यांचा विलक्षण प्रभाव होता. 'ह. ना आपट्यांची कळस ही रहस्यकथा वाचूनच आपणही पुढे रहस्य प्रांतात शिरलो', असं गोनीदा म्हणाले होते.

'रुमाली रहस्य'चं कथानक अठराव्या शतकातल्या पुण्यात घडतं. मराठेशाही, नाना फडणवीस - घाशीराम कोतवाल - रामशास्त्री प्रभुणे यांच्या परिसर आणि सामाजिक - राजकीय पर्यावरणात घडणारी ही कादंबरिका गेली पंचेचाळीस वर्षे उपलब्धच नव्हती. मृण्मयी प्रकाशनाने ती नुकतीच पुनर्मुद्रित केली आहे.

गोनीदांच्या कसदार लेखणीतून उतरलेल्या या पेशवेकालीन रहस्यकथेची ही काही पानं ...

rumalirahasya.jpg

'आज रात्रीपासून दिल्लीदरवाज्यावरचे पहारेकरी बदला. दरोबस्त बंदोबस्त पक्का करून आम्हांकडे वर्दी रुजू करा.'
घाशीराम कोतवाल शेवटचा हुकूम फर्मावून मसनदीवरून उठले. पहारेकरी-ढालाइतांचे मुजरे घेत ते बाहेर पडणार,तोंच कोतवाल-चावडीच्या रोखाने त्यांना गोंगाट ऐकू आला;
'खून ! खून !'
घाशीराम जगीच थबकले. त्या अस्वस्थ कालांत खून म्हणजे कांही मोठी अपूर्वाईची बाब नव्हती. मात्र घाशीरामांनी कोतवालीच्या वस्त्रांचा स्वीकार केल्या दिवसापासून पुण्यांतली अंदाधुंदी कमी करीत आणली होती. पेठांपेठांत चौक्या बसवून त्यांनी रात्रीचे फिरते भालाईत ठेवून मोठा छान बंदोबस्त केला होता. त्यामुळे चोर्‍यामार्‍यांचे प्रमाण तर कमी झालेंच होते, पण खुनासारखे प्रकारही थांबले होते.

अशा स्थितींत अगदी रात्रींचा पहिला प्रहर असतां आणि पुण्यांतली माणसांची वर्दळ अजून कमीं पडली नसतां खून व्हावा, याचें त्यांना किंचित आश्चर्य वाटलें. लगेच त्यांनी एका स्वाराला बोलाविलें आणि त्याला म्हटलें,
’फौरन् दवडत जा, आणि काय गडबड आहे, तें पाहून ये.'
स्वार गेला.
घाशीराम अस्वस्थपणें फेर्‍या घालत राहिले, पण त्यांना फार काळ वाट पाहावी लागली नाहीं. लवकरच हातीं एक प्रेत घेऊन दोनतीन माणसें आणि त्यांच्या मागें आरडाओरडा करीत लोकांचा समूह चावडीजवळ येऊन पोंचला.

दाराशीच पहारेकर्‍यांनी त्या जमावाला अडविलें. प्रेत घेऊन आलेल्या माणसांस मात्र त्यांनी पुढें जाऊं दिलें, तो खवळलेला समूह. 'खूनी कोण तो धुंडून काढा ! त्यास आमच्या हातीं द्या !' असा गलगा करीत तिथेंच उभा राहिला.

ते इसम प्रेत घेऊन चावडीच्या ओटीवर आले. घाशीरामांनी त्यांना प्रेत खाली ठेवण्यास सांगितलें व त्यांनी प्रेताचे तोंड न्याहाळून पाहिले आणि तत्क्षणी विस्मयोद्गार काढीत ते मागें झाले !

ते प्रेत सरदार सर्जेराव घारे यांचे होते !

सर्जेराम म्हणजे मोठी मातब्बर असामी ! शिक्रापुरीं त्यांची मोठीपागा होती. तींतली घोडी खाशांच्या स्वारांकरीता वापरलीं जात. मल्हारराव होळकर, पाटीलबाबा शिंदे, ही मंडळीही त्या घोड्यांवर नजर ठेवून असे. भीमथडी ठेंगण्या, पण दमदार घोड्यांची पैदास करणार्‍यांत सर्जेरावांचे नांव अगदी आघाडीवर होते.

सर्जेराव मोठा गोड माणूस. पुण्यांत कोणाशीं त्यांचें वैर नव्हतें. पायांत तांबडाभडक जोडा, मांडचोळणा, डाक्क्याच्या मलमलीची बाराबंदी, डोईवर नोकदार पागोटें, भल्या थोरल्या मिशा, कानीं कनौजच्या उंची अत्तराचा फाया, असे सर्जेराव पुण्याच्या रस्त्यावरून रामराम घेत निघाले, म्हणजे मोठमोठ्या सरदारांनाहीं त्यांचा हेवा वाटायचा.
अशा अजातशत्रू सर्जेरावाचा खून हे एक गौडबंगालच होते.

घाशीरामांनी प्रेत आणलेल्या इसमांस दूर होण्यास सांगून स्वत: प्रेताची तपासणी चालवली. सर्जेरावांच्या सबंध शरीरावर कुठेंही घाव नव्हता. तपासणी चालूं असतां त्यांनी बरोबर आलेल्या इसमांस विचारलें,
'हे कुठें पडलेले सापडले तुम्हांला?’
'दाणे आळींतून रस्ता सोन्यामारुतीजवळ मिळतो, तिथें.'
'किती वेळ झाला?'
'अर्धी घटिका.'
'त्यांना पाहिल्यावर तुम्हीं काय केलेंत? ठीक जाब द्या ! नाहींतर तुम्हांसच जेरबंद केलें जाईल !'
'आम्हांला वाटलें, कीं हे बेशुद्ध पडलें आहेत. पाणी आणण्यास एक माणूस धाडून आम्हीं यांच्या नाकाशीं सूत लावून पाहिलें. पण सगळें शरीर कास्यासारखे थंड पडलेलें पाहून आम्हीं यांना उचललें आणि धांवत चावडीवर आलों.' भीतभीत ते इसम बोलले.
'तुम्हीं यांना पडलेलें पाहिलेंत, त्यावेळीं कोणी इसम तुम्हांस पळून जातांना आढळला काय?'
'नाहीं. आम्हीं ज्यावेळीं यांस पाहिलें, त्यावेळीं तिथें कोणीही नव्हतें.'

घाशीरामांचे लक्ष सर्जेरावांच्या गळ्याकडे गेलें. तिथे त्यांना दोराने आवळल्याप्रमाणे करकोचे आढळून आले ! ते काळजीपूर्वक त्या करकोच्यांचे निरीक्षण करीत होते, तोच त्यांचा मदतनीस आक्याजी देवळे तिथें येऊन पोहोंचला.
'हें आक्रीत ऐकलेंस?' घाशीरामांनी विचारलें.
'होय, धनी. आइकलें, आणि गुन्हेगारांना धरून आणण्यासाठी लगेच हशमही दवडविले आहेत.'
'कोण गुन्हेगार? तुला कसें ठावें झालें?'
'आपणांस विदित असेलच, की सर्जेरांची शिक्रापुरी पागा होती. तिथें मोठमोठ्या नामवंत जातीचीं घोडी पैदा होत.'
'होय. ते तर पेशवांईत कोणासही ठावें आहे. अगदीं थेट सातारियासही सर्जेराव महाराजांकडे घोडीं धाडीत.'
'याच समयीं दहापांच आरब आरबस्तानांतून घोडीं घेऊन गारपिराजवळ पालें देऊन आहेत. त्या आरबांस सर्जेरावांचे येश न देखवून त्यांनी सर्जेरावांचा कांटा काढला असला पाहिजे. कालच शनवारवाड्यांत श्रीमंतांकडे आरब घोडीं घेऊन आले होते, त्यावेळीं नाना फडणविसांनी त्यांस सध्यां घोडीं नकोत म्हणून सांगितलें होते. त्या बयानावरून आरब तापले असले पाहिजेत.'
'पण सर्जेरावांच्या आंगावर कुठेंही वार नाहीं ! केवळ त्यांच्या गळ्यास करकोचे आहेत. ते तूं पाहिलेस काय?'
'धनी ! मला यांत काहीं मोठें विचित्र वाटत नाहीं. आरबांची व सर्जेरावांची कलागत होऊन आरबांनी गळा दाबून जीव घेतला असावा.'

तोच पुन: बाहेर गलका ऐकूं येऊ लागला. चार स्वार पांच आरबांच्या मुसक्या बांधून त्यांना खेंचीत चावडीकडे आणीत होते. संतापलेला जनसमूह त्या आरबांस धोंडे मारीत होता. स्वार बरोबर होते, म्हणून ठीक.. नाहींतर आरबांचे मुडदेच पडले असते.

चावडींत पोचतांच स्वारांनी घोड्यांखाली उड्या टाकल्या आणि आरबांच्या काढण्यांचे दोर हातीं धरून ते आंत आले. घाशीरामांस मुजरा करून ते बोलले,
'आम्ही त्यांच्या तंबूजवळ गेलों, तेव्हा रांडलेक घोरत पडले होते !'
घाशीरामांनी आक्याजीला खूण केली, व त्याला एका बाजूस घेऊन ते म्हणाले,
'आक्याजी, आम्हांला वाटते, तुझें अनमान चूक आहे.'
'धनी, आपणांस काय ठावें नाहीं? हे विलायती चोर वाटेल ती सोंगेढोंगे करू जाणतात.'
'पहा बुवा ! आम्ही तुझ्या तपासाच्या पद्धतीत विक्षेप आणूं इच्छीत नाहीं; पण अजून आम्हांस वाटतें कीं, सर्जेरावांचा खून गळा दाबून झाला नाही. भांडण-कलागत होती, तर भवताली लोक गोळा झाले असते. शिवाय सर्जेराव ही काहीं सामान्य आसामी नव्हे. चारचौघांस भारी इसम. सहज त्यांचा गळा दाबून खून पाडणें, ही तुला वाटते तितकी सोपी गोष्ट नाहीं !'
'धनी ! आपण मला तपास करूं द्यावा. माझी खात्री आहे, की खून आरबांनीच केला आहे. हे विलायती लोक मोठे भामटे असतात. म्हणून तर ते इकडे एवढ्या दूरपर्यंत प्रवास करून येतात. कुठें रूमशाम? कुठें फरांस? पण तिथून येथपर्यंत धडपडतात, ते कांहीं सामान्य नव्हेत.'
'आक्याजी, तुझा तपास चालू दे. मात्र याच वेळीं मीही साबाजीस हातीं धरून तपास चालवितों. काय वाटेल तें होईना का? सर्जेरावांच्या खुनाचा तलाश लागायसच हवा. नाहींतर हा गलका श्रीमंतांपर्यंत पोंचून त्यांची इतराजी व्हायची !'
'होय तर काय ! सर्जेराव श्रीमंतांचे लाडके सरदार ! आतां उद्यांच ही वार्ता वाड्यांत कळून गदारोळ होईल.'
'त्यास आपला इलाज नाहीं. आपण आपल्याकडून येत्नांची पराकाष्ठा करायास पाहिजे. या आरबांचे काय करणार आहेस?'
'आजची रात ठाकून पाहतों. न कबूल झाले, तर उदईक खोड्यांत पाय अडकवून ठेवतों गुलामांचे ! जाताहेत कुठें?'
'पण सर्जेरावांची वाट काय लावायची? आम्हांस वाटतें, यांस मूलबाळ कोणी नाहीं.'
'नाहीं. बाईलही त्यांची कैलासवासी होऊन बरेच दिवस झाले.'
'तरी पण सर्जेराव बडा सरदार. सकाळीं अवघ्यांस बलावून दहनविधि सरकारातर्फे उरकावयास हवा. लगेच एक स्वार इकडे धाड. नानांस खबर दिली पाहिजे.'

आक्याजी बाहेर गेला, आणि त्याने एका स्वारास धाडून दिले. स्वाराच्या मुजर्‍याकडे दुर्लक्ष करीत घाशीराम त्याला म्हणाले,
'नानांच्या वाड्यांत दौडत जा. संध्या आटोपून फलाहार चालला असेल. तातडीनें वर्दी देऊन सांग, कीं सर्जेराव घारे यांचा खून झाला आहे. लगेच संशयित जेरबंद करून आणले आहेत. तपास चालूं आहे.'
'जी, धनी !'
'आणि ऐक. साबाजी पांढरे, भिकाजी गोजरे, दोघांसही तिकडून येतांना बलावून आण. जेवत असाल, तर आंचवण्यास या म्हणावें.'

स्वार त्वरित निघाला. दुसर्‍या एका स्वाराशीं कांहीं बोलून, त्यास बाहेर धाडून घाशीराम चावडीच्या दाराजवळ आले. तंवर जमाव तेथेंच थांबला होता. घाशीरामांस पाहतांच सर्वजण उठून उभे राहिले. ते गलगा करू लागले,
'खुनी आमच्या स्वाधीन करा !'
'आम्ही त्यास पर्वतीवर नेऊन दगडांनी ठेंचून मारूं !'
'त्यास पालथा घालून त्याच्यावरून घोडे दौडवूं !'
'त्याला हत्तीच्या पायीं द्या !'
'त्याची उंटावरून धिंड काढा !'

'थांबा.' घाशीरामांनी हात वर करून म्हटले. गलगा शांत झाला.
'खुनी सांपडल्यावर त्याला सजा सुनावणे हे श्रीमंतांचे काम. त्यांनीं खुन्याला तुमच्या स्वाधीन करावयास सांगितलें, तर तसें करीन. तंवर तुम्ही जा. नाहींतर तुम्हांस घालवून द्यावें लागेल.'

ही जरब ऐकून मात्र जमाव हळूहळू पांगला. घाशीराम आंत परतले, तंवर नानांकडे धाडलेला स्वार येऊन हजर झाला. त्यानें मुजरा करून सांगितलें,
'आपणांस काम आवरल्यावर बोलाविले आहे.'
'तूं निरोप सांगितलास?'
'होय, धनी.'
'निरोप ऐकून काय म्हणाले?'
'क्षणभर तर उगाच राहिले. नंतर म्हणाले, काम आटपल्यावर लगेच बोलाविलें आहे म्हणून सांग.'
'साबाजी येत आहे?'
'होय. भिवाजीही. शेजारी गोंधळी गोंधळ घालीत होता, तिथें बसले होते. लगेच तयार होऊन येतों, बोलले.'
'ठीक आहे. तूं जा.'

घाशीरामांनी सर्जेरावांचे प्रेत झांकून ठेवण्यास सांगितलें व राजवैद्यांस बोलावणें धाडलें. तंवर प्रेत घेऊन आलेल्यांस बसवूनच ठेवलें होतें. त्यांची नांवठिकाणांची चौकशी करून घाशीराम त्यांस बोलले,
'आतां तुम्ही जा. पण पुन्हां बोलाविलें, की हजर व्हा.'

एवढ्यांत साबाजी व भिकाजी असे दोघेही येऊन हजर झाले. दोघेही ठेंगणे. एक भरल्या अंगाचा, तर दुसरा सडसडीत. दोघांच्याही मुद्रा तरतरीत. तंग मांडचोळणा, बंडी, तीवर लपेटलेले उपंरणे, डोईवर पगडी असा दोघांचाही पोशाख. त्यांना खूण करून घाशीरम आंत घेऊन गेले. गादीवर बसून तक्क्यावर रेलत ते बोलले,
'काय झालें, ते ऐकलेंत?'
'होय, धनी.'
वहात्या रस्त्यावर सर्जेरावासारख्या भरदार गड्याचें प्रेत राबता सुरूं असतां आढळतें, याचा अर्थ काय?’
'दुसरीकडे कुठे तरी खून करून प्रेत आणून टाकले असले पाहिजे.'
'पण राबता राहत होता, त्याचें काय?'

इतक्यात नवा बाहेर धाडलेला स्वार आंत आला. घाशीरामांनी त्याला पुसलें,
'काय झालें?'
'सर्जेरावांचे प्रेत गवसण्यापूर्वी एक वेडा माणूस सोन्या मारुतीजवळ मोठमोठ्यानें बडबडत होता. त्याचे बडबडणे ऐकून खूप लोक भोवती गोळा झाले होते, असे मारुतीचा पुजारी बोलला.'
'त्या वेड्याविषयी त्यानें काय सांगितलें?'
'तो वेडा दखनी नसावा.'
'उत्तर हिंदुस्थानातला होता काय?'
'पुजारी बोलला, त्यास तसें वाटलें.'
'प्रेत सापडल्यावर चेडा कुठें गेला?'
'मग तो कुठें गेला, कोणास कळे !'
'बरें आहे. तूं जा.'

तो स्वार निघून गेला.
घाशीराम तक्क्यावर अधिकच रेलत बोलले,
'साबाजी, ऐक. भिवाजी, तू ध्यान दे. सर्जेरावांस दुसरीकडे ठार मारून त्यांचे प्रेत तिठ्ठ्यावर आणून ठेवले. ते ठेवतां यावे, म्हणून एक वेडा मारुतीजवळ बडबडत राहिला. लोकांचे लक्ष तिकडे वेधलें, हें देखून इकडे हे काम उरकलें.'
'आलें ध्यानीं. हुशार दिसतात बेटे.'
'त्यांना तसे वाटते. पण इथे घाशीराम कोतवाली करीत आहेत, हें त्यांस ठावें नाहीं. असू दे. तुम्हीं सर्जेरावांस जखम कुठें आहे, तें पाहिलेंत?'
'नाहीं.' साबाजी बोलला.
'त्यांस कुठेंही जखम नाहीं !'
'अरे ! मग काय विष - ?'
'नाहीं. विष देते, तर तोंडातून फेंस बाहेर येता. तेंही नव्हे. त्यांच्या गळ्यावर करकोचे आहेत.'
'मग काय गळा दाबून - ?' भिवाजीने पुसलें.
'थांबा. आक्याजीनेंही हीच चूक केली. धिंगामस्ती होती, तर तिची कांही निशाणी उठली असती. सर्जेराम माणूस दांडगा. चारांस खाऊन मग प्राण सोडता. पण तो तर जसा कांहीं फिरायास जाऊन येऊन झोंपला आहे.'
'मग आपला होरा काय धांवतो?'
'गळ्याभोंवती रुमाल टाकून सर्जेरावांस मारलें ! एक क्षणही न लागतां त्यांचा प्राण गेला !'
'बाप रे !' साबाजी शहारला.
'ऐक. आक्याजीने आरबांवर शक घेतला. पण त्यांची ही पद्धति नव्हे.'
'नव्हे नव्हे ! आरब गडी आडदांड. समोरासमोर लढून खांडे पाडतील.'
'बरोबर आहे तुझा होरा. पैका देईल, त्याची चाकरी करतील. त्याहून अधिक पैका मिळाला, तर पहिल्या धन्याचा मुडदा पाडतील. पण त्यांच्याजवळ लुकाछिपी नाहीं.'
'मग हा खून कोणीं केला असेल?'
'ठगांनीं किंवा पेंढार्‍यांनीं ! गळ्यांत रुमाल घालून मारण्याची त्यांची पद्धत. माणूस चालतां चालतां त्यास दुनियेंतून पार करणें हें त्यांचें कसब !'
'होय ! मीही हेंच आइकलें.' साबाजी म्हणाला.
'तर आता असें करायचें --' घाशीरामांचें बोलणें इथेच थांबलें. एक हशम धांवत धांवत आला.
'काय झालें?' घाशीरामांनी पुसलें.
'दाणेआळीतून भालाईत आला आहे.' हशम उत्तरला.
'काय बोलतो?'
'गौरव्वा कर्नाटककरीण - मोठी तयारीची गाणारीण -'
'मला माहीत आहे, पुढे सांग.'
'तिचा - ' हाशम पुन: अडखळला.
'सांग !' जरबेने घाशीराम म्हणाले.
'तिचा खून झाला !'

--------------------------------------------------------------------------------------------------

रुमाली रहस्य

लेखक - श्री. गो. नी. दाण्डेकर

मृण्मयी प्रकाशन
पृष्ठसंख्या - ९३
किंमत - रुपये शंभर

--------------------------------------------------------------------------------------------------
हे पुस्तक खरेदी विभागात उपलब्ध आहे.
http://kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=17249

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान असणार पुस्तक. मी गोनींचं अजुन एक पुस्तक शोधतेय " दर्यासारंग" खुप ठिकाणी शोधलं , आउट ऑफ प्रिंट आहे.
(जरा विषयांतर होइल पण
मला एक विचारयचय कि 'खुन' हा शब्द तेव्हा पासुन प्रचलीत होता का? आणि हा मूळ मराठी शब्द आहे की हिंदी , उर्दू वगैरे ? )

पूर्वी असेच निरोप असत. अर्जन्ट असेल तर विशाळगडावर जेवत असाल तर हात धुवायला रायगडावर यावे वगैरे....

भाषा आणि काही शब्द लक्ष देऊन, पुन्हा पुन्हा वाचले. Happy
पुढे वाचायची उत्सुकता आहे. पुस्तक मिळवून वाचणार हे रहस्य.

नुकतच वाचलं हे पुस्तक. खिळवून ठेवणारं आहे. जुन्या पुण्याचे संदर्भ येतात ते वाचताना छान वाटतं.
चिनुक्स , धन्यवाद पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल. इथे वाचून उत्सुकता होती म्हणून ह्यावेळी
आवर्जून घेऊन आले.