२००९ चे दिवाळी अंक

Submitted by हर्ट on 21 October, 2009 - 05:11

नमस्कार!

ज्यांनी २००९ चे दिवाळी विकत घेतलेत आणि वाचलेत त्यांना विंनती की त्यांनी त्या त्या दिवाळी अंकातील चांगले साहित्य आणि साहित्यकार याबद्दल लिहावे. म्हणजे एखाद्या दिवाळी अंकातील चांगला लेख सुटणार नाही.

आभारी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सा. सकाळ चांगला आहे. अनिल अवचटांचा 'किटक' ह्या विषयावरचा ' आपले थोरले भाऊ ' लेख नेहमीप्रमाणे मस्त. डॉ. आनंद नाडकर्णींचा लेख पण चांगला आहे. आणि 'खेळ जीवन्-मृत्यूचा' ह्या मधले तीनही लेख चांगले आहेत.
मेनकातल्या गोष्टी ठिक आहेत.

उपक्रमचा दिवाळी अंक वाचा... अप्रतिम!!! मला हा संशोधन लेख खूप अभ्यासपूर्ण वाटला.. भारतातले मूळ रहिवासी - चंद्रशेखर आठवले

http://diwali.upakram.org/mukh

मोहिनीमध्ये अनुराधा औरंगाबदकरांनी घेतलेली प्रेम चोप्राची मुलाखत आहे, 'प्रेम नाम है मेरा..', चांगली वाटली. मोबाईलची भाषा, स्वाईन फ्लू आणि हॉटेलमधले मेनू या विषयावरची काही व्यंगचित्रे चांगली जमलीत.

राजू, धन्यवाद! सर्वांचे खरे तर धन्यवाद! किती माहिती मिळत आहे चांगल्या बर्‍या लेखांची.

शतायुषी कुणी वाचलाय का?

'उपक्रम' काय अप्रतिम आहे हा अंक. नंदनचा पण लेख आहे त्यात. खरचं राजू पुन्हा एकदा धन्यवाद! अगदी मांडणी, मुखपृष्ठ, आतले साहित्य सर्वच काही उत्तम जमले आहे.

उपक्रम अंकाची मांडणी फारच सुंदर आहे. यापुढील मायबोली अंकात तसे काही करता येईल का? सर्व लेख एकाच पानावर व प्रत्येक लेखाची प्रस्तावना लगेच. मला मायबोली दिवाळी अंकातील विभागांची नावे व लेखांच्या नावावरुन लेख कश्याबद्दल आहे याचा पत्ताही लागत नाही. तसेच अनुभूती हा विभाग दृकश्राव्य आहे हे अजिबात कळत नाही. इथे काही बाफंवर चर्चा बघुन जरा टुयबलाईट पेटली. असो..

नात्या, मावणार नाही सगळे. त्यांनीही उजव्या बाजूला पहिल्या ३-४ चौकोनात लिन्क्स दिल्या आहेत, सगळे लेख नाही मावलेले. आणि लेख कशाबद्दल आहे आधी नाही कळले तर आत जाऊन बघायचे. Happy

इसकाळचे टेम्प्लेट मला आवडले. त्यांचे मागच्या वर्षीही छान होते. मागच्या पानावर आर्च ने लिन्क दिली आहे पहा.

मनोगतचा अंक आज चाळला. ले आउट छान आहे. अंक तसा बरा आहे. पण गद्य विभागातील कथा काहीकाही सोसो आहेत.
काही विशेष सापडले की लिंक टाकते.

उपक्रमचा पाहिला पाहिजे अंक आता.आत्ताच नंदनचा लेख वाचला. सुंदर आहे.

कामाच्या घोर गड्बडीत असताना लायब्ररीवाल्याने माहेर चा दिवाळी अंक आणून दिला. काय ट्रीट. मीना बेदरकरांवरील लेख छान आहे. बाकी नेहमीचेच. दोन दिवस ऑफ लाइन वाचले. मला साप्ताहिक सकाळ, मिळून सार्याजणी, म.टा. व मेनका चे अंक हवे आहेत. तुमचे वाचून झाल्यावर. रीसायकल कराल का?

सावंतवाडीमधे ४ अंक असेच विकत घेतले. नुसतेच चाळलेत.
त्यातले चारचौघी आणि अधिष्ठान भिकार.
चारचौघी नावाच्या दिवाळी अंकात कथालेखकांमधे काही काही नावं तर प्रसिद्ध आहेत पण कथांचा दर्जा किमान पातळी पण नाही. संपादक म्हणून रोहीणी हट्टंगडी असे नाव आहे.
अधिष्ठान मधे भोंदूपणाचा गदारोळ आहे.
डॉ. आनंद कर्व्यांचं कामच महत्वाचं आहे म्हणून तो लेख वाचवतो तरी. पण लेख/मुलाखत धन्यवाद आहे.
राम प्रधान म्हणून कुणी ज्येष्ठ पत्रकार आहेत म्हणे त्यांनी एक कथा/लेख लिहीलाय 'ऑटिझम' बद्दल. त्यामधे सतत सगळे टोचून बोलत असल्यामुळे काही करायची इच्छा हरवून बसलेल्या एका मुलाची गोष्ट आहे. हा मुलगा वयाच्या ५-६व्या वर्षापर्यंत नॉर्मलच दाखवलाय. याचा ऑटिझम शी काय संबंध हे मला विचार करूनही कळले नाही. राम प्रधानांना 'ऑटिझम' शब्दाच्या नाविन्याने भुलवले असावे आणि मग काहीही विचार, संशोधन, माहीती करून घेणं असं न करता त्यांनी हा लेख/कथा लिहिली. पण इतकी धडधडीत मोठी चूक छापताना संपादकाची अक्कल शेण खायला गेली होती का या पेक्षा माइल्ड काही वाटले नाही.

लोकसत्ता आणि लोकमत अजून वाचून झाला नाहीये. दोन्हीही वाचायला वेळ लागणारे अंक दिसले.

साप्ताहिक सकाळ च्या दिवाली अंकात अनिल अवचटांचा 'कीटकां'वर लेख आहे. अगदी मस्ट रीड. आणखी कुठल्याशा अंकात निळू फुले आणि सुरेश अलूरकर यांच्यावर आठवण स्फुटे आहेत. दिवाळी अंकांसाठी उत्स्फूर्ततेने लिहिणारे जे मोजके लेखक आहेत त्यात अवचट आहेत. बाकी नुसते 'घाणा' काढणारे हो.आपणही दिवाळीच्या चाराठ दिवसात कम्पलसरी वाचन करतो त्याचा फायदा घेऊन 'घाल पानी अन कर कालच्यावानी' असे प्रथितयश दिवाळी अंकही काढ्ले जातात्.मग केवळ जाहीराती मिळवण्यासाठी उगवलेल्या कुत्र्याच्या छ्त्र्या तर हातातही घेण्याच्या लायकीच्या नसतात.

मौजेचा अंक वाचला. बराचसा आवडला. आतापर्यंतच्या अंकातील सर्वात वाचनिय.
नंदिनीशी सहमत. अशोक रानड्यांचा लताबाईंवरचा लेख म्हणजे रोचक कसा होऊ नये हे तत्व कटाक्षाने पाळलेले आहे. त्यातले "लता" हे विशेषनाम काढुन इतर कोणाचेही घुसवा, संख्यांवर हात फिरवा, झाला होतकरु पीएचडी लेख तयार.
श्री. वि. कुलकर्ण्यांची जी. ए. भेट पण पाटीटाकु. अजून किती वर्ष कोणाकोणाच्या रिसायकल्ड जी.ए. भेटी आणि तेंडुलकरभेटी वाचाव्या लागणारे कोण जाणे.
कमल देसाईंच्यालेखाबद्दल ठरवता येत नाहिये, एकतर प्रचंड प्रामाणिक किंवा प्रचंड fake. तसंही सध्या सुमित्राबाईंच्या चित्रपटात कोणीतरी नॉन अ‍ॅक्टरनी कसं काम केलं हे "य" वेळा वाचलं आहे. कमाल म्हणजे चित्रपटाच्या विषयाबद्दल एकही ओळ नाहिये आख्ख्या लेखात.
मतकरींचा लेख, दांडीयात्रेवरचा लेख, गायतोंडेंवरचा लेख, आशा बगेंच "पंगत", सुलभा ब्रम्हना़ळकरांचा लेख- चित्र शिल्पाची नादवीणा, झुल वेलांनीवरचा लेख, आणि कविता आवडल्या. कथा अजून वाचल्याच नाहीत.

दिवाळी अंकांसाठी उत्स्फूर्ततेने लिहिणारे जे मोजके लेखक आहेत त्यात अवचट आहेत>> हुड - पूर्वीच्या अवचटांबद्दल सहमत. Happy अलिकडे ते सुद्धा बुंदी पाडतात. अजून सा.स. वाचला नाहिये, पण आदतसे मजबूर म्हणून वाचणारे.

सुलभा ब्रम्हना़ळकरांचा मी आजवर फक्त एकच लेख वाचला आहे. तो लेख म्हणजे प्रवासवर्णन होतं ते. या लेखिकेबद्दल जर कुणाला काही माहिती असेल तर लिहाल का? अतिशय छान लिहितात त्या..

रैना, धन्यवाद.

काही चांगल्या कविता असतील तर त्यांच्याबद्दलही इथे लिहा.

>>कमल देसाईंच्यालेखाबद्दल ठरवता येत नाहिये, एकतर प्रचंड प्रामाणिक किंवा प्रचंड fake Lol
मी सा.स. नाही मागवला यंदा.
>>हुड - पूर्वीच्या अवचटांबद्दल सहमत. अलिकडे ते सुद्धा बुंदी पाडतात
अनुमोदन! मी मागच्या वर्षी हेच लिहिलं होतं.

मौजेच्या अंकातला रानड्यांचा लेख हा स्वतंत्र नाही. मागे भारतीय पार्श्वगायकांवरील एक इंग्रजी पुस्तक वाचलं होतं. त्यातलेच बरेचसे मुद्दे आहेत. जसेच्या तसे. हे पुस्तक रानड्यांनी लिहिलं असण्याची शक्यता आहे.
कमल देसायांचा लेख मला आवडला. प्रभाकर पेंढारकरांचे लेख वाचून मात्र आता कंटाळा यायला लागला आहे. विषय बहुतेक सारखेच असतात.
ग्रंथालीच्या 'रुची'चा अंक मस्त आहे. मुखपृष्ठावर आशाताईंचा फोटो आहे. पण आत त्या फोटोखाली लिहिलेलं 'गाणारं झाड' अंकात कुठेच नाही. लतिका भानुशाली, अवधुत परळकर यांचे लेख मस्त आहेत.

डॉ. आनंद कर्व्यांचं कामच महत्वाचं आहे म्हणून तो लेख वाचवतो तरी. पण लेख/मुलाखत धन्यवाद आहे.
>> चिनूक्सने मागल्या दिवाळी अंकात लिहिलं होतं तेच ना डॉ. कर्वे ? तीच मुलाखत वाचायची परत. मस्त जमली होती एकदम

बरोबर तेच ते. चिन्मयने घेतलेली मुलाखत परफेक्ट होती. पण त्या अंकात जोसेफ तुस्कानो असं मुलाखत घेणार्‍याचं नाव होतं..

एकतर माझं डोकं गंडलय नाहीतर सकाळ, लोक्प्रभा यांचे संपादक..... "काहीच्या काही दिवाळी अंक " असा प्रकार करुन ठेवलाय. (इकड्चं काहीच्या काही हजार पटीने चांगल)

'माहेर' दिवाळी अंकाचे वाचन सुरू आहे... मला आवडला. कथा चांगल्या आहेत.

धनंजय आणि कथाश्री वाचलाय का कोणी? या दोन अंकांबद्दल माझा पुर्वानुभव चांगला आहे.

मी मिळून सार्‍याजणी, अक्षर, सा.सकाळ व माहेर हे अंक विकत आणून वाचले. अक्षरमधील डॉरिस लेसिंग(नोबेल विनर) यांच्यावरील लेख माहितीपूर्ण आहे. आवडला. पूर्ण अंक जरा वेळ काढून वाचणार आहे. पण हा अंक खूपच स्टँडर्ड असतो.
मि.सार्‍याजणी : सचिन कुंडलकरचा सुमित्रा भाव्यांवरचा लेख खूप प्रामाणिक वाटला.
वृद्धत्वाच्या वाटेवर मधील सर्वच लेख माहितीपूर्ण आहेत. मीना गोखलेंचा खूप आवडला.
पेडिक्युअर नावाची कथा फक्त प्रज्ञा दया पवार या नावावर छापली असावी असे वाटले. काही जातीवाचक उल्लेख खटकले.
साप्ताहिक सकाळः दी बेस्ट : अनील अवचटांचा "आपले थोरले भाऊ हा कीटकांवरचा लेख!काय बहु आयामी प्रतिभा आहे या माणसाची! कीटकांच्या विश्वातली अद्भुत यात्रा. यातले फोटोही अप्रतीम आहेत.
रोहिणी निलेकणींची मुलाखतही वाचनीय! आनंद नाडकर्णींचा टाईम मॅनेजमेंटवरचा लेखही मार्गदर्शक.
नीता गद्रेंची महानगर - मुंबापुरीवर प्रकाश टाकणारी कथा मस्त!
विद्युल्लेखा अकलूजकरांचा लेख : आर्थिक मंदीच्या काळात शहर प्रशासनाला परवडत नसताना कॅनडातील रिचमंड मधील नागरिकांनी एका सार्वजनिक बागेचा कसा कायापालट केला ...अगदी आपण धडा घेण्यासारखी गोष्ट आहे.
वैशाली करमरकरांचा जर्मनीतल्या हॉस्पिटल सिस्टिमव प्रकाश टाकणारा लेखही वाचनीय!
एकंदरीतच हे चारही अंक वाचनीय वाटले.
कविता वाचन अजून नीट केले नाही.

ममम३३३,

खूपच छान माहिती दिलीत तुम्ही त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आता मी नक्कीच मि. सा. घेणार आहे.

परिसवांद वगैरे कुणी वाचतं का?

शतायुषी मधे कशावर माहिती दिली आहे?

धन्यवाद.

माहेर आणि मेनका मला नेहमीच आवडतात. कधीच निराशा करत नाहीत. कथा छान असतात. या वेळचे अजुन वाचले नाहीयेत पण घरी विकत घेऊन ठेवायला बोलले आहे.

www.myemagazines.com इथे बघा. बरेच दिवाळी अंक ऑनलाइन आहेत. रजिस्टर करावं लागतं. रजिस्टर केल्यानंतर एक महिना फुकट अंक वाचता येतात.

अंजली, तिथे दिसतायत तेवढे वाचता येतात का?

लोकप्रभा 'वाचून टाकला'. तरी त्यातला अच्युत गोडबोलेंचा 'मल्लिकार्जुन मन्सूर' यांच्यावरचा लेख आवडला. मोहिनीमधली वाचलेल्या गोष्टींपैकी 'दयेचा पाझर' आवडली.

'चंद्रकांत' मध्ये नेहमीप्रमाणे दीर्घकथा, कादंबर्‍या आहेत. अजून काही वाचलेले नाही. 'धनंजय' अंकही त्यांचाच. मागच्या दोन वर्षी मला चांगला वाटला होता.

Pages