जन्माष्टमी

Submitted by चिन्नु on 30 January, 2008 - 11:59

असं वाटतं तू आजही टेकून बसली असशील
अंगणातल्या वृंदावनाशी..

अर्धोन्मिलीत जाईजुईला आणि
चांदणे पांघरून जवळच पहुडलेल्या आकाशाला
माझ्या बालखोड्या सांगत-
कापर्‍या हातांनी दिव्याची उतू जाणारी वात
सारखी केली असशील..

हल्ली म्हणायला लागली होतीस
तुझ्या डोळ्यांना फॅशन कळायला लागली आहे
मागच्याच आठवड्यात एका भिंगाला तडा गेला होता तेव्हा..
तरी बसलीच असशील सुईदोरा घेवून
काहितरी शिवत- नव्हे- ती तर सुईधाग्याची काँपीटीशन नाही का?
तरी सुईच जिंकते असच सांगतात ना तुझ्या चेहर्‍यावरच्या सुरकुत्या..
(तू केलीसच घाई सुई होण्याची
संस्काराचे धागे शिवून ठेवलेस तेव्हढे..)

कुंपणाचं दार ऐकतच नाही माझं
चाहुल लागेलच तुला
अंगणभर बाळकृष्णाची पावले असणार बैठकीपर्यंत..
त्या रांगोळीच्या पावलावर पाउल टाकायचा
तुझा हट्ट परत पुरवावा लागणार..
अडखळणारी पावलं शिताफीने लपविणार मी
'चढलेली' लपविणारं मन कधीच सोंगाड्या झालयं..
जगाच्या बाजारातलं घाउक चंदन बनायचा प्रयत्न चाललाय..
अश्या अनेक उठणार्‍या वादळांना थोपवीत पोहचेन मी तुझ्यापर्यंत
"माझा बाळकृष्ण तो!" म्हणून कानशीलावर बोटं मोडशील ना?

हल्ली पाउस फार पडतो गं
पावलांची रांगोळी पुसट झाली आहे..
तुळशीच्या कट्ट्याला चैन पडेना
विचारत होता जन्माष्टमी परत कधी येणार म्हणून?

- चिन्नु

गुलमोहर: 

चिन्नू, सुरेख ग

सुंदर, चिन्नू.
<< चांदण पांघरून जवळच पहुडलेल्या आकाशाला>>
सुंदर.

चढलेली' लपविणारं मन कधीच सोंगाड्या झालयं..
जगाच्या बाजारातलं घाउक चंदन बनायचा प्रयत्न चाललाय..>>> आवडलं

खुप खुप धन्यवाद श्यामली.

पावलांची रांगोळी पुसट झाली आहे..
तुळशीच्या कट्ट्याला चैन पडेना
विचारत होता जन्माष्टमी परत कधी येणार म्हणून?>>.
शेवट तर अल्टीमेट......
खुप खुप आवडली.. तुझ्या नेहमीच्या शैलीप्एक्षा वेगळा.. प्रयत्न..

खुप खुप धन्यवाद.
बापू ही कविता बर्‍याच दिवसांपासून मन जाळत होती!

लोपा खुप खुप खुप धन्सं ग.

चिन्नु छाने कविता, जरा विचार करायला लावणारी. Happy

पुन्हा पुन्हा वाचत राहीलं की अजून अजून कळत जाते.

कविता पोस्टतांना बरीच साशंक होत्ये. तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियांनी खुप छान वाटले.

मला असं मुक्त लिहायला आणि वाचायला आवडतं.....
पावलांची रांगोळी पुसट झाली आहे..
तुळशीच्या कट्ट्याला चैन पडेना
विचारत होता जन्माष्टमी परत कधी येणार म्हणून?
गहन काव्य्....धन्सं...

गहन वगेरे काही नाही गं. अजून शिकतच आहे मी. तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनाने हुरूप येतो.
धन्यवाद.

अशक्य लिहीलं आहेस...
जल्ला... सुरुवातीला कळलीच नाही कविता.... ५-६ वेळा वाचुन झाली तेव्हा कुठे अर्थबोध झाला...
Happy Happy Happy
एकतर इतके heavy लिहीतेस की कळायला वेळ लागतो.... आणि कळल्यावर..... आई ग....... Sad

छान ग चिन्नू. Happy

वाचताना काहीतरी तूटतयस वाटत. पण काय ते कळत नाही Sad

आगे बढो Happy

गोबु, इतक्यांदा वाचलीस कविता! कळाली असंही म्हणालास Happy
खूप धन्सं रे.
केदारा, तुटेपर्यंत कळत नाही रे.
तुटल्यावर शिवायला जमत नाही.. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

चिन्नु ,
शुद्ध वेगळेपण !! ओसंडणारी वेदना. आठवांचा उचंबळ. काळजात खळबळ.
........................................अज्ञात

अज्ञात, खूप खूप धन्यवाद.
तुमचा प्रतिसाद एक छोटी चारोळीच झाली आहे Happy