संध्याकाळ

Submitted by राजू on 30 January, 2008 - 11:54

इतक्या दूर जायचं तर
कुणाची तरी सोबत असावी लागते
कातरवेळी मनाचं कापरं नीवू द्यायचं तर
कुणाची तरी सोबत असावी लागते ..

अंधारात आकृती विरघळून जातात
जसे पाण्यात बर्फाचे खडे
ढगांची निळाई विरुन जाते
क्षितिजाला कवटाळतात गलबतांची शीडे

गाडीची संथ लय चालूच राहते
आणि एकटेपणाची जाणीव
खिडकीतून येणार्‍या
वार्‍याबरोबर वाहते

कदाचित तुझ्यापर्यंत ती पोहचत असेल
एका क्षीण उसाश्यासारखी

तुझेही मन तुळशीपुढे
दिवा लावताना फरफरते का?
त्याच्याभोवती ओंजळ धर
कातरवेळेचा एकांतवास ऊजळावयाला
तेवढा एकच दीप ....
प्रकाशाने भरेल घर.

गुलमोहर: 

अंधारात आकृती विरघळून जातात
जसे पाण्यात बर्फाचे खडे
ढगांची निळाई विरुन जाते
क्षितिजाला कवटाळतात गलबतांची शीडे

ह्या ओळी आवडल्या.

इतक्या दूर जायचं तर
कुणाची तरी सोबत असावी लागते>>>.मस्त..
सगळी कविताच सुरेख आहे..

शब्द छान. थीम छान. 'कदाचित तुझ्यापर्यंत ती पोहचत असेल' पासून पुढं एकदम जमून गेलीय.
आधी थोडी शब्दखेळात गुंतल्यासारखी वाटतेय. लिहीत रहा.

चांगली आहे Happy
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

सही. Happy

खुप आवडली Happy

-------------------------------------------------------------------------
इतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार Happy

कातरवेळची ही मनःस्थिती सुंदर चितारली आहेस.
"तुझेही मन तुळशीपुढे
दिवा लावताना फरफरते का?
त्याच्याभोवती ओंजळ धर
कातरवेळेचा एकांतवास ऊजळावयाला
तेवढा एकच दीप ....
प्रकाशाने भरेल घर."
शेवट अप्रतिम!!:स्मित:

माझ्या "दिवेलागणी" ची आठवण झाली. गुलमोहरवर आहे. उसंत मिळाल्यास भेट द्यावी.

सही.... Happy