चंद्रावरचे पाणी कोणी शोधले?

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

सँटा मोनिकामधील एका उंच इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील कचेरीत बसून मी इंटरनेटवर भारतीय वृत्तपत्रं चाळत होतो. तो दिवस शुक्रवार असल्याने अॉफिसात जरा ढिलं वातावरण होतं. जसं जसं मी वाचू लागलो, तस तसं माझी छाती अभिमानाने फुगू लागली. कॉलर ताठ व्हायला लागली. मानवी इतिहासाला वेगळे वळणच जणू काही भारताच्या चांद्रयान १ या मोहिमेमुळे लागल्याचा एकंदरीत सूर वृत्तपत्रांमध्ये होता.

मला फार आनंद झाला. मनात म्हटलं अॉफिसात दवंडी पिटण्याआधी काही आवडत्या अमेरिकन वृत्तपत्राच्या संकेतस्थळांना भेटी देऊन खात्री करुन घेऊया. सीएनएन, न्यूयॉर्क टाईम्स, लॉस एंजलिस टाईम्स या अमेरिकेतील नामांकीत वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्रांमध्ये मात्र या विषयी एखादी छोटीशी बातमीही नव्हती. मी बुचकळ्यात पडलो. अमेरिकेत मानवी इतिहासाला वेगळे वळण लागले नव्हते तर! घरी गेल्यावर या प्रकरणाचा मी छडा लावण्याचे ठरविले.

बरेचसे वाचल्यावर खूप नवीन माहीती मिळाली. चंद्रावर पाणी असल्याची शक्यता गेले बरेच वर्षापासून शास्त्रीय वर्तुळात वर्तविली जात होती. अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्याचे प्रयत्न होत होते. शनि ग्रहाचे संशोधन करण्यासाठी पाठवलेले कॅसिनी हे नासाचे यान १९९९ मध्ये चंद्राजवळून गेले. कॅसिनीने पाठवलेल्या माहीतीच्या आधारे चंद्रावरील खनिजांमध्ये पाणी शोषलेल्या अवस्थेत असावे असा निष्कर्ष काढण्यात आला. चंद्राच्या ध्रुवावर अधिक प्रमाणात पाणी (बर्फ स्वरुपात) असावे अशीही माहीती मिळाली. एका धूमकेतूवर आदळून त्याचा अभ्यास करण्यासाठी नासाने जानेवारी २००५ मध्ये डीप इम्पॅक्ट नावाचे एक यान सोडले. या यानानेही चंद्राजवळून जाताना चंद्राची माहीती पाठवली. या माहीतीमध्ये पुन्हा एकदा चंद्राच्या ध्रुवावर पाणी असावे हे स्पष्ट झाले. त्याव्यतिरिक्त इतर भागातही पाणी आहे व त्याचे प्रमाण सूर्याकिरणांच्या प्रखरतेनुसार बदलते - दुपारी कमी, सकाळी जास्त - असेही आढळले. त्यानंतर अलिकडेच चांद्रयानाबरोबर पाठवलेल्या मून मिनरॉलॉजी मॅपर या नासाच्या उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागावरुन परावर्तित झालेले प्रकाशकिरण पकडले. त्याचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केल्यावर त्यांना त्यात पाण्याचे नक्की लक्षण असलेले हायड्रोजन आणि अॉक्सिजनचे रासायनिक बंध आढळले.

वरील तीन मोहीमातून मिळालेल्या सबळ पुराव्यामुळे चंद्रावर पाणी आहे की नाही याबद्दल आता जगभरातील शास्त्रज्ञांचे एकमत झाले आहे. नासाने जून २००९ मध्ये पाठवलेल्या चांद्रयानासारख्याच मोहीमेतून याबद्दल अधिक माहीती मिळेल अशी आशा आहे. ल्यूनार क्रेटर अॉबझर्वेशन अँड सेन्सींग सॅटेलाइट असे नाव असलेला हा उपग्रह ९ अॉक्टोबर २००९ च्या आसपास चंद्रावर आदळण्यात येणार आहे. या टक्करीमुळे चंद्रावरील हायड्रोजन आणि पाण्याबद्दल अधिक माहीती मिळणार आहे.

अंतराळ संशोधन हा विषय खूप गुंतागुंतीचा आणि गहन आहे. नासाच्या अनेक मोहीमा सतत चालू असतात. त्यांनी पाठवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या माहीतीचं विश्लेषण जगभरातील शास्त्रज्ञ सतत करत असतात. एखाद्या मोहीमेत थोडीशी जरी नवीन माहीती मिळाली तरी जुन्या मोहीमांचा पुन्हा अभ्यास करावा लागतो. नविन मिळालेल्या माहीतीच्या आधारे जुन्या प्रश्नांची उत्तरे बदलू शकतात. ही अखंड चालू असणारी प्रक्रिया आहे. २००३ आणि २००४ मध्ये ह्यूस्टनच्या जॉन्सन स्पेस सेंटर (नासाचे ह्यूस्टनमधील अॉफिस) मध्ये काम केल्याने मला या विषयाच्या गहनतेची थोडीशी कल्पना होती. चंद्रावरील पाण्याचे आणि खनिजांचे संशोधन संपलेले नाही. किंबहुना आता कुठे सुरुवात होत आहे. सबळ पुरावे मिळाल्याने शास्त्रज्ञ पुन्हा एकदा चंद्रावरील पाण्याकडे वळू लागले आहेत. नविन प्रयोगांची आखणी केली जात आहे. चांद्रयान १ मधून मिळालेल्या माहीतीच्या आधारे चांद्रयान २ मधील प्रयोगांची नव्याने आखणी करावी लागणार आहे.

मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. अनेक मोहीमा अंतराळात सतत पाठवणाऱ्या अमेरिकेला चंद्रावर पाणी असण्याबद्दल मिळालेल्या अजून एका पुराव्याचं अप्रूप नव्हतं. आमची मात्र ही पहीलीच मोहीम होती. आणि पहील्याच मोहीमेतील एका उपकरणाने एका मोठ्या संशोधनाला मदत केली होती. मी आरशात बघितलं आणि पुन्हा कॉलर ताठ केली...

विषय: 
प्रकार: 

सही लिहीले आहे. Happy अमेरीकेने या आधी केलेल्या संशोधनावर कदाचीत आधी संशय घेतला गेला असेल पण भारतीय चांद्रयानामुळे त्यांच्या शोधाला पुष्टी मिळाल्याने अधिक कौतुक झाले असेल.