मैत्र जीवाचे - श्री. विदुर महाजन

Submitted by चिनूक्स on 6 October, 2009 - 01:16

माणूस एकटा येतो, आणि एकटाच जातो, हे काही खरं नाही. जाताना तो अनेकांचं सुख, झोप असं बरंच काही घेऊन जातो. अरुणा ढेर्‍यांच्या त्या कवितेतल्यासारखं.

श्री. विदुर महाजन हे एक उद्योजक आणि प्रख्यात सतारवादक. त्यांचा वीस वर्षांचा मुलगा, मैत्रेय, एका अपघातात हे जग सोडून गेला. हा आघात सोसणं महाजन कुटुंबास खूप कठीण होतं. या दु:खातून सावरण्यासाठी श्री. विदुर महाजन यांनी डायरी लिहायला सुरुवात केली. मग सुरू झाला एक शोध - जीवनमृत्यूचा, सुखदु:खांचा, मानवी अस्तित्वाचा व नात्यांचा आणि कलेचाही. तेच हे तत्त्वचिंतनपर लेखन -'मैत्र जीवाचे'. म्हटलं तर श्री. महाजन यांचं व्यक्तिगत, पण प्रत्येक संवेदनशील माणसाला अर्थपूर्ण जगण्यासाठी बळ देऊ शकेल असं.

श्री. विदुर महाजन यांच्या 'मैत्र जीवाचे' या पुस्तकातली ही काही पानं...

maitrajeevache.jpg

०७ जानेवारी ०६
(११ वाजता आंबी रोडहून आल्यावर - )

अपर्णा म्हणाली, मला मैत्रेयला विसरायचं नाही. मला नॉर्मल लाईफ जगण्याची भीती वाटते. मी कॉलेजात पाऊण तास शिकवताना - मला शिकवता येईल किंवा येणार नाही? जर आलं नाही तर कठीण आहेच. आलं तर त्याचा अर्थ मी शिकवण्यात इन्व्हॉल्व्ह झाले आणि त्याचा अर्थ मी तेवढा काळ मैत्रेयला विसरले. मला तसं होऊ द्यायचं नाही.

मी तिला म्हणालो, 'अपर्णा, व्यक्त होत असलेला आक्रोश हा थांबू शकतो. त्याला मर्यादा असतात. मैत्रेयची चिता जळताना, अस्थी गोळा करताना, विसर्जन केल्यावर मी जे व्याकूळ रडलो, त्याला मर्यादा होती. दहा-पंधरा मिनिटांनंतर, माझं शरीर दमलं आणि माझा आक्रोश आपोआप थांबला, पण अंतर्मनातला आक्रोश? तो मी थांबवू शकत नाही. त्या आक्रोशाची चिता - त्याची आग मनात धगधगत जळत आहे. त्याला अंत नाही.'

'त्या आगीत होरपळून न जाण्यासाठी, त्या आगीपासून काही काळ लांब जायलाच हवं. त्यात आपलं भस्म व्हायला नको. त्या आगीची उब वाटायला हवी. शेकोटीजवळ सतत थांबलं तर चटकेच बसणार. मी सतार वाजवणं, 'स्लिंग'मध्ये - माझ्या कारखान्यात - जाणं, तू कॉलेजमध्ये शिकवणं; हे त्या आगीपासून काही काळ दूर जाणं आहे. आपापली कामं सोडून आपण जर अंतर्मनातल्या आक्रोशाचा आवाज ऐकत राहिलो तर त्याचा त्रास आपल्यालाच होणार. मैत्रेय आपल्यात कधीच नसणार आहे हे जसं खरं तसं दुसर्‍या अर्थानं, तो असणार आहे हेही तितकंच खरं आहे. हे समजलं तर वियोगाचा अर्थ समजेल. अर्थ समजून काम करत राहिलो तर तो आपला कर्मयोग असणार आहे.'

मैत्रेय गेल्यावर मला वाटलं, छत्र जाणं वेगळं, बरोबरीचं कुणी जाणं वेगळं, पण आपल्या अस्तित्वाचा भाग निखळून पडणं फार भयानक आहे! मुलांना काळजाचा तुकडा का म्हणतात हे कळलं - खरं तर, काळीज म्हणजे काय हेही... असंही मनात आलं, की माझाच मृत्यू आहे हा! मीच माझं मरण माझ्या डोळ्यांनी पाहत आहे.

मग विचारांच्या काळ्या मातीवर, मी प्रेरणेचं बीज पेरलं अन लक्षात आलं, की हा मृत्यू नाही. हा पुनर्जन्म आहे. मैत्रेय गेला नाही. मी, अपर्णा, नेहा, तिघाही जणांनी एकत्र येऊन पुन्हा जन्म घेतला. कारण आम्ही तिघंही ३ जानेवारीपर्यंतचे वेगळे होतो आणि ४ जानेवारीनंतरचे वेगळे झालो. आमचा हा पुनर्जन्म आहे - नवा जन्म!

कुदळीनं घाव घालून, मैत्रेयने आमच्या भावविश्वात खड्डा खणला. आम्हांला त्यात आमचं अस्तित्व पेरून, त्याला विचारांचं खतपाणी घालून पुन्हा उभं करायचंय. चांगलं जगायचंय. जीवनवृक्षाला पुन्हा पालवी फुटणार आहे - त्याला फळंही येणार आहेत. आम्हांला त्याची सावली अनेकांना द्यायची आहे. मैत्रेयच्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती त्या वृक्षाखाली क्षणभर बसली, तरी तिला सावली मिळेल, ऊब मिळेल. मैत्रेयच्या देहातीत असण्याची ऊब आमच्या देहार्पणानंतरच थंड होणार आहे. हा विचार मनात आला आणि चक्क एक कोंब फुटल्यासारखं वाटलं!

०५ जानेवारी

सकाळी उठून सतार वाजवण्याची प्रेरणा कुठून आली? काल तर मैत्रेयचं अपघाती निधन झालं. त्याचं क्रियाकर्म करून दमलेलं शरीर केव्हातरी श्रांत झालं आणि सकाळी उठून सतार वाजवण्याची उर्मी मनात आली. भीती वाटत होती, ही मला साथ देणार आहे का नाही? ती भीती होती की पंचवीस वर्षं माझ्याबरोबर जीवनाचा भाग असलेल्या सतारीनं दिलेली प्रेरणा होती? पण मी सतार हातात घेतली अन आवाजाच्या परिणामाचं वेगळं परिमाण जाणवलं. Sound ही काय energy आहे, त्याचा मानवी मनावर काय परिणाम होऊ शकतो, ह्याचं एक अद्वितीय रूप मला अनुभवाला येऊ लागलं. माझ्या अंतर्मनाचा आक्रोश - कोमल रिषभ - तार सप्तकातला होता.

पंचमावर, वरच्या षड्जावर स्थिरावल्यावर मला आधार मिळत होता, शांत वाटत होतं. षड्ज - पंचम स्थिर स्वर का ह्याचा अर्थ त्यापूर्वी कधीच कळला नाही. सतार पंचवीस वर्षं मजजवळ राहून मला ती कळलीच नव्हती. तिची नवी ओळख होत होती. तिच्या-माझ्या नात्याचाही पुनर्जन्म झाल्यासारखं वाटत होतं.

संध्याकाळी मैत्रेयचे मित्र-मैत्रिणी आले. त्यावेळी मी यमन वाजवला. त्यावेळी निर्माण झालेली अगम्य शांतता - कित्येक क्षण... त्यांनी मला काय दिलं? मी शरण गेलो होतो, सतारीला, सुरांना, स्वतःला, यमनला. तो भाव कितीतरी वेळ रेंगाळला!

त्याच क्षणी, मला मैत्रेयनं मोटारसायकलीवरील कसरती करण्याचा नाद (स्टंटिंग) सोडून दिल्यानंतर, त्यानं केलेला स्वतःचा उल्लेख आठवला, 'Once a Wheelie King!' मोटारसायकल चालवताना पुढचं चाक वर करणं याला wheelie असं म्हणतात. त्याला त्यातल्या onceचा अर्थ असा भीषण सुचवायचा होता का? सर्व मित्रांनी निघताना मोटरसायकली सुरू करून, रेझ करून, मैत्रेयला सलामी देऊन ते निघून गेले. त्या आवाजानं आसमंत दणाणला होता. शूर योद्ध्याला वीरगती प्राप्त झाल्यावर जवानांनी सलामी द्यावी तसा तो प्रसंग होता. जगातलं श्रेष्ठ संगीत कोणत्याही आवाजात असू शकतं असं त्यावेळी मनात आलं.

आंबी रोड - मैत्रेयच्या मते, जगातील सर्वात सुंदर जागा आणि त्याची ती in love असलेली babe - Pulsar 180 मोटार सायकल. त्याच्या मोटारसायकलीला तो त्याची बेब म्हणे. म्हणजे त्याची जणू प्रिय मैत्रीण. आणि आंबी रोड त्याच्यासाठी त्याचा स्वर्ग होता. त्यामुळे आताही तो तिथंच असणार! त्याला वेगळ्या स्वर्गाची गरजच नाही.

मी आणि अपर्णा सकाळी एका अनामिक ओढीनं तिथं गेलो. तिथल्या वार्‍याच्या आवाजात मैत्रेय होता. त्याच्या cell phoneवरचे बाईकच्या आवाजाचे सगळे ring tones ऐकत आम्ही दोघं जेव्हा कट्ट्यावर बसलो तेव्हा एक काळा पक्षी समोरच्या झाडावर...

'हाच परवाही आपल्या बदामाच्या झाडावर होता' अपर्णा म्हणाली. अपर्णानं जोरात 'मणी' अशी मारलेली आर्त हाक त्याला ऐकू न जाणं शक्यच नव्हतं. त्या रस्त्यावर, वातावरणात मैत्रेयचं भारून गेलेलं अस्तित्व होतं. तेवढ्यात, कुणीतरी मोटार सायकल चालू करून, एका जागी मागचं चाक वेगात रस्त्यावर घासून, केलेलं burn out पाहिलं. आम्हाला ते अर्धवट भासलं. अपर्णा म्हणाली, 'ते मैत्रेयचं असणं शक्य नाही - त्याचं पूर्णच असणार.' थोड्याशाच अंतरावर एक पूर्ण सर्कल होतं. त्यात मी उभा राहिलो. तो क्षण अंगावर वेगळ्या लहरी आणणारा होता. त्या वर्तुळानं मला, अपर्णाला, नेहाला कशात तरी बांधून ठेवल्यासारखं वाटलं. ते मैत्रेयचंच अस्तित्व होतं. एका वेगळ्याच अनुभूतीनं आम्ही घरी परतलो. त्याच्या सहवासात क्षण जगून आल्यासारखे...

आता प्रचंड गर्दी होणार, माणसं येणार, काहीतरी बोलत राहावं लागणार. इच्छा असो-नसो. So called सामाजिक संकेत! अक्षरशः हजारो लोक घरी आले. ४, ५, ६, ७ व ८ तारखांना सलग पाच दिवस एकावेळी सरासरी पंचवीस-तीस जण अशा गराड्यात आम्ही राहिलो. वाटलं होतं, त्यापेक्षा वेगळाच अनुभव. प्रत्येकाच्या सद्भावना - काही वेळा शब्दांत, काही वेळा हालचालींत, कित्येक वेळा अव्यक्त. त्या भावनांची स्पंदनं जाणवत राहायची. ह्या हृदयीचे त्या हृदयी कळावे त्याप्रमाणे. ह्या मंडळींनी आमच्या भावविश्वात पडलेल्या खोल खड्ड्यात माती भरली, पाणी टाकलं अन ह्या सामाजिक संकेताचं महत्त्वही कळलं.

गेल्या दोन-चार दिवसांत मैत्रेयचा जो मित्रपरिवार आला त्यानं भारावून गेल्यासारखं झालं. ससूनमध्ये बाहेर शंभर एक मित्र केविलवाणे उभे होते. जगताप हॉस्पिटलच्या बाहेर असाच मोठ्ठा ग्रूप आणि इकडे तळेगावात रोज सातत्यानं येणारे मित्र... एक जण म्हणाला, 'त्याची ओळख झाली, मैत्री झाली - मग वाढली... असं नसायचंच. पहिल्या भेटीतच व्हायची एकदम intense मैत्री.' मला मैत्रेय माझ्यासारखा वाटायचा तो त्याच्या याच पैलूमुळे. No Friend आणि Best Friend. मधेअधे काही नाही. सही रे भाऊ! किती माणसं जोडलीस, यार... मैत्रेय सातार्‍याला मयाच्या (मैत्रेयचा एक वर्गमित्र. सातार्‍याचा मयुरेश उर्फ मया) घरी दोन दिवस राहून आल्यावर त्याच्या घरचाच झालेला बलू (मैत्रेयचं घरातलं नाव). मयुरेशकडे त्याच्या मृत्यूचं कळल्यावर ते लगेच घरी आले. मयाची आई ज्या उत्स्फूर्ततेनं बोलली त्यावरून ध्यानी आलं, की त्यानं सगळ्यांना पहिल्याच भेटीत आपलंसं केलं होतं. I am proud of you, my son!
गेल्या दोन-चार वर्षांत त्याची-माझीही छान मैत्री झाली होती. अपर्णा १० सप्टेंबरनंतर कोथरुडला राहायला गेल्यावर तिचं-त्याचंही मैत्र होतं. मी त्याच्यासाठी, त्याच्या मित्रमैत्रिणींसाठी Cool Dad होतो. माझ्या सतारवादक असण्याचा, भ्रष्टाचाराविरुद्ध मी लढलो त्याचा आणि 'दोस्त-बाप' असण्याचा त्याला अभिमान होता. तो त्याच्या दोस्तांनाही माझ्याविषयी भरभरून सांगे, He was my great emotional support as well as his mother's... His mother used to feel that he understood her better than anybody else in the world. मला आठवतंय, मी शाळेतून रेल्वेनं घरी येताना शिवाजीनगर ते तळेगाव प्रवासात माझी सहप्रवाशाशी सहज मैत्री व्हायची.

अस्तित्वाच्या वियोगातून प्रकर्षानं शिल्लक राहतं ते वियोगाचं अस्तित्व. मैत्रेयचा वियोग हेच माझं अस्तित्व आहे. त्याचं असणं हे माझं अस्तित्व नव्हतं. त्या अर्थानं ४ जानेवारी हा माझ्या अस्तित्वाचा जन्मदिवस.
दुःख आत घेण्याचीसुद्धा एकेकाची क्षमता असते, ताकद असते. माझ्या मुलाची चिता जळताना, त्याला अग्नी दिल्यानंतर मी केलेला आक्रोश, त्यातली व्याकुळता, माझ्या अंतर्हृदयात उमटलेली स्पंदनं हे सारं मैत्रेयचं माझ्यात येणं होतं. माझं स्वतःचं माझ्यात येणं होतं.

सकाळी सव्वानऊच्या सुमारास कान्हा येथे ऑफिसला निघण्याऐवजी काही क्षण, मी खुर्चीत बसून रेलत होतो. अनामिक शांततेचे क्षण होते ते. निघवत नव्हतं मला कामाला. आता, त्या जगलेल्या क्षणांचा अर्थ स्पष्ट दिसत आहे. ते मैत्रेयच्या निरोपाचे क्षण होते. तो माझा निरोप घेतल्याशिवाय जाईलच कसा? मीच तर त्याला सोडून आलो. मीच तर त्याला माझ्या अंतर्मनातल्या खोल सागरात तळापर्यंत नेऊन ठेवलं. लगेच फोन आला. अ‍ॅक्सिडेंट झालाय. पुण्याला निघालो तेव्हा स्वतःशीच मोठ्यानं म्हणालो, You have lost your son. - तुला आता हे सत्य स्वीकारायचं आहे!

त्यामुळे जगताप हॉस्पिटलला पोचण्याच्या क्षणी मला आश्चर्य वाटत नव्हतंच. माझा मेहुणा, भैया मला मिठी मारून रडला तेव्हा मीच त्याचं सांत्वन केलं. मैत्रेय शांतपणे झोपला होता. भैयानं 'कन्फर्म' आहे का हे? आपण काहीच करू शकत नाही का? एवढं विचारून, खात्री करून घेतल्यावर, मैत्रेयच्या जवळ बसून त्याच्या केसात हात फिरवताना, त्याचा हात हातात घेऊन घट्ट धरून ठेवताना, त्याच्या कपाळाचं चुंबन घेताना, त्याच्या निस्तेज डोळ्यांकडे पाहताना जाणवत होतं, किती खोल खोल तळाशी ठेवलं आपण त्याला! मनाच्या सागरावर लाटांचं प्रचंड थैमान सुरू होतं. त्यांनी किनाराच उद्ध्वस्त केला होता. मी त्या लाटांनी वाहून गेलो नाही! मी तळाशीच होतो. त्याच्याबरोबर. तसं असताना माझ्या डोळ्यांत आलेले ते अश्रू नव्हते - त्या महाकाय लाटा होत्या!

अंतर्मनाच्या तळाशी, खोलवर गूढ जागी मैत्रेय आहे. मीपण आहे - त्याच्याच बरोबर. त्याला देह नाही. माझ्या देहाला अधूनमधून वर येऊन श्वास घ्यावा लागणार आहे. खरंच, मैत्रेयच्या अस्थी विसर्जन करताना, त्या तळाशी जाताना, इंद्रायणीच्या थंड पाण्यात उभा असताना मला काय जाणवलं? जाणवली ती त्या पाण्याची खोली. समोर जाणवलं ते क्षितिजाचं - आकाशाचं विस्तीर्ण रूप. पंचमहाभूतांना शरीर परत केल्याची खात्री - Body is given back to the elements - त्याशिवाय का आंबी रोडवरच्या आणि आता, कान्ह्याच्या माझ्या केबिनमधल्या वार्‍यात मला मैत्रेय जाणवतोय? त्याशिवाय का गेले चार दिवस सकाळी बाहेर जाऊन, उन्हात उभं राहावंसं वाटलं मला? त्याशिवाय का अपर्णाची आर्त हाक त्यानं अवकाशात ऐकली? त्या घाटावर नीरव शांततेचे जे क्षण आम्ही अनुभवले, जो वेगळेपणा आम्ही अनुभवला, ती मैत्रेय पंचत्वात विलीन होण्याची प्रक्रिया होती. तिचा साक्षीदार होतो मी.

माझ्या देहापासून खूप खूप लांब, खोल, उंच माझं अस्तित्व आहे. तिथं मी त्याच्याबरोबर आहे. आम्ही एकत्रच आहोत. मैत्रेय कायमच आमच्यात असणार आहे. हा भ्रम आहे. आम्ही कायम त्याच्याबरोबर असणार आहोत हे सत्य आहे. मला दिसलेलं अंतिम सत्य.

तो ज्या आवेगानं मला म्हणाला, 'बाबा, आत्ताच बोल.' तो आवेग, तो स्वर, त्यातली अधीरता यांत घाई होती, ती विलीन होण्याची. पण मला ती त्यावेळी जाणवली नाही. पण खरं तर पुसटशी जाणवलीही. त्याला पोचवण्यासाठी मला बोलावत होता तो.

१२ जानेवारी ०६

मैत्रेय गेला. पुत्रवियोग हे माणसाच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दु:ख असं महाभारतापासूनचं सत्य. का? दु:ख करत बसण्यापेक्षा, माझ्या आयुष्यात घडलेल्या ह्या घटनेचं आकलन करणं मला तीव्रतेनं आवश्यक वाटू लागलंय. याचा अर्थ माझ्यासाठी काय आहे?

जन्म देणारा, त्यानं जन्म दिलेल्या अपत्याचा मृत्यू त्याला पाहवा लागणं हे जर फार मोठं दु:ख असेल तर विश्व निर्माण करणार्‍या शक्तीला, जेव्हा दररोज लाखो जीव नष्ट होतात तेव्हा किती त्रास होत असेल? त्यामुळे मृत्यू ही संकल्पना वाईट नसेलच. तो नैसर्गिक प्रक्रियेचा अपरिहार्य भाग..

मग अशा मृत्यूपेक्षासुद्धा मुलाचा मृत्यू वाईट असणार.. कारण त्याचं असलेलं अकालीपण. निसर्गक्रमाप्रमाणे, तो माझ्यानंतर जाणार; त्या ऐवजी तो आधी गेला. का? असा प्रश्न विचारायला समोर कुणीच नाही. त्यामुळे माझ्या हातात 'म्हणजे काय?' असा प्रश्न स्वत:ला विचारण्यापलीकडे आणि त्याचं उत्तर शोधण्यापलीकडे काहीच नाही.

व्यावहारिक पातळीवरचं जीवन जगताना ज्या ज्या गोष्टी केल्या जातात त्यामागची मुख्य गरज पुढल्या पिढीची तरतूद... तेव्हा माझ्या आयुष्यात त्या पातळीवरच्या जीवनाची आसक्ती कमी होणं अपरिहार्य. किंवा तसं झालं म्हणजे आसक्ती कमी झाली तर ते स्वाभाविक आहे. आमच्या जीवनाचा खूप मोठा भाग मैत्रेयच्या भविष्यकाळाशी, पर्यायानं माझ्या-अपर्णाच्या भविष्यकाळाशी निगडित होता. ते कारण कमी तीव्र झालं.

सामाजिक पातळीवर मी जसा त्याचा बाप आहे तसा नेहाचापण बाप आहे - मुलीचा बाप आणि मुलाचा बाप ह्यांत नात्यांचा वेगळेपणा आहे. त्यामुळे बाप म्हणून माझं निम्मं अस्तित्व - कदाचित नेहापुरतं संपूर्ण अस्तित्व शिल्लक आहे. जीवनाचा जोडीदार म्हणून मी अपर्णाचा नवरा आहे. वंश चालू राहावा आणि समाजाची रचना म्हणून निर्माण झालेल्या कुटुंबसंस्थेचा भाग - तेही अस्तित्व शिल्लक आहे. त्या खेरीज कुणाचा तरी मुलगा-भाऊ-दीर-काका-मामा आणि कौटुंबिक पातळीवरच्या नात्यांच्या अशा कितीतरी बंधनांत मी आहेच. त्याशिवाय, जीवन जगताना माझं भावविश्व व्यापणार्‍या किती तरी जणांचा मित्र. एकलाचि जन्मा आलो, मरणालागि एकलाचि जाणे - जणू ऋणानुबंध जन्मांतरीचे - जिव्हाळ्यानं ओथंबलेले. माझ्या जीवनात जी जी माणसं आली ती ह्या ऋणानुबंधांनी बांधली गेली.. अशी कितीतरी माणसं आजूबाजूला आहेत. तेव्हा कोणत्याही पातळीवर बॅलन्स शीट मांडायचा ठरवला तर शिलकीत बरं काही आहे. ज्यात माझं अस्तित्व आहे. आम्ही माणसांच्या जगात नसतो आणि चौघंच असतो तर? यापेक्षा अधिक अवघड झालं असतं अस्तित्व टिकवणं!

याहीखेरीज माझ्या दोन प्रेरणा शिल्लक आहेत - एक म्हणजे ज्ञानाची लालसा. संगीत, साहित्य ह्या माझ्या आवडीच्या विषयांचं ज्ञान. तो किती मोठा महासागर आहे. तो जाणण्याचा माझ्यापरीनं प्रयत्न करणं. हाही माझ्या भावनिक, त्यापेक्षाही वैचारिक जीवनाचा केवढातरी मोठा भाग आहे! दुसरी, भावनिक जीवनात माझी अभिव्यक्तीची गरज. अगदी आतून आलेली. Instinct. ती माझ्याबरोबर आहेच. त्या गरजेसाठी मी निवडलेलं माझं माध्यम - भारतीय शास्त्रीय संगीत- हेही कितीतरी प्रभावी आहे! स्वत:चं अस्तित्व विसरायला लावणारं.

तेव्हा माझ्या मुलाचं सदेह माझ्याबरोबर नसणं स्वीकारूनही करण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत! त्य़ा सार्‍या करण्यात अवघड भाग आहे तो माझं, काळ हे औषध नसलेलं दु:ख. सातत्यानं दु:ख जवळ ठेवून किंवा ते अपरिहार्यपणे जवळ असताना जीवन जगण्याची सवय करणं. ती सवय, जोपर्यंत मी मी सदेह आहे तोपर्यंत मला जडवावी लागणार!

त्रास कुठे होतो? हे आणि अशाप्रकारचे विचार करणं म्हणजे पत्त्यांचा बंगला बांधण्यासारखं वाटतं. एकेक विचार जोडत जोडत बंगला उभा राहतो आणि मैत्रेयच्या आठवणीची एखादी झुळूक तो पाडून टाकते. पुन्हा नवी इमारत - नवा बंगला. तेव्हा मैत्रेयच्या आठवणींचं वादळ निर्माण हौ न देण्यासाठी उपाय काय? त्याच्या आठवणींचं वादळ निर्माण हो‍ऊ न देण्यासाठी उपाय काय? त्याच्या आठवणींना हृदयापासून दूर जाऊ न देणं. त्या दूर गेल्या नाहीत तर येण्याचा प्रश्नच शिल्लक राहत नाही. म्हणजे त्याचं आठवणींच्या रूपातलं अस्तित्व अंतर्हृदयात साठवून ठेवणं. बरं, असाही आव आणण्याचं कारण नाही की त्या आठवणींनी किंवा मैत्रेयच्या अस्तित्वानं वर येऊच नये. ते अस्तित्व मधून मधून डोकावलं तर उलट मैत्रेयच्या भेटीचा तो सोहळा का वाटून घेऊ नये?

अपर्णा म्हणाली, माझी जी मनस्थिती ४ तारखेला सकाळी साडेदहा वाजता होती, ती तितक्याच इंटेन्सिटीनं आताही आहे. तरीही सात दिवस गेलेच की!

मला एकदम माझ्या मनाच्या खोल अंधारात रस्ता शोधण्यासाठी बॅटरी सापडल्यासारखं वाटलं. सात दिवस गेले म्हणजे सात महिने जाणार अन् सात वर्षंही. कालप्रवाह चालू राहणार - तो थांबणारच नाही. ती इंटेन्सिटीही तशीच राहणार. ती कमी होणार नाही. ह्या दोन्ही गोष्टी अटळ अपरिहार्य, आमच्या कुणाच्याही हातात नसलेल्या.

मग हातात काय आहे? जीवन जगणं. नुसतं जिवंत राहण्याची प्रेरणा ही नैसर्गिक आहे. चांगल्या तर्‍हेनं जगण्याची प्रेरणा ही त्या जीजिविषेवर इमारत बांधण्यासारखं आहे. जीजिविषा हा पाया आहे. तेव्हा मी आणि अपर्णा मिळून जेव्हा एक सुंदर विश्व निर्माण करू, चांगलं कुटुंब निर्माण करू तेव्हा त्यातून आमच्या सहवासातली कितीतरी माणसं, आमची एकत्र कितीतरी नाती, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होईलच की! आमच्या एकत्रित अस्तित्वाचा केवढातरी मोठा भाग नेहा आहे. नेहा आहे हा दिलासा आहे. नेहा आहे ही सोय पण आहे, मैत्रेय शरीरानं आमच्याबरोबर नसताना जगण्याची..

१३ जानेवारी ०६

दशक्रिया विधी होता. पिंड ठेवून तटस्थपणे स्वत:ला समजावत मी पुन्हा गुरुजींसमोर बसलो. त्या क्षणी, का कुणास ठाऊक कावळा येतोय का नाही ते पाहवं म्हणून पिंडाकडे पाहिलं? एरवीपेक्षा थोडा मोठा, थोडा अधिक काळा एक कावळा आला की! त्याच्याकडे पाहताना तोही माझ्याकडे पाहतोय असा भास झाला. मी त्याला नक्की पाहात होतो. तो शिवला पिंडाला. का कुणास ठाऊक त्याला एक व्यक्तिमत्त्व होतं. काहीतरी वेगळ्या संवेदना झाल्या मनात - अपर्णाकडून नंतर कळलं, की तिनंही सुरुवातीला पाहिलं तेव्हा तिला दिसलं नव्हतं, पण नंतर ती पुन्हा पाहत असताना तो शिवला अन्‌ म्हणे, पिंड पाण्यात पडला आणि कावळा निघूनही गेला. मात्र तो खायला आल्यासारखा वाटला नाही.

आतेभाऊ पुष्कराज म्हणाला, सुरुवातीला काव काव करणारे तीन-चार कावळे होते. तो वेगळाच कुठूनतरी अचानक टपकला.

गुरुजींना विचारलं, कावळा का? तर ते म्हणाले, की तो म्हणे वकील असतो. आत्म्याचा वकील. त्याच्या वतीनं मृत्यूलोकात बोलणारा. गुरुजींना
विचारलं, शिवत नाही असं पण होतं का कधी? ते म्हणाले, हो कितीदातरी!
दोन-दोन चार-चार तास थांबावं लागतं. मृत्यूलोक! कावळा! वकील! सारंच अगम्य - शोधण्यापलीकडचं.

सतार वाजवताना आठवणी येत होत्या, घाटावर अस्थी विसर्जन करतानाच्या मनस्थितीच्या. माझे अनेक शब्दांचे अर्थ, अनेक जाणिवा, सुरांचा परिणाम... सारे संदर्भ बदलले, अर्थ बदलले, परिणाम बदलले. खोल या शब्दाचा अर्थ, त्याची व्याप्ती किती असू शकते हे आतापर्यंत कळलं नव्हतं. अंतच नाही अशी, खाली खाली जाणारी पोकळी आपल्याच अंतर्मनाच्या किती आत असू शकते अशी काहीतरी गूढ जाणीव हृदयात / मनात होत आहे. मैत्रेयनं जाता जाता या अथांग, अनंत खोलीची जाणीव करून दिली. त्यात खाली कुठेतरी त्याचं अस्तित्व जाणवतं. 'मी आहे रे इथं, पण तू पोचू शकणार नाहीस, बाबा' असं तो मला शांतपणे सांगतोय असं वाटतं, आणि माझी त्याला आर्तपणे हाका मारण्याची धडपड चालू आहे असंही वाटतं. मी पण त्या खोलीत उडी मारण्याचा प्रयत्न करतो, पण कशाला तरी धरून ठेवलं आहे. ते सोडवत नाही. ते काय आहे ते माहीत नाही, पण सोडवत नाही. ते धरूनच खाली पडण्याचा प्रयत्न करतो आणि चक्क क्षणभर भेटही होते त्याची!

शांतता. इतके दिवस, यावेळी मैत्रेय घरी नसायचाच. कित्येकदा मी एकटाही असायचो. पण आता होत असलेल्या शांततेची जाणीव प्रचंड निराळी आहे. ही शांतता कशी आहे? तिला विशेषण नाही. पण शांततेलाही एक dimension आलंय. पोकळी हेच तिचं dimension. तिला रंग आलाय. काळाकुट्ट. भीती वाटावी स्वत:च्या अस्तित्वाची, अशी ही शांतता. कालप्रवाहाचीही जाणीव करून न देणारी. या शांततेत राहिलं की मन कावरंबावरं होतं.

४ जुलै ०६

आज चार तारीख. योगायोगानं सकाळी चार वाजताच जाग आली. अपर्णा काल म्हणत होती, उद्या चार तारीख आहे. मी कॉलेजला जात नाही, आपण एकत्र राहू. मी तळेगावला येते, वगैरे. म्हटलं, तारखेचा बाऊ मुळीच करायचा नाही आणि दुप्पट काम करायचं. मघाशी फोनवर बोलताना म्हणालो, काय गं, आपल्याला रोजच चार तारीख असल्यासारखं वाटतं. परवा महिना बदलताना कॅलेंडर भिंतीला चुकून उलटं लावलं, तर एकदम जानेवारी महिना आला! मग परत जुलै लावला. तेव्हाच जाणवलं, अर्धं वर्षं संपलं. वर्ष! अर्धं वर्षं! आमचा मैत्रेय आमच्यात नाही या गोष्टीला अर्धं वर्षं झालं! बापरे!

खरोखरच, काळ ही विलक्षण गोष्ट आहे. एक बरं आहे, असंही वाटतं, की चला, आपल्या आयुष्याचा प्रवास संपण्याच्या रस्त्यावर अर्धं वर्षं तर ओलांडलं. असंच एक. अशीच अजून काही. किती ते माहीत नाही. पण प्रवास संपेपर्यंत चालू राहणार. तो ठेवायचा न ठेवाय्चा choice नाही. काळ पुढे सरकत राहणार.

माझं लिहिणं चार जूननंतर संपल्यासारखं झालं होतं. कान्ह्याला जाताना मैत्रेयबरोबर ऐकलेला यमन पुन्हा एकदा केव्हातरी ऐकला. त्यादिवशी लिहिलं. गंमत वाटत होती स्वतःची. नेहा आली तेव्हा नव्या आयुष्याला पाच महिने झाले होते. त्या पाच महिन्यात आठ concerts आणि जवळजवळ एकशेतीस पानं लिखाण. खूप दमल्यासारखं झालं. लिहावंसं वाटत नव्हतंच. आज मात्र जाग आल्या आल्या खूप तीव्रतेने लिहिण्यासाठीच उठलो.

आता आठवते, नेहा येण्याआधीची मनस्थिती. त्या विचित्र-दु:खद घटनेचा परिणाम असाही होता, की नेहा परतेपर्यंत, ती सुखरूपपणे नीटपणे येण्याचंच टेन्शन होतं. त्यामुळे ती आपल्यापासून इतक्या दूर राहत आहे, इतक्या लांबचा प्रवास एकटीनं करून येणार, याचाच ताण होता. तो मुंबईच्या विमानतळावर तिला मिठी मारेपर्यंत टिकला आणि नंतर एकदम सुटला. आता ती आली. आमच्यात आहे. आम्ही तिघं एकत्र आहोत. बरीच मंडळी म्हणतात, ती आली. आता काय? बरं वाटत असेल. अर्थात त्यांना काय म्हणायचं ते कळतं, पण गंमत वाटते. मी म्हणतो त्यांना, 'ती येणार होतीच, प्रत्यक्षात आली एवढंच.' ती आली त्यामुळे बरंही वाटत आहे, पण त्यामुळे जो गेलाय... इतके दिवस मुलगा गेलेले आईबाप एकत्र होते. आता भाऊ गेलेली बहीण त्यांच्याबरोबर राहायला आली आहे.

एक मात्र आहे, की आमची व्यग्रता वाढली. तिच्यामुळे. तिचं कॉलेज, नवं routine, मित्रमैत्रिणी, तिच्याबरोबरचं एकूणच सारं sharing यांमुळे आयुष्याला वेग आला. हो, खरंच, नेहा आल्यामुळे आयुष्याला वेग आला. दु:ख कमी झालं नसलं तरी... कदाचित, लोकांनाही तेच म्हणायचं असेल.

बर्‍याचदा असं होतं. काय म्हणायचं आहे ते म्हणायच्या ऐवजी आपण वेगळंच काही म्हणतो. ऐकणारा वेगळंच ऐकतो आणि निष्कर्ष आणखी वेगळा काढतो. त्यामुळे सगळाच गोंधळ.

गेले चार दिवस खूप पाऊस पडतोय. पावसाळ्यात मैत्रेयची आठवण आणखी येते. त्याच्या जन्माचा हा महिना. तो हॉस्पिटलमध्ये असताना त्याच्या जन्माच्या दिवशी, १५ जुलैला मी आणि आक्का M-80वरून भर पावसात तळेगावहून पुण्याला गेलो होतो. आमची दोन्ही मुलं भर पावसात जन्मली. नेहा १८ ऑगस्ट.

मैत्रेयला पाऊस मात्र अजिबात आवडत नसे. तू खूप वैतागायचा. 'बाबा, असं अजून किती दिवस?' असं सारखं विचारायचा. म्हणजे त्याला पावसात भिजणं, मजा वगैरे वाटायची, पण 'आपापलं routine सांभाळायला पावसाचा त्रास होतो. कॉलेज नको होतं पावसात. मग आवडला असता पाऊस मला, नुसती मजा करायला' असं म्हणायचा. माझंही तसंच होतं. त्यात 'स्लिंग'चा कागदपुठ्ठ्यांशी संबंध. इतका त्रास होतो काम पुढे न्यायचा. बॉक्स वाळत नाहीत. वाहनं ये-जा करायला वेळ. रिळं भिजण्याचं टेन्शन. एक ना दोन. मग मी पण स्वतःबरोबर त्याची समजूत घालायचो. अरे, आता तीन नहिने असं चालणार. स्वीकारायचं, वगैरे.

'तो गेल्याला' असं म्हणण्याऐवजी 'नव्या आयुष्याच्या सुरुवातीला' असं म्हणायला मस्त वाटतं, हे आता लिहिताना जाणवतं. बर्‍याचदा, बोलण्यात तसं आलं की अपर्णा म्हणायची, 'नको रे असं बोलत जाऊस, कसंतरी वाटतं ऐकायला'. आता नाही म्हणणार असं कधी. आता म्हणीन नव्या आयुष्याच्या सुरुवातीला अर्धं वर्षं झालं..की आयुष्याच्या नव्या सुरुवातीला?

८ जुलै ०६

१५ जुलै. त्याचा वाढदिवस. काय करायचं त्या दिवशी? अपर्णा मला विचारते अधूनमधून. आम्ही मग गोंधळतो. खरं तर, मला तर त्या दिवसाची भीती वाटल्यासारखंच होतं. काय करायचं?

कुणी म्हणे, त्या दिवशी मृताच्या आठवणीत कुठल्या कुठल्या सामाजिक संस्थांना देणगी देतं. कुणी मुंबईतला फ्लॅट विकून, बरेच पैसे बँकेत ठेवून ट्र्स्ट केलाय आणि मृताच्या अंगच्या गुणांची समाजात वाढ व्हावी म्हणून त्याच्या नावानं बक्षीस देतं. कुणी व्यवस्थित साजरा करतं म्हणे वाढदिवस. आपल्या मुलाचा वाढदिवस, तो गेल्यावरही. आम्हांला तर काहीच कळत नाही.

त्याच्या मित्रमैत्रिणींना बोलवावं, एकत्र यावं आणि घालवावा वेळ. अपर्णाची ही सूचना मला पण बरी वाटत आहे. त्याच्या आवडत्या babeचे, त्याच्या मोटारसायकलीचे मात्र त्या दिवशी नक्कीच लाड करू. झालंय काय, मनाला बरं वाटणारी कोणतीही गोष्ट आम्ही केली किंवा कोणत्याही गोष्टीनं मनाला बरं वाटलं, तर ती गोष्ट म्हणजे वेडेपणा असंच वाटू लागलं आहे हल्ली. तरीही आम्ही ते सारं करतो.

खरं तर, वेड्यासारखं जगायचं त्यापेक्षा जगणं हा वेडेपणा असं अधूनमधून वाटलं तर बिघडलं कुठे? कदाचित शहाण्यासारखं जगताना किंवा जगल्यामुळेच तसं अधूनमधून वाटणार. हे ठरवणार तरी कोण? आपण स्वतःच ना? मग कशाला त्या भानगडीत पडा? जगा!

नेहा नुकती नुकती अमेरिकेहून परतली होती. मला तिच्या एकटीनं घराबाहेर पडण्याचाच ताण यायचा. आता मी सरावतोय. त्या दिवशी असंच तिच्या स्कूटरवर मागे बसलो असताना म्हणालो, your life is more precious to me. ती म्हणाले, हो रे बाबा, and for me, yours. आमचं झालंय काय की, मृत्यूच्या भीतीपेक्षा आम्हांला दुसर्‍याच्या, म्हणजे एकमेकांच्या संभाव्य मृत्यूची भीती अधिक प्रकर्षानं वाटू लागली आहे.

Life is Beautiful पाहिला, नानाच्या आग्रहामुळे. त्यातल्याप्रमाणे आपल्याला स्वतःच्या मृत्यूचं नाही काही वाटत. आपण घाबरतो दुसर्‍याच्या मृत्यूला. आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूला.

लिहिता लिहिता साडेपाच वाजले. अपर्णाला फोन करून ऊठवलं. 'मस्त घालवायचा दिवस' सांगितलं. मीही रियाज करून कामावर निघालो. नव्या आयुष्याची सुरुवात रोज नव्यानं करावीच लागते.

१९ जुलै ०६

१५ जुलै २००६ हा मैत्रेयचा वाढदिवस. एकवीस वर्षांचा झाला असता तो. प्रत्येक वाढदिवशी असले विचार मनात येणार. आम्ही पाहणार त्याच्या बरोबरीच्यांकडे. त्यांच्यात मैत्रेयला. तो नसतानाचा हा पहिलाच वाढदिवस. काय करावं ते कळत नव्हतं. एकेका मित्राचे फोन येऊ लागले. एकूण अंदाज आला. बरेच जण आम्हांला भेटायला येणार. म्हटलं, ठीक आहे.

मैत्रेयने मोटारसायकलीच्या चेनची सुरेख कीचेन केली होती. तशा अनेक करायचं ठरवलं. त्याच्या आवडत्या मेकॅनिककडे गेलो आणि पन्नास पीस करून आणले. पुण्याहून बोहरी आळीतून रिंगा आणवल्या आणि छान खोकी बनवली. त्याने सुंदर गणपती काढला होता. छोटासाच १.५ x १.५ इंचाचा असेल. लीनाकडून स्कॅन करून घेतला आणि ५ x ३१/२ च्या फ्रेम आणल्या. त्यांनी त्याच्या अनेक ग्रूप्सपैकी 'सॅटर्न' ग्रूपचा एका 'ग्रूप फेस' नावाचं चित्र काढलं होतं. मला तर ते चित्र पिकासोचीच आठवण करून देतं. पाच जणांचा ग्रूप. एकाची गिटार, मैत्रेयची बाईक, हचं पैशाचं झाड, राहुलची पुस्तकं आणि रवीचं नाक. या चित्राच्या फ्रेम केल्या.

संध्याकाळी पाच वाजता आंबी रोड. मैत्रेयची सर्वाधिक प्रिय जागा. तिथे एका चौकात मोठ्ठं वर्तुळ. त्यात गवत. झाडं. तिथं आम्ही गेलो. त्याचे पंचेचाळीस मित्रमैत्रिणी सहा वाजेपर्यंत जमा झाले. सगळे पुण्याहून आलेले. आठ-दहा तळेगावातले. एक सॅटर्न ग्रूप, एक फ्रेंड्स, मग आरएसए, आरपी, मिशलीम. काय काय नावं ठेवली होती त्या ग्रूप्सना! सगळी पोरं जमली. मला तर सुचेनाच. तो वाढदिवस साजरा करणं शक्य नव्हतं. ती श्रद्धांजलीची सभा नव्हती. तरीही आम्ही सारे एकत्र होतो.

मी मग सगळ्यांना म्हणालो, तुम्हा सार्‍यांमुळे आम्ही जगतोय. त्याच्या नावातला 'मैत्र'भाव आपण एकमेकांत निर्माण करू, जोपासू आणि एकत्र राहू. त्यानंतर प्रत्येकजण मैत्रेयविषयी बोलला. त्याच्याकडून आम्ही काय शिकलो ते सांगितलं. दुसर्‍याच्या यशानं आनंदित होणारा, जीव तोडून मैत्री करणारा, प्रेम देणारा मैत्रेय. सगळे मनापासून बोलत होते. त्यात औपचारिकता नव्हती. सुमारे तीस-चाळीस मिनिटं ज्या कुणी तो प्रसंग अनुभवला, तो प्रत्येकजण जणू मैत्रेयच्या सहवासात होता. सर्वांची त्याच्याविषयीच्या प्रेमाची, मैत्रीची भावना एकच होती. त्याचा एकत्रित परिणाम त्या वातावरणात भरला होता. जणू ते त्याचं अस्तित्व होतं.

आपर्णानं उपमा घरी केला होता. आम्ही तो खाल्ला आणि त्याचं आवडतं पेप्सी प्यायलो. सगळ्यांबरोबर फोटो काढले आणि आयुष्यातली एक अविस्मरणीय संध्याकाळ मनात साठवत सारे परतले. येताना गाडीत अंधार होता. बाहेरही. पाऊस पडत होता. अपर्णानं जोरात हाक मारली. सगळ्या वातावरणात त्याचंच अस्तित्व होतं. काही जण रात्री अकरापर्यंत थांबले होते. पुन्हा आमचे आम्ही.

दुसर्‍या दिवशी अपर्णा म्हणाली, प्रचंड ऊर्जा मिळाल्यासारखं वाटतं. तिच्यातली positivity पाहून सही वाटलं. खरंच, खूप ऊर्जा मिळाली. अनेक sms आले. लागलो कामाला.

आधी वाटलं होतं, चार जानेवारी ते नेहाचं परतणं हा एक अवघड टप्पा आहे. नेहा आल्यावरही १५ जुलै जवळ येत होती, तेव्हा निराळंच वाटत होतं. आता वाटतंय, चार जानेवारी ते १५ जुलै हा एक अत्यंत अवघड टप्पा. दमवणारा चढ. आम्ही तिघांनी एकमेकांना धरून तो पार पाडला. आता जणू पठार सुरू, पण आयुष्य सहज असतं यावर विश्वास राहिलेला नाही. पुढचे चढउतार कसे असतील, कुणास ठाऊक? तरीही जगायचं एवढं मात्र नक्की.

अपर्णाशी बोलताना एक मुद्दा जाणवला, दु:ख नाही वाटता येत, पण आम्ही जणू मैत्रेय वाटतोय सार्‍यांबरोबर. आणि या वाटण्यामुळे तो वाढतोय. कोणतीही गोष्ट वाटली की ती वाढते. तसंच जणू. मग हे चांगलंच आहे. आमच्या बरोबरीनं तो वाढत राहील, असाच आमच्या प्रत्येकात. आम्हांलाही वाढवेल.

------------------------------------------------------------------------------------

मैत्र जीवाचे

लेखक - श्री. विदुर महाजन
प्रकाशक - ग्रंथाली
पृष्ठसंख्या - १७४
किंमत - रुपये २००

------------------------------------------------------------------------------------

टंकलेखन साहाय्य - श्रद्धा द्रविड, अंशुमान सोवनी

------------------------------------------------------------------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे असलं काही वाचून खूप त्रास होतो. एका जवळच्या मित्रावर हाच प्रसंग आला होता.त्याची तेव्हाची मन।स्थिती अजून आठवते.चिनुक्ष धन्यवाद.पुस्तक मिळवून वाचले पहिजे.त्रास झाला तरी.

कठीण आहे रे बाबा आयुष्य. खरोखर, हे असं पाहिलं की वाटतं आपल्याला जगण्याच्या छोट्यामोठ्या कुरबुरी करायचा अजिबात हक्क नाही. दुखा:ची प्रतवारी करता येत नाही, कुणाचं किती मोठं ते, पण पुत्रवियोगाचं दु:ख वै-याच्याही वाटेला येऊ नये.

असो. चिनुक्स/श्र/अंशुमान- धन्यवाद

'माणूस एकटा येतो, आणि एकटाच जातो, हे काही खरं नाही. जाताना तो अनेकांचं सुख, झोप असं बरंच काही घेऊन जातो'.. चिनुक्स.. धन्यवाद.. यापूर्वी दु:खाशी अक्षरशः तोंडओळख सुद्धा नव्हती.त्यामुळे ते माझ्या वाटेला येणार नाही असंच समजून चालत होते.. नुकतीच काही दिवसापूर्वी आई सोडून गेली आणी ती ज्या परिस्थितीत गेली ते रोज रोज आठवून कुठेही,कधीही रडू कोसळतं,, ही काही पानं वाचली आणी मनात सुविचारांचा उजेड पडला.. मार्ग सुचला अशा मनस्थितीतून बाहेर निघण्याचा. निदान प्रयत्न करायला तरी उमेद आली. आता भारतात आले की हे पुस्तक जरूर विकत घेईन.

मन उदास उदास झाल्,
का कुणास ठाऊक इतक्या दिवसानी माझ्या आजोबांची आठवण झाली.माझे वडील ते हयात असताना वारले. आयुष्याची सावरासावर करता करता त्यांचे उर्वरीत वार्धक्य गेले्. हे सर्व वाचताना तो भूतकाळ डोकावत होता.
अत्यन्त ह्रुद्य अन प्रामाणिक स्वगत आहे.
याची प्रशंसा करताना ही खूप अपराधी वाटते कारण हे साहित्य नसून स्वनुभूतीची अभिव्यक्ती आहे.

'त्या आगीत होरपळून न जाण्यासाठी, त्या आगीपासून काही काळ लांब जायलाच हवं. त्यात आपलं भस्म व्हायला नको. त्या आगीची उब वाटायला हवी. शेकोटीजवळ सतत थांबलं तर चटकेच बसणार.>>> असं आपण करु शकलो तरच दूर गेलेल्या माणसाच्या आठवणी सुसह्य होतात. त्याचे चटके न बसता उबच वाटते.

मैत्रेयच्या देहातीत असण्याची ऊब आमच्या देहार्पणानंतरच थंड होणार आहे. >>> हेच ते नसून जवळ असणं.

चिनुक्स /श्र/अंनशुमन धन्यवाद. रैनाला अनुमोदन. मला पुर्ण वाचवलं नाही. नंतर धीर करुन वाचेन.

अस्तित्वाच्या वियोगातून प्रकर्षानं शिल्लक राहतं ते वियोगाचं अस्तित्व>>> अगदी खरंय. दाटून आलं खूप खूप आतून. सारखे डोळे भरून येत होते पण तरिही पूर्ण वाचून काढलं.

धन्यवाद चिनूक्स. पुस्तकाचं नाव 'वाचायच्या पुस्तकांच्या' यादीत सर्वात वर लिहीलं आत्ताच.

मरण हे जन्माच्या वेळी निश्चित झालेले असते असे म्हणतात. परन्तू असा अपघाती किन्वा अपमॄत्यू होतो तेव्न्हा ? देवाने दिलेले आयुष्य पूर्ण पणे न जगता अर्ध्यावरच आपणास सोडून जाणारे आपले प्रियजन अर्धेच आयुष्य जगतात तर त्यान्चे उरलेले अर्धे आयुष्य आपण त्यान्च्या बरोबर पुढील जन्मात जास्त काळासाठी घालवू शकतो का ? कोणी सान्गू शकेल का ?

अनुभव असता तर सांगितले असते हो!
माहिती हवी आहे विभागात एक नवा बीबी उघडून विचारा. हितगुजमधे यावर अधिकारवाणीने बोलू शकेल असा तज्ञ असेलच ते माहिती देतील. Wink

डीअर अ‍ॅबी च्या सौजन्याने: चान्गली माहिती आहे म्हणुन इथे चिकट्व्ली आहे.

DEAR ABBY: In cities large and small across the globe, a sad reality occurs year after year. Children die. The causes vary -- an auto accident, suicide, drive-by shooting, fire, illness, war or something completely different. Families, friends and entire towns mourn the deaths of children who have died before they could reach their full potential.

For the past 13 years, The Compassionate Friends, a national self-help support organization for families grieving the death of a child, has sponsored a Worldwide Candle Lighting during the difficult holidays to honor the memory of all children -- no matter their age -- who died too young.

Dear Abby readers, whether or not they have been personally touched by such a tragedy, are invited to remember all children who have died by joining in the Worldwide Candle Lighting on Sunday, Dec. 13. Although officially held for one hour at 7 p.m. local time, this has become an event where hundreds of services in memory of children are held throughout the day around the world.

In the U.S. this includes services in all 50 states and Washington, D.C. Dozens of countries are hosts to services. Anyone who is unable to attend is encouraged to light candles in their home, whether alone or with friends and family. Please join us in honoring these children who are loved, missed and always remembered. -- PATRICIA LODER, EXECUTIVE DIRECTOR, THE COMPASSIONATE FRIENDS

DEAR PATRICIA: I am pleased to help spread the word. Your organization is a valuable resource for families and friends of those who have experienced the loss of a child, and I commend you for the work you do.

Readers, you can locate local services on The Compassionate Friends Web site: www.compassionatefriends.org or by calling (toll-free) 877-969-0010. You will also be able to join the thousands of caring individuals who post a memorial message in their online Remembrance Book during the 24-hour period of the Worldwide Candle Lighting and let them know your thoughts are with them.

धन्यवाद मामी Happy

'मैत्र जीवाचे' या पुस्तकाला यंदा महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.