माझा चित्रपट .....!!!!

Submitted by Girish Kulkarni on 1 October, 2009 - 04:53

****************************************************
****************************************************

आई नेहमी म्हणायची....आयुष्य चित्रपटासारख सरकतं
लहानपणी कधी कळलच नाही हे म्हणजे नक्की काय असतं
तेव्हां काय सगळं कस प्रवाही वाटायच
आई-वडील हे जग कित्ती मोठ्ठ वाटायच
मोहाचे रंग गहीरे नव्हते अन मत्सराशी तर नातेच नव्हते
घरातल ते जग अन बाहेरची ती दुनिया इतकं सारं सोप्प होतं
नसलेल्या सुबत्तेला मायेच विरजण अन जगणं कस निर्लेप होतं

मग धीरे धीरे जगाच नव रुप अन दुनियेचा नसता हुरुप कळायला लागला
आईचा वेळ देवापाशी आमच्यासाठी बरच काही मागण्यांत जायला लागला
मुळं-फांद्या-पारंब्या सगळ्यांसहीत घराचा पसारा गहीरा व्हायला लागला
बाबा नावाचा संत भला मोठा ग्रंथ होऊन जगायच्या दिक्षा द्यायला लागला

घरचं बाळकडू आकार घेत-घेत कर्मयोगात भिजायला लागलं
सगळ्या भावडांना समजुन न उमगायच उत्तम जमायला लागलं
कळत नकळत आयुष्याच वर्तुळ मोठ-मोठ व्हायला लागलं
त्याच ऐटीत हातावरच्या रेषांच नेमानं पुढे-मागे व्हायला लागलं

धीरे धीरे डाव नियंत्याचे कसे सैरभैर पसरु लागले
देता-देता घेत जायच्या खेळात नवे-नवखे फसू लागले
आई-बाबा घराच कोंदण जन्माच आंदण हातातुन निसटू लागलं
एक दिवस असाही आला आधारवॄक्षावाचूनच तांबड फुटू लागलं
मग काय...सारच कठीण..आईचही मन सगळ्यातनं तुटू लागलं
जपाचे बोल क्षीण अन देवघरातला भोळा सांबही पोरका झाला
रोजच्या जाणीवा-नेणीवांना फोटोंचाच केव्हढा आसरा झाला

जुनं जाऊन नवं या नियमावर चित्रपटाच कथानक सरकतय
नव्या लाडक्यांच चित्रपटात आता चांगलच बस्तान बसतय...
त्याचा तारणहार होण्याऐवजी माझ अन मुलाच दोस्तीतच जमतय
एक नवा चित्रपट अन नव कथानक सुरु व्हायची वाट बघतय

मुळ चित्रपटही पुढे चाललाय..कधी रडण्याचे सीन्स तर कधी हसणं
'शो मस्ट गो ऑन' म्हणत थिएटरमध्ये अंधार-उजेडाच असणं-नसणं....
कधी मनासारखा अवखळ पसारा तर कधी योगायोगानी दैवाच तुटणं...
नवे ग्रीष्म..नवे शिशीर..पुन्हा पालवी अन पानगळीच हळुच सगळं पुसणं
संपलेल्या रीळांतन जगलेल आयुष्य टपकतय झिरपतय..
पुढच्या अज्ञात यात्रेसाठी अनावर मन तयार होऊ बघतय
'सुरु झालेल्या चित्रपटाला अंत असणारच'...निराकाराशी नातं जमतय
'खाली हाथ आये थे खाली हाथ जाय'...यावरच येऊन सगळ थांबतय

"आता एव्हढच व्हाव...या चित्रपटाचा अंत मात्र सुखद शांत व्हावा
आप्तांसह इतरांचेही डोळा पाणी अन ठेवा आठवांचा अनंत पुरावा"
हे पण आईचच वाक्य...इतर अनेक शिकवणींसारख आजन्म पुरतय...
"आयुष्य चित्रपटासारख सरकतं".......आत्ता कुठे चांगल कळतय ...!!!!

****************************************************
****************************************************

गुलमोहर: 

"मोहाचे रंग गहीरे नव्हते अन मत्सराशी तर नातेच नव्हते"

"जपाचे बोल क्षीण अन देवघरातला भोळा सांबही पोरका झाला"

अख्खी कविताच भिडली पण या दोन ओळींनी काळीज रिते केले.

आशुतोष्-चंपक-श्रुती-सारंगी : मनःपुर्वक धन्यवाद सगळ्यांचे !!!

"आता एव्हढच व्हाव...या चित्रपटाचा अंत मात्र सुखद शांत व्हावा
आप्तांसह इतरांचेही डोळा पाणी अन ठेवा आठवांचा अनंत पुरावा">>>सुंदर्!आवडला चित्रपट.

आभार मानायला दोन वर्षे लाऊ नका,आणि लवकरच एखादी नविन कविता घेऊन या बर का गिरीशजी.

तुझ्या कविता वाचल्या ना की अंतर्मुख व्हायला होतं रे....... !! थोडा वेळ कुणाशीच बोलू नये असं वाटतं. तुझ्या शब्दांमधेच रेंगाळायला होतं.
तुझ्या चित्रपटातले रंग अजून फुलू दे......... !!

Pages