अशी गोड तू... एक महाग़ज़ल!!!

Submitted by niraj_kulkarni on 23 January, 2008 - 02:39

अशी गोड तू... एक महाग़ज़ल!!!

फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे अशी गोड तू...
निशेने नव्या मंद गंधात न्हावे अशी गोड तू...

अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता;
सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे अशी गोड तू...

ढगांनी झुलावे, हळूवार यावे, तुझ्या अंगणी;
नभाने तुझ्या उंबर्‍याशी झुरावे, अशी गोड तू...

जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी भैरवी,
दवाने उन्हालाच ओले करावे, अशी गोड तू

जसे चातकाला मिळावे जरा थेंब मेघातले,
मनाचे समाधान आकंठ व्हावे, अशी गोड तू...

तहानेत ज्या बालकाने किती आसवे वाहिली,
तुला पाहता त्या मुलाने हसावे, अशी गोड तू...

सदा व्हायची धुंद राधा जशी पाहुनी श्रीधरा,
हरीने तसे धुंद होऊन जावे, अशी गोड तू...

यमाला कसा प्राण माझा मिळे, मी तुला जिंकता;
अता श्वास माझे चिरायू बनावे, अशी गोड तू...

जणू धन्य माता तुझी जाहली,जन्म देता तुला;
पित्याने तुझ्या सार्थ गर्वात न्हावे, अशी गोड तू...

तुझा सावळा रंग माया करे, पांडुरंगावरी;
तुला वंदण्या, मी तुकाराम व्हावे, अशी गोड तू...

असे मेघ काळे झपाटून जावे, तुला पाहुनी;
इथे पावसाळे सुगंधी बनावे, अशी गोड तू...

कसे काय सांगू कसा गुंतलो मी, तुझ्या प्राक्तनी;
अनावर्त ज्योतिष्य दिग्मूढ व्हावे, अशी गोड तू...

शहाणा म्हणा की, म्हणा आज झालोय, वेडा खुळा;
स्वतःला सखे मी अता विस्मरावे, अशी गोड तू...

सये लाघवी हास्य येता तुझ्या, मुग्ध ओठांवरी;
पुन्हा आज सौदामिनीने रुसावे, अशी गोड तू...

तुझे मूल्य जाणून झाले, अचंबीत ब्रम्हांड हे;
कुबेरासही, मी भिकारी गणावे, अशी गोड तू...

तुझ्या वर्णनाचे, महाकाव्य वाचून होता प्रिये;
जनांनी महाभारताला भुलावे, अशी गोड तू...

तुझ्या दर्शनाला, सये रांग आहे, किती लागली!
अता चालणे बोधिवृक्षास यावे, अशी गोड तू...

कधीही, कुठेही, कसेही, कुणी नाव घेता तुझे;
पुन्हा या जगाने मला आठवावे, अशी गोड तू...

मला स्पर्श साधा, तुझा भासतो, 'अमृता'च्यासवे;
'तुला मी कसे बाहुपाशात घ्यावे?' अशी गोड तू...

कशाला असे मांडतो मी तुला व्यर्थ शब्दांतुनी?
तुला रेखिण्या जन्म संपून जावे, अशी गोड तू...

- निरज कुलकर्णी.

गुलमोहर: 

अशी गोड तू ....
वाचुन फार आनन्द झाला...
मोठी असल्यावरही खरच फार सुन्दर आहे .!!!

(^_^)

ढगांनी झुलावे, हळूवार यावे, तुझ्या अंगणी;
नभाने तुझ्या उंबर्‍याशी झुरावे, अशी गोड तू...

दवाने उन्हालाच ओले करावे, अशी गोड तू ....

अता चालणे बोधिवृक्षास यावे,....

वाह!!! वाह!!! सुंदर लिहिल आहेस... फार सुंदर कल्पना माडंल्या आहेस.. काही कल्पना अप्रतिम सुंदर आहेत,

काही कडवी मार खातात , उदाहरणार्थ.
चातक! तोच तोच पणा येवढ्या सगळ्या अभिनव कल्पनांमध्ये हे नसत तर चालल असत,
माता पिता (नको रे...येवढ्या सुंदर पोरिच्या वर्णनात आई वडिलांना कशाला, तंद्री मोडलिस ना),
महाभारत?? (टीव्ही सिरियल आठवली, सॉरी) महाभारता ऐवजी मेघदुत किंवा प्रणय काव्याचा उल्लेख छान वाटला असता,
कुबेरा च्या कडव्यात लय सापडत नाही आहे, ब्रम्हांड टोचतय (त्र्यलोक्य?).

तस मला गझलेचा अजिबात गंध नाही, त्यामुळे बिना तोंडी मोठा घास.... पण तु लिहीलयस सुंदर त्यामुळे प्रतिक्रिया देणे भाग होते... सुरेख.!!!

कविता निर्मीती ही उस्फुर्त असते आणि कवितेचा अस्वाद हा चोखंदळ असतो. त्यामुळे वाचकाला काय आवडेल हा विचार केला तर ते काव्या उस्फुर्त होत नाही त्यामुळे मी दिलेल्या निगेटीव प्रतिक्रीया या चोखंदळ प्रतिक्रीयेच्या खाजे पोटि आहेत. उचलली बोट लागलो टायपायला... Happy

ढगांनी झुलावे, हळूवार यावे, तुझ्या अंगणी;
नभाने तुझ्या उंबर्‍याशी झुरावे, अशी गोड तू...

मलाही वरील शेर भावला. गझल सुंदर आहे. महा असली तरी वाचनीय आहे!
ज्योतिष्याचा मिसरा उत्तम जमला, पण मला बोधिवृक्षाचे समजले नाही.
मक्ता शोभून दिसत आहे. अजून येउ देणे.

तुझा सावळा रंग माया करे, पांडुरंगावरी;
तुला वंदण्या, मी तुकाराम व्हावे, अशी गोड तू...

........................ अप्रतिम, खुपच छान !!!

वा ! क्या बात है!

सत्याभाय च्या अभिप्रायाला दुजोरा. तो 'तुकारामाचा' शेर आहे त्यात 'वंदण्या' हा शब्द (आणि अर्थ) विचित्र वाटला.
चांगले जमलेत बाकी शेर.

परागकण

सत्यजीत चे म्हणणे पटले रे....
पण तु जे काहे लिहिले आहेस ते सर्व तुझे विचार जाणुन त्यांचा आदर्...उच्च गजल!

वा! मजा आ गया...

कशाला असे मांडतो मी तुला व्यर्थ शब्दांतुनी?
तुला रेखिण्या जन्म संपून जावे, अशी गोड तू...

हा शेर कळस!!!

सगळ्याच शेरांमधले भाव आवडले हे महत्वाचे ... (थोड्या तांत्रिक गडबडी सोडल्या तर मस्त गझल!)

फारच छ।न...
१ शेर सान्सोमे छू गया..

मुस्कुराहट है हुस्न का जेवर,
मुस्कुराना ना भुल जाया करो

आपका घर है आया जाया करो...

आवड्त्या १० मध्ये टाकला आहे...