आरोग्य आणि स्वस्थता यांचे निकष

Submitted by नरेंद्र गोळे on 24 September, 2009 - 03:02

आरोग्य आणि स्वस्थता यांचे निकष

आरोग्य म्हणजे मनुष्याची निरोगी, अविकृत, प्राकृत अवस्था. प्रकृती.
कुपोषण, अतिसेवन, अजीर्ण, जंतूसंसर्ग, विकार, रोग, अपघात ह्यांमुळे आरोग्य धोक्यात येते.
हीच विकृत अवस्था. विकृती.

प्रकृती सुदृढ असेल तर स्वस्थता आपसुकच येते.
सुदृढ मनुष्य स्वस्थतेच्या निरनिराळ्या स्तरांवर राहू शकतो. निकोप जीवन जगू शकतो.
मात्र असामान्य संकटास सामोरे जाण्याची त्याची प्रतिबंधात्मक आणि निवारणात्मक शक्ती स्वस्थतेवर ठरते. आणि स्वस्थता म्हणजे शारीरिकदृष्ट्या मनुष्याची कर्तबक्षमता, कार्यक्षमता,
अन्नाचा ऊर्जेसाठी आणि ऊर्जेचा कामाकरता सक्षम वापर करण्याचे सामर्थ्य.

आरोग्यवान माणूस इष्टताप, इष्टचाप, सुडौल, नियमित-उदर आणि संवेदनक्षम असतो.
म्हणजे त्याच्या शरीराचे तापमान इष्ट तेच असते, त्याचा रक्तचाप (रक्तदाब) इष्ट तेवढाच असतो,
बांधा डौलदार असतो, उदर नियमित असते आणि परिसरातील चराचरांची योग्य ती दखल घेण्याकरता तो पुरेसा संवेदनाक्षमही असतो. आता या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे? ते पाहू या.

आरोग्याचे निकष

१. तापमानः सामान्यपणे माणसाचे शरीर ३७ अंश C किंवा ९८.६ अंश F तापमानावर असते. ताप जास्त वाढू देऊ नये. १०२ अंश F च्या वर गेल्यास पट्ट्या ठेवाव्या. १०४ अंश F च्या वर गेल्यास त्वरित वैद्यकीय मदत मिळवावी.

२. रक्तदाबः सामान्यतः १२०/८० असतो. म्हणजे हृदय शुद्ध रक्त शरीरात ढकलते त्यावेळी जो दाब वापरते तो दाब १२० मिलीमीटर पार्‍याच्या स्तंभाइतका असतो, तर अशुद्ध रक्त शरीरातून खेचून घेते तेव्हा वापरते ती ओढ ८० मिलीमीटर पार्‍याच्या स्तंभाइतकी असते.

३. शरीर-वस्तूमान निर्देशांक: माणसाच्या किलोग्रॅममधील वजनास, त्याच्या मीटरमध्ये व्यक्त केलेल्या उंचीच्या वर्गाने भागल्यावर येणारे गुणोत्तर. हे सामान्यत: १९ ते २४ असते. त्याहून कमी असल्यास माणूस कुपोषित सदरात मोडेल तर त्याहून जास्त असल्यास माणूस स्थूल स्तरात मोडेल.

४. कमर/नितंब गुणोत्तर: हे सामान्यत: ०.८५ च्या आसपास असते. ते १ हून जास्त असेल तर पोट सुटलेले असल्याचे दर्शवते. हे गुणोत्तर फारच कमी असल्यास कुपोषणाने पोट खपाटीला गेल्याचे दर्शवते.

५. संवेदनाक्षमः कुठल्याही उपाधी, व्याधी, विकार, विकृती, आजार, रोग यांनी संत्रस्त झालेला मनुष्य आजूबाजूच्या चराचराची पुरेशी दखल घेऊ शकत नाही. त्याला जर त्यांची पुरेशी दखल घेता येत असेल तर तो आरोग्यवान असण्याची शक्यता असते.

स्वस्थतेचे निकष

१. विश्रांत अवस्थेतला हृदयस्पंदनदर: आरामात विश्रांत अवस्थेत असतानाचा हृदयस्पंदनदर कमीतकमी असावा. पुरूषांत ७२ तर स्त्रियांत ८४ स्पंदने प्रतिमिनिट असा दर सामान्यत: असतो. विश्रांत अवस्थेतला हृदयस्पंदनदर कमीतकमी असणे चांगले.

२. कष्टानंतर ते थांबवताच लवकरात लवकर विश्रांत अवस्थेतला हृदयस्पंदनदर गाठण्याची क्षमता: काम केल्यावर अथवा व्यायामानंतर हृदयस्पंदनदर वाढतो. काम करणे थांबवताच अथवा व्यायाम बंद करताच तो पूर्वपदावरही येऊ लागतो. काम वा व्यायामाची तीव्रता, वेग अथवा ते करत राहण्याचा वेळ वाढतो तसतसा, जास्तीत जास्त हृदयस्पंदनदर गाठला जातो. (२२५-तुमचे वय)= अंतिम हृदयस्पंदनदर. काम वा व्यायामाची तीव्रता, गती वा अवधी एवढाच वाढवावा ज्यामुळे तुमचा हृदयस्पंदनदर, तुमच्या अंतिम हृदयस्पंदनदराच्या ९० टक्क्यांहून जास्त वाढणार नाही. मात्र त्या काम वा व्यायामा दरम्यानचा सर्वोच्च हृदयस्पंदनदर गाठल्यावर, काम वा व्यायाम थांबवताच, कमीत कमी किती काळात तुमचा हृदयस्पंदनदर आरामात विश्रांत अवस्थेत असतानाच्या हृदयस्पंदनदरापर्यंत परततो, तो काळ. तो कमी असावा. तो काळ जेवढा कमी तेवढेच तुम्ही जास्त स्वस्थ. म्हणजेच, कष्टानंतर ते थांबवताच लवकरात लवकर विश्रांत अवस्थेतला हृदयस्पंदनदर गाठण्याची क्षमता.

३. अंतिम हृदयस्पंदनदरावर पोहोचेपर्यंत करू शकाल ते जास्तीत जास्त काम: जास्त तीव्रतेचे, जास्तीत जास्त वेगाने, जास्तीत जास्त वेळ केलेले सोसेल तेवढे काम वा व्यायाम. ते जास्त असावेत. जेवढे तीव्र, गतीमान आणि दीर्घकाळ काम करू शकत असाल तेवढीच तुमची स्वस्थता चांगली. म्हणजेच, अंतिम हृदयस्पंदनदरावर पोहोचेपर्यंत करू शकाल ते जास्तीत जास्त तीव्रतेचे, जास्तीत जास्त गतीमान व जास्तीत जास्त काळ केलेले काम.

४. श्वसनक्षमता: पूर्ण श्वास छातीत भरून घेऊन स्तनाग्रांपाशी मोजलेला छातीचा घेर, उणा त्याच जागी मोजलेला संपूर्ण निश्वसनाचे वेळी छाती रिकामी असता मोजलेला घेर हा फरक, रिकाम्या छातीच्या घेराच्या टक्केवारीत व्यक्त केल्यास मिळणार आकडा म्हणजे श्वसनक्षमता. ही ऑलिंपिक्सपटूंसाठी १५ टक्के पर्यंत असते. तर हृदयरुग्णांची ती २.५ टक्क्यांपर्यंत खालावलेली असते. सामान्य माणसाची श्वसनक्षमता ५ ते १० टक्के असू शकते. प्राणायामाने, योगासने केल्याने वा व्यायामानेही ती वाढते. हे सारे करतांना त्याचा उद्देश श्वसनक्षमता वाढवण्याचाच असावा. थोड्या थोड्या कालावधीनंतर पुन्हा मोजून प्रगतीची खात्री करून घ्यावी.

५. श्वसनगतीः श्वास आणि उच्छवास यांचे एक आवर्तन असते. एका आवर्तनास लागणारा वेळ श्वसनगती ठरवतो. श्वसनगती वेगवती असणे अस्वस्थतेचे निदर्शक असते. सामान्य माणूस मिनिटास १० ते १५ आवर्तने या गतीने श्वासोच्छवास करतो. तर ऋषीमुनी मिनिटास ५-६ आवर्तने या गतीने श्वासोच्छवास करत असतात. जर आयुष्याचे श्वास पूर्वनिर्धारित असतील तर दीर्घ श्वसन/ मंद श्वसन दीर्घायुष्याप्रत नेत असणार ह्यात काय संशय!

माझ्या अनुदिनीसही अवश्य भेट द्या!
पत्ता आहे: http://nvgole.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली माहिती आहे. विशेष करुन सगळे आकडे एका ठिकाणी मिळाले... धन्यवाद.
>> जर आयुष्याचे श्वास पूर्वनिर्धारित असतील तर
हे खरे आहे का?

>> जर आयुष्याचे श्वास पूर्वनिर्धारित असतील तर
हे खरे आहे का?>>>>

असे म्हणतात खरे. खात्री करून घेणे मात्र शक्य ठरणारे नाही.

तरीही, या विषयावर केवळ एकच प्रतिसाद पाहून, काहीतरी चुकतय असे वाटू लागलाय!

काहीही चुकत नाहीय... छान माहिती देतात.
कोलेस्टेरॉलविषयी माहिती असेल तर कृपया द्याल का?? जसे चांगले किती असावे आणि वाईट किती नसावे इ.??
चेकपनंतर बरेच वेळा फक्त आकडे दिसतात, पण त्यावरुन बरे वाईट फारसे कळत नाही. तुमच्या ह्या माहितीचा उपयोग होईल अशा वेळी.

(हा लेख आधी का दिसला नाही माहित नाही.. नाहीतर तुमचे लेख मी कधीच चुकवत नाही. कदाचित ललित मध्ये आहे म्हणुन असेल... आरोग्यविषयक गृप आहे तिथे लिहिल्यास सगळे एकत्र दिसेल आणि गृपच्या सदस्यांनाही 'नविन लेखन' मध्ये चटकन दिसेल... अर्थात ही केवळ सुचना....)

धन्यवाद साधना! http://www.manogat.com/node/5421 या दुव्यावर कोलेस्टोरॉलबद्दल काहीसे लिहीले आहे.

कोलेस्टेरॉल तीन प्रकारचे असते. चांगले (हाय डेन्सिटी), वाईट (लो डेन्सिटी) आणि ओंगळ (ट्रायग्लिसेराईडस - हे सूक्ष्मदर्शकाखाली फारच ओंगळ दिसतात म्हणून ओंगळच ठरवले गेले आहेत). त्यांचे सर्वसामान्य प्रमाण अनुक्रमे (३०-७०), (०-१९०) आणि (६०-१६०) असते. शरीरातील ७५% कोलेस्टेरॉल (मेद) शरीरच तयार करते. त्याकरता साखर कच्चा माल ठरते आणि मानसिक तणाव उत्प्रेरक (कॅटॅलिस्ट). शरीर या मेदाचा वापर अंतर्गत जखमा भरून काढण्याकरता करते. चांगले मेद (ओमेगा-३ तेले) बदाम, आळशी इत्यादीतून मिळतात. साजूक तुपासकट सर्व तुपे आणि तेले वाईट मेद असतात. शरीरातील अतिरिक्त साखरेचे पर्यवसान वाढत्या ओंगळ मेदांत होत असते. म्हणून हृदयविकार असणार्‍यांनी "मधुमेह आहे काय?" असा प्रश्न न विचारता साखर बंद करावी.

साखर, मीठ, तेल, तूप इत्यादी मनुष्यनिर्मित संहत पदार्थांच्या सेवनाकरता मानवी शरीराची घडण केलेली नसते. तरीही मनुष्य जिभेच्या सोसाखातर शरीरावर न सोसणार्‍या संहत पदार्थांचा अविरत मारा करत राहतो. म्हणून जे वयपरत्वे उद्भवणारे अवनतीकारक रोग निर्माण होतात त्यांच्या निरसनार्थ याच संहत पदार्थांचा संपूर्ण त्याग करणे हाच सर्वात रामबाण उपाय ठरतो.

अत्यंत उपयुक्त माहिती आहे. काहीही चुकत नाहीये. अहो काही वेळा नक्की काय प्रतिसाद द्यावा ते कळत नाही त्यामुळे असेल.

धन्यवाद कल्पु, श्रुती आणि पाटील. प्रतिसादांमुळे लिहीण्याचा उपयोग होत आहे याची पावती मिळते.

गोळे अजून लिहा. विषयाचे नाव वाचून मीही उशिर केला इथे यायला पण खरचं छान लिहिलंत तुम्ही.

एक कळले नाही मीठ हे कधी आले जेवणात? पुर्वी नव्हते वापरत का? पतंजलीने तर तूप शरिराला चांगले सांगितले आहे.

अर्चना आणि बी, प्रतिसादाखातर धन्यवाद.

मीठ आणि साखर आज ज्या स्वरूपात आपण सेवन करत आहोत त्या स्वरूपात, नक्कीच ईश्वराने निर्माण केलेले नाहीत. त्यांच्या स्त्रोतांच्या सेवनाने आपल्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत नसावा.

साजूक तुपाची आरोग्याकरता निकड किती असते हे सांगतांना तर आयुर्वेदाचे समर्थक थकत नाहीत. मात्र साजूक तूप मानवनिर्मित संहत पदार्थ आहे हे सत्य उरतेच.

ज्या गाईपासून तूप मिळते ती तरी कुठे स्निग्ध पदार्थ खात असते? गवत खाऊनच ना ती तूपास जन्म देते!

मानवी शरीरातही ७५% कोलेस्टेरॉल, हे मानवी शरीरच निर्माण करत असते. जिज्ञासूंनी आधुनिक विज्ञानातील संदर्भांद्वारे याची खात्री करून घ्यावी. अन् हे जर असे असेल तर साजूक तूप मुळीच सेवन न केल्यास, म्हातारपणी शरीर रुक्ष बनून सांधेदुखीसारखे रोग बळावतील, या भीत्याही निराधारच ठरतात.

तुम्ही काय म्हणता वाचकहो!

मला किडनी स्टोन ब्द्द्ल माहिति हवी आहे पण नविन धागा कसा सुरु करायचा हे सम्जत नाहि क्रुपया मार्गद्रशन करा

पण मला माझ्या प्रशाचे उत्तर मिळाले नाहि क्रुप्या मार्गद्र्श्न करा...............???????????????????
>>>>>>

अमृता, तुम्ही मायबोलीच्या सदस्य झालेलाच आहात. आरोग्यम धनसंपदा गटाच्याही सदस्य असाव्यात. नसलात तर व्हा. उजव्या वरच्या बाजूस त्याकरता उपाय सापडेल. झाल्यावर मग नवा धागाही उघडू शकाल. तोही वरच्या बाजूस उजवीकडे दिसेल.