दुर्गदुर्गेश्वर रायगड

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

1-Cover-100_3587.jpg

गेल्या वर्षी २ ऑक्टोबरला रायगड दर्शन केलं होतं त्यानंतरच ठरवले होते की आता या पुढे दरवर्षी एक फेरी तरी मारायचीच. त्यातच गो. नी. दांडेकरांचे दुर्गभ्रमणगाथा वाचनात आले आणी त्यानंतर तर मी कधी एकदा पुन्हा रायगडला जातोय असे झाले होते. गेल्या वेळी सोबत आलेल्या योगायोगनेही (योगेश शेलार) हे पुस्तक वाचुन काढले. तोही माझ्याबरोबर पुन्हा यायला तयार झाला होता. मी ते पुस्तक किरुला दिले, त्यालाही रायगडावर यायचे होते. किरु, इंद्र, विनय भिडे, योगायोग आणि मी असे पाच जण रायगडावर जायचे असे ठरलेही. पण वेगवेगळ्या कारणांमुळे विनय, किरु आणि अगदी आदल्या दिवशी इंद्राचे येणे रद्द झाले. मी रायगडवेडा आहे, त्यामुळे रायगडावर जायचे ठरल्यापासुन मला सतत डोळ्यासमोर रायगड दिसत होता. त्यात २ तारखेलाच मी प्रा. प्र. के. घाणेकरांचे ' दुर्गदुर्गेश्वर रायगड' हे पुस्तक विकत घेतले होते. ते वाचल्यामुळे मला रायगडाबद्दल खुप नवी माहिती मिळाली आणि पुन्हा एकदा रायगडावर जायचे कारण मिळाले होते. त्यामुळे इतर तिघांचे येणे जरी रद्द झाले होते तर मी थांबणार नव्हतो. मी योगायोग तर होतोच, मग जोडीला माझ्या ऑफिसमधील मधील मित्र स्वप्निल जाधव ( मायबोलिकर युवराज) आणी माझा मेव्हणा प्रविण या दोघांना घेतले. आणी १२ तारखेला सकाळी ७.३० वाजता ठाण्याहुन महाडला निघायचे असे ठरले. मी ११ तारखेला सकाळीच रायगड रोप वे च्या पुण्यातील ऑफिसमध्ये फोन करुन किल्ल्यावर रहाण्याची सोय केली होती.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
आता थोडे प्रा. प्र के घाणेकरांच्या 'दुर्गदुर्गेश्वर रायगड' या पुस्तकाबद्दल. 'किल्ले रायगड' या विषयावर लिहिल्या गेलेल्या महत्वाच्या सर्व पुस्तकांचा अभ्यास त्यांनी केला आहे. त्या पुस्तकांतील संदर्भ (अगदी पृष्टक्रमांकासहीत) देताना त्यांनी रायगडावरील व परीसरातील सर्व स्थळांची माहीती आपल्या पुस्तकात नमुद केली आहे. पण असे करताना प्रत्येक स्थळा बद्दलचे आणि त्याच्या नावाबद्दलचे त्यांचे स्वताचे मत त्यांनी ठामपणे मांडले आहे.
या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते लिहितात, " खरं तर या पुस्तकातूनही मला सगळा रायगड कळला किंवा रायगडाबद्दल आता अगदी 'अ' ते 'ज्ञ' पर्यंत सारं लिखाण मी वाचलं आहे, असा माझाही 'गैर' समज नाही. रायगडावर मी ५ - ५० वेळा निश्च्चित गेलो. रायगडासारखं एक भव्यदिव्य स्वप्न स्वता शिवाजी महाराजांनी पाहिलं, ते प्रत्यक्षात उतरवलंसुद्धा. ते माझ्यासारख्या छोट्या अभ्यासकाला पुर्ण समजणं ही माझ्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. तरीही रायगड अभ्यासाची ही शिडी मी तुमच्यापुढे ठेवली आहे. मी या शिडीच्या खालच्या एखाद-दुसर्‍या पायरीवर आहे. पण या शिडिचा उपयोग करुन तुम्ही आणखी वर चढुन जाल आणि स्वताच्या आणी इतरांच्याही ज्ञानात भर टाकाल याचे मला खात्री वाटते. त्यासाठी पूरक असं हे माझं ५४ वं पुस्तक मी तुमच्यापुढे ठेवतो आहे."
खरोखर या वेळीच्या रायगड फेरीत या शिडीचा वापर करण्याचा मी प्रयत्न मी केला. त्यामुळे खुप वेळा रायगडावर येऊनही माझ्याकडुन दुर्लक्षित राहीलेल्या खुपशा नविन गोष्टी ( शिलालेख, दगडी चिर्‍यावरील खुणा इत्यादी) मला पहायला मिळाल्या. म्हणुन यावेळील वृत्तांतामध्ये मी नविन पाहीलेल्या व गेल्या वेळी न लिहिलेल्या गोष्टिंबद्दल लिहिणार आहे. इतर जागांविषयी थोडीफार माहिती माझ्या या आधीच्या वृत्तांतात मिळू शकेल. या वृत्तांतात रायगडावरिल स्थळांबद्दल जी माहिती मी लिहिणार आहे ती सर्व 'दुर्गदुर्गेश्वर रायगड' या पुस्तकातील आहे. त्याचे सर्व श्रेय प्रा. प्र के घाणेकरांना जाते. मी फक्त तिथे जाउन त्यांचे फोटो काढुन तुमच्यापार्यंत पोहोचवण्याचे काम करतो आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

१२ तारखेला सकाळी ७.३० वाजता योगेश, प्रविण आणी स्वप्निल मला ठाण्यातील खोपट येथील एस टी स्टँड वर भेटले आणी ८ वाजता चिपळुण - महाड गाडेने आमचा रायगड प्रवास सुरु झाला. एस टी ११.४५ ला महाडला पोहोचली. तिथे उतरल्यावर महाड ते पाचाड (रायगड पायथा) ही गाडी १२.३० ला असल्याचे कळले. मग या वेळेचा सदुपयोग पोटपुजा करुन करण्याचे ठरले. आमची चौकडी उपहारगृहाकडे वळली. पोटोबा करुन परत येईपर्यंत १२.३० गाडी निघुन गेली होती. मग आम्ही रिक्षा करुन पाचाडला जायला निघालो. इथे महाडमध्ये जरी लख्ख उन पडले असले तरी कोंझरला पोहोचे पर्यंत पावसाने काळोख केला होता. दुरुन रायगड दिसु लागला पण तो काळ्याकुट्ट ढगात वेढलेला.
4-Dhagat-raigad.jpg3-Dhag.jpg
आम्ही रोपवेने न जाता पायर्‍यांनी जायचे ठरवले होते. पाचाडला पोहोचता पोहोचताच जोरदार पावसाला सुरुवात झाली. आमचे वर रहाण्याचे बूकिंग रोपवे च्या ठिकाणी केले असल्याने त्यांच्या पायथ्याशी असलेल्या ऑफिसमध्ये जाऊन रीतसर पावती घेऊन रूम नंबर घेणे भाग होते. तिथे पोहोचे पर्यंत तुफान पाऊन सुरु झाला होता. रायगडाकडे नजर टाकल्यावर वर जाणार्‍या रोपवेच्या तारा अर्ध्या अंतरावरुन काळ्या ढगांमध्ये लुप्त झाल्या होत्या.

2-Rope-way.jpg

गडावरिल रूमची पावती घेऊन आम्ही चौघांनी रायगड पायथा गाठला आणि पायर्‍या चढायला सुरुवात केली.जबरदस्त पाऊस पडत होता. छत्री असुनही त्याचा काही उपयोग होत नव्हता. खुबलढा बुरुज गाठेपर्यंत वाटेत दोन तीन ग्रुप गड उतरताना भेटले. त्यांनी ही गडावर खुप जोरात पाऊस पडत असल्याचे सांगितले. वाटेत दोन ठिकाणी दरड कोसळली होती. खुबलढा बुरुज पार केल्यानंतर आपण डावीकडे वळतो तिथेच वाटेत एक मोठा ६ ते ७ फुट उंच दगड पडला होता. अजुन थोडे पुढे गेल्यावर एका ठिकाणी तर वरुन कोसळणरी दरड डाव्या हाताची लोखंडी रेलिंग तोडुन खाली गेली होती. वाटेत तीन चार ठिकाणी वरुन कोसळणारे धबधबे दिसले. पाउस तर पडत होताच पण उतरलेल्या ढगांमुळे २० ते ३० फुटावरील काही स्पष्ट दिसत नव्हते.
5-dhabadhaba.jpg

जसे जसे वर जाऊ लागलो तसा पाऊस कमी झाला मात्र ढगांमुळे दाट धुके होतेच. मध्ये एका चहाच्या टपरीवर गरमागरम चहा घेतला आणि पुन्हा नव्या जोमाने चढाईस सुरुवात केली. दुरुन ढगात वेढलेले महादरवाजाचे बुरुज दिसु लागले.
6-mahadarvaja-buruj.jpg
त्या आधिच्या वळणावरही एक लहानसा धबधबा होता. तिथे काही फोटो काढले. घाणेकरांच्या 'दुर्गदुर्गेश्वर रायगड' या पुस्तकात त्यांनी महादरवाजातील अस्पष्ट शिलालेखाचा उल्लेख केला होता. तो शिलालेख पहायचा असल्याने घाईघाईत पायर्‍या चढायला सुरुवात केली. तिथे वाहणार्‍या पाण्याने खुप शेवाळं जमलं होतं. त्यावरुन माझा पाय सरकला पण योगेश आणि स्वप्निलने मला सावरले. आणि आम्ही महादरवाजात पोहोचलो.

महादरवाजातील शिलालेख

7-shilaalekh.jpg

महादरवाजातुन आत शिरताना आतील कामानीत उजव्या बाजुस जमिनिपासुन २ मीटर उंचीवर (आतील कमानीच्या दगडी चौथर्‍यावरुन ४.५ ते ५ फुट उंचीवर) हा शिलालेख आहे. घाणेकरांच्या मते त्याचे वाचन ' न ल द ' किंवा ' न ल ट' असे आहे. आम्हाला मात्र वाचताना ते तिथ्र वाचताना ' न ल व' असे दिसले. इतिहासकार निनादराव बेडेकरांना त्याचे वाचन ' रा ज ला व' असे केले होते. काँप्युटरवर व्यवस्थित झूम करुन पाहिले असता मलाही निनादराव बेडेकरांचे मत पटले. घाणेकरांना या लेखाबद्दल कै. भरताग्रज मळेकरांनी सांगितले. मग नंतर घाणेकरांनी आणि इतिहासकार निनादराव बेडेकरांनी हा ले़ख शोधुन काढला. जर हा शिलालेख चांगल्या अवस्थेत असता तर रायगडाच्या इतिहासात मोलाची भर पडली असती.
(संदर्भ 'दुर्गदुर्गेश्वर रायगड - लेखक प्र. के. घाणेकर)

महादरवाजातुन वर चढायला लागले की लगेच जुन्या रायरी किल्ल्याचे बुरुज लागतात. ते ओलांडल्यावर पुढे जाताना डाव्या हाताला दोन तोफा ठेवलेल्या दिसतात.
8---topha.jpg

तिथुन पुढे निघाल्यावर पुन्हा ढगांनी काळोख करायला सुरुवात केली होती. पाउस सुरु झाला नसला तरी धुके खुपच दाटले होते. पायर्‍या चढता चढता आम्ही कधी हत्ती तलावाजवळ आलो हे कळलेही नाही. हत्ती तलावातील व हनुमान टाक्याच्या दगडी चिर्‍यांवरंअसलेली चिन्हेही आम्हाला शोधायची होती पण दाट धुके असल्सल्याअगदी दुर्बीणीनेही हत्ती तलावाच्या आतील बाजुला असलेली चिन्हे दिसणे शक्य नव्हते. त्यात आम्ही सर्व चिंब भिजलो होतो. थकलोही होतो. पाठीवरिल बॅगा कधी एकदा रुमवर नेऊन टाकतोय असे झाले होते. आमाच्या रुम रोप वे जवळच होत्या त्यामुळे इथे दुसर्‍या दिवशी सकाळी यायचे ठरले आणि आम्ही होळी माळाकडे वळलो. दुपारी २.१५ पायथ्याशी असलेलो आम्ही होळी माळावर ४.३० ला पोहोचलो. महाराजांच्या पुतळ्यासमोर जाउन नतमस्तक झालो. स्वप्निल आणि प्रविण दोघेही पहिल्यांदाच रायगडावर आले होते. त्यांना महराजांच्या पुतळ्याचा फोटो काढायचा होता. पण पुरेसा प्रकाश नसल्याने प्रविण नाराज झाला. तो म्हणालाही, 'महाराज, पहिल्यांदा रायगडावर आलो आणि इथे पुरेसा प्रकाशही नाही' आता तुम्ही याला योगायोग म्हणा अथवा अंधविश्वास पण त्यापुढील दोन मिनिटातच आम्हाला होळीमाळावरुन सुर्याचे दर्शन होईल इथकेच ङ्हग दुर झाले. हलकेसे ऊन माळावर पसरले. फार फार तर २-३ मिनिटे उन राहिले आणि सुर्यमहाराज पुन्हा ढगाआड निघुन गेले. त्यावेळात आम्ही काही फोटो काढुन घेतले.
9-holicha-mal.jpg

मग होळीच्या माळावरुन नगारखान्यातुन दरबारात पोहोचलो. दरबारातील मेघडंबरीमध्ये आता महाराजांची मुर्ती ठेवण्यात आली आहे. आम्ही तिथे जायच्या आधीच २-३ ग्रुप तिथे होते. 'जय शिवाजी, जाय भवानी' च्या ललकारींनी दरबार दणाणुन गेला होता. आम्हीही त्यात सामिल झालो. महाराजांना मुजरा केला आणि दरबारामागुन शिवसदनाच्या चौथर्‍यावरुन राणीवसा करत आम्ही मेणा दरवाजातुन रोपवेच्या ठिकाणी पोहोचलो. रुमच्या चाव्या ताब्यात घेतल्या आणि रुममध्ये जाऊन कपडे चेंज केले. मग बरोबर नेलेल्या बाकरवड्या आणी जॅम ब्रेडवर ताव मारला. मग थोडा वेळ आराम करुन पुन्हा ६ वाजता बाहेर पडलो. मेणा दरवाजातुन आत आलो की डाव्या हाताला सहा वास्तुंचं एक संकुल लागतं. यालाच राणीवसा किंवा राण्यांचे महाल असे म्हणतात. पण घाणेकरांच्या मते हे राणी महाल नसावेत तर ही भांडारगृहे असावीत. त्याचे स्पष्टीकरण्ही ते देतात. त्यातील काही मुद्दे मी इथे देतो आहे ते असे.

राणीवसा की भांडारगृहे??
१) महाराजांच्या एकूण आठ राण्या होत्या
सईबाई सोयराबाई पुतळाबाई काशीबाई
कमलाबाई गुणवंताबाई सकवारबाई सगुणाबाई
शिवराय राजगडावरुन रायगडावर आपला मुक्काम १६७०-७२ नंतर कायमचा हलवला. त्याच्या कितीतरी आधी १६५९ मेध्येच सईबाईमहाराजांना देवाज्ञा झाली. म्हणजे इतर सात राण्यांसहीत राजे जरी रायगडावर आले असले तरी त्या सात जणींसाठी महाल सहाच का?

२) येथील सहा वास्तुंपैकी चार एकमेकांना जोडलेले आहेत व इतर दोन पुर्णपणे अलग आहेत. शेवटच्या ( मेणा दरवाजाकडील) दोन वास्तुंत सौचकुपांची संख्या चार आहे तर इतरमहालावास्तुंत तीच संख्या आठ आहे. या सर्व वास्तुंमध्ये स्नानगृहाची सोय नाही.

३) फक्त पहिल्या वास्तुत एक जोते व इतर पाच वास्तूंमध्ये दोन-दोन जोती कशी?? ही सर्व जोतीही सुघड चिर्‍याची नाहीत.

४) प्र. के घाणेकरांच्या मते या सर्व वास्तु म्हणजे वस्त्रशाळा, शस्त्रशाळा, पोथीशाळा, इत्यादी अशी भांडारगृहे असावीत.

(संदर्भ 'दुर्गदुर्गेश्वर रायगड - लेखक प्र. के. घाणेकर)

मला तर हे सर्व मुद्दे पुर्णपणे पटले. माझ्या मते या वास्तूंमधील एका जोत्यावर भांडारगृह असावे तर दुसर्‍या जोत्यावर त्या त्या भांडार गृहाचे सचिव अथवा कर्मचारी, पहारेकरी बसत असतील.
पालखी दरवाजा, गंगासागर तलाव, नगारखाना, बाजारपेठ या आणि रायगडावरिल अशा अनेक ठिकाणांची नावे अशी का?? आणी ती चुकीची असल्यास ती का आहेत याचे अचुक स्पष्टीकरण त्यानी पुस्तकात दिलेले आहे. रायगडावर प्रेम असणार्‍या सर्वांनी हे पुस्तक वाचावेच.

भांडारगृहावरुन पालखी दरवाजातुन आम्ही स्तंभांच्या बाजुने गंगासागर तलावावर पोहोचलो. गंगासागराच्या काठावरिल दगडी चिर्‍यांवरर्‍यांचिन्हे दिसतात का ते पाहिले. घाणेकारांनी त्यांच्या पुस्तकात गंगासागरात असलेल्या भुयारांबद्दल आणि चौकोनी भोकांबद्दल लिहिले आहे. पण ती फक्त उन्हाळ्यात दिसतात.

10-gangasagar.jpg

गंगासागर तलावावरुन देशमुखांच्या हॉटेलवरुन पुन्हा एकदा आम्ही हत्ती तलावावर गेलो. हत्ती तलाव डाव्या हाताला ठेवला तर उजव्या हाताला एक लोखंडी खांब दिसतो. याचे उंची साधारणपणे २ मीटर आहे. हा लोखंडी खांब खाली चौकोनी असुन वर तो गोल होत गेला आहे. जमिनीपासुन दिड मीतर अंतरावर काहे देवनागरी अक्षरे कोरलेली दिसतात. पण त्या खांबाला लागलेल्या गंजामुळे ती अक्षरे नष्ट झाली आहेत. या खांबाच्या टोकाला वर एक लोखंडी कडी आहे. या खांबाचे इथले प्रयोजन कळत नाही. काही इतिहासकारांच्या मते हा मल्लखांब असावा किंवा ही सुर्यघंटी( वेळ समजण्याचे जुने साधन)असावी तर काहींच्या मते हा खांब हत्ती बांधण्यासाठी वापरत असावेत. पण घाणेकरांच्या मते हत्तीला पायबंद असतो म्हणजे हत्तीच्या पायात साखळी अडकवुन ती एका विशिष्ट आकाराच्या खांबाला बांधतात.

11-lohstambh.jpg

काळोख वाढत चालला होता म्हणुन आम्ही पुन्हा होळीच्या माळावर आलो. तिथे शिर्काई देवीचे दर्शन घेतले आणि पुन्हा दरबारात आलो. आता अंधारुन आले होते ७.३० वाजले होते. आकाशातील ढगही दुर झाले होते. आणि त्या मावळत्या आकाशाच्या पार्श्वभुमीवर मेघडंबरी खुपच सुंदर दिसत होती. त्याचे काही फोटो काढण्याचा मी प्रयत्नही केला. त्यातलाच एक फोटो मी सुरुवातीला वर टाकला आहे.

12-meghadaMbari.jpg

८ वाजण्याच्या सुमारास आम्ही परत मेणा दरवाजाकडे वळलो पलीकडील फरशीवर काही वेळ वारा खात बसलो. मस्त वारा सुटला होता. थोडा वेळ तिथे बसुन आम्ही परत रुमवर आलो. ८.४५ ला जेवण आटपले आणि ११ वाजेपर्यंत टाईमपास करुन नंतर अंथरुं गाठले. थंडी खुप जास्त होती. इतकी की दोन सोलापुरी चादरी घेऊनही पाय गार पडले होते. शेवटी रात्री २.३० ला उठुन मी पंखा बंद केला. त्यानंतर मला शांत झोप लागली.

सांगलीच्या 'शिवप्रतिष्ठान' या संस्थेचा एक २-३ जणांचा ग्रुप रोज २७५ किलोमीटर प्रवास करुन रायगडी दाखल होतो. दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे रायगडावरिल सर्वच पुजनीय स्थानांचं पुजन करतात. दिवसभर रायगडाचं दर्शन घेतात आणि दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा पुजाअर्चा करुन सांगलीकडे मार्गस्थ होतात. तोपर्यंत दुसरा ग्रुप रायगडावर पोहोचलेला असतोच. १४ जानेवारी १९९१ पासुन हा शिवपुजनयज्ञ अखंडित चालु आहे.
या ग्रुपला मला भेटायचे होते म्हणुन सकाळी ५.३० चा गजर लावला होता. पण मी प्रत्यक्षात उठलो ६.३०ला. अंघोळ वगैरे आटोपुन बाहेर पडायला ७ वाजले. अर्थातच तोपर्यंत सांगलीचा गृप निघुन गेला असावा.

बाहेर पडलो. योगेश बरोबर होता. प्रविण आणि स्वप्निल अंथरुणातच होते. आम्ही दोघांनी तडक दरबारामागील शिवसदनाचा चौथरा गाठला. सिंहासन चौथर्‍याच्या मागील भागात चार जोती दिसतात. यातील सर्वात शेवटचे जोते म्हणजे शिवसदन.

13-shivasadan.jpg

त्याच्या अगदी शेजारी कोपर्‍यात पाणी साठवण्याची जागा आहे. शिवाय त्या पलिकडे दोन भाग असलेला पण हौद आहे. डाव्या हाताच्या दरवाजातुन बाहेर पडलो कि शौचकुप आहेत व पुढे पाणी तापवण्याची जागा आहे. काही इतिहासकार या जागेची ओळख टाकसाळ म्हणुन करुन देतात. पण शिवनिवासाच्या इतक्या जवळ टाकसाळ असणे शक्य नाही. कारण या ठिकाणी जाण्याचा रस्ता हा शिवनिवासाच्या चौथर्‍याच्या बाजुनेच आहे.
(संदर्भ 'दुर्गदुर्गेश्वर रायगड - लेखक प्र. के. घाणेकर)

तिथुन पुढे मी आणी आणि योगेश पुन्हा मेघडंबरीजवळ गेलो. तिथुन मागे जायच्या रस्त्यात डाव्या बाजुला जोत्याचे काही दगड वितळ्ल्यासारखे दिसतात असा उल्लेख घाणेकरांनी त्याच्या पुस्तकात केला आहे. पायर्‍यांपासुन अगदी १०-१२ फुटावर हे दगड दिसतात. पुस्तकातील माहीती खालिल प्रमाणे.

सिंहासन चौथर्‍याचे वितळलेले दगड
रायगडावरील दरबारातील सिंहासनाचा मेघडंबरी असलेला चौथरा ज्या दगडी जोत्यावर आहे. त्या जोत्याचे मागील बाजुचे २-३ दगड वितळल्यासारखे दिसतात. नगारखाना(?) कडे पाठ करुन मेघडंबरीच्या डावीकडुन शिवसदनाकडे जायच्या मागच्या पायर्‍या उतरल्या की डाव्या हाताला जोत्याचे तीन चार दगडी चिरे वितळल्यासरखे दिसतात.

15-dagad-1.jpg16-dagad-2.jpg

हे असं का झालं असावं याचं कारण कळत नाही. जोत्याच्या वरील भागात एवढी उष्णता कशी काय निर्माण झाली असेल के ज्याने फक्त येथीलच दगड वितळले असावेत?? इतिहासकार गोपाळराव चांदोरकरांच्या मते मे १८१८ मध्ये पोटल्याच्या डोंगरावरुन इंग्रजांनी केलेल्या हल्ल्याच्या वेळी एखादा कुलपी गोळा इथे फुटला असेल. पण ते होणे शक्य वाटत नाही. एका गोळ्याने इतकी उष्णता निर्माण होईल असे वाटत नाही.
(संदर्भ 'दुर्गदुर्गेश्वर रायगड - लेखक प्र. के. घाणेकर)

इथेही घाणेकरांचे मत मला पटते. माझ्या मते जर अशा एखाद्या कुलपी गोळ्याने जर दगड वितळू शकले तर असे शेकडो गोळे त्यावेळी रायगडावर पडले असतील. मग इतर कोणत्याही ठिकाणी असे वितळलेले दगड का आढळत नाहीत? याच्या मागे कदाचित महाराजांच्या ३२ मण सोन्याच्या सिंहासनाचा शोध घेण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असावा. कारण रायगडावर ठिकठिकाणी खोदाखोद करुन सिंहासनाचा शोध घेण्याचे असंख्य प्रयत्न झाले आहेत. खुद्द महाराजांची समाधीचे चिरे उखडुन खजिना शोधण्याचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख गो. नी दांडेकरांच्या ' दुर्गभ्रमणगाथा' या पुस्तकात आढळतो. कोणीतरी अ‍ॅसिडसारखा रासायनिक पदार्थ इतर कुठेतरी वापरायच्या आधी इथे वापरुन पाहीला असेल. नक्की कारण काय हे कळायला काहीही मार्ग नाहीये.

रविवारची सकाळ असल्याने सकाळी सात वाजता रोप वे सुरु झाल्यापासुन गडावर फार पर्यटक दिसत होते. दरबारातही बरेचसे गृप जमले होते. त्यांचेही फोटो काढणे चालु होते. मग आम्ही नगारखान्याकडे आलो.
नगारखान्याबद्दलही घाणेकर लिहितात की हा नगारखाना नसावा. याच्या उभारणीसाठी वापरलेला दगड इतर सर्व बांधकामात वापरलेल्या दगडापेक्षा वेगळा आहे. तसेच याचे बांधकाम शिवपुर्वकालातील असावे असे वाटते. त्यांनी असे खुपसे मुद्दे मांडले आहेत. ते सर्व इथे विस्तृतपणे मांडणे शक्य नाही. पण नगारखान्यावरील शरभशिल्पांबद्दल खुप नविन माहीती वाचावयास मिळाली ती थोडक्यात अशी.

नगारखान्यावरील शरभशिल्पे

नगारखान्याच्या आतील व बाहेरीएल अशा दोन्ही बाजुस दोन-दोन अशी एकुण चार शरभ शिल्पे आपणास दिसतात. ही शिल्पंच ही वास्तु शिवपुर्वकालीन असल्याची साक्ष देतात. मध्ययुगात शक्तीचं प्रतीक म्हणुन वाघ किंवा सिंहासारखी एक पशुआकृती शिल्पांमध्ये दाखवली जात असे. त्यालाच 'शरभ' या नावाने ओळखले जाते. आपल्याकडे हिंदु शिल्पांमध्ये हत्ती हे ऐश्वर्य आणि बलवानतेचं प्रतीक मानलं जातं. बर्‍याच ठिकाणी स्गरभाच्या दोन अथवा चारही पायात एक एक आणि तोंडात एक आणि शेपटीत एक असे सहा हत्ती धरलेले दाखवले जातात. म्हनजे हे शिल्प असलेली सत्ता एकापेक्षा अधिक संख्येने असणार्‍या बलवान हत्तींना ( बलवान सत्त्तांना ) लोळवु शकते.

17-sharabha-1.jpg17-sharabha-2.jpg

शरभ या प्राण्याबद्दल त्यांनी अजुनही खुपशी माहिती दिलेली आहे. पण त्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचावे लागेल.
असेच एक शरभशिल्प वाडेश्वराच्या ( जगदिश्वर) मंदिराच्या दक्षिणेकडिल भिंतीवर बाहेरील बाजुस पहावयास मिळते. तिथे मंदीराच्या भिंतीवर या शरभशिल्पाचे प्रयोजन कळत नाही.

18-sharabh-3.jpg

(संदर्भ 'दुर्गदुर्गेश्वर रायगड - लेखक प्र. के. घाणेकर)

नगारखान्याहुन मग योगेश आणि मी होळी माळावर आलो. होळीमाळाजवळील शिर्काई देवीच्या देवळात जाउन पोहोचलो. शिर्काई देवी ही रायगडची गडदेवता. शिवरायांनी जावळीच्य चंद्रराव मोर्‍यांकडुन रायरी ही किल्ला ताब्यात घेतला. पण मोर्‍यांच्या आधी तो शिर्के सरदारांच्या ताब्यात होता. होळीचा माळावरुन गंगासागर तलावाकडे जाताना वाटेत एक प्रशस्त चौथरा लागतो. तेथे शिर्काई देवीचे देऊळ होते. कालांतराने ते पडले. मुर्तीही उघड्यावर आली. त्यातच या मुर्तीवर वीज पडल्याने ती किंचित भंगली. १९३६ साली रायगडावर मेघडंबरी उभारणार्‍या श्री. सुळे नावाच्या काँट्रॅक्टरांनी स्वखर्चाने एक छोटे मंदीर या जागेजवळच बांधले. सध्या आपण पाहतो ते हेच मंदीर. त्याच वेळी त्यांनी शिर्काई देवीच्या पिठावर ' श्रीशिरकाई भवानी शके १८५८' असा लेख कोरवुन घेतला असावा. १९७४-७५ पर्यंत हा लेख वाचता येत असे. आता या लेखाची सर्व अक्षरे अस्पष्ट झाली आहेत.

19-shirkaai.jpg20-shirkaai-lekh.jpg

(संदर्भ 'दुर्गदुर्गेश्वर रायगड - लेखक प्र. के. घाणेकर)

शिर्काई देवीच्या मंदीरातुन निघुन आम्ही पुन्हा पायर्‍या उतरुन हत्तीतलावाजवळ आलो. घाणेकरांनी पुस्तकात उल्लेख केलेल्या हत्ती तलावाच्या बांधावरील कोरलेली चित्रे आम्हाला शोधायची होती. हत्ती तलाव हा एका बाजुने खोदीव आहे आणि दुसर्‍या बाजुला उतरता होत गेलेला आहे. उतरत्या बाजुला पाणी अडवण्यासाठी विहिरिच्या काठाप्रमाणे दगडी चिर्‍यांचा बांध बांधला आहे. याच बांधावर तलावाच्या आतील बा़जुला दगडी चिर्‍यांच्या वरुन तिसर्‍या ओळीत काही चित्र कोरली असल्याचा उल्लेख घाणेकरांनी केला आहे. धुके जमलेले असल्याने तसे स्पष्ट काही दिसत नव्हते. जवळुन बघावे म्हटले तर त्यासाठी तळ्यातील दगडावर उतरावे लागले असते. ते काही श़य नव्हते. मग बरोबर नेलेल्या दुर्बीणीतुन ती चित्रे शोधायला सुरुवत केली. पुस्तकानुसार मध्यभागी पाने असलेला कलश व दोन्ही बाजुला एक एक केळीचे खुंट आणि मासे अशी एकुण ५ चित्रे तिथे आहेत. पण आम्हाला काही केल्या ती सापडत नव्हती. शेवटी दुर्बीणीतुन पाहतना बांधाच्या बरोबर मध्यभागी काही झाडे उगवली आहेत त्यांच्या बरोबर वर एक चित्र अस्पष्ट दिसले. नीट पाहिले असता तो कलश असावा असे वाटले. पण त्याच्या दोन्ही बाजुला कोणतेही चित्र दिसले नाही. दगडावर जमलेल्या शेवाळामुळे काहीच दिसत नव्हते. माझ्याकडील कॅमेरा हा साधा डिजिटल असल्यामुळे त्याचा फोटोही काढता आला नाही. पण पुढल्या वेळी जाताना एक चांगली दुर्बीण आणि एक चांगला कॅमेरा बरोबर न्यायचे ठरवले आहे. इतर चार चित्रेही शोधायची आहेतच.

(अपुर्ण)

विषय: 

नील... अतिशय सुरेख फोटो आणि सोबत वर्णन देखील...
रायगडाची सफर घडवुन आणलीस अगदी. फार वर्षापुर्वी बघितलेला रायगड परत एकदा फिरवुन आणलास्..सुंदर!!..:)

मित्रा.. सहिये !!! इतर चार चित्रे शोधायला येइन रे.. Happy
तुझे वर्णन वाचुन आता पुन्हा जाईनच ! सगळे फोटो मस्त..
तो रोपवेचा चौथा फोटु लै खत्री रे.. पुढे ताराच गुल आहेत.. !!!