गणेशोत्सव २००९ आभार प्रदर्शन

Submitted by संयोजक on 3 September, 2009 - 20:20

गेले बारा दिवस चालू असलेल्या मायबोली गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. 'मायबोली गणेशोत्सव : हमखास यशस्वी पाककृती' मध्ये सांगितल्याप्रमाणे भरपूर उत्साह, आवडीनुसार कल्पनाशक्ती, विनोदाचा मसाला, कोपरखळ्यांची फोडणी, दाद आणि प्रतिसादांची सजावट आणि रांधायला-वाढायला-चाखायला
लेखण्या, कॅमेरे, झारे, कढया, चॉपस्टिक्स आणि रंगपेट्या हे सगळे घटक पदार्थ घेऊन साजरा केलेला गणेशोत्सव दणक्यात साजरा न होता तरच नवल !!! हा उत्सव यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी संयोजक मंडळाला पडद्यामागच्या अनेक कलाकारांची खूप मदत झाली. ह्या मायबोलीकरांना पडद्यासमोर आणून त्यांची ओळख व आभार प्रदर्शनाचा हा एक महत्वाचा आणि गोड कार्यक्रम.

मायबोलीकरांच्या सक्रीय सहभागाशिवाय गणेशोत्सव साजरा होणं शक्यच नव्हतं. त्यामुळे सर्वप्रथम गणेशोत्सवात स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, अवांतर कार्यक्रम आणि जाहिराती ह्यांना मनमोकळी दाद व भरभरून प्रतिसाद देणार्‍या सर्व मायबोलीकरांचे संयोजकांतर्फे मन:पूर्वक आभार. तुम्हा सगळ्यांचा हा सहभाग आम्हा संयोजकांना रोज नवीन उत्साह देऊन जात असे.

मागच्या वर्षी चालू झालेला लिखित व श्राव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचा उपक्रम यंदाही उत्साहात साजरा झाला!

लिखित विभागामध्ये यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात घडणार्‍या घडामोडींचा आढावा कथामालिकेच्या माध्यमातून खास नेमाडे शैलीत घेतला मायबोलीकर बो-विश ह्यांनी. ही कथामाला आवडल्याचे अनेक मायबोलीकरांनी आम्हांला तसेच बो-विश ह्यांना कळवले आहे. श्री गणेशाचे, अष्टविनायकाचे दर्शन चित्रांच्या माध्यमातून पल्ली ह्यांनी आपल्याला घडवले तर अवती भवती असणार्‍या परिचितांमधल्या अपरिचित व्यक्तींची ओळख मायबोलीकरांना अ‍ॅडम ह्यांनी करून दिली. चीझ ह्या विषयावरची माहितीपूर्ण लेखमाला मायबोलीकर शोनू ह्यांनी सादर केली. ह्या सर्व लेखमालांबद्दल बो-विश, पल्ली, अ‍ॅडम आणि शोनू ह्यांचे संयोजकांतर्फे आभार!

ह्या व्यतिरिक्त लिखित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गुंडाळलेल्या कापडाची कहाणी, ॐ नमोजी आद्या, आई..ते लेखिका-कवयित्री, सार्थ गणपत्यथर्वशीर्ष, तू असे विविध विषयांवरचे लेख सादर केल्याबद्दल अनुक्रमे नीरजा, बासुरी, प्राजु, झक्की व श्रावण मोडक ह्या मायबोलीकरांचे तर आपल्या खास शैलीतल्या गुंफण, दृष्टीभ्रम, आणि सुरूवात ह्या कथा सादर केल्याबद्दल अनुक्रमे सुपरमॉम, कविता नवरे, आणि विशाल कुलकर्णी ह्या मायबोलीकरांचे शतश: आभार!

मायबोलीकर उपासक यांनी संगीतबध्द केलेल्या 'जय हेरंब' ह्या ध्वनीफितीतली सगळी गाणी श्राव्य विभागात सादर झाली. संगीतप्रेमी मायबोलीकरांना ही एक अनोखी मेजवानीच मिळाली. मायबोलीवरचे प्रसिध्द कवी वैभव जोशी ह्यांचे काव्य वाचन तर प्रसिद्ध विडंबनकार मिल्या ह्यांचे हझल वाचन सांस्कृतिक कार्यक्रमांत निराळेच रंग भरून गेले. स्वत: रचलेल्या गणेशविषयक रचना स्वरबध्द करून त्या आपल्या गणेशोत्सवासाठी मायबोलीकर श्यामली आणि जयावी ह्यांनी उपलब्ध करून दिल्या. आपल्या कलाकृती मायबोलीकरांसाठी घेऊन आल्याबद्दल संयोजकांतर्फे उपासक, वैभव जोशी, मिल्या, श्यामली आणि जयावी ह्यांचे आभार.

वरील सर्व लेखक, कवी आणि कलाकारांनी हे कार्यक्रम आपल्यासमोर सादर करता यावेत म्हणून वेळात वेळ काढून अपार मेहनत घेतली आहे. गणेशोत्सव संयोजन समिती ह्या सर्वांच्या मेहेनतीला दाद देत त्यांचे मन:पूर्वक आभार मानत आहे.

यंदाच्या वर्षी प्रथमच गणेशोत्सवात दोन गद्य STY घेण्यात आली. ह्या दोन्ही STYची उत्कंठावर्धक आणि चटकदार सुरवात करुन दिल्याबद्दल मायबोलीकर psg (जळ्ळं मेलं 'लक'क्षण) आणि प्रकाश काळेल (अपराजित) ह्यांचे खास आभार!

मायबोलीकरांना कोड्यात टाकायला सदा उत्सुक असलेले स्लार्टी, गजानन देसाई आणि क्ष ह्यांनी वेळातवेळ काढून "परस्पर संबंध ओ़ळखा" साठी कोडी बनवून दिली तर "कायापालट" स्पर्धेसाठी मिल्या ह्यांनी मायबोलीवरच्या असंख्य कविता चाळून कवितांची निवड करून दिली. तसेच ह्या कवितांच्या रचनेबद्दल माहितीही दिली. याच स्पर्धेसाठी मायबोलीकर कवी वैभव जोशी, हरीष दांगट, झाड, आणि चक्रपाणी ह्यांनी आपल्या रचना उपलब्ध करून दिल्या. ह्या अमूल्य योगदानासाठी स्लार्टी, गजानान देसाई, क्ष, मिल्या, वैभव जोशी, हरीष दांगट, झाड, आणि चक्रपाणी ह्यांना धन्यवाद !

पाककृती स्पर्धेच्या परिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल परिक्षकांचे आभार. तसेच शुध्दीकरण, मुद्रित शोधन व वेळोवेळी लागेल ते सहाय्य केल्याबद्दल मायबोलीकर आयटीगर्ल, psg, शोनू, सुपरमॉम, सशल, चिनूक्स तसेच मंडळाच्या सल्लागार रुनी ह्यांचे विशेष उल्लेखनीय आभार!!

ह्यावर्षी मायबोलीकरांच्या परिवाराला गणेशोत्सावात सामिल करून घेण्यासाठी लहान मुलांची चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. आपल्या मुलांना ह्यात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल पालक मायबोलीकरांचे तसेच अतिशय छान छान चित्रे काढल्याबद्दल सर्व छोटुकल्यांचे कौतुक.

आता सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्वाचे. आम्हां सर्वांवर विश्वास दाखवून गणेशोत्सव संयोजनाची संधी दिल्याबद्दल संयोजक मंडळातल्या प्रत्येकातर्फे अ‍ॅडमिन ह्यांना मनापासून धन्यवाद. अ‍ॅडमिन आणि वेबमास्टर ह्यांनी वेळोवेळी तांत्रिक मदत, कायदेशीर बाबींबद्दल सल्ले, मार्गदर्शनपर प्रेमळ सूचना आणि अनुभवांचे बोल सढळ हस्ते आम्हाला उपलब्ध करून दिले. त्यांच्या मदती शिवाय तसेच सहकार्याशिवाय गणेशोत्सव पार पाडणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्या दोघांचे आभार मानावे तेव्हढे कमीच आहेत !

गणेशोत्सवाच्या संयोजनामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार लागला आहे पण अनवधानाने इथे उल्लेख करायचा राहून गेला अशा सर्वांनाही संयोजकांतर्फे धन्यवाद!

कुठल्याही गोष्टीमध्ये सुधारणेला वाव असतोच. जर यंदा गणेशोत्सवात काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील किंवा काही गोष्टी अधिक चांगल्या पध्दतीने करता आल्या असत्या असं आपल्याला वाटत असेल तर ते आम्हाला नक्की कळवा. पुढच्या वर्षीच्या संयोजक मंडळाला त्याची निश्चित मदत होईल. आपल्याला काय आवडलं, काय नाही आवडलं किंवा आणखी काय करता आलं असतं ह्याबद्दल जाणून घ्यायला आम्ही सर्व जण उत्सुक आहोत.

स्पर्धांच्या मतदानाबद्दलची घोषणा लवकरच केली जाईल.

धन्यवाद,
मायबोली गणेशोत्सव २००९ संयोजक मंडळ.

विषय: