"कायापालट - द मेक ओव्हर" अर्थातच विडंबन स्पर्धा क्र. ४

Submitted by संयोजक on 31 August, 2009 - 22:47

स्पर्धेचे नियम :

१. दर चार दिवसांनी एक कविता दिली जाईल, तिचे विडंबन करायचे आहे.

२. विडंबन मराठी भाषेतच केले जावे.

३. एका आयडीला एका कवितेचे फक्त एकच विडंबन करणे अपेक्षित आहे.

४. एका आयडीला, एकूण दिल्या जाणार्‍या चारही कवितांचे विडंबन करण्याचे स्वातंत्र्य आहे.

५. विडंबन करताना शक्यतो वृत्त, गण ह्यांचे नियम पाळून करावे असा आग्रह आहे पण बंधन नाही. मूळ कविता ज्या प्रकारात आहे, त्याच प्रकारात विडंबन पण आले तर उत्तम!!

६. विडंबनाला शीर्षक देणे बंधनकारक आहे.

७. विडंबन अश्लील किंवा बिभत्स नसावे.

८. विडंबनात वैयक्तीक टीका नसावी.

९. एका आयडी तर्फे एकूण फक्त चारच एन्ट्री स्वीकारली जातील.

१०. विडंबन या अगोदर मायबोलीवर प्रकाशित झालेले नसावे.

११. विजेता मतदान पध्दत वापरून निवडला जाईल.

--------------------------------------------------------------------------------------
स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना :

१. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना ती गणेशोत्सवाच्या संयोजकांना sanyojak@maayboli.com ह्या पत्त्यावर इ मेल करून पाठवणे अपेक्षित आहे.

२. तसेच इमेल पाठवताना Vidamban spardha असे सब्जेक्ट मधे लिहावे. (एक नम्र सूचना : इकडूनच कॉपी-पेस्ट करावे.)

३. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना प्रवेशिकेसोबतच मायबोली आयडी आणि प्रवेशिकेला शीर्षक देणे बंधनकारक आहे.

४. प्रत्येक प्रवेशिकेला स्पर्धेसाठी क्रमांक (ID) देऊन ती प्रवेशिका संयोजकांतर्फे ह्या बातमी फलकावर प्रकाशित केली जाईल, तसेच स्पर्धकाला प्रवेशिका मिळाल्याची पोच इ-मेल द्वारे पाठवली जाईल.

५. प्रवेशिका संयोजकांना इ-मेल केल्यानंतर संयोजकांना २४ तासांची मुदत द्यावी. २४ तासांनंतरही तुमची प्रवेशिका दिसत नसेल तर संयोजकांना इ-मेल करावी.

--------------------------------------------------------------------------------------

मायबोलीकरांकडून आलेल्या सुचनेनुसार ह्या वर्षी स्पर्धांच्या निकाल जाहिर होईपर्यंत स्पर्धकांचे नाव जाहिर केले जाणार नाहिये. मतदान निनावी (anonymous) पध्दतीने घेतले जाणार आहे. त्यामुळे स्पर्धकांनी त्यांच्या प्रकाशित झालेल्या प्रवेशिकेवर येणर्‍या प्रतिसादांना, निकाल जाहीर होईपर्यंत कुठल्याही माध्यमात (प्रतिक्रिया, विचारपुस, वाहत्या बातमी फलकांवरच्या गप्पा इत्यादी ) उत्तर देऊ नये. स्पर्धकांकडून (अनवधानानेसुद्धा) त्यांची ओळख उघड झाल्यास ती प्रवेशिका स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी.

--------------------------------------------------------------------------------------

चौथी कविता :

'सौभाग्य' - कवी चक्रपाणी - वृत्तबद्ध कविता

खोड्या करून इतके दुर्दैव हासलेले
पण गप्प राहण्याचे मी वचन पाळलेले

हातांस काय ठावे मेंदीत रंगलेल्या
गजऱ्यास काय ठाउक केसांत माळलेल्या
कोठेतरी कुणावर खंजीर चाललेले...

सनई नि चौघड्यांनी आहेत कान किटले
दिसतेस तू तरी मी डोळे कधीच मिटले
हृदयात आसवांचे मग सूर लागलेले...

जपलेत घाव इतके - जणु मूल्यवान रत्ने
या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?
होते कधी तुला मी सर्वस्व वाहिलेले...

मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो
समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो
होमात आज माझे आयुष्य पेटलेले...

चिमटीत मावणारे सौभाग्य घे तुला तू
विसरून जा मला अन् कर मोकळे मला तू
झोळीत घाल माझ्या अस्तित्त्व फाटलेले...

रचनेबद्द्ल :

कवी चक्रपाणी हे त्यांच्या गझलांसाठी आणि वॄत्तबद्ध काव्यासाठी मायबोलीवर प्रसिध्द आहेत.
त्यांची ही कविता आनंदकंद वृत्तात आहे.
गा गा ल गा ल गा गा । गा गा ल गा ल गा गा
पहिल्या गागालगालगागा नंतर यती येतो (जिथे आपण काव्य म्हणताना अल्पशी विश्रांती घेतो ती जागा)

आनंदकंद वृतातली किती उदाहरणे द्यायची :
केव्हातरी पहाटे । उलटून रात्र गेली
जेव्हा तुझ्या बटांना । उधळे मुजोर वारा
अद्यापही सुऱ्याला । माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा । हा खोल घाव नाही
जेव्हा तुझी नि माझी । चोरून भेट झाली
डोळ्यात सांजवेळी । आणू नकोस पाणी

विडंबन करताना वृत्त पाळा हा आग्रह आहे पण बंधन अर्थातच नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users