ताडगोळा

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

या दिवसात मुंबईच्या बाजारात ताडगोळे दिसू लागतात. पाच सात सेमी व्यासाचे हे छोटेसे फळ. वरती फ़िक्कट बदामी रंगाची साल. ती हळुवार हाताने उकलली की आत अर्धपारदर्शक गर. आणि कोवळा असेल तर आतमधे चमचाभर गोड पाणी.

गराची चव अगदी कोवळ्या शहाळ्यासारखी. फारशी गोड नाहीच. ताडगोळ्याच्या चवीपेक्षा तो हळुवार सोलुन खाण्यातच खरी मजा.

हि फ़ळे अगदी कोवळीच घ्यावी लागतात. जरा जून असली तर पाणी गायब झालेले असतेच शिवाय गरही चामट झालेला असतो.

अनेकजणाना हे फळ माहित नसते, त्यामूळे ग्राहकही कमीच, पण ज्याना माहित आहे, त्यांचे डोळे मात्र याचा शोध घेणारच.

या ताडगोळ्याची झाडे, मुंबईत, खास करुन समुद्रकिनार्‍यावर आणि रेल्वे ट्रॅकच्या बाजुने भरपुर दिसतात.

tadgola.jpg

अशी झाडे तूम्ही बघितली असतीलच.

त्यातही नर मादी असे प्रकार आहेतच. हे झाड पाम या प्रकारातले. भरपुर उंच वाढते. सहसा फांद्या नसतात. नर झाडाला केवळ फ़ुलांचा दांडोरा लागतो. मादी झाडाला मात्र पाच सहा इंच व्यासाची गोलाकार फळांचे घोस लागतात. वरच्या फोटोत जरा निरखुन बघुया.

tadgole.jpg

या फळांचा रंग बराचसा वांग्यासरखा काळपट जांभळा. फळाच्या कठिण आवरणात, दोन तीन ताडगोळे असतात, त्याना धक्का न लावता ताडगोळे अलगद काढणे जरा कौशल्याचेच काम आहे.

मुंबईत हि झाडे आहेत तशीच उत्तरेला अहमदाबाद रोडच्या बाजुनेही खुप आहेत. दक्षिणेला मात्र पनवेलच्या पुढे हि झाडे फारशी दिसत नाहीत.

फळाच्या आवरणातुन बाहेर काढलेला ताडगोळा फारसा टिकत नाही. सालही काळी पडत जाते आणि गर आंबूस होत जातो. वरच्या फळाच्या आवरणात मात्र तो थोडाफ़ार टिकतो.

माझ्या आजीला ते फार आवडायचे, पण मुंबईहून गावाला ते नेणे शक्य नसायचे. मग आम्ही अख्खे फळत विकत घेत असु. त्यावेळी तो विक्रेता फार आढेवेढे घ्यायचा. घरी ताडगोळे काढता येणार नाहीत हे वर वर सांगितलेले कारण असले तरी, आतमधल्या ताडगोळ्यांच्या संख्येची खात्री नसल्याने, आपण कमी दरात विकतोय कि काय, अशीच भिती त्याला वाटत असावी.

बाजारात मात्र हल्ली, खुपदा अख्खी फळेच आणलेली असटात, आपल्या डोळ्यासमोरच ते काढुन दिले जातात.

तसा याचा सिझन अगदी छोटा. याच्या झाडावरुन घोस काढताना, दोरीने बांधुन अलगद काढावे लागतात.

नुकत्याच उतरवलेल्या फ़ळातुन काढलेल्या फळाची चव मात्र अप्रतिम लागते.
भारताबाहेर माझ्या अंदाजाने फ़िलीपिन्स आणि थायलंडमधे याची झाडे आहेत. याचे गर टिनमधे विकायला असलेले बघितले आहेत मी. पण ताजे फळ मात्र बघितले नाही.

विषय: 
प्रकार: 

दिनेश.
ताडगोळे खाल्याच्या आठवणी जागवल्यात.... च्यायला, इथे न्यू जर्सीत ताडगोळे, जाम वगैरे खास फळांचं सुखच नाहीये !!
-- संदीप
www.atakmatak.blogspot.com

संदीप, तिथे सुवर्णपत्र किंवा क्रायसोफॉयलम ची झाडे आहेत का ? त्यालाच Star Apple असेही म्हणतात. मी ताडगोळ्याची तहान, सॉरी भूक या फळांवर भागवली होती.

ताडगोळ्याच नाव ऐकून तोंडाला पाणी सुटलं. लहानपणी खुप खाल्लेत पण गेल्या काही वर्षात नाहीच. गेल्या वर्षी मुंबईला गेलो असताना घेतले पण जून निघाले. लहानपणी कन्याकुमारीला दोन दिवस पोटभर तेच खाल्ले होते.

चला आता ताडगोळे आणलेच पाहिजेत. ह्याच झाडापासून नीरा बनवतात. पूर्वी ती फार कमी ठीकाणी (विशेषतः काही मोजक्या railway platforms वरच) मिळायची आणि ती पण सकाळीच. हल्ली बर्‍याच ठिकाणी मिळते आणि अगदी दुपारपर्यंत मिळते. पण त्याला तो स्वाद नाही, खूप गोड व पाणीदार असते.

काल लिहिण्याच्या ओघात शास्त्रीय माहिती द्यायची राहिलीच. ( बरोबर ओळखलत, मीही आठवण काढतच लिहित होतो.)

तर याचे शास्त्रीय नाव Borassus madagascariensis याला फ़ॅन पाम असेही म्हणतात. याच्या पानाचा दांडा दोन मीटर आणि प्रत्यक्ष पान, दीड मीटर लांब रुंद असु शकते. आशिया, न्यु गिनी आणि आफ़्रिकेतही हा आढळतो, पण स्थानिक जातीत फरक असु शकतो. याच्या पानाचे अनेक उपयोग होतात. पंखे, चटया, ताट्या वगैरे करण्यासाठी उपयोग होतो. पुर्वापार याची लागवड केली जातेय, कंबोडियाच्या जगप्रसिद्ध अंगकोर मंदिरसमुहाच्या परिसरात या झाडांची लागवड केली आहे. या झाडाचे आयुश्य सहज १०० वर्षांचे असते.

भुर्जपत्र करण्यासाठी याच्या पानांचा उपयोग होतो. हि पाने हळद आणि मिठाच्या पाण्यात उकळुन वाळवतात. मग त्याना दगडाने पॉलिश केले जाते.
अनेक जुने ग्रंथ या पानांवर लिहिलेले आढळतात. मला कुठेतरी वाचल्याचे आठवतेय कि तामिळनाडु मधे अनेक जणांचे भविष्य असे लिहुन ठेवलेले आहे. लोक तिथे हौसेने ते वाचायला जातात. आणि ती व्यक्ति तिथे कधी येणार आहे तेही, त्या पत्रांवर लिहुन ठेवलेले आहे.

याच्या पानाच्या दांड्यांचा कुंपणासाठी उपयोग होतो. या पासुनच जाडसर काथा निघतो आणि त्याचा ब्रश वगैरे करता येतो, झाडाचे लाकुडही मजबुत असते आणि घरबांधणीत त्याचा उपयोग होतो.

या झाडापासुन ताडी मिळते, ती आंबवुन मादक पेय करतात. ( नीरा शिंदीच्या झाडापासुन मिळते ). याही झाडापासुन नीरेसारखे पेय मिळते. ते आटवुन गुळही करता येतो, तो गुळ उसापासुन केलेल्या गुळापेक्षा चवदार लागतो.

आपल्यापेक्षा तामिळनाडुमधे या झाडाचा खाण्यासाठी जास्त उपयोग होतो. या झाडाचे कोंब, कोवळी रोपे खातात. तसेच झाडाच्या टोकाशी एक मऊ गर तयार होतो, तोही खातात.

या वेळीच्या भारतभेटीत मी आयुष्यात पहिल्यांदा ताडगोळे बघितले आणि खाल्ले. माझ्या सासरी (पालघर तालुक्यात) मात्र सगळ्यांना हे फळ माहित आहे आणि एकदम आवडते. मला असे फळ असते आणि ते खातात हेच माहीत नव्हते.
ताडी करतात ते हे फळ अशी याची सासरी ओळख करुन दिली होती.

मलापण ताडगोळे खुप आवडतात... अगदी जून झालेले पण मी थोडेसे खाते. खोबरे खाल्ल्यासाऱखे वाटते. पण उगाच जास्त खायला गेलं तर दात दुखायला लागतात.
(तुम्ही ताडगोळ्याच्या गूळाबद्दल लिहिले ते वाचुन मला अमिताभ, नुतन आणि पद्मा खन्नाचा सौदागर आठवला. त्याच्यात पण असाच कुठलातरी गूळ दाखवला होता. आता नक्कि आठवत नाही. मात्र त्यातले 'सजना है मुझे सजना के लिये' हे गाणे मात्र चांगले आठवतेय)
साधना

साधना,
सौदागर माझ्याही आवडीचा सिनेमा. त्याचा विषयच हा आहे. त्यात शिंदीच्या झाडापासून केलेला गूळ दाखवलाय. त्याची पूर्ण प्रक्रियाही दाखवलीय.
गाणीपण छान होती.
लताची, तेरा मेरा प्यार रहे, अब तो है तुमसे, आशाचे सजना है मुझे, क्यू लाये सैंया पान, किशोरचे हर हँसी चीजका हि सगळी त्यातलीच गाणी.

सन्दीप

तादाचे झाद नाहि पन जामचे झाद मात्र आमच्या लोनावल्याच्या घरी आहे आनी त्याला अगदि पानागनीक जाम लाग्तात.
सम्पुर्न झाद पान्धरे होते.तसेच तूतीचे झाद सुधा आहे. आमच्या कदिल बालचमु त्या झादाखालि थीय्या थोकुन आसतात.
आनि सम्पुर्न चेहरा लाल्-लाल माकदासारखा करतात.

मला आजवर वाटायचं की हे रातांबे आहेत म्हणुन्...आम्ही ताडगोळे म्हणुन जे खातो पुण्याला ते फळ चपट्या आणि चौकोनीसर आकाराचं असतं. त्याच्या कडा गोलाकार असतात. साल तपकिरी रंगाची सहज काढता येणारी. पारदर्शक पांढरट जेलीसारखा पाणिदार गोड पदार्थ असतो आत. सोलुन काढतानच हात गार गार ओले होतात मस्तपैकी. कोपरापर्यंत रस जातो. त्या फळाला काय म्हाणायचं मग?

पल्लि, तेच ताडगोळे. रातांबे लाल असतात आणि प्लम म्हणजे आलुबुखार सारखे दिसतात. शहरात ते क्वचितच विकायला असतात. झाडावर पिकलेल्या रातांब्याचा गर गोड असतो, पण तो दाताला न लागू देता खायचा असतो. सालापासून कोकमे वा आमसूले करतात. बियांपासून तेल काढतात त्याला मुटियाल म्हणतात. माझ्या जुन्या पानावर त्याचा फोटो आणि माहिती आहे.

हे आम्च्या बेंगलोरी मिळतात.. रस्त्यांवर गाड्याच्या गाड्या असतात.. सही लागतं हे.. उन्हात तपलो आपण की खावं... शांती.. शांती.. शांती Happy

आई ग्ग! मस्त मस्त! मी खाल्लेत हे पनवेलला! अगदी नारळाच्या पाण्यासारखी चव.

<<तामिळनाडु मधे अनेक जणांचे भविष्य असे लिहुन ठेवलेले आहे. लोक तिथे हौसेने ते वाचायला जातात. आणि ती व्यक्ति तिथे कधी येणार आहे तेही, त्या पत्रांवर लिहुन ठेवलेले आहे. <<
रेणुका शहाणेच्या 'सुरभी' मधे दाखवलं होतं हे. Happy

दिनेशदा, ताडाच्या पानांना 'भूर्जपत्र' म्हणतात?

दिनेशदा दिनेशदा दिनेशदा आहो तुम्ही कुठली फळे पुढे टाकणार आहात ते एकदा मला सांगत जा. माझ्याक्डे ताडगोळ्याचे फोटो आहेत.

ताडगोळा हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणुन मी त्याचे फोटो गोळा करतेय. पुर्ण झाले की एक सविस्तर लेख लिहायचा आहे. तुम्हाला काही फोटो देते. अजुन मी सगळे फोटो लोड नाही केलेत कॅमेर्‍यातुन म्हणुन जे आहेत ते इथे टाकते.

ताडगोळे.

सॉरी पिकासात एकच फोटो सेव्ह आहे. बाकीचे अजुन कॅमेर्‍यातच आहेत.

ताडगोळे-शिंगाडे- म्हटलं की हमखास आईची आठवण येते. तिनेच या खाद्यप्रकारांची ओळख करून दिली होती. माझ्या मुलीला एक दोनदा खाऊन देखील खुपच आवडतात. पण सहसा सहज्पणे मिळत नाहीत. पुण्यात मंडई जवळ उन्ह्याळ्यात मिळतात.

जागु तुझ्या फोटोवरुन आठवले, उरणवरुन येणारी सकाळची एक एस्टी आहे जी माझ्या घराजवळच्या स्टोपवर स, ९.३० ला पोचते. त्यातली एक प्रवासी भरपुर भाज्या व. घेऊन ठाण्याला जाते. हल्लीच्या दिवसात तिच्याकडे मोठी टोपली भरुन ताडगोळे असतात. ती दिसली की मी विकत घेते ताडगोळे Happy हल्ली आमच्याकडे ताडगोळ्याचे जांभळे नारळ घेऊन विक्रेते फिरतात. पण आतले ताडगोळे कसे निघतील ते सांगता येत नाही. त्याने नारळ सोलल्यावर जसे निघतील तसे घ्यावे लागतात. जुन निघाले की वांधे.

साधना अगदीच जर ताडफळ काळा असेल तर तो जुन असतो. थोडा हिरवा असणारा ताडफळ कोवळा असतो. मी थोड्याच दिवसात डिटेल्स देईन ग. आईला सांगुन ठेवलय की ताडगोळे उतरवायला माणुस आला की मला बोलव.

वसई ते बोर्डी ह्या भागात समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर ताडाची झाडे दिसतात. अनेकांच्या बागाही आहेत. आमचीही अनेक ताडाची झाडे आहेत. ताडगोळे खायला जितकी मजा येते तितकीच मजा मला ताडी प्यायला येते. मात्र ताडी एकदम सकाळी-सकाळी ताजी असताना प्यावी. पोटाला चांगली असते असे म्हणतात. जून झाली की मात्र आंबट होते.

पाणीपुरी जशी आख्खी तोंडात टाकून फोडावी लागते तसाच ताडगोळे सुद्धा आख्खातोंडात टाकूनच फोडावा.. नाहीतर आतले पाणी वाया... Happy

आईला सांगुन ठेवलय की ताडगोळे उतरवायला माणुस आला की मला बोलव.

तु उशिरा पोचलीस तरी चालेल, मला आधी बोलवायला सांग....

हा जुना होता लेख. (माझ्या फलश्रुती मालिकेतला नाही.) मला यावेळी सिंगापुरला सुकवलेले ताडगोळे मिळाले. सुकवलेले असल्याने आकाराने एक रुपयाच्या नाण्याएवढेच होते. पण चवीला अप्रतिम होते. आता परत जायला हवे !!

मला खुप आवड्तात्...मी नेहमी खाते....
उन्हाळ्यात हे ताडगोळे खाणे खुप छान असते.....आत्ताही ऑफीसच्या बाहेर आहेत

सावरी

दिनेशदा,तुमच्या ताडगोळ्याचा लेख मला माझ्या लहानपणात घेऊन गेला.हैद्राबाद्ला ताडगोळ्याला मुंजालु म्हणतात्.भर उन्हाळ्यात दुपारी आम्ही ह्या मुंजालुवाल्याची अगदी वाट पहात असू.तेंव्हा एक रुपयाला दहा मिळत असत्.मग त्यांचा केंव्हाच फडशा पडत असे.आता म.प्र मध्ये आल्यापासुन विसरलेच होते ताडगोळ्यांना.पण तुमच्या लेखाने परत लहानपणांत हरवून गेले.

दिनेशदा खूप छन माहिती दिलीत. आमच्याकडेपण हे फळ खूप आवडते. सध्या इथे ती फळं खूप आहेत. सुमेधा आपल्या लहानपणी ती फळं जास्त दिसत नव्हती. पण आता खूप दिसतात. तेंव्हा एक रुपयाला दहा फळं मिळायची आता दहा रुपयाला चार मिळतात. पण ताडीचं फळ म्हणून न खाणारे मी बरेच पाहिलेत.