सातबारा उतारा कसा वाचावा? How to read satbara utara

Submitted by daksha on 9 February, 2014 - 01:57
satbara utara

आपल्यापैकी अनेकजण नोकरीधंद्यानिमित्ताने किंवा इतर काही कारणाने आपल्या मूळ गावापासून इतर ठिकाणी म्हणजे शहरात किंवा इतरत्र स्थायिक झालेले दिसतात. बर्‍याचदा त्या मूळ गावात आपल्या काही वडिलोपार्जित किंवा स्वकष्टार्जित मिळकती तसेच जमिनीदेखील असतात. आपल्या आजी-आजोबा,आई-वडिलांच्या पिढीला जमिनीसंदर्भातल्या थोड्यातरी कायदेशीर बाबी ते त्या गावच्या ठिकाणी राहात असल्याने माहीत असायच्या. आपल्या पिढीला मात्र गावापासून लांब राहील्यामुळे सातबाराचे उतारे,फेरफारपत्रक्,वारसाहक्क व त्याबद्दलचे कायदे इत्यादीविषयी फार माहिती असलेली दिसत नाही. तेव्हा आपण सातबारा उतारा या जमिनीसंदर्भात अत्यंत महत्वाच्या अशा उतार्‍याची माहिती करुन घेणार आहोत.
आपल्या महाराष्ट्राची जिल्हे,तालुके,गावे,खेडी यात विभागणी झालेली आहे.यात जे जमिनीचे क्षेत्र आहे,या सर्व क्षेत्रात सर्वसाधारणपणे जे डोंगर, नदी,नाले व समुद्राच्या किनार्‍याच्या भरतीच्या खुणेपर्यंतचा जो भाग असतो तो शासकिय मालकीचा असतो. इतर राहिलेले जमिनीचे जे क्षेत्र असते त्यात शेतीसाठी वापरात असलेली जमिन,पडिक जमिन,माळरान जमिन,गावठाण अशा बर्‍याच प्रकारच्या जमिनीचा समावेश होतो.
७/१२ चा उतारा म्हणजे काय?
सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाचं. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो.महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमिन महसूल कायदा १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदणी ठेवल्या जातात. यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स) या रजिस्टर मध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो. तसेच यासोबत २१ वेगवेगळ्या प्रकारचे गावचे नमुने ठेवलेले असतात. यापैकी गावचा नमुना नं ७ आणि गावचा नमुना नं १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उतार्‍याला सातबारा उतारा असे म्हणतात.
७/१२ उतारा काय दर्शवितो?
प्रत्येक जमिनधारकास स्वत:कडे असलेली जमिन किती व कोणती हे सातबारा उतार्‍यावरून कळू शकते. गाव नमुना ७ हे अधिकारपत्रक आहे व गाव नमुना १२ हे पीकपाहणी पत्रक आहे.जमिन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात

ann-a.jpg
सातबारा उतार्‍याच्या अगदी वर गाव,तालुका,जिल्हा इ. नमूद केलेले असते.
१) गाव नमुना ७:
अ) उतार्‍याच्या डाव्या बाजूस भूमापन्/सर्व्हे/गट नं व हिस्सा नं. दाखविलेला असतो.सरकारने प्रत्येक जमिनीच्या गटाला एक नं. दिलेला असतो, त्याला भूमापन किंवा सर्व्हे नं किंवा गट नं म्हणतात. आणि या प्रकारातील जमिनीचा हिस्सा कितवा आहे हे हिस्सा नं मध्ये दाखविलेले असते.त्याजवळच जमिन ज्या प्रकाराने धारण केलेली असते ती भूधारण पद्धती दाखविलेली असते. सदरची जमिन त्या व्यक्तीकडे कशी आली हे त्यावरून कळते.
भोगवटादार वर्ग१ म्हणजे ही जमिन वंशपरंपरेने चालत आलेली,मालकीहक्क असलेली असते.यालाच खालसा असेही म्हणतात.
भोगवटादार वर्ग२ म्हणजे सरकारने अल्पभूधारक किंवा भूमिहीनांना दिलेल्या जमिनी.जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली तरच या जमिनीची विक्री,भाडेपट्टा,गहाण,दान्,हस्तांतरण करता येते.
सरकारने विशिष्ट शर्ती किंवा विशिष्ट कामांसाठी किंवा मुदतीसाठी किंवा भाडेपट्ट्याने दिलेली जमिन भूधारणमध्ये मोडते. अशा अटींचा भंग केल्यास सरकार ती काढून घेते.या ईनाम्,वतन वर्गातल्या जमिनी असतात.
भूमापन क्रं.चे स्थानिक नाव या रकान्यात शेतकर्‍याने आपल्या जमिनीला नाव दिलेले असल्यास(खाचर/वाळूखाच) उल्लेख असतो.
त्याखाली जमिनीचे 'लागवडीचे योग्य क्षेत्र' यात जिरायत्,बागायत,भातशेतीचे क्षेत्र याची एकूण नोंद असते.हे क्षेत्र एकर/हेक्टर व गुंठे/आर मध्ये दाखविलेले असते.
त्याखाली पो.ख. म्हणजे 'पोट खराबा' म्हणजे लागवडीस पूर्णतः अयोग्य असे क्षेत्र दाखविलेले असते.यात पुन्हा वर्ग्(अ) म्हणजे शेतातील बांध/नाले/खाणी यांचा समावेश होतो, तर वर्ग(ब) मध्ये रस्ते,कालवे,तलाव व विशिष्ठ कामांसाठी राखून ठेवलेल्या जमिनीची नोंद असते.
त्याखाली 'आकार',जमिनीवर लावण्यात येणारा कर रु./पैसे मध्ये दिलेला असतो.
गाव नमुना ७च्या मध्यभागी मालकाचे किंवा कब्जेदाराचे नाव दिलेले असते.प्रत्यक्ष व्यवहाराच्यावेळी सातबारा उतारा पाहिला असता जर जमिन विकत देणार्‍याच्या नावास कंस केला असेल तर ती त्या जमिनीची मालक नाही असे समजावे.जमिन विकल्यावर अगोदरच्या नावास कंस करून नविन मालकाचे नाव त्याखाली लिहीले जाते.मालकाचे नावाशेजारी,वर्तुळात काही क्रं. दिलेले असतात त्याला फेरफार असे म्हणतात.त्याबद्दल आपण नंतर पाहू.
ब)गावनमुना ७च्या उजव्या बाजूला भूधारकाच्या जमिनीचा खातेक्रमांक व त्याखाली कोणाची कुळवहिवाट असेल तर त्या कुळाचे नाव लिहिलेले असते व खंडाची रक्कम दाखविलेली असते.
'इतर हक्क' मध्ये मालमत्तेमध्ये इतर अधिकार धारण करणार्‍याच्या नावाची नोंद असते.या सदरात जमिनीसंदर्भात घेतलेले कर्ज फिटलेले आहे की नाही हे पाहायला मिळते.इतर हक्क सदरात लिहिलेला शेरा नीट समजून घेणे आवश्यक असते.
काही वेळेला संपूर्ण जमिन न घेता त्यातील काही भागचं विकत घेतला जातो. अशा भागाला तुकडा असे म्हणतात.इतर हक्क मध्ये 'तुकडेबंदी' असे नमूद केलेले असेल तर ती शेतजमिन असेल तर ती शेतजमिन तुकडे पाडून विकता किंवा विकत घेता येत नाही.
'पुनर्वसानासाठी संपादीत' असा शेरा असल्यास सरकारला रस्ते, धरण यासाठी जी जमिन संपादित करायची असेल त्यातील शेतकर्‍याचे पूनर्वसनासाठी सरकार इतर जमिनी संपादित करु शकते. तेव्हा अशी जमिन सरकारचा अंतिम निर्णय झाल्याशिवाय विकता येत नाही.
कुळकायदा कलम ४३ च्या बंधनास पात्र राहून असा शेरा असल्यास अशी जमिन जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगी शिवाय विकता येत नाही.
कुळकायदा कलम ८४ च्या बंधनास पात्र असा शेरा असल्यास शेतीवापरासाठी असलेली जमिन विकत घ्यायची असल्यास विकत घेणारी व्यक्ती ही शेतकरी असलीचं पाहिजे.ती व्यक्ती शेतकरी नसल्यास जिल्हाधिकार्‍याकडे अर्ज करून तशी परवानगी घ्यावी लागते.

मायबोलीवरचाच सात बारा या विषयावरचा हा एक लेख पहा : ७/१२ व त्यातल्या नोंदी
satbara utara kasa wachava. How to read satbara utara? 7 12 utara in marathi online

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

वन्शावलसाठी तुमचे पूर्वज किंवा वडील जिथे स्थायिक होते / आहेत तिथल्या तलाठी ऑफिसमध्ये तुम्हाला वारस तपासनीसाठी अर्ज द्यावा लागेल. cast valididy certificate ह्यासाठी तुम्हाला तेथील स्थानिक सेतू ऑफिसवाले मदत करु शकतात किंवा तुमच्या जिल्ह्याच्या तहसिलदार ऑफिसमधून तुम्हाला हे certificate मिळते.

जात पडताळणी प्रमाणपत्र हे तहसिलदार कार्यालयात मिळत नाही तहसिलदार कार्यालय फक्त जात प्रमाणपत्र देते. जात पडताळणी प्रमाणपत्र हे जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातुन मिळते. जात प्रमाणपत्राला जोपर्यंत पडताळणी समितीचे प्रमाणपत्र मिळत नाही तो पर्यंत कायदेशीरदृष्टा त्याला महत्व नसते. अनेक निवडुन आलेल्या लोकप्रतिनिंधींना जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे आपले पद गमवावे लागल्याचे आपण वाचत असतो ते यामुळेच. जात पडताळणी समितीची कार्यालये विभागवार असतात.

फारच छान लेख आहे.

फेरफार उतारा, तो कुठे मिळतो यावर पुढच्या लेखात आपण लिहालच.

कुळासाठी येणार्‍या ३६ग ची नोंदआणि त्याचा सिग्निफिकन्स सुध्दा लिहावा.

७/१२ चा उतारा मिळतो ती वेबसाईट यांची लिंक दिल्यास आणि आपले नाव कसे शोधायचे याचा डेमो टाकल्यास अनेकांना फायदाच होईल.

साईटवरुन काढलेला उतारा आणि प्रत्यक्ष तलाढ्याकडुन घेतलेला उतारा यात काय ग्राह्य धरले जाते यावरही प्रकाश टाकावा.

दक्षा, तुम्ही असा काही लेख लिहील अस वाटल नव्हत. आता पटल की तुम्ही यात पारंगत आहात.

नॉन एन ए प्लॉट घेतला तर त्यालाही सात बारा मिळतो का ?>>>> हो मिळतो. प्लॉट कुठे घेणार त्यावर अवलंबुन. उदाहरणार्थ : मुंबई शहरात सात बारा नसुन कॅडेस्ट्र्ल सर्व्हे नंबर असतात. तसेच मुंबई उपनगरात सिटी सर्व्हे नंबर असतात पण तिथे सात बारासुध्दा असतो पण जिथे जिथे सिटी सर्व्हे नंबर पडले आहेत तिथे सातबारापेक्षा प्रॉपर्टी कार्ड महत्वाचे असतात. पण ग्रामिण भागात सिटी सर्व्हे नंबर नसतात तिथे फक्त सातबाराचा उताराच असतो.

दक्षा, तुम्ही असा काही लेख लिहील अस वाटल नव्हत. आता पटल की तुम्ही यात पारंगत आहात

त्या वकील आहेत... Happy

चला! ह्या लेखानिमित्ते आमच्या (पूर्वजांच्या) कुळात गमविलेल्या शेतजमीनिंची आठवण झाली!

ज्याने कुळ लावले होते त्या व्यक्तिच्या पुढच्या पिढ्या आता शहरात स्थायिक झाल्याचे कळले. आता दुसराच कुणी उत्पन्न घेतोय !! असो!!

त्रोटक महितीमुळे व योग्य माहिती नसल्यामुळे पुढे काही करता आले नाही! त्यामुळे वाडवडीलांच्या ऐकिव माहितीवर समाधान! कालाय तस्मै नमः!