' जैन धर्मियांचे तिर्थक्षेत्र श्रवणबेळगोळचा गोमटेश्वर'

Submitted by jyo_patil25 on 15 October, 2008 - 09:37

'श्रवणबेळगोळ' हे जैन धर्मियांचे तिर्थक्षेत्र म्हैसूरपासून साधारणपणे ९० कि.मी. अंतरावर आहे.श्रवणबेळगोळ हे एक छोटेसे खेडे आहे. तसे हे सर्वात शांत तिर्थक्षेत्र आहे. येथे गडबड गोंधळ हा प्रकार नाही. ज्या व्यक्तिंना शांतता व निसर्गाची आवड आहे त्यांच्यासाठी हे सगळ्यात चांगले ठिकाण आहे. कदाचित हे ठिकाण शहराच्या गजबजाटापासून लांब आहे त्यामुळे तेथे शांतता आढळून येते. श्रवणबेळगोळ हे खेडे डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. श्रवणबेळगोळला जांण्यासाठी म्हैसूरहून टॅक्सीने सकाळी ९ वाजता नीघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेतं. शेतामध्ये मधून मधून आढळणारी नारळाच्या झाडांची रांग, तसेच केळीची झाडे.कर्नाटक्,तमिळनाडू या प्रांतात शेताच्या बांधावर केळीची व नारळाची झाडे दिसणारच. येथील लोक अजूनही जेवण ताटात न घेता केळीच्या पानात घेतात्.रस्त्याने जातांना एका शेतात नारळाची व केळीची खूप झाडे होती तेथे आम्ही थोडा वेळ थांबून फोटो घेतले. म्हैसूर ते श्रवणबेळगोळ दरम्यान रस्त्यात आम्हांला एक ही मोठे गाव दिसले नाही. सर्व छोटी छोटी खेडी. लुंगी, कुर्ता घातलेली माणसे शेतात काम करताना दिसत होती.फाटक्या व मळक्या कपडयात खेळणारी मुले .येथील स्रियांचे खास वैशिष्टय म्हणजे काळे व लांब केस. साउथ इंडियन स्रियांना केसांमध्ये गजरा किंवा एखादे फूल लावल्याशिवाय चैनच पडत नाही.या स्रियांचे आणि फुलांचे नाते जणू काही जन्मोजन्मीचे ॠणानुबंध असावेत त्याप्रमाणे आहे असे आपल्यासारख्यांना वाटल्याशिवाय राहत नाही.लांब केसांचा व फुलांचा मोह येथील प्रत्येक स्रिला आहे.
श्रवणबेळगोळला पोहचल्यानंतर समोरचा डोंगर कसा चढायचा म्हणून मनाची तयारी करू लागलो.चहा-नाश्ता झाल्यावर आम्ही विंध्यगिरी पर्वत चढण्यास सुरुवात केली. अर्थात डोंगराच्या वरच्या टोकापर्यंत पायर्‍या आहेत. पायर्‍यांमुळे डोंगर चढणे सोपे जाते. थोडा वेळ चढायचे नंतर थांबायचे असे करत करत आम्ही एकदाचा डोंगर पार केला. वरती चढ्ल्यावर खाली वाकून पाहिले तेव्हा सभोवतालचे दृश्य पाहून आमचा थकवा कुठल्या कुठे पळाला व पर्वत चढण्याच्या श्रमांचे चीज झाले असे वाटले.विंध्यगिरी पर्वतावरुन दिसणारे खालील दृश्य फारच विलोभनीय होते. कौलारू छत असलेली घरे लाल लाल ठिपक्यांसारखी दिसत होती. एक छोटेसे तळे.आकाशाचे प्रतिबिंब तळ्यात निळया रंगाचे पाणी धारण करुन वरती आल्यासारखे भासत होते. नारळाची झाडे, सर्व देखावा नजरेत साठवून घ्यावासा वाटत होता.विंध्यगिरी पर्वत हा काळया भुरकट रंगाच्या दगडांचा बनलेला आहे.
पर्वतावर पोहचले की समोरच द्वारपालाची सुबक व रेखीव दगडाची मूर्ती गोमटेश्वराचे दर्शन घ्यायला येणार्‍यांचे जणु काही स्वागतच करीत आहे. प्रवेशद्वार ओलांड्ल्यानंतर एका अखंड दगडातून बनवलेली भव्य मूर्ती पाहणार्‍याला स्तंभितच करते. ही मूर्ती ५७ फूट उंचीची आहे. या मूर्तीलाच गोमटेश्वराचा किंवा बाहुबलीचा पुतळा म्हणतात. गोमटेश्वराच्या पुतळयासमोर उभे राहिल्यावर माणसाला आपल्या खुजेपणाची जाणीव प्रकर्षाने होते. या महाकाय मूर्तीसमोर उभे राहिल्यावर माणसाचा अहंकार नक्कीच लुप्त होतो. गोमटेश्वराचा पुतळा खूपच उंच असल्यामुळे त्याला छत बांधणे शक्य नाही् ही मूर्ती वर्षानुवर्षे ऊन, वारा व पाऊस यांचा सामना करीत धीराने उभी आहे. जणू काही ती मूर्ती मानवाला एक मूक संदेश देत आहे की कुठलेही संकट आले तरी न डगमगता धीराने तोंड द्या. मूर्तीच्या चेहर्‍यावरील तेज आपल्याला प्रभावित करीत असते. एखादया स्थितप्रज्ञाप्रमाणे ही मूर्ती उभी आहे. गोमटेश्वराच्या पुतळयाविषयी एक दंतकथा आहे. गोमटेश्वराची कथा लिहिणे हा या लेखाचा उद्देश नाही म्हणून ती कथा येथे देत नाही.कारण पर्यटनाच्या दृष्टीने या तीर्थक्षेत्राचे महत्त्व स्पष्ट करणे होय. श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराचा संपूर्ण पुतळा आपल्या कॅमेर्‍यात बंदिस्त करणे मात्र शक्य झाले नाही. इंदिरा गांधी यांनी या पुतळयाला हेलिकॅप्टरमधून अभिषेक केला होता. बाहुबलीच्या पुतळयाजवळ पंडीत वगैरे लोकांचा त्रास नाही यज्ञ करा, हवन करा, असे करा, तसे करा असा कुठलाही प्रकार येथे दिसत नाही. शांतपणे जायचे व तेवढीच शांतता तेथे उपभोगायची. तिथली शांतता भंग करण्यास आपले ही मन धजत नाही.डोळयांनी फक्त माणसांच्या हातांची किमया बघत राहायचे आवारातली शांतता व मूर्तीच्या चेहर्‍यावरील शांत भाव पाहून तेवढयाच शांतपणाने आल्या पावली परत निघायचे. खाली उतरल्यावर श्रवणबेळ्गोळ येथील जैन मठ पाहायला गेलो.जैन मठामध्ये ठेवलेले हिरे,पाचू व माणिक पाहिले. श्रवणबेळगोळ हे छोटेसे गाव असल्यामुळे येथे मोठमोठी रेस्टॉरंट्स नाहीत. हॉटेलमध्येही इडली,डोसा व उत्तप्पा यांचीच रेलचेल असते. जेवण म्हणजे एका मोठया बाऊलमध्ये भात व दोनचार भाज्या मिक्स केलेली भाजी,दही वगैरे मोठया मुश्किलीने एका ठिकाणी गुजराती थाली लिहिलेले दिसले तेव्हा आम्ही तेथे जेवण करुन आम्ही म्हैसूर मक्कामी निघालो.फिरुन पुन्हा त्या परिसराचे दर्शन लाभणे शक्य नव्हते.डोळयांनीच पुन्हा एकदा शेवटचा नमस्कार करुन आम्ही मुक्कामी पोहोचलो.

गुलमोहर: 

शाळेत असतांना आम्हाला नेले होत श्रवणबेळगोळला सहलीत. तेव्हा अभ्यासाच्या पुस्तकात होते की मराठीतला पहिला शीलालेख इथे मूर्तीच्या पायाशी सापडतो ते बघायची खूप उत्सुकता होती. सरांनी वाचुन दाखवला होता. आता पूर्ण आठवत नाहीये पण चामुंडराय करवीयले असे काही तरी होते. एकदम छान जागा आहे. खूप वर्ष झाली बघुन.

त.टी. हा लेख तुम्ही २ वेळा टाकलाय का चुकुन, जर एक लेख काढुन टाकायचा असेल तर त्या लेखाच्या संपादन मध्ये जावुन डीलीट करता येईल.
-----------------------------------------------------------
Calvin : You can't just turn on creativity like a faucet. You have to be in the right mood.
Hobbes : What mood is that?
Calvin : Last-minute panic.
- Calvin & Hobbs

चामुन्डराये करवियले, रामराये सुत्ताले करवियले.
छान आहे लेख.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

खुप छान लिहिले आहे.

फोटो पण टाका.. आम्हाला घरबसल्या ट्रिप घडेल....