भीती

Submitted by कौतुक शिरोडकर on 8 October, 2008 - 02:02

आम्हाला... आम्हाला स्वतःचा बहुवचनी उल्लेख आवडतो.... हां तर काय सांगत होतो... आम्हाला तुमचा हेवा वाटायचा. इतरानांही वाटत असावा. पण आम्हाला वाटायचा हे मात्र खरं. कधी कधी ईर्षाही. कारण एकच. तुम्ही आमच्यासारखे घाबरट नाही. तुम्हाला कधी कशाचीही भीती वाटली नाही. जणूकाही 'घाबरणे' हे क्रियापद तुमच्या भाषाज्ञानात नव्हते.
अगदी लहानपणापासून आम्ही तुम्हाला ओळखतो. सर्वसामान्यपणे ज्या गोष्टींची भीती प्रत्येकाला वाटते, ती भीती तुम्हाला नसायची. तुम्हाला वडीलांची भीती नव्हती कारण मुळात तुम्ही आज्ञाधारक. तुम्हाला मास्तरांची भीती नव्हती कारण तुमचा अभ्यास पुर्ण. ऑफिसात साहेबांची भीती नव्हती कारण तुमचा कामाचा उरक अगदी चोख. बायकोचीही भीती नव्हती कारण तुम्ही एक आदर्श पती.
थोडक्यात अमक्याची..तमक्याची भीती हा प्रकार तुमच्या बाबतीत नव्हता. तुमच्यासारखी सरळमार्गी माणसं हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी. आपण भलं आणि आपलं काम भलं. संताच्या वचनाप्रमाणे. कुणी जर म्हणाला असता की तुम्हाला परमेश्वराची भीती तरी नक्कीच असेल, तर आम्ही त्याला त्याचक्षणी ठणकावून सांगितलं असतं की 'शक्यच नाही.' परमेश्वराची भीती पापी व दुराचारी लोकांना. तुमच्यासारख्या आदर्शवादाच्या चौकटीत संथ व शांत आयुष्य घालवणार्‍या व्यक्तीला का म्हणून ?

आता ही गोष्ट अलाहिदा की तुमच्यामूळे आम्हाला मात्र नेहमी भीती. नस्ता ससेमिरा. खरचं... तुमच्यामूळेच. साहजिकच नाही का ? बर्‍या वाईटाची तुलना ही व्हायचीच. आमच्या आयुष्याच्या प्रत्येक उतार-चढावात तुमचं उदाहरण हे असायचचं. पालुपदासारखं. सावलीसारखं. अंधारातही, डोळे रोखून तर कधी वटारून. आमच्या मागेच.
"त्याला बघ, आहे का कधी शब्दाबाहेर ? नेहमी हसतमुख. तुझं तेव्हढं तोंड नेहमी वाकडं ? " इति संतापाने थरथरणारे आमचे पिताश्री.
"कुठं शेण खाल्ल दिवसभर ? चार शुद्ध लेखनाच्या ओळी लिहीता येत नाहीत दिवसभरात ? हे बघ. अक्षर बघ. जरा शिका. आमच्याकडे नाही तर निदान मित्राकडून तरी शिका काहीतरी." कायम शंख करणारे मास्तर.
"परवाची फाईल अजून इथेच. या फायली बघा. एटीआरसकट तयार. ओव्हरटाईम शिवाय. ही तुमची पद्धत... कामाची आणि प्रमोशनसाठी रडारड." चष्म्याच्या वरून दरडावणारे मिचमिच्या डोळ्याचे साहेब. खडूस साला.
"या.. आलात, मागे वळून बघायलाच नको ना ! सोयरसुतकच नाही घरच्यांच. भाओजी कसे वेळेवर येतात घरी. तुम्हाला काही विचारावं तर नन्नाचाच पाढा." कपाळाच्या आठ्या या कानापासून त्या कानापर्यत विस्तारून सौभाग्यवती.
सगळे बाण आमच्यावर. धनूष्य तुमचं. पण तुम्हीच सांगा, सगळ्यांना कसं होता येईल तुमच्यासारखं ?

त्या दिवशी तुम्ही चक्क कमाल केलीत. हेडक्लार्कला किती सहज म्हणालात, "मरणाला काय घाबरायचं ? ते चुकलयं का कुणाला ? आपलं कार्य संपल की निमुट माघारी फिरायचं. मरण तर जन्माआधीच ठरलेलं. इथे ..या भाळी लिहीलेलं."
निव्वळ सर्दी झाली की घाबरून डॉक्टरकडे पळणारे आम्ही आणि तुम्ही मरणालाही घाबरत नाही. मरण सत्य आहे हे आम्हीही मानतो व तेवढयाच निकराने नाकारतोही. पण ते सत्य तुम्ही सहज जवळ केलत. जीवनाचा दुरूपयोग करणारेच मरणाला घाबरतात. तुमच्यासारख्या पापभीरू माणसाला का भीती ?
त्याच क्षणी आम्ही ठरवलं आता उर्वरित आयुष्य तुमच्या पावलावर पाऊल ठेवून घालवावं. जमेल तेव्हढं तुमच्यासारखं व्हावं. तुमच्या जगण्याच्या व वागण्याच्या पद्धतीला अंगिकारावं. आमच्यासारखेच तुम्हालाही रोज रोज छोट्या-छोटया प्रश्नांना सामोरं जाव लागत असेल. त्या प्रश्नांना तुम्ही कसं सोडवता ते पहावं, अनुभवावं. या उद्देशाने आम्ही तुमच्या नक़ळत तुमचं निरिक्षण करू लागलो. जमेल तेव्हढा वेळ तुमच्या अवतीभवती राहण्यात घालवू लागलो. पाठलागच करत होतो म्हणाना. माफ करा हं. पण नाईलाज होता. स्वार्थ. दुसरं काय ?

तुम्हाला पाय मोकळे करण्याची सवय. दर रविवारी तुम्ही न चुकता देवळापर्यंत जात व तिथल्या पारावर बसत. त्यादिवशी तुम्ही नेहमीप्रमाणे घराबाहेर पडलात आणि आम्ही तुमच्या मागे. तुमचं अनुकरण करायला. देवळात पोहोचलात व नेहमीप्रमाणे देवळाकडे पाहून मारूतीला हात जोडलेत. पारावर विसावलात. तुम्ही भोवताल न्याहाळत होता. आम्ही तुमच्यापासून हाकेच्या अंतरावरच होतो. तुमच्या दृष्टीक्षेपात येणार नाही या बेताने. तुम्ही काहीतरी पुटपुटत होता. रामरक्षा असावी. आणि तेवढ्यात ते घडलं. अदृश्यातून दृश्य व्हावं तसा तो अचानक कुठूनतरी आला. तुमच्या शेजारी बसला. परवानगी न घेता. आम्हाला वाटलं तुमचा मित्र असावा. तसे आम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना ओळखतो पण हा नवीन होता. पण हे क्षणापुरतंचं वाटलं. कारण त्याची नजर. तुम्ही त्याच्याकडे अनोळखी नजरेने पाहीलं. आम्हाला त्याचं ते वागणं फार विचित्र वाटलं. त्याचं ते सरळ तुमच्या शेजारी, तुमचं लक्ष वेधून, तुमच्याकडे रोखून पहात बसणं. संमोहन करतात तसं. आम्ही मागे टिव्हीवर पाहीलं होतं असं एकदा. मनात पाल चुकचुकली. स्वभाव आमचा. शंका, संशय कायम. वाटलं, पुढे यावं व बोलावं. थोडे पुढे सरकलो व थांबलो.

साधारण चाळीशीचा तो. दिसायला चारचौघांसारखा. साधा सैल पांढरा झब्बा व काळी पँट. पायात साध्याच चामड्याच्या चपला. डाव्या हातात जुनाट घड्याळ. लांबून बांधलेला अंदाज. पटकन लक्षात राहील असं त्या व्यक्तीमत्वात काही नव्हतं. पण त्याची नजर ??? त्या नजरेने तुमच्या नजरेवर अधिकार मिळवलाय असं वाटल आम्हाला. तुमची नजर स्थिर. आता तुमच्या डोळ्यात काहीच भाव नव्हते. भोवतालचं अस्तित्व संपलेलं जणू. तुमचा चेहरा वेगळाच वाटायला लागला. कोरा. पाटीसारखा. कोणीतरी काहीतरी लिहीलं म्हणून वाट पहात असलेला. बिनचेहर्‍याचा माणूस. भावनांचे प्रतिबिंब नसलेला. नकळत आम्ही पुढे सरकलो. पण आमचं असणं तुमच्या काय त्याच्याही गावी नव्हतं.

एवढ्यात तुमचे डोळे हलल्यासारखे वाटले. पापणी बहुधा. बोलण्यासाठी ओठ विलग झाल्यासारखे वाटले. पण तेवढ्यात त्याचा हात वर गेला आणि विलग झालेले ओठ मिटले गेले. घट्ट. आम्ही आता फारच जवळ पोहोचलो होतो. तो बोलत होता व एवढेच ऐकु शकलो.
"सात दिवस. आजपासून. आजची ही वेळ. पुढच्या रविवारी तुम्ही या जगात नसाल. ". थंड,खोल, बर्फाळ आवाज. सुर्‍याने सहज लोणी कापावा तसा. आमच्या काळजात धस्स झालं. त्याच्या त्या ठाम आवाजाने घाम फुटला. घशाला कोरड पडली. जागच्या जागी जखडलो गेलो. तो उठला व चालू पडला. आम्ही जागचे हलूही शकलो नाही. तुम्ही त्या शब्दांचे पडसाद नजरेत घेऊन तिथेच व तसेच.
हरवल्यागत.

आम्ही तो गेला त्या दिशेला पाहू लागलो पण तिथे कुणी नव्हतेच मुळी. तो नाहीसा झालेला. जादुगाराच्या साध्या हातचलाखीने चक्रावणारे आम्ही. हा सारा प्रकार आमच्यासाठी फारच पुढचा होता. आम्ही तुमच्याकडे वळलो.
नेमका त्याचवेळेस चणेवाला तुमच्या शेजारी येऊन ओरडला.
"चना सिंगदाना"
तुम्ही केवढ्याने दचकलात. आम्ही दचकलो. अंग शहारलं. तुम्ही आजुबाजुला पाहीलतं. तुमच्या नजरेत भीती होती. खरचं होती का ? की आम्ही घाबरलो म्हणून आम्हाला आमच्या भीतीची पडछाया तुमच्या नजरेत दिसली. पैजेवर सांगतो आमच्या जागी तेव्हा कोणीही असता तर घाबरला असता. खिशातला रूमाल काढून आम्ही घाम पुसला. तुमच्या मृत्युची अनोळ्खी भविष्यवाणी आम्हाला हादरवून गेली. तुमच्या कपाळावर घर्मबिंदू दिसले. उकाड्याने असतील. एखाद्या कुड्मुड्या ज्योतिषाच्या भविष्याने घाबरणार्‍यांपैकी तुम्ही नाही.
पण आम्ही का घाबरावं ? तेही तुमच्या मृत्युच्या भविष्यवाणीला. तुमच्या आमच्या वयाच्या सारखेपणामुळे ? काटा आला अंगावर नुसत्या कल्पनेने. थोरामोठ्यांच्या मरणानंतर बाता ठोकणारे असतात. पण कोणी कुणाच्या मृत्युची भविष्यवाणी केल्याचं ऐकीवात नाही.

तुम्ही झटकन उभे राहीलात. रुमालाएवजी शर्टाच्या बाहीने घाम पुसलात. घराच्या दिशेने चालू लागलात. वाटलं तुमच्याशी बोलावं. पण बोलणार काय ? आम्ही तुमच्या मागे चालू लागलो. तुमच्या पावलांचा वेग वाढला. त्यात मघासची सहजता नव्हती. मनात घोंगावणार्‍या विचारांची गती कमी व्हावी म्हणून आम्ही पावलांची गती कमी केली. शरीराची व विचारांची गती बहुघा सारखीच असते. मघाचे विचार आता थंडावल्यासारखे वाटले. पण भीतिचा स्पर्श अजून ओलसर होता. रंग उडालेल्या भिंतीला चिकटलेल्या पपडीसारखा. आम्ही पाहील की तुमच्या आमच्यात आता बरचं अंतर पडलं होतं. तुम्ही आजुबाजूला शोधक नजरेने अजून पहात होता. पुन्हा तो माणूस दिसेल असं वाटत होतं का तुम्हाला की मृत्यु कोणत्याही क्षणी झडप घालेला असं वाटत होतं ? पण का कुणास ठावूक, तो पुन्हा दिसेल, जवळपासच असेल आणि अचानक दत्त म्हणून समोर हजर होईल असं आम्हाला राहून-राहून वाटत होतं.

घर जवळ आलं आणि तुमचा वेग वाढला. वाटलं की धावताय. तुम्ही त्वरेने घरात शिरलात. तुमच्या मागोमाग आम्ही तुमच्या दारापर्यंत. पण तुम्ही त्यापुर्वीच दार बंद केलेलं. आम्हाला वाटलं तुम्ही बंद दारालाच पाठ टेकवून उभे होता तेव्हा. श्वासोच्छवासाचा आवाज ऐकल्यासारखा वाटला. वेगाने चालण्याने तुम्हाला दम लागला होता. आम्ही न राहवून दाराची बेल वाजवली. तुम्ही दचकलात का तेव्हा ? घाबरलात ?? वहिनींचा आवाज आला,"काय हो, काय झालं ? कोण आहे दारात ?"
"नाही. कुणी नाही." तुमचा आवाज. कंप पावलेला. भेदरलेला.
दुसर्‍यांदा बेल वाजवण्यासाठी उचललेला हात मागे घेऊन आम्ही वळलो.

दुसर्‍या दिवशी "तो कोण ?" हे विचारण्याच्या इराद्यानेच ऑफिसला आलो. अर्धी रात्र त्या माणसाने खाल्ली आमची. जागरणाचे अवशेष डोळ्यात होते. "अजून जागरणं होतात तुमची ? "असा चावटपणाही केला धोत्रेने. कळकट मेंदुचा माणूस. पण तुम्ही ऑफिसला नव्हता. आजारी असल्याचं कळलं. आश्चर्य वाटलं. यापुर्वी असं कधी झालं नव्हतं.

संध्याकाळी तुमच्या घरी पोहोचलो. तुमची काळजी की चौकस स्वभाव की भविष्यवाणीचे प्रतिबिंब ... कल्पना नाही. तुमच्या घरी पोहोचलो तेव्हा तुम्ही झोपलेले होता. झोपेची गोळी घेऊन.
"काय झालं ? " आम्ही वहिनींना विचारलं.
" काय कळत नाही. काल आले तेच धापा टाकत. दाराची बेल वाजली तरी दार उघडलं नाही व मलाही उघडू दिलं नाही. पुन्हा बेल वाजली नाही तेव्हा थोडे शांत झाले. पण अस्वस्थता संपली नाही. रात्री जेवणाआधी खिडकीत उभे होते. मी यांना बोलवायला आले तेवढ्यात हे खिडकीतून बाजूला झाले. पटकन खिडकी बंद केली व पडदेही ओढले. मी हाक मारताच केवढ्याने दचकले. रात्री नीट जेवले नाहीत की बोलले नाहीत." वहिनींचा स्वर रडवेला झाला. "स्वतःमध्येच हरवल्यासारखे. कितीदा विचारलं तर म्हणे, काही नाही. रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर. मध्येच एक-दोनदा दचकून उठले देखील. मला तर काही कळेनासचं झालय." वहिनी थांबल्या. आम्ही गप्पच. डोळ्याच्या कडा पदराने पुसून वहिनी पुन्हा बोलू लागल्या. " सकाळी नेहमीपेक्षा लवकर निघाले. मी गॅलरीत उभी होते. समोर रस्त्याला पोहोचले तेव्हा एक रिक्शा यांच्या जवळून गेला. जवळ जवळ घासूनच. मी किंचाळलेच तेव्हा. पण यांच लक्षच नव्हतं. हे बसस्टॉपजवळ पोहोचले व मी घरात आले. पाचेक मिनिटात बेल वाजली. बघते तर हे दारात. घामाने थबथबलेले. मी काही विचारायच्या आत ' बरं वाटत नाही' इतकं तुटकपणे बोलून यांनी दार लावले. खिडक्या बंद केल्या. पडदे ओढले. दिवसभर गप्पच. फक्त अधूनमधून पडदा सारून खिडकीतून डोकावत. एकदा मी खिडकी उघडण्याचा प्रयत्न ही केला. पण हे धावत आले आणि मला बाजूला सारुन खिडकी बंद केली. "
"का ? " आम्ही गोंधळून विचारलं.
"माहीत नाही. उगाच त्रागा नको म्हणून विचारलं ही नाही."
"डॉक्टरांना बोलावलतं ? "
" नको म्हणाले. काय होतय ते सांगतही नाही. करावं तरी काय ? "
आम्ही काही बोलणार तोच तुम्ही चटदिशी दचकल्यागत उठलात. बहुधा एक अस्पष्ट किंकाळी देखील. वहिनी तर वहिनी..आम्हीपण दचकलो. भयानक स्वप्नातून जागे झाल्यासारखे वाटलात. त्या गारव्यात ही घामाने डबडबलात. मैल न मैल धावत आल्यासारखे धापा टाकत होता. वहिनी तर रडायला लागल्या. काय करावं तेच सुचेना !!
आमचं अस्तित्व तुमच्या ध्यानी नव्हतं. तुम्ही अजून त्या स्वप्नाच्या फेर्‍यात होता. स्वप्न आणि सत्य यांच्या उंबरठ्यावर उभे तुम्ही. दोलायमान. तुम्ही भानावर येताय असं वाटताच आम्ही पुढे सरून तुमचा घाम पुसला. पण तुम्ही मागे सरकलात. अनोळखी भाव होते तुमच्या नजरेत. असं वाटलं की ओळखण्याचा प्रयत्न करताय.
"काय झाल ?" राहवलं नाही म्हणून विचारलं आम्ही.
"अहो....अहो, काय झाल ?" वहिनींनी पदराने डोळे पुसत विचारलं. हळवा स्वभाव त्यांचा.
"काय झाल ?" हातात हात घेऊन आम्ही पुन्हा विचारलं.
"अं......" झोपेतून जाग आल्यासारखं केलत. किती वेळ आमच्याकडे व वहिनींकडे विचित्र नजरेने पहात होता तुम्ही. बहूधा वहिनींच्या कपाळाकडे पहात होता. वहिनींच्या मोठ्या कपाळावर नेहमी ठसठशीत कुंकु फार छान दिसते. पटकन नजरेत भरते ते.
"काय झाल ?" आम्ही तिसर्‍यांदा विचारलं. तुमची तंद्री भंग झाली.
"काही नाही... काही नाही." तुम्ही वहिनींच्या हातातला नॅपकीन घेऊन घाम पुसू लागलात. तुमचा हात थरथरत होता तेव्हा.
"वहिनी, गरमागरम कॉफी करा पाहू." आम्ही असं म्हणताच,"आत्ता आणते." म्हणून वहिनी किचनमध्ये गेल्याही. त्या गेल्या त्या दिशेला पहात राहीलात. मग आमच्याकडे वळलात. आमच्या हातावर स्वत:च्या हाताची पकड घट्ट करत म्हणालात," भविष्यावर विश्वास आहे तुमचा ?" तुमच्या हाताची ती थरथर आत एक भीतीची लहर उठवून गेली तेव्हा.
आम्ही गोंधळलो. प्रश्न जरी होकारात्मक असला तरी बोलण्यातला सूर नकारात्मक होता. याचा अर्थ कालचा प्रकार तुमच्या अंतर्मनात ठाण मांडून बसला. तुम्हाला व्यापून. त्याच संदर्भात ते स्वप्न पडलं असणार. त्या अनपेक्षित घटनेचा तुमच्यासारख्या सरळमार्गी माणसाच्या मनावर ठसा उमटला. ठसा नव्हे....ओरखडा. रक्तबंबाळ करणारा. तो सहजी पुसला जाणारा नव्हता. त्याला एकच उपाय. तो म्हणजे काळ. पण तोही कुठे होता तुमच्या कडे ? होते फक्त सहा दिवस.
"मी तुम्हाला काहीतरी विचारतोय ?'' तुम्ही आमचा हात पुन्हा हलवलात. तुमचा हात आता गार झालेला.
"नाही. अजिबात नाही." आम्ही ठाम नकार दिला. खरंतर आमचा विश्वास आहे. वर्तमानपत्रातले राशी भविष्य न चुकता वाचणारे आम्ही. पडताळ्यासाठी का होईना.
पण तुमच्या नकाराला ठाम करण्यासाठी नकार दिला. वाटलं, तुम्हाला दिलासा मिळेल. क्षणापुरता सुटकेचा निश्वास आणि पुन्हा तुम्ही विचारांच्या वावटळीत. अंधाराला सरावलेले डोळे प्रकाशाने पुन्हा मिटावे तसे. आम्ही गोंध़ळलो. तुम्ही त्या फाटक्या माणसाच्या भविष्यावर विश्वास ठेवावा ? मरणाची भीती वाटावी ? शरीराची व मनाची काही तक्रार नसताना.
"का ? का विचारलत ? " आमचं कुतूहल.
"तो आला होता. पुन्हा. आज सकाळी." तुम्ही स्वत:शीच बोललात.
"कोण ? कोण आला होता ? " आम्ही माहीत असून विचारलं. आम्हाला माहीत आहे हे तुम्हाला नव्हत माहीत.
"तो......." तुमच्या नजरेत भीती होती. पुढे बोलणार तोच वहिनी कॉफी घेऊन आल्या व तुम्ही गप झालात. नजर पुन्हा कुंकवावरती.
"घ्या भाओजी." वहिनींनी कप पुढे केला. तुम्हीही कप हातात घेऊन मागे टेकलात. तुमची नजर कधी खिडकीकडे, दाराकडे, वहिनींच्या कपाळाकडे. आम्ही नव्हतोच त्या वर्तुळात. दहा मिनिटांनी उरलेले सारे प्रश्न घेऊन आम्ही निघालो.

तुम्ही दुसर्‍या दिवशीही आला नाहीत. सहा दिवसांची रजा टाकल्याचं कळलं. मुदतीएवढी रजा. एका अनोळखी भविष्यावर विश्वास ठेवून स्वतःभोवती भविष्याच्या अंधाराचं जाळ विणलतं तुम्ही. पण रजा का घेतलीत ? भविष्य खर होणार हा भ्रम उराशी बाळगून रजा घेतलीत की खोटं ठरावं म्हणून घरी राहीलात ? मरण तर कोणाचाही दार केव्हाही ठोठावू शकते. घरी बसून ते चुकवता येत का ?
पण रजा घेतलीत ते बर केलत. एवढ्या वर्षात कधी घेतली नव्हती. तेवढाच या निमित्ताने आराम. शरीराला व मनाला विश्रांती मिळालेली चांगली.

दोन दिवस कामात गेले. तुमच्याकडे फिरकता आलं नाही. बुधवारी संध्याकाळी तुमच्याकडे पोहोचलो. ओफिसातले बरेच येऊन गेल्याचे कळले. पण तुम्हाला पाहील आणि विश्वासचं बसेना. घरातले अचानक दिवे जावे आणि मिट्ट अंधार व्हावा तसा तुमच्याभोवती अंघार साकळल्यासारखा झालेला. चेहर्‍याची रयाच गेलेली. एखाद्या बंद खोलीत शांतता मी म्हणत असताना अचानक टिव्ही लावल्यावर माणसांचा कल्लोळ होतो. तसा मेंदूत प्रश्नाचा कल्लोळ झाला.
तुम्ही झोपला होता. वहिनींशी बोलावं म्हणून तोंड उघडणार तोच त्यांचा हुंदका तोंडावरच्या पदराआडून ओघळला. आम्ही गप्प. मोठीने सावरलं त्यांना.
"आई..." धाकटा फक्त हाक मारून गप्प झाला. अशावेळी काय बोलावं तेच सुचत नाही. समोर औषधांच्या बाटल्या दिसल्या.
"डॉक्टर... ?"
" आले होते. निदान होत नाही. मानसिक असावं असं म्हणाले." धाकटा बोलला. तुम्ही त्या दिवसासारखे झटकन उठाल असं आम्हाला उगाच वाटत होतं.
"आताच गोळी घेऊन झोपलेत." धाकट्याच्या कदाचित लक्षात आलं होतं आमचं ते बघणं. वहिनीच्या हुंदक्यामुळे काहीतरी घडल्याचं आम्हाला जाणवलं.
"काय झाल ?"
"सकाळी आई पेपर वाचत होती. तिला मोठ्याने वाचायची सवय आहे. कालच्या एस.टी अपघाताची बातमी वाचत होती. 'सातजण जागच्या जागी ठार' हे वाचताच बाबांनी पेपर ओढून घेतला व फाडला. " मोठीने आता तोंड उघडलं. तशी ती सहसा जास्त बोलत नाहीच.
"कुणाची मेली दृष्ट लागली माझ्या संसाराला ? " वहिनी स्फुंदता-स्फुंदता स्वतःशीच बोलल्या. आम्ही काय बोलणार ? त्याला ओळखत थोडी होतो ? बराच वेळ कोणी काहीच बोललं नाही. मग आम्ही निघायचं ठरवलं.
"येतो वहिनी. काळजी करू नका. सगळ ठिक होईल. " सांत्वनाचे दोन शब्द बोलून आम्ही निघालो. बसमध्ये कधी नव्हे ती खिडकी मिळाली. सहज तुमच्या घराकडे नजर टाकली. तो रस्त्याजवळ उभा होता. आम्ही तातडीने पुढच्या दरवाज्याकडे धावलो. थोड्या अंतरावर ड्रायव्हरने बस थांबवली. आम्ही परत आलो तेव्हा तो तिथे नव्हता. असला तरी काय केलं असतं ?

गुरूवारी ऑफिसात तुमचीच चर्चा. तुम्हाला वेड लागलय असं दस्तकराचं मत, तर भुताने झपाटलय असं धोत्रे छाती ठोकून सांगत होते. नालायक माणूस. नेहमी अफवा पिकवतो. वर शपथाही घेतो. भानामती वा करणी असं सावंत पुटपुटले. त्यांच्या म्हणे गावाला चालतात हे प्रकार. मुठ मारतात म्हणे. एकदम फेक माणूस हाही. आम्ही आमच्या परिने समजावण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ ! जो तो त्याच्या अफाट कल्पनाशक्तीचा वापर करत होता. गुरूवारी तुमच्या घराकडे वळलेली पावले माघारी घेतली. वहिनींचा रडवेला चेहरा डोळयासमोर आला. कोणी रडायला लागलं की आम्हाला अवघडल्यासारखं होतं.

शुक्रवारी दुपारी तावडे गेल्याचं कळलं. लाख माणूस. पण नेहमी घाईत. घाईच नडली. रेल्वेने उडवलं. सगळे तावडेकडे निघाले. जाता-जाता तुमच्याकडे डोकावलं. तुम्ही झोपलेलात. बहुधा गो़ळी घेतली असावी. वहिनींचे डोळे सुजून लाल. काही बोलायच्या आतच पुन्हा रडायला लागल्या.
"भाओजी, यांच्यावर नक्कीच काहीतरी बाहेरचं आहे." वहिनींचा या सार्‍यावर विश्वास. उपास, उद्यापन असायचं अधूनमधून.
"वहिनी, स्वतःला आवरा. तसलं काही नसतं. कामाचा ताण आहे. दुसरं काही नाही." आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला.
"नाही हो. खरचं आहे. तावडे गेल्याचं सांगितल यांना. तसे यांनी गरागरा डोळे फिरवले. मला घट्ट धरून म्हणाले,'मरणार. सगळेच मरणार. फक्त त्यांना माहीत नाही केव्हा. पण मला नाही मरायचं. मला जगायचय. माझा संसार वार्‍यावर पडेल नाहीतर. मला तुझ्यासाठी, मुलांसाठी जगायचय. मला जगू द्या. मला जगू द्या. ' केवढा विचित्र वाटला यांचा आवाज. भाओजी, मला वेडीला काहीच कळत नाही हो. यांना झालय तरी काय ? डॉक्टरही सांगतात, सगळ ठीक आहे म्हणून. हे असं का करताहेत मग? " वहिनी बोलता-बोलता रडू लागल्या. आमच्या तोंडून शब्द फुटेना. अशा अवस्थेत वहिनींना काही सांगण्याची सोय ही नव्हती.
"काहीही होणार नाही वहिनी. दोन दिवसांचा प्रश्न आहे हा. मग सारं सुरळीत होईल." आम्ही धीर देण्याचा प्रयत्न केला. आत खोल कुठेतरी वाटत होते की हा दिलासा खोटा आहे. वहिनीच्या नजरेत जागलेल्या आशेला नजर न भिडवता आम्ही निरोप घेतला.

तुम्ही चौकटीत राहणारी माणसं. तुमची आणि तुमच्या आप्तजनांची चौकट. त्याचीच काळजी. आपला मृत्यु ही चौकट उध्वस्त करेल ही खरी भीती. ती भविष्यवाणी ही भीती जागृत करून गेली आणि भासांच एक न संपणार चक्रव्युह सुरू झालं. काडी काडी करून उभा केलेला संसार उध्वस्त होणार ही भीती मरणापेक्षाही भयानक. तिनेच ग्रासलं तुम्हाला. वावटळीसारखी भीती मनात फेर धरून नाचू लागली. तिचं वादळ झालं व ते अंतर्मनात स्थिरावलं. भविष्याने नव्हे तर भविष्याच्या परिणामांने तुम्हाला हतबल केलं. वाळवीने लाकूड पोखरावं तसं या भीतीने पोखरलं तुम्हाला. तुम्ही कुणाला हे सांगू ही शकत नव्हता कारण कोण विश्वास ठेवेल हा एक प्रश्न आणि दुसर्‍याला त्रास देणं तुमच्या स्वभावात नव्हतं. त्यात त्याचं ते पुन्हा पुन्हा येणं आणि तुम्हाला त्या गर्तेत ढकलणं, मनाला अजून दुर्बल करून गेलं. शेवटी विचार म्हणजे वस्तु नव्हेत की ढकलून दिले आणि झालो मोकळे. विचारांच्या असंख्य सुया मनाला टोचतात. चेटुक केलेल्या बाहूलीला टोचाव्या तशा. तुमच्या सार्‍या वाटा एकाच दिशेला जाऊ लागल्या आणि वाट पाहण्याशिवाय हाती काही उरलं नव्हतं. निपचित. एका जागी.
दिवसाढवळ्या प्रकाशाला भेदत जाणार्‍या गाडीत आपण बसलोय. तेवढ्यात एखाद्या पुलाखालून वा बोगद्यातून गाडी जाते. डब्यातला प्रकाश नाहीसा होतो व क्षणापुरता अंधार दाटतो. काहीच दिसत नाही असा. गाडी बाहेर आली की पुन्हा प्रकाश. पण त्या भविष्यवाणीने निर्माण केलेल्या त्या अंधारात तुम्ही चाचपडत राहीलात. यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी रविवारची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

तुमच्या अनुपस्थितीमुळे कंपनीच्या कामासाठी पुण्याला जावं लागलं. सोमवारी घरी परतलो. दारात पाऊल ठेवलं तोच,
"अहो, भाओजी गेले काल." हीचा शांत स्वर.
ठरल्याप्रमाणे रविवारी गेलात. भविष्यवाणी खरी झाली. गावाकडची एक घटना आठवली. खाडीच्या काठावर काही टारगटांनी बिनविषारी साप मारून दगडावर वा़ळत घातला. चार दिवसानंतर तो सुकलेल्या बोंबलासारखा दिसायला लागला. अजाणतेपणे एकाने नेऊन कालवण करून खाल्ला. नंतर त्याला काय खाल्लं ते कळताच उलट्या करून मेला. इतरांना काहीच झालं नाही. त्याचा बळी सापाने नव्हे तर मरणाच्या भीतीने घेतला. तुमच्या बाबतीत थोडेसे तसेच झाले. मृत्युगोलात चकरा मारणार्‍या मोटरसायकलवाल्यासारखे तुम्ही भीतीच्या परिघात चकरा मारत राहीलात.

तुमच्या पिडदानाचा दिवस. आम्ही होतो तिथे. कावळा शिवत नव्हता. दादासाहेब, वहिनीचे थोरले भाऊ, बोलले."लक्ष ठेऊ. काळजी नको." कावळा शिवला पिंडाला. सगळे सोपस्कार पार पडले. आम्ही धाकट्याबरोबर निघालो.
"काय झाल त्या दिवशी ? " काहीतरी घडलं असणार याची खात्री होती आम्हाला. धाकटा सांगू लागला......

...दुपारची गोष्ट. बाबांची अवस्था खूप वाईट होती. त्यांना काय दिसत होतं देव जाणे. शहारत होते. थरथरत होते. शरीराचं मुट़कुळं करून घेतलेलं. 'शेवटचा दिवस' असं पुटपुटत होते. बेल वाजली. मी दार उघडलं. समोर अनोळखी माणूस. तो आत आला व सरळ बाबांकडे गेला. त्याला पाहताच बाबा घाबरले. शब्द फुटत नव्हता. मीही घाबरलो. आई देवळात व ताईही घरी नव्हती. माझ्या घशाला कोरड पडली.
"हे काय ? जायचं ना आपल्याला. लांबचा प्रवास व या अवस्थेत. शरीरात त्राण नकोत. तयार व्हा पाहू. संध्याकाळी येतो मी." थंडगार आवाजात तो बोलला. धमकी नसली तरी तो आदेश होता.
"मला नाही यायचं" तीन शब्द. पण किती कष्ट पडले ते बोलताना बाबांना.
"जावं तर लागेल. येतो मी." तो हसला आणि बाबांची शुद्ध हरपली.
संध्याकाळी त्यांची नजर दाराकडेच होती. पांढराफटक चेहरा. किती अनोळखी वाटत होता तो. तेवढ्यात बेल वाजली. मी दाराकडे वळलो. ते काहीतरी पुटपुटले. मला कळलचं नाही. मी कडीला हात घातला आणि...
"नको." ते किंचाळले. तोवर मी कडी काढली होती. दारात कोण आहे हे न पाहताच मी त्यांच्याकडे धावलो. अर्धवट उठून बसलेले त्यांचे शरीर कोसळले. कोसळले ते कायमचेच. मागे काही आवाज झाला व वळलो. दारात डॉक्टरकडून परतलेली आई. पायाजवळ औषधांचा खच. लालभडक थारोळं. औषधांचं. सगळ संपलं..........

धाकटा हुंदका देऊ लागला. आम्ही त्याला सावरले. एव्हाना चालत स्मशानाबाहेर पोहोचलो होतो. मुख्य रस्ता लागला.
"तो पहा, तोच तो माणूस." धाकटा ओरडला. आम्ही पाहीलं. तो रस्त्याच्या पलिकडे उभा होता.
"दस्तकर" आम्ही आवाज दिला, "याला घरी न्या." आम्ही त्याच्या दिशेने धावलो. गाड्याची वर्दळ होती. डिवायडरला पोहोचून मागे पाहीलं तर धाकटा दस्तकरांबरोबर रिक्षात बसला होता व वळून पहात होता. रिक्षा निघाला व दिसेनासा होईपर्यंत आम्ही रस्ता क्रॉसही केला. तो तिथे नव्हता. आम्ही शोधू लागलो. तो दिसला. समोर, एका टॅक्सीच्या मागे. आम्ही त्याच्या दिशेला धावलो.
"घरी जायची काय गरज होती ?" आम्ही ओरडलोच.
"इलाज नव्हता. घेतलेले काम मी कधी अर्धवट सोडत नाही." तोच थंड आवाज. "पण हे कशासाठी ?"
"तुला काय करायचं ? पुन्हा इथे दिसू नकोस." आम्ही बजावलं.

लहानपणापासून दुय्यमपणा. वर्षे लोटली पण क्रमांक तोच. हेवा..मग ईर्षा ..... अन त्याचाच नकळत झाला सूड... भावना कशा बदलतात ना.
पण पाप ते पापच. तुमच्यासारख्या चांगल्या माणसाचा जीव घेतला. हे मनात राहीलं. आत. खोल. तेच मग बसलं भीती बनून मानगुटीवर. भुतासारखं. बुमरँग झाल आमचं शस्त्र.

आज आम्ही तुमच्यासमोर आहोत. पण आता कसं हलकं हलकं वाटतय. तुम्हाला सगळ सांगितलं आणि मोकळा झाला यातून. पण खरं सांगू, माणसाने एवढ चांगल असू नये की दुसर्‍याचा त्यामूळे असा तोल जाईल. तुम्हाला नाही वाटत यात तुमचचं खर तर चुकल होत म्हणून. बोला ना.

गुलमोहर: 

कथा वेगाने (ऑफिस मध्ये चोरुन वाचली म्हणुन) वाचली....
पण शेवट आमच्या अल्पबुद्धीला समजला नाही.... 'त्यांच्या' मरणात 'तुमचा' काय वाटा होता? आणि तो कसा? हा 'तो' कोण होता?
थोडे समजुन सांगीतले तर बरे....
बाकी कथेने खिळ्वुन ठेवले होते.

समोर, एका टॅक्सीच्या मागे. आम्ही त्याच्या दिशेला धावलो.
"घरी जायची काय गरज होती ?" आम्ही ओरडलोच.
"इलाज नव्हता. घेतलेले काम मी कधी अर्धवट सोडत नाही." तोच थंड आवाज. "पण हे कशासाठी ?"
"तुला काय करायचं ? पुन्हा इथे दिसू नकोस." आम्ही बजावलं.

०००००००००००००००००००००००००००००००००००००००००

............ या संवादात सगळे क्लिअर आहे की..... म्हणजे हे एक फार मोठे षडयंत्र होते... ' तो' कुणीतरी भाडोत्री मनुष्य होता...... कथेच्या निवेदकानेच ते रचले होते... ...सूड म्हणून...

ह्म्म... आवडली.
छान ओघ आहे कथेला.

कथेचा ओघ मस्त आहे. शिवाय मनोविश्लेषण छान जमले आहे.

कौतुक, कथेचा वेग आणि तंत्र अप्रतीम रे ! फक्त तुला जे मांडायचय ते थेट पोचलेले दिसत नाही ( थोडा आगाउपणा करुन सांगतोय ) आणखी एक दोन ओळी जोडल्यास तर ते ही स्पष्ट होईल.

.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

कथा आहे तश्शी एकदम जबरी जमली आहे.
शेवटच्या दोन कलाटण्या तेवढ्याच कमी शब्दात असल्या तरच मजा येते आणि ती इथे येते. कौतुक, तुम्हाला उन्हाळ्यात आता चिंता करायचे कारण नाही कारण इथे तुमच्या कथांचे बरेच पंखे जमा व्हायला लागलेत Happy

छाया

कौतुकच कौतुक

कथा छान भाषा ओघवती

छाया

कौतुकच कौतुक

कथा छान भाषा ओघवती

जगमोहन प्यारे..... आता समजले. वेगात कथा वाचली म्हणुन समज्ले नाही. धन्यवाद.........

सुंदर कथा.
मनातिल भावना खुपच छान रेखाटल्यात.
त्यातल्या त्यात स्वतःचा उल्लेख आज्ञार्थि केलाय त्याचा प्रभाव जास्त जाणवला.

कथा आवडली. शेवटची कलाटणीही मस्त आहे.

नारायण धारप वाचतोय किं काय असे वाटता वाटता एकदम पुन्हा सु.शि. टच.
मस्तच आहे.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

खुप छान आहे कथा , आवडली !!!!!

चाफ्या, मला हे नाही कळलं .....फक्त तुला जे मांडायचय ते थेट पोचलेले दिसत नाही. थोडं स्पष्ट केलस तर बर. (मला माझ्या फायद्याचा आगाऊपणा चालतो. मीही त्यातलाच.)
प्रतिसादाबद्द्ल आभार.

>>>>>>>>>>>या संवादात सगळे क्लिअर आहे की..... म्हणजे हे एक फार मोठे षडयंत्र होते... ' तो' कुणीतरी भाडोत्री मनुष्य होता...... कथेच्या निवेदकानेच ते रचले होते... ...सूड म्हणून...
>>>>>>>>>>'त्यांच्या' मरणात 'तुमचा' काय वाटा होता? आणि तो कसा? हा 'तो' कोण होता?
थोडे समजुन सांगीतले तर बरे....

कदाचीत तुझ्या लिहीण्याचा हेतु कुणीतरी `माणुस' कुणाचा तरी खुन करण्याचा कट रचतोय असा नसावा त्यामुळे लिहीले होते रे ते !
.................................................................................................................................
** खरे मित्र असाल तर तुमच्या दुखा:तही सहभागी करुन घ्या ! **

कौतुक शिरोडकर
अप्रतिम !!
------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

खुप छान कथा आहे. तुम्ही खुप छान लिहिता माहिती नव्ह्ते मला. मस्तच आहे.

सही!! काय लिहिली आहे कथा!! कथा सांगण्याची पद्धत फार वेगळी आणि प्रभावी. जबरी.

सही Happy