धक्का

Submitted by कौतुक शिरोडकर on 30 September, 2008 - 06:09

तिला पाहताच मला तो दिवस आठवला.

भार्गवच्या क्युबीकलमध्ये मी शिरलो तेव्हा दिवाकर तिथेच बसले होते.
"इकडे कसे काय ?" मी आश्चर्याने विचारलं.
"सहजच." दिवाकर हसून बोलले.
"डॉक्टरसाहेब, जुने क्लायंट आहेत ते आमच्या बँकेचे." भार्गवने कारण पुरवलं.
"तु इथे कसा ?" दिवाकरांचा प्रतिप्रश्न.
"नेट बँकीगसाठी बोललो होतो. झाल का रे भार्गवा ?" मी भार्गवकडे वळलो.
"यस सर. हे पहा." कि-बॉर्डवर खटखट करून भार्गवने स्क्रीन आमच्याकडे वळवली.
"ग्रेट." मी खुष झालो. बर्‍याच दिवसापासून रेंगाळलेले काम आज मार्गी लागले.
"अजून काय सेवा साहेब ? " भार्गव टिपीकल सर्विस प्रॉव्हायडर.
"नाही रे. निघतो मी. गाडी नॉन पार्किंगला टाकलीय. चला दिवाकरसाहेब, निघतो." मी निघालो.

दुपारी तीनची अपॉईटमेंट होती दिवाकरांची. मी त्यांचा फॅमिली डॉक्टर. त्यांना नुकताच एक अटॅक येऊन गेला होता. दिवाकर जोशी. इंडस्ट्रियालिस्ट. वय वर्षे अठ्ठेचाळीस. विधूर. मुलबाळ नाही. विभावरी..त्यांची बायको..गेल्यानंतर ते एकटे पडले. घरात मन रमत नाही म्हणून स्वतःला कामात झोकलं. आता कम्प्लिट स्ट्रेस घेतल्यावर अटॅक तो यायचाच. मी बोललो त्याना.
"दिवाकरसाहेब, स्वतःसाठी थोडा वेळ काढावा माणसाने. एवढी गडगंज संपत्ती उभारलीत, ती काय चॅरिटीत टाकायला ? बघा कोणी कंपॅनिअन. सोबत कोणी असलं की बरं. सगळ्या बाबतीत नोकरांवर विसंबून चालत नाही."
" बघू रे. तू आता मला पटापट तपास म्हणजे मी उडायला मोकळा. संध्याकाळी दिल्लीला जायचय." असा त्यांनी विषय संपवणं माझ्यासाठी नवीन नव्हतं.
वेळेच्या बाबतीत ते एकदम पंक्चुअल. तीनला पाच मिनिटे आणि इंटरकॉम वाजला.
"सर, जोशीसाहेब आलेत." अनघा. माझी रिसेप्शनिस्ट.
"आत पाठव." मी फोन कट केला. दिवाकरसाहेब आले. तपासणी वगैरे झाली व मग नेहमीसारखा मी अवांतर गप्पाकडे वळलो.
"बोला, काय नवीन ?"
"सध्या माझं चॅटींग प्रकरण जोरात चालू आहे." दिवाकर खुशीत बोलले.
"चॅटींग... आणि तुम्ही ? " मला आश्चर्याचा धक्काच तो.
"विसरलास ? मागच्या सिटींगमध्ये काय म्हणालास ते. " त्यांनी माझ्याच स्मरण शक्तीला आव्हान दिलं.
"मी... ? " मी अजून अंधारातच.
"अरे , तुच म्हणालास ना, विरंगुळा म्हणून नवीन मित्र जोडा. त्यासाठी सोपा मार्ग म्हणजे नेट चॅटींग. स्वत:ला वाटेल तेव्हा अनोळखी लोकांशी गप्पा मारायच्या आणि कंटाळा आला की नेट कट. कुणाचा काही त्रास नाही. आठवलं का ?" दिवाकरसाहेब जणू हट्टाला पेटल्यासारखे मला शब्द न शब्द सांगून आठवण करून देत होते.
"यस. आता क्लिक झालं. पण तुम्हीतर म्हणाला होता, मला कॉम्पुटरमधलं कुठे कळतयं म्हणून ? " मी ट्युब पेटल्यावर पुढच्या संभाषणाची कॅसेट वाजवली.
"हो रे. तेही खरचं. त्यादिवशी भार्गवकडून घेतलं स्वतःला नेटकर करून. त्यानेच समजवलं सारं. म्हणतो, साहेब तुम्ही आमचे जुने क्लायंट. तुमच्यासाठी कधीही हजर होऊ. " दिवाकर त्यादिवशी भार्गवबरोबर का होते त्याचा आता प्रकाश पडला.
"चला. चांगल झालं. मग कसं वाटतयं आता ? " टिपीकल डॉक्टरी प्रश्न केल्यासारखं वाटलं माझं मलाच.
"मस्त. रोज नवीन मित्र जोडतोय. धम्माल येतेय." दिवाकरांच्या स्वरातला आनंद लपत नव्हता.
"सर, शहासाहेब आलेत." अनघाने पुढच्या सिटींगची आठवण करून दिली. दिवाकर निघाले.
"एक मिनिट, तेवढा तुमचा आयडी तर द्या म्हणजे कधी भेटलोच नेटवर तर तिथल्या तिथे तुमची तपासणी करता येईल." मी त्याना पॅड व पेन दिले. त्यांनी आयडी लिहून दिला.

त्यानंतर जवळ जवळ दोन-तीन महिने गाठभेट नव्हतीच. ते त्याच्या कोणत्यातरी प्रोजेक्टच्या निमित्ताने पुणे, भुवनेश्वर व मुंबई असे अपडाऊन करत होते. पण नेटवर आम्ही रात्री भेटत होतो. शक्यतो एक-दोन दिवसाआड. मध्येच एकदा त्यानी मग तन्वीबद्दल सांगितलं. त्याना नेटवर भेटली होती म्हणे.

सकाळी चक्क नऊला दिवाकरांचा फोन.
"आज भेटशील का ? " दिवाकर.
"किती वाजता ? " मी.
"तू बोल ? " दिवाकर.
" चार ? " मी.
"डन." दिवाकर. मी चाट. त्याच्या त्या 'डन' मुळे.

"हे बघ. मी तिला वेबकॅम मध्ये पाहिलय. सुरेख दिसते. विभावरी आठवली तिला पाहून. आज रात्री लिओजला भेटतोय तिला."
"जस्ट नेटफ्रेंड म्हणूनच ना ?" का कुणास ठाऊक, मला उगाच काळजी वाटली.
"हो रे तुर्तास तरी तेच. पुढचं पुढे बघु. " दिवाकर मग सुरुवात कशी झाली इथून सुरू झाले.

त्यानंतर मला ते भेटले ते सरळ आमंत्रण घेऊनच. त्यांच्या लग्नाचे.
"तुम्ही सर्वागाने या गोष्टीचा विचार केला असेलच." मी एवढेच बोललो.
"तू लग्नाला ये. विसरू नकोस." त्याच्या चेहर्‍यावर व देहबोलीत प्रचंड उत्साह होता.

मी लग्नाला गेलो त्यांच्या. तन्वी...त्यांची पत्नी खरेच सुंदर होती. मी माझ्यापरिने तिची थोडी माहीती काढली होतीच. ती एकटीच हॉस्टेलला राहायची. अंधेरीच्या एका कॉलसेंटरमध्ये ती कामाला होती. तिचं जवळच अस कोणीच नसल्याने तिच्या लग्नाचं तिने कधीच मनावर घेतलं नाही. विरंगुळा म्हणून ती नेटकर झाली. यातच दिवाकरांची ओळख झाली. त्यांची भेट झाल्यावरही तिला त्याच्या सांपतिक स्थितीची माहीती नव्हती. ती न देताच दिवाकरांनी तिला लग्नाबद्द्ल विचारलं. भले त्यांच्या वयात बारा - पंधरा वर्षाचे अंतर असले तरी त्यांचा स्वभाव तिला आवडला. त्यांनी तिला मनमोकळेपणाने स्वतःबद्दल सारं काही सांगितले. तरीही ती लग्नाला तयार झाली.

दोन महिने गेले. दिवाकरांशी अधूनमधून बोलणं होत होतं. त्यांच्या बोलण्यातून कळत होतं की तन्वी त्यांची एखाद्या लहान मुलासारखी काळजी घेत होती. आता तर प्रत्येक गोष्टीसाठी ते तिच्यावर विसंबून होते. ही गोष्ट ते तिच्यासोबत क्लिनिकला आले तेव्हा ही जाणवली.

रात्रीचा साधारण एक वाजला होता. तेवढ्यात फोन वाजला.
"फोन घे रे, तुझाच असेल तो ." दिशा.. माझी बायको खात्रीने म्हणाली.
"हॅलो ?" मी. तिने कुस बदलली.
"डॉक्टर, मी तन्वी बोलतेय. यांना अटॅक आलाय. प्लीज लवकर या. मला भीती वाटतेय." माझी झोप उडाली.

मी त्यांच्या घरी पोहचलो तेव्हा सारं संपलं होतं. दिवाकर दारातच पडले होते. हाताजवळ गोळ्यांची बाटली. तन्वी त्यांच्या पायाजवळ. एकदम सुन्न. तिला तसं पाहीलं आणि वाईट वाटलं. अवघ्या सहा महिन्यात वैधव्य. पण घरात एकही नोकर नव्हता याचं मात्र मला तेव्हा थोडं आश्चर्य वाटलचं.

सगळे सोपस्कार पार पडले. यथावकाश सांगळे ..दिवाकरांचे वकील व मी भेटलो. कायदेशीर बाबी पार पडल्या. मृत्युपत्रात मी एक साक्षीदार होतो. सांगळेनी कागदपत्रे तन्वीला सुपूर्त केली. एक जबाबदारी संपली.

एवढ्या दिवसांनी आज ती मला दिसली. लिओजमध्ये. पण आज ती दु:खीकष्टी नव्हती. तिच्यासोबत कोणीतरी होतं. त्याची माझ्याकडे पाठ होती. तिने मला पाहताच तिच्या चेहर्‍यावर ओळखीचं स्मित पसरलं. मी तिच्या दिशेला वळलो.
"कशा आहात ?"
"मजेत." ती सहज उत्तरली. तिच्या चेहर्‍यावर वेदनेचा व गतकाळाचा लवलेश नव्हता.
"बसा ना डॉक्टर." तिच्यासोबत असलेला तो माणुस. आवाज ओळ्खीचा वाटला. मी वळलो. तो भार्गव होता.
"तू ?" मी खुर्चीत कोसळलो.
"रिलॅक्स. वेटर, पाणी." वेटरने दिलेला ग्लास मी घोटात संपवला.
"मीट माय फियान्सी, तन्वी." भार्गवचा आवाज. मी ऐकत होतो." हे सार पैशांसाठी. आम्हाला दोघांना त्यांची गरज होती. हे सालं मिडलक्लास आयुष्य किती दिवस जगायचं ? तुम्ही दिलेला सल्ला त्यांनी मला सांगितला व मी तो अमलात आणला. ठरल्याप्रमाणे तन्वी त्यांना नेटवर, मग इथे भेटली. तन्वी त्याच्या विभावरी सारखी दिसते हा प्लसपॉईंट. सगळ सुरळीत झालं. त्या रात्री त्यांनी तिच्याबरोबर जंगी प्लान आखला. सगळ्या नोकरांना सुट्टी. ते हिच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. म्हातार्‍याला रंग चढला होता. पण त्या रात्री त्यांच्या आधी मी तिथे पोहोचलो. आम्हाला दोघांना त्यांनी एकत्र पाहीलं आणि तन्वीच्या विश्वासघाताचा धक्का ते सहन करू शकले नाहीत. कोसळले. आम्ही खात्री केली. मग तन्वीने तुम्हाला फोन केला व मी निघून गेलो.
"म्हणजे त्यांना गोळ्या घ्यायची संधी पण मिळाली नाही." मला त्या जवळ पडलेल्या गोळ्या आठवल्या.
"नाही. कारण गोळ्या तन्वीकडे होत्या. त्या नंतर तिथे ठेवल्या." भार्गवने समोरच्या पेप्सीच्या ग्लासात बर्फ टाकला. मी मात्र इथे पुर्ण थंड झालो होतो. आता याच्यावर गुन्हा दाखल करावा तर कसा ? ऐकीव माहीतीवर कॉर्ट शिक्षा करते काय ? एनीवन लिसनिंग ????

गुलमोहर: 

छान आहे कथा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तु माझ्या असण्याचा अंशअंश
तु माझ्या नसण्याचा मधुर दंश.....

छान आहे

कधी कधी कथा ही सत्यात उतरते...
Sad

दिसलीस तू...फुलले ॠतू..................

पैशासाठी माणसाची मजल कुठपर्यंत जाऊ शकते याला काही मर्यादाच उरली नाहिए. Sad

कथा छान आहे, आवडली...

ए, काय चाललय काय? कौतुक? ऑ? Happy
छान लिहितोयस रे. गुंगुन रहावं असं..... काहीही.
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया

कथा आवडली.. गुंगवून टाकणारी तरीही वेगवान. Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
The only thing bad about Holiday is it is followed by a Non Holiday..
Happy

छान आहे कथा
-----------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

कौतुक तुझे किति कौतुक करु?

छान आहे कथा

खूप आवडली कथा. असले कायद्याच्या कचाट्यात कधीही न सापडू शकणारे गुन्हे पावलोपावली घडत असतात. उदा. एखाद्या लग्नाळू मुलाची माहिती मुलीकडले (किंवा उलटही) काढायला जातात तेव्हा ज्या व्यक्तीची खरी माहिती असुनही ती सांगितली जात नाही म्हणजे व्यसने, आधिचे संबंध etc. तेव्हा समोरची व्यक्ती त्यावर विश्वासून पुढचे पाऊल टाकते व तिच्या आयुष्याचा घात होतो. या पुढे घटस्फोट होऊ शकतो पण चुकीची माहिती मुद्दामहून देणार्‍या व्यक्तीला कुठलेही कोर्ट शिक्षा देऊ शकत नाही Sad

असो, वरील कथेतील गुन्हेगार किंवा अश्याच इतर गुन्हेगारांचे इथले कोर्ट काहिही करु शकत नसले तरी "त्या"च्या कोर्टात कुणीच सुटू शकत नाही कारण "तो" पुर्णपणे न्यायी असतो. Happy

कसंतरी झालं पोटात शेवटचं भार्गव चं बोलणं वाचताना.. कल्पनाही केली नव्हती मी.. अनपेक्षित धक्का बसला मला.. सुंदर लिहिली आहेस गोष्ट..

कौतुक सुरेख लिहिली आहेस कथा.
मला जुन्या घरौंदा या सिनेमाची आठवण झाली.
कथा खूप मिळतीजुळती आहे.

काय पण धक्का आहे हा? सुंदर आणि वेगवान!!!!!
झकास!!!!!!
Happy योगेश Happy
======

कौतुक छान लिहिलय! एकदम चक्रादेनेवाला ट्विस्ट!

थँस टू योगेश, नाही तर मी मिसलीच असती!

खुप छान कथा कौतुक, खुप आवडली

सुमेधा पुनकर Happy
**************************************
पतंग्यानेच का जावं आगीजवळ ?
ज्योतीला सांग, नमन कर ना एकदा
**************************************

उत्तम....... पन एखादया सिनेम्यासारखि वाटलि....

कौतुक छान मांडलीत कथा. आवडलीच. खरच असं होत असेल नाही? सत्य कल्पनेपेक्षा भयंकर असतं.