बाबाची कहाणी...

Submitted by dreamgirl on 1 July, 2010 - 07:45

मदर्स डे पाठोपाठ येतो फादर्स डे. यावेळी तो २० जूनला होता.

"पापा कहते है बडा नाम करेगा
बेटा हमारा ऐसा काम करेगा..."

मुलाच्या जन्माच्याही आधीपासून आपली अधूरी स्वप्ने त्याच्या भविष्याच्या रूपाने पाहणार्‍या वडीलांबद्दल मुलाच्या मनात धाकाबरोबरच काहीशी अढीही असते. काळानुसार हा धाक आणि ही अढी मित्रत्वाच्या स्निग्ध नात्यामध्ये घोळून काहीशी साजूक बनली आहे.

पूर्वीच्या काळी वडील म्हणजे मूर्तीमंत दैत्य वाटत असे. ओसरीवर चपलांची चाहूल लागताच आत दंगा करणारी पोरेटोरे एकदम चिडीचिप होऊन जात असत. गरमागरम जेवणाचे घास बकाबक कोंबणार्‍या चुकार पोराला नुकतेच जेवून ओसरीवर वा झोपाळ्यावर विसावलेल्या अन ढेकराबरोबरच प्रगतीची पृच्छा करणार्‍या वडीलांच्या धाकाने दोन घास कमीच जात.

तिन्हीसांजा व्हायच्या आत घराकडे परतायचं असा अलिखित तेव्हा सर्वच बाळगोपाळांसाठी असायचा. मुलगा-मुलगी असा भेद तेथे नसे. मग दिवेलागणीची वेळ टळूनही एखादं पोरटं घरी परतलं नसेल तर त्याच्या वडीलांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरं कसं जायचं या विचाराने कावरीबावरी झालेली आई बिचारी अस्वस्थपणे येरझार्‍या घाले. वडीलांच्या घरी यायच्या वेळेआधी पोरगं उगवलं तर वाचलं नाहीतर आधी त्याच्या काळजीने ओसरीवर अस्वस्थपणे येरझार्‍या मारणार्‍या बापाच्या अंगात क्रोधपिशाश्चाचा संचार कधी होईल ते कळतही नसे आणि मग वडीलांच्या क्रोधताडनाच्या तडाख्यातून पोराला वाचवण्यासाठी आईची कोण तारांबळ उडे...

कोणीही न शिकवता अवचित ओठी येणार्‍या बाप रे! मध्ये बापाचा धाक आणि आई गं! यात आईचं कळवळणारं ह्रदय दडलेलं असतं.
ठेच लागल्यानंतरच्या वेदनेसह अस्फूट बाहेर पडणारे "आई गं!" शब्द हळूवार फुंकर घालून त्या वेदनेची ठसठस कमी करतात तसंच भीती वाटल्यावर आपसूक निघणारे "बाप रे!" हे शब्द त्या भीतीमधून धीर देणारा बाबांचा हात डोक्यावरून अलगद फिरवतात.

आईच्या वात्सल्याविषयी, ममतेविषयी साहित्यिकांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे, त्यामानाने बाबा हा प्राणी काही अंशी दुर्लक्षितच राहीला आहे. साहित्यिकच कशाला सर्वसामान्यपणे बाबा या व्यक्तीकडे पाहण्याचा समाजमानसाचा दृष्टीकोन - कुटुंबाच्या चरितार्थ अर्थार्जन करणे आणि वेळप्रसंगी कुटुंबाचे संरक्षण करणे एवढाच मर्यादित आहे. समाजाच्या या दृष्टीकोनाने बापाला कुटुंबप्रमुखाचं बिरूद मिरवण्यासाठी जरी चिकटवलं असलं तरी प्रेमाच्या भावभावनांच्या ओलाव्यापासून काहीसं अलिप्तच ठेवलं गेलंय.

वास्तविक आई जेव्हा तुम्हाला जन्माला घालत असताना अतीव वेदनांशी झुंजत असते तेव्हा तेवढ्याच अस्वस्थपणे काळजीने बाहेर येरझार्‍या घालणारा बापच असतो. तेव्हा बापाच्या धाकाच्या मागे लपलेलं अपार प्रेम, काळजी तुम्हाला जाणवत नाही.
तुमच्या शिक्षणासाठी काबाडकष्ट करून स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला सर्व सुखसोयी उपलब्ध करून देणारा बापच असतो... पण ते तर बापाचं कर्तव्यच असतं अशा स्वर्थी विचारामुळे बापाचं प्रेम तुमच्यासाठी अगम्यच राहतं.

आपली स्वप्ने आपल्या मुलांच्या रूपाने पूर्ण होण्याची आस बाळगणारा बाप असतो पण ते तुम्हाला त्याच्या अपेक्षांचं जोखड वाटतं.
बापाच्या नजरेत तरळणारा तुमच्याविषयीचा अभिमान तुम्हाला जाणवतही नाही कारण तेव्हा तुम्ही उत्तरोत्तर प्रगतीची शिखरे सर करण्यात मग्न असता. मुलीच्या लग्नात मंगलाष्टका संपेपर्यंत डोळ्यांतील पाणी पापण्यांआड दडवून ठेवणारा, आणि मुलगी सासरी निघाली की मग लहान मुलासारखा ढसाढसा रडणाराही बापच असतो.. एरवी कोणाहीसमोर आपली मान न झुकवणारा पुरूष मुलीचा बाप असेल तर मात्र मुलीच्या सुखासाठी तो वेळोवेळी नमतं घेतो. सर्व वधूपिते हे सिंधूच्या बापाप्रमाणे दुर्लक्षित, उपेक्षित, उपकृत आणि केविलवाणे भासतात.

पण सुदैवाने आता परिस्थिती बदलू लागलेय. शिकलेल्या सिंधू आपल्या बापाला उपेक्षित न ठेवता योग्य तो मान मिळवून देऊ लागल्या आहेत. बापाच्या धाकाची जागा आपुलकी, मैत्री आणि सामंजस्य घेताहेत. वयाची आणि संवादाची दरी अस्पष्ट होऊ लागलेय. "अहो बाबा"ची जागा "ए बाबा"ने पटकावली आहे.
संदीप खरे यांनी आपल्या "दमलेल्या बाबाची कहाणी" या कवितेत समस्त मुंबईकर नोकरदार बाबांची कथा, व्यथा आणि हतबलता अतिशय तरल आणि भावूकपणे वर्णिली आहे की डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय राहत नाहीत.

लोकल ट्रेन्सचा गर्दीचा प्रवास, उशीरापर्यंतचं ऑफीसमधील काम या जंजाळात अडकलेला बाबा आपल्या चिमुकलीला वेळच देऊ शकत नाही मग तो या गाण्यातून चक्क तिची माफी मागतो. मुलगी आणि बाबांचं नातं हे खूप लाघवी आणि हळवं असतं. 'शब्दावीण संवादु' असावं तसं, अव्यक्त तरी खूप काही बोलून जाणारं! मुलीसाठी वडील हाच एकमेव आदर्श पुरूष असतो. मग ती आयुष्याच्या जोडीदारातही वडीलांच्या दिसण्याचं, वागण्याचं, व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब शोधू लागते आणि ज्या पुरूषात हे साधर्म्य आढळेल त्याला आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडते.

लग्नाळू मुलगी ही तिच्या वडीलांच्या दृष्टीने फार मोठी जोखीम असते. कधी एकदा मुलीला सुस्थळी आणि योग्य हाती सोपवतोय आणि आपण आपल्या या जबाबदारीतून पार पडतोय ही चिंता असंख्य वधूपित्यांना भेडसावत असते.
पण जसजसा लग्नाचा दिवस जवळ येतो तसतसा हाच वधूपिता हळवा होतो. आपल्या काळजाचा तुकडा दुसर्‍याच्या हाती सोपवतोय, ते तिला नीट वागवतील ना? इथल्यासारखा हट्ट तिने केला तर अल्लड समजून तिला माफ करतील ना? तिला इथल्यापेक्षा जास्त सुखात ठेवतील ना? या नव्या चिंता त्यांना भेडसावायला लागते आणि जेव्हा त्याला कळते की आपली मुलगी सासरी फार फार सुखात आहे तेव्हा त्या बापाला धन्य धन्य वाटते.

मुलगा वयात येऊ लागला की वडील त्याचा सगळ्यात जवळचा मित्र बनतात. त्याच्या शंकाकुशंका निरसन करणारा, त्याच्या मनातील संदेहांना त्याला समजतील अशा प्रकारे उत्तरे देणारा, त्याच्या अडचणी ऐकून आणि समजून घेणारा, त्यातून योग्य तो तोडगा सुचविणारा, त्याच्या नैराश्याच्या काळात उभारी देणारा, त्याची गुपितं शेअर करणारा, त्याचे आनंद द्विगुणीत करणारा, साम-दाम-दंड वापरून मुलाच्या घसरणार्‍या पाऊलाला सावरणारा... बाबाची अनेक रूपे आहेत.

जाहीरातींमध्ये मुलगा आणि वडील यांचं भावविश्व अप्रतिम साकारलेले आढळते. अप्सरा पेन्सीलच्या जाहीरातीतील वडील मुलाला शाळेतून घरी आणताना मुलाच्या नुकत्याच मिळालेल्या प्रगतीपुस्तकावरील गुणांची चर्चा करीत असतात. मुलगा गणितात १०० पैकी १०५ मिळाले असे सार्थ अभिमानाने सांगतो. वडील मिश्किलपणे उद्गारतात,"तुमच्या शिक्षिकेचं गणित जरा जास्तच खराब दिसतंय...". मुलगा मोठ्या आत्मविश्वासाने उत्तरतो, "किंवा माझं हस्ताक्षर जरा जास्तच छान आहे..."
"तुमचं हस्ताक्षर..." मुलगा मिश्कीलीने वडीलांना विचारतो आणि वडील त्याला लटके दटावतात. वडील आणि मुलगा यांच्यातील मित्रत्वाच्या नात्याचं अतिशय बोलकं उदाहरण!

अशाच एका कारच्या जाहीरातीमधील मुलाला एका विषयात खूपच कमी मार्क्स मिळतात. मुलगा हिरमुसतो. त्याला शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठी गाडी घेऊन आलेल्या बाबांना मुलाचा हिरमुसलेला चेहरा पाहून वाईट वाटते. मग ते त्याची समजूत काढण्यासाठी एक छान क्लुप्ती काढतात. घरी जाण्याऐवजी त्याला एका लाँग ड्राईव्हवर घेऊन जातात आणि जाता जाता अवघड वाटणार्‍या त्या विषयावर चर्चा करून त्या विषयाचा बागुलबुवा घालवतात.

मुलगी आणि बाबा यावरील जाहीरातींमध्ये संदीप खरे यांच्या कवितेतील बाबाप्रमाणे हे वडीलही आपल्या मुलीला,"सासुरला जाता जाता उंबरठ्याम्ध्ये बाबासाठी डोळ्यांमध्ये येईल का पाणी..?" अशी पृच्छा करताना आढळतात.
खरंच बाप आणि मूल यांच्यामध्ये एक अव्यक्त अतूट हळवा बंध असतो, जो मुलाला आयुष्याच्या प्रवासात निरंतर साथ करतो... कधी संस्कारांच्या आणि तत्वांच्या रूपात, कधी खंबीर आधारवडाच्या रूपात, कधी घसरण्यार्‍या पाऊलाला सावरणार्‍या धाकाच्या रूपात तर कधी आदर्शांच्या रूपात!

गुलमोहर: 

dreamgirl, तुझ्या लेखनावर माझी पहिली प्रतिक्रिया हं...म्हणून पटकन लिहिली. शाब्बास मुली Happy
दुसरी शाबासकीची थाप देईन तुझं ललित वाचून झाल्यावर!

dreamgirl, मस्त लिहिलायस गं हा बाबांवरचा निबंध... बाबांविषयी इतक्या तरलतेने त्यांची मुलगीच लिहू शकते. Happy
माझ्या सुदैवाने मला पण बाबांच्या रुपाने एक मित्रच लाभला आहे. एकदम जिवाभावाचा मित्र. शाळेतून आले की सगळ्या गंमती-जमती कधी एकदा माझ्या बाबाला सांगते असं व्हायचं मला. हो, माझा बाबाच! त्याला नाही आवडत आम्ही आहो-जाहो केलेलं. आईला अगं, तर मला का आहो? असा युक्तिवाद करुन त्याने आमचं आहो-जाहो अरे-तुरे मधे बदललं.
अजुनही मी माझ्या बाबाला सगळ्या गंमती-जमती सांगत असते. अगदी माबोवरच्या सुद्धा Happy

ऋयाम Happy
कधी पासून मी dreamgirl च्या मागे लागले आहे, 'लिही, लिही' म्हणून. आज तिने लिहिले, म्हणून मी एक्साईट होऊन पहिली प्रतिक्रिया लिहिली. नेहमी नेहमी असं काही करत नाही मी Happy

सानी, ऋयाम... मनापासून धन्यवाद... तुम्ही सगळेच खूप छान लिहीता, मला काही एवढं नाही लिहीत येत छान वगैरे... मनात तर हजारो विचार येत असतात... पण त्यांना शब्दांचं मूर्तस्वरूप देताना बाचकत होते... आणि सानी ने सांगितल्याप्रमाणे विचार केलेला काय हरकत आहे, पण मला माबो वर ते ऑप्शन नाही मिळालं आपले लेख संपादन न करता साठवून ठेवता येतोय का ते... पण असो, एकदाची केली हिंमत... सानी करा बरं का त्रास सहन Happy

असं छान छान सहन करावं लागत असेल, तर माझी हरकत नाही नेहमी करायला.
आणि आहे की तो ऑप्शन.... जेव्हा लेखन करतेस, तेव्हा त्याच्या शेवटी
साहित्य लेखन स्थिती :
संपूर्ण (प्रकाशन करण्यायोग्य)
अपूर्ण (इतक्यात प्रकाशन नको)

असे दोन पर्याय आहेत. त्यातला दुसरा पर्याय निवडलास तर तुझं लेखन प्रकाशित न होता फक्त तुला accessible राहील.

खुप छान लिहीलंय..काही काळ आधी ह्याच विषयावरचा एक अफलातुन लेख मेल मधुन फिरत होता...तेव्हा ह्यावर भरपुर सारासार विचार करुन डोळे ओलावले होते..आज पुन्हा असंच झालं...

खूप छान लिहिलेय.बाबा आणि लेकीतील बाँडिंग मी रोज अनुभवते आहे.माझी लेक नेहमी रडताना बाबा म्हणूनच रडते.माझ्याशी पटते तिचे पण बाबा म्हणजे जीव की प्राण.

>>> खूप छान लिहिलेय.बाबा आणि लेकीतील बाँडिंग मी रोज अनुभवते आहे.माझी लेक नेहमी रडताना बाबा म्हणूनच रडते.माझ्याशी पटते तिचे पण बाबा म्हणजे जीव की प्राण.
सेम पि.ंच
माझी माऊ सुद्धा रडताना बाबा म्हणुनच रडते... Happy

नक्षी, चंपक, एक फूल धन्यवाद Happy

फुला, माझ्यापण आत्ता आता पर्यंत नव्हता लक्षात आला... काही संदर्भ असेच जाणवत जातात... अचानक सापडतात... Happy धन्यवाद!