नातं

Submitted by कौतुक शिरोडकर on 29 September, 2008 - 07:09

पार्लेश्वर नेहमीप्रमाणे आजही गजबजलेलं होतं. त्यातल्या त्यात मंगळवारी सायंकाळी सातची वेळ म्हणजे निव्वळ लगबगीची वेळ. ही गर्दी पार्लेकरांनाच काय, कोणत्याही जाणकार मुंबईकराला नवीन नाही. गुरूवारी साईमंदिरात व मंगळवारी पार्लेश्वरात..अशी वार लावून देवदर्शन घेणार्‍यांची कमतरता नाही. पण त्यात त्यांचाही काय दोष म्हणा. या धावपळीच्या जगात जिथे स्वतःसाठी वेळ नसतो, तिथे देवासाठी आवर्जून वेळ काढायचा म्हणजे थोडं कठीणच !

कोपर्‍यातला नेहमीचा बेंच अडवता-अडवता देसाईनी सभोवार नजर टाकली. खरतर देवळात येऊन देवदर्शन घ्यायचं म्हणजे निवांतपणा हा हवाच. पण इथे प्रत्येकाच्या हालचालीतील घाई काही लपत नव्हती. निवांत विसावलेले देहही अधूनमधून घड्याळाच्या काट्याकडे लक्ष देत होते.
"घाई हा आम्हा मुंबईकरांचा स्थायीभावचं. इथे विश्रांतीतही एक घाईच." देसाईंनी माणसं न्याहाळताना सर्वसामान्य मुंबईकरांचा सिद्धांत मनाशी मांडला.

देसाई पन्नाशी ओलांडून सुस्तावलेले. दररोज सायंकाळी सातपर्यंत पार्लेश्वरात पोहोचण्याचा त्यांचा शिरस्ता अलिकडचाच. काही वर्षांचाच. शक्यतो ते यात खंड पाडत नव्हते. दुकानातील वर्दळ मुलाच्या हाती सोपवून ते त्वरेने पार्लेश्वरला पोहोचत. थोड्याफार फरकाने पंत ही त्यांच्यामागून तिथे येत. पण तुर्तास तरी पंताचा मागमूस नव्हता.

किंचीत मागे रेलत त्यांनी काठी शेजारी टेकवली. अजूनही ताठ असलेले देसाई काठी का घेतात हे त्यांच त्यांनाच ठाऊक! कदाचित सोबतीची सवय असावी.

आपल्या नुकत्याच मांडलेल्या सिद्धांताच्या पडताळणीसाठी ते भाविकांची लगबग न्याहाळू लागले. जवळपासचे सगळे बेंच त्याच्या समवयस्कांनी अडवलेले. एखाद-दुसरा तरूण जोडप्याचा अपवाद वगळता.. पुढच्याच बेंचवर बसलेले वॄद्ध जोडपे पाहताच त्यांना शारदा आठवली. दोन वर्षे होत आली तिला जाऊन. नुसत्या आठवणींनी डोळे पाणावले. त्यांनी डोळे मिटले आणि खारे थेंब हलकेच ओघळले. या आठवणींच वागणं किती विचित्र असते. कांद्यासारखं. एकामागोमाग एक पाकळी खुडत गेल्यावर शेवटी हातात काहीच उरत नाही पण डोळ्यातलं पाणी मात्र मनाच्या बांधाला न जुमानता वहात राहतं. सतत भिजवत.
"काय नाना, आज एकटेच ?'' हाकेसरशी त्यांनी डोळे उघडले व लगोलग पुसलेही. मनाचा हा दुबळेपणा त्यांना पसंत नव्हता व तो इतरांच्या दॄष्टीस पडू नये याचाही ते आटोकाट प्रयत्न करत.
"काय नाना, आज एकटेच का ?'' पलिकडच्या बेंचवर, नेहमीच्या गोतावळ्यात स्थिरावलेले काणेकर त्यांना हाक मारून गेले होते. बसता-बसता काणेकरांनी देसाईंच्या दिशेने हात हलवला. किंचीत हसून देसाईंनी त्याना हातानेच प्रतिसाद दिला आणि प्रवेशद्वारावर नजर टाकली.

समोरच्या बुथवरून पंताना फोन करावा का ?.. क्षणात हा विचार अनाहूत पाहूण्यासारखा मनात डोकावला. पण त्यांनी तो झटकला. चार-पाच जण आधीच तिथे रांग लावून होते. त्यांची नजर प्रांगणात फिरली. चपलांच्या स्टँडजवळ कुजबुजणारा मुलींचा घोळका, शेजारीच बदामाच्या पायथ्याशी ..चौथर्‍यावर बसून.. बुटांच्या नाड्या बांधण्याच्या मिषाने भिरभिरणार्‍या तरूण नजरा, पलिकडे गप्पांच गुर्‍हाळ मांडून बसलेला सासूरवाशिणींचा थवा, देवळात चाललेल्या प्रवचनाचा अदांज घेत स्वतःशीच पुटपुटणार्‍या वॄद्धा, एखाद-दुसरी नववधू, दर्शनास जाणारी जोडपी..काही प्रेमात पडलेली तर काही संसारात. मंदिराच्या प्रांगणातील ते उत्साही जग त्यांना सुखावत होते.
"देवा, गजानना, हा आनंद, हा उत्साह चिरकाल टिकू दे." त्यांनी बसल्या जागेवरून हात जोडून श्रींकडे पसायदान मागितलं.

"अमितsssअमित..." लटक्या रागाने, किंचितसा स्वर चढवून, दुडूदुडू धावणार्‍या अमितच्या मागे बाजारातल्या नानजीभाईंची सून धावली. देसाईंनी डोळे उघडले. त्याचवेळेस पंत आत येताना दिसले.
"पंत, आज उशीरसा केलात ?" पंत विसावण्याआधीच देसाईंचा प्रश्न.
"झाला. व्हायचाच.." पंतानी हातातली काठी देसाईंच्या काठीच्या सोबतीस ठेवली व ते मागच्या बाजूस रेलले.
"म्हटलं आज येताय की नाही ?" पंताच्या स्वरातील वेगळेपण जाणवूनही देसाईंनी मघापासून घोळणारी शंका बोलून संभाषण पुढे रेटलं.
"येणारच नव्हतो. मग म्ह्टल, करावं तरी काय ? जायचं तरी कुठे ? शेवटी त्याच्याकडेच जायचयं, तेव्हा आतापासूनच सवय केलेली बरी ." नेहमीचे मिश्किल पंत आज फार हतबल वाटले देसाईंना.
अलीकडे पंताना वार्धक्याची जाणिव जास्तचं होतेय हे जाणलं होतं देसाईंनी. शरीराआधी मन थकलं की होतं असं. मागच्या वर्षी त्यांनी आग्रहाने पंताची साठी साजरी केली. खरं तर पंताना ही हिरक महोत्सवाची कल्पना पसंत नव्हती.
"अजूनही आपण जिवंत आहोत, याचा आनंद मरणाच्या उंबरठ्यावर का साजरा करावा ?" हा त्यांचा सवाल. त्यांच्या दृष्टीकोनातून रास्त असा. पण तरीही देसाईंचा हट्ट व इतरांच्या इच्छांना मान देऊन ते तयार झाले. त्यावेळेस देसाई बोलावयास उभे राहीले व म्हणाले," पंतानी आज साठी पुर्ण केली, आता त्यांनी शतकपुर्ती करावी हीच माझी त्या पार्लेश्वराकडे प्रार्थना." तेव्हा." नाना, पार्लेश्वराने जर तुमची इच्छा खरोखरचं पुर्ण केली तर...." पंत एवढं बोलून थांबले होते. ते अर्धवट वाक्य देसाईंच्या मनात प्रश्नांचे काहूर माजवून गेले. उंबर्‍यावर पंत म्हणालेही," नाना, तुमच्या दुकानात थोडी जागा ठेवा अडगळीच्या सामानासाठी. " पंताच्या मुलाच्या व सुनेच्या दिलखुलास पाहूणचार्‍याने भारावलेले देसाई परतीच्या वाटेवर त्या वाक्याचा अर्थ शोधत राहीले.

"मुर्खपणा निव्वळ, दुसरं काय ?" काणेकरांचा चिडलेला आवाज देसाईंना पुन्हा पार्लेश्वरात घेऊन आला. "मी सांगतो तेच खरं. अहो, या सरकारला अक्कल ही नाहीच. " राजकारण हा काणेकरांचा आवडता व वादाचा विषय. त्यांच्याकाळी सर्व आलबेल होते, हे पुन्हा-पुन्हा सांगण्यात ते धन्यता मानत. कोणत्याही सरकारला अक्कल ही नसतेच, हा त्यांचाच जावईशोध आणि या निमित्ताने ते इतक्या तावातावाने बोलत की पाहणार्‍याला वाटावं, ते आपली भांडणाची हौस भागवताहेत.

देसाई पंताकडे वळले. पंत दुडदुडणार्‍या अमितकडे पहात होते.
"मुलं मोठी का होतात ?" उत्तराची कोणतीही अपेक्षा न बाळगता पंत अमितवरची नजर न हलवता स्वत:शीच बोलले. पंताचं नक्की काय बिनसलय याचा देसाईंना अंदाज लागेना. पंताच्या एकुलत्या एका मुलाकडून त्यांना काही त्रास वगैरे..? छे..छे !! शक्य नाही. देसाई स्वत:चेच अंदाज खोडत होते.
"पंत." देसाईंच्या हाकेवर पंतानी फक्त हुंकार भरला. अमित एव्हाना देवळात दिसेनासा झालेला, पण पंताची नजर अजून तेथेच होती, काहीतरी शोधत असल्यासारखी.
"महिना होत आला नाही नागपुराहून येऊन ? " देसाईंनी विषयांतरासाठी पंताची महिन्याभरापुर्वीची नागपुर भेट उकरली.
"या दहाला होईल." पंत देसाईंकडे वळले. देसाईंना हायसं वाटलं.
"नागपुर आणि मुंबई म्हणजे बरीच तफावत नाही का पंत ?" देसाईनी धागा धरत पुढे पाऊल टाकलं.
"तफावत कसली नाना ? शहरं बदललं, रस्ते बदलले, चेहरे बदलले तरी सभोवतालची माणसं तिच ना. अनोळखी चेहरे तर सगळीकडे सारखेच. त्यांच्या असण्यानसण्याने फरक तो काय पडणार ? ओळखीची माणसं बदलली तर कदाचित वाटलं असतं की आपण घर बदललय म्हणून" पंता॑चा आजचा सुरच वेगळा होता.
"मी समजलो नाही, पंत " देसाईंना या सुरामागचा अर्थ उमगला नव्हता.
"त्यासाठी वार्धक्य यावं लागतं नाना. निव्वळ वय वाढल्याने वार्धक्य येत नाही. ते तेव्हाच येते जेव्हा इतर त्याची जाणिव करून देतात. वार्धक्यात जेव्हा आधाराची काठीसुद्धा वाकते ना, तेव्हा मात्र आयुष्यात मांडलेल्या सार्‍या गणितांची उकल कराविशी वाटते. " पंताच्या बोलण्यात गूढ वाढत होतं.
पंत देसाईंना दहा वर्षानी सिनियर. पंताच्या वेदनेचे कारण जाणून घेणे देसाईच्या गरजेचे होते. पंताना नेमकी कुठे ठेच लागलीय हे कळलं तर आपल्याला शहाणं होता येईल, हा एकच विचार त्यांच्या पुढच्या प्रश्नात होता.
" पंत, मला नेहमी वाटतं की तुम्ही काहीतरी लपवताय. मनाचा असा कोंडमारा बरा नव्हे, पंत." देसाईंच्या स्वरातला आपलेपणा पंताना स्पर्शून गेला. बालपणी दुरावलेल्या एखाद्या जिवलगाने आस्थेने येऊन पोळलेल्या मनावर फुंकर घातली असं वाटलं पंताना.
"नाना, काही माणसं दुधासारखी असतात. वर वर असते ती हवीहवीशी वाटणारी सुखाची साय. त्या पांघरूणखाली दडून असते ती दु:खाची वाफ. आपले चटके आपणच सोसायचे. जेव्हा ही कोंडलेली वाफ अनावर होते, तेव्हा सुखाची साय ओसंडून उतू जाते आणि उकळत्या मनाची जाण होते. " पंताच्या सुस्कार्‍यात देसाईंना खंत जाणवली.
कोणतं हलाहल आहे पंताच्या मनात ? वार्धक्याची व्याधी की घरात कलह ?
"छे ! पंताचा सरळमार्गी मुलगा त्यांना घालून पाडून काही बोलणेच शक्य नाही." देसाई स्वतःशीच पुटपुटले. देसाईंची विचारशृखला पंतानी तोडली.

"आमच्या ऑफिसात एक वल्ली होता. राजाराम साने. अजब रसायन. नेहमी त्याचा हात वर. इतरांसाठी खस्ता खाण्यात आणि लष्कराच्या भाकर्‍या भाजण्य्यत तोच पुढे. चारचौघाप्रमाणे मीही त्याला बरेच फुकट सल्ले द्यायचो. म्हणायचो, 'साने थोडे जमवून ठेवा.' मग साने हसून म्हणायचा,' कोण नेणार ते सोबत ?' साने गेला. निवांतपणे. चटका लावून. तेव्हा चार लाकडांपुरतेही पैसे नव्हते त्याच्या मोकळ्या हातात. नाना, आयुष्यभरात एक नवा पैसा जोडला नाही त्या माणसाने. पण माणसं जोडली. ती अमर्याद मानवी साखळी उभी राहीली आणि त्याच्या मोडक्या संसाराला हातभार लागला. माणसं जोडायला हवीत हे शिकवून गेला साने. पण तोवर फार उशीर झाला. नाना, माणसं जोडायला हवी होती. शेवटी तिच उपयोगी पडतात." सानेची आठवण पंताना हेलावून गेली. देसाईपण गलबलले. देवळात आरती सुरू झाली. दोघानी बसल्या जागेवरूनच नमस्कार केला.
"पंत, आज असं निर्वाणीच का बोलताय ? आभाळ भरलं की अंधार दाटतोच. गडगडू द्या या निराशेच्या ढगांना. बरसून जाऊ द्या सार्‍या वेदना. तेवढच आभाळ निरभ्र होईल." देसाईंच्या स्वरात आपुलकीचा ओलावा होता.
"नाना, मला कधी साने नाही होता आलं. त्याच्यासारखा माझा हा हात नेहमी वर नाही राहीला. फक्त एकच. मी, माझं घर, माझी मुलं, माझी माणसं, एक चौकोन. त्यापलीकडे काही नाही. जणू त्या स्वार्थाच्या चौकटीबाहेर जग हे नव्हतचं. सम्पुर्ण आयुष्य एखाद्या सुरवंटासारखं. स्वतःच्याच कोषात." पंत बोलु लागले आणि देसाईंना जाणवलं की त्याच्या जखमेवरची खपली निघतेय.
"पण पंत तुम्ही चुकलात असं तुम्हाला का वाटते ? सर्वसामान्य संसारी माणूस हेच करतो. सानेप्रमाणे स्वतःचा संसार वार्‍यावर सोडून जगाची चिंता वाहण्यात काय अर्थ ? मला सांगा, त्याच्या मुलांच भवितव्य काय ? निव्वळ शुन्य. वडील या नात्याने सानेने मुलांसाठी काहीच केलं नाही. ज्यांना चोच दिली त्यांना घास नको का द्यायला ? सगळ्यांना संत नाही होता येत. जो तो तुकोबाचा वसा घेऊन भजनाला लागला तर त्या विठोबाने तरी कुठे कुठे पहायचं ? " देसाईंनी प्रापंचिक व्यवहाराचं सुत्र मांडलं.
" साने परिपुर्ण होता असं नाही म्हणत मी. पण कुठेतरी काहीतरी नक्कीच चुकलं माझं. " पंत पुन्हा त्याच प्रश्नात गुरफटले.
"पंत, एक जबाबदार पिता व समजूतदार पती म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य केलतं. एका स्वयंपुर्ण, समाधानी घराशिवाय आणखी काय हवं असते आयुष्यात ? " देसाई पंताना त्यांची भुमिका किती अचूक होती ते पटवून देत होते.
"नाना, तुमचं पटतय. पैशाने जे जे घेता येत ते सारं घरात आलं. पण नुसत्या सजवण्याने घराला घरपण येत नाही. घर माणसांनी बनते. परस्परातील रेशमी बंधानी बनते. पण जेव्हा व्यवहार हेच नातं रहातं तेव्हा कर्तव्याचं डबडं वाजवून प्रेमाचं दान मागावं लागतं." पंत महत्प्रयासाने मन मोकळं करत होते.
"पंत, या उतारवयात आयुष्याचा आलेख फलदायी न वाटण्याइतपत झालय तरी काय ?" पंत अजूनही राखून बोलताहेत हे देसाईंनी पुरेपुर जाणलं.
"नाना, त्यांनी मागितलं व मी दिलं. यात पैसा हाच दुवा झाला आमच्यात. मुलगा "मोठा' व्हाव हे स्वप्न पुर्ण झालं. मी जेवढं रिटायरमेंटला घेतलं नव्हतं तेवढं तो एकावेळी घेतो. जमवलेलं सर्म आज त्याच्या नावावर आहे. " पंताचे डोळे पाणावले.
"मग चुकलं कोठे पंत ? " देसाईंच्या कातर स्वरात अनामिक भीती होती. वार्धक्याच्या त्या वाटसरूलाही मुलगा होताच.
"इतकेच की आजसुद्धा माझा मुलगा मला माझ्या पेन्शनच्या पैशांचा हिशोब विचारतो. शेवटी हे एकच नातं उरलं आमच्यात" पंतानी पाणावलेले डोळे मिटून घेतले व ते मागे रेलले. देसाईंचे सगळे प्रश्न संपले होते.

देवळात टाळ - झांजाचा सूर टिपेला पोहोचला होता. माणसांची लगबग अजुनही होती. दुडुदुडू धावणार्‍या अमितच्या मागे त्याची आई धावत होती. काणेकर राजकारणाच्या नव्या व्याख्या सांगत होते. घाई नेहमीसारखीच सर्वांच्या सोबतीस होती.

गुलमोहर: 

चटका लावणारि आहे! आवडलि.

पैशाचं नातं.....

*************************************************************
मनापासुन.............मनापर्यंत
*************************************************************
प्रिया

सुंदर लिहिलं आहे.

"अजूनही आपण जिवंत आहोत, याचा आनंद मरणाच्या उंबरठ्यावर का साजरा करावा ?" \

"नाना, काही माणसं दुधासारखी असतात. वर वर असते ती हवीहवीशी वाटणारी सुखाची साय. त्या पांघरूणखाली दडून असते ती दु:खाची वाफ. आपले चटके आपणच सोसायचे. जेव्हा ही कोंडलेली वाफ अनावर होते, तेव्हा सुखाची साय ओसंडून उतू जाते आणि उकळत्या मनाची जाण होते.

छान लिहिलय फारच! आवडल

कौतुक,
तुम्ही छानच लिहीली आहे कथा.. Happy आवडली...
>>पण जेव्हा व्यवहार हेच नातं रहातं तेव्हा कर्तव्याचं डबडं वाजवून प्रेमाचं दान मागावं लागतं>> Sad

कौतुक, खूप छान लिहितोयस.... खूप म्हणजे खूपच. अनेक ठिकाणी मी परत थांबून वाचलं... त्यातही शब्द बंबाळ न करता... सहजपणा आहे, समोर घडल्यासारखं.
बहोत खूब!
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया

अतिशय हॄदयस्पर्शी कथा आहे... दुधातली वाफ.. कर्तव्याचं ड्बडं.. कांदा.. सग्गळं सग्गळं मनापासून पटलं.. असेच लिहीत रहा.. तुम्हाला पुढील लेखनास शुभेच्छा!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
The only thing bad about Holiday is it is followed by a Non Holiday..
Happy

ठिकठिक...
> त्यातही शब्द बंबाळ न करता... सहजपणा आहे, समोर घडल्यासारखं. > शब्दबम्बाळ आहे (तसं असायला माझी हरकत नाही) ते पंत ज्या भाषेत बोलतायत तसं कोणी बोलतं का खऱ्या आयुष्यात Lol

नाना, काही माणसं दुधासारखी असतात. वर वर असते ती हवीहवीशी वाटणारी सुखाची साय. त्या पांघरूणखाली दडून असते ती दु:खाची वाफ.

सुंदरच लिहिलंय. मस्तच कथा.